Wednesday, June 30, 2010

शाश्वत कंटाळ्याच्या माळरानावर

शब्द असे अडकले आहेत, दिवस थबकून बसला आहे
कंटाळ्याची गोधडी पांघरुन
थिजला आहे पाउस तट्ट फुगलेल्या ढगात
रात्र संपली केव्हा तर्र होऊन
केव्हा उगवला नियमित सूर्य

तीच तीच गाणी, तेच उतू जाण शब्दांचं
नवे काही सापडावे असं शिल्लक आहे का काही
ह्या खोलवर मानवी खोदकामात

खूप दूरच्या प्रश्नांचे ओरखडे आहेत शब्दांवर
वांझोट्या जाणीवा आणि नपुंसक आव्हाने
एकटेपणाने केला आहे खोलवर वार
मला दुसरं माणूस हि एक कल्पना वाटू लागलीये

आता उत्खनन करावं थोडं
आपल्याच आत शोधावा हडप्पा
कुठे लागतोय पाहावा का कातळ
किंवा अजून न सापडलेला झरा

शब्दांमध्ये अडकलेली अव्यक्त स्पेस
अर्धाविरामात गुदमरलेली एक्सप्रेशन्स
यांना जरा मलमपट्टी करावी

चार फुले वाहावीत जुन्या कवितांच्या स्मृतीस्तम्भावर
आठवणी जपण्याची सनातन रूढी
प्रोजेक्ट कराव्यात न जगता आलेल्या शक्यता
द्यावा त्यांना रोमेंटिक लूक
निशाण ठोकावे नवनिर्मितीचे
शाश्वत कंटाळ्याच्या माळरानावर

Tuesday, June 29, 2010

मिणमिण

गर्दीच्या लोंढ्याबरोबर अपोआप तो स्टेशनावर उतरला. ह्याच्याआधी अनंत वेळेला आलेले त्याप्रमाणे का आपण असे चिलटसारखे जगतो आहोत असा विचार त्याच्या मनात आला. मग त्याने आता अगदी ताबडतोब येणारा विचारांचा ताफा रोखला आणि गर्दीत सामील होत, पाकीट आणि मोबाईल सांभाळत तो चालायला लागला. पडत्या पावलांबरोबर त्याचे विचारही लय पकडू लागले. जाऊन कोण कोण मित्रांना भेटायचे आहे हे तो ठरवू लागला. स्टेशनाबाहेर जाणार्या जिन्यावर खूपच माणसे एकवटली होती. आणि सगळ्यांना आधीच बाहेर पडायचा होतं. तो सावकाश गर्दीच्या कडेला उभं राहून रेटारेट करणाऱ्या माणसाना पाहू लागला. एक वृद्ध जोडपं कडेकडेने पुढे सरकू पहात होतं. एका बाईने तिच्या आजारी आणि मंद मुलाला खांद्यावर घेतला होतं आणि हतबलतेने समोरच्या माणसांकडे पहात ती उभी होती. त्याला परत उबल्यासारखा वाटायला लागलं. त्याच्या बाजूने एक ऑफिसहून आलेला त्याच्या एवढ्याच वयाचा तरुण कानात हेडफोन दाबून आणि मग्रुरीने त्याला धक्का देऊन पुढे गेला. त्याला खेचून, हिसडून जरा बाचाबाची करावी असं वाटलं, पण तळवे घामेजण्यापलीकडे तो डंख फार टिकला नाही. मग फॉर्मल कपडे घातलेलं एक विवाहित जोडपं त्याच्या समोरून जात होतं. ती पुढे चालत होती आणि तो मागून तिला सांभाळत जात होता. तिच्या कपड्यातून दिसणाऱ्या कमनियतेकडे काही वेळ तो पहात राहीला, मग त्या दोघांच्या मागून चालणारा एक मध्यमवयीन माणूस असाच तिच्याकडे बघतो आहे हे पाहून त्याला स्वताची किळस आली. अजूनही... अजूनही असे आपण का बघतो असं प्रश्न त्याला पडला. मग त्याने तेवढ्यात बिथरू पाहणाऱ्या मनाला शांत करायला सुरुवात केली. गर्दी थोडी कमी झालेली. ती हतबल बाई चालू लागली होती, म्हातारे जोडपे टोकाशी पोचले होते. त्यानेही होईलतितकं अंग चोरत पण वेगाने पुढे जायला सुरुवात केली.
स्टेशनाबाहेर अंधार होता. आणि मागचे २-३ दिवस झालेल्या पावसाने सगळी चिखलाची रिपरिप होऊन गेलेली. रिक्षा मिळताच नव्हत्या. ज्या होत्या त्यात जे होते ते सगळे अटीतटीने चढत होते. एका ४० एक वर्षाच्या सुखवस्तू जाडसर बाईने समोरच्या थोड्या नेभळ्या तरुणाला ढुशी देत रिक्षाची कडेची सीट मिळवली. तो तरुण ह्या आकस्मिक हल्ल्यात बावरून त्या बाईकडे अन्यायाची दाद मागणाऱ्या काकुळ नजरेने पाहू लागलं. ती बाई आत जाऊन, 'काय बाई गर्दी आणि त्यात हे लाईट गेलेले' असे उस्कारे टाकत वितभर रुमालाने वारा घेऊ लागलेली. ह्यात उतरून पराक्रमाने रिक्षा मिळवण्यापेक्षा चालत रस्ता पकडावा ह्या विचाराने त्याने, त्या नेभळ्या तरूणापाठोपाठ चालायला सुरुवात केली.
भाजीवाल्यांचे आवाज, सडलेल्या भाज्यांचा वास, गाड्यांचे होर्न, माणसांचे संवाद, भजी, वडे यांच्या तळणाचा उद्दीपक वास, कडेला बसलेले गर्दुले, चेहरा रंगवून उभ्या असलेल्या वेश्या असं सगळं पहात तो चालत होता. त्याच्या पुढच्या नेभळ्या तरुणाने त्या अंधारात उठून दिसणाऱ्या रंगीत चेहेर्यांकडे क्षण- दोन क्षण पाहिलं आणि मग एकदम पुढे बघत तो निघून गेला. त्या बायांकडे बघून त्याला कामाठीपुर्यात जायचा आजवर अधुरं असलेला प्लान आठवला. मग परत मगाशी आली तशी स्वतःची किळस त्याला आली. अजून आपण असे वासनांचे गुलाम आहोत असं उदात्त वाक्य त्याच्या मनात यायला लागलं. पण त्याचवेळी 'ह्यात काय चूक आहे? मागची १०-११ वर्षे जे शरीरात सळसळता आहे त्याला प्रतिसाद दिला तर काय चूक? ' असा प्रतिस्पर्धी विचार आणि त्यासोबत तिथे गेलं कि नेमकं काय असा तपशीलही त्याच्या मनात यायला लागला. त्या बाया मागे पडून आता तो एका गल्लीतून जायला लागलेला. त्याच्या पुढे २ मुली लो वेस्ट जीन्स आणि शरीराच्या वळणाना तलम स्पर्श देणारे टि-शर्टस घालून चालल्या होत्या. त्याने त्यांच्यावर थोडीही न संकोचता नजर फिरवायला सुरुवात केली. अशीच खेचावी का एखादीला? निदान या अंधाराचा फायदा घेऊन त्यांना कुस्कारणारा स्पर्श तरी करावा का? आणि मग एकदम भोवळ यावी तसे हे विचार गळून तो नुसताच चालायला लागला. यातली पुरुष म्हणून असणारी नैसर्गिक स्त्रीची ओढ किती आणि मागची १०-१२ वर्ष पाहिलेल्या, वाचलेल्या कथा आणि सिनेमांच्या कान्डीशानिंगचं भाग किती असं आता एकदम त्याला वाटू लागलं. म्हणजे हे काय आजच वाटतं नाहीये. त्याला एका क्षणी असं वाटण्यात काही गैर वाटलं नाही. मनात काहीही येवो, आपण असं काही करत तर नाही ना असं उत्तेजनार्थ बक्षीसही त्याने स्वतःला दिला. पण असं वाटतंच का? माजावर आलेल्या बैलासारखा येईल त्याला शिंगांवर घ्यावं, मनसोक्त चरावा , आणि मग जुगावं असं सणसणीत पाशवी भाव त्याला जाणवू लागले. त्या रस्त्याच्या मधोमधच आत्ता कोणालातरी गचांडी धरून बुकलवा, आपणही चार ठोसे खावे, मग कोणीतरी येऊन त्या जखमांवर फुंकर घालणारा स्पर्श करावा आणि मग..... मग काय? बस १५-२० मिनिटांचा बेभान वेळ, मग एक अनोळखी गर्ता, मग शरीरात अडकून पडलेल्या स्वतःचा झिडकार, हेच, हेच ना? मान खाली घालून तो चालू लागला. त्याला आता 'कोसला' आठवत होता. ''ती गेली. तिच्याबरोबर तिचे इवलेसे गर्भाशय गेले. खानेसुमारीची एक मोठ्ठी ओळ वाचली.' हे डोक्यात गेलेलं वाक्य त्याला आठवलं. आपणही असे आधीच मेलो असतो तर अशा रेताड, वांझ विचारांची भुणभुण तरी वाचली असती असं वाक्य त्याला वाटू लागलं. अशी वाक्य वाटण्याचा त्रास त्याला बरेच दिवसापासून वाटत होता. म्हणजे काही वाचलं कि तीच फ्रेम घेऊन जगाचा अन्वयार्थ लावायचा. सगळं दिसणं आणि असणं त्यात कोंबून भरायचं. वाक्य मनात घोलावयाची. आठवायची. सांगायची. लिहिणार्यांच्या आणि स्वतःच्या आयुष्यात बादरायण संगती जोडायच्या. आणि मग काही दिवस कुठलंच पुस्तक किंवा सिनेमा पाहणं थांबवायचा. म्हणजे आपण दिवसेंदिवस त्याच एका चक्रात फिरतो आहोत. जितके बाहेर येवू म्हणतो तितके नव्या नव्या प्रकाराने अडकतच आहोत. स्वतःशीच बोलायचं, स्वतःचाच आवाज ऐकायचा आणि अर्थात सभोवतालचा जो काय येईल तो आवाज आणि कशावरही अर्थाचा रंग फसायचं नाही असा बेफाम निश्चय करून तो समोर बघून चालायला लागला. खरा म्हणजे त्याला आता एकदम सात्विक वगेरे वाटू लागलं होता, गीतेतल्या काही ओळी वगेरे आठवत होत्या. पण असं काहीही वाटणं कृत्रिमच आहे असा ठाम फटकारा देऊन तो परत एक निर्विकार बघणारा व्हायचा प्रयत्न करू लागला. आता नवीनच प्रकार त्याच्या डोक्यात सुरु झाला. समोर जे दिसेल ते तो जसं काही मनातल्या मनात जोराने बोलत होता. मग असं स्वतःलाच सांगताना शब्द हवेत कशाला असं वाटून तो थेट अनुभूती अनुभवण्याचा थोर प्रयत्न करू लागला. थोड्याच वेळात तो थकला.
बाकीची माणसा कशी काही ना काही उद्दिष्ट घेऊन चालत आहेत. त्यांचा त्यांचा संसार चालवणं हि एक फार मोठी कलाच त्यांना जमली आहे. त्याला पण एकदम कर्ता पुरुष वगेरे व्हावा असं वाटू लागलं. अगदी पै-पै करून पैसे वाचवावेत, घरी जाताना काही घेऊन जावं, इकडे तिकडे पैसे गुंतवू लागावेत असं एकदमच घरगुती त्याला वाटू लागलं. आणि कितीही आखूड वाटलं तरी असं आपल्या माणसाना धरून राहणं हाच की तो खरा विरंगुळा इतपत सिद्धता त्यांच्या मनात येऊ लागली. या नवजात स्थिरतेत तरंगत असतानाच त्याचं लक्ष समोर चाललेल्या जोडीकडे गेलं. गर्दीचे धक्के वाचवताना त्याच्या अंगालाही स्पर्श होणार नाही अशी कसरत करत ती चालली होती. तिला गर्दीत नीट चालता यावं असं प्रयत्न करत, खरतर तिचं एखादं चोरटा स्पर्श मिळावा असं इरादा पण त्याचवेळी तिला ते आवडणार नाही अशा भीतीने अंग चोरत तो चालला होता. तेवढ्यात बाजूने असेच एक तो आणि ती असलेली बाईक जाऊ लागली. बाईक वरील ती त्याला बिलगून, एक हात त्याच्या खांद्यावर ठेवून बसली होती. तो आपण या गर्दीतल्या अनेकांच्या हेव्याचे केंद्र आहोत ह्या सुखद जाणीवेत ऐटीत बाईक चालवत होता. तिचे गाल त्याच्या मानेला स्पर्श करत होते. मधेच ती काही कुजबुजायची आणि दोघे हसायचे. त्या बाईककडे बघताना चालणारे तो आणि ती एका क्षणी थांबूनच गेले. समोरून येणाऱ्या रिक्षेने होर्न दिला आणि तो बेसावधपणे चालतो आहे असं वाटून तिने पटकन त्याचा हात पकडून त्याला बाजूला खेचले. शहराल्यागत दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, तिने एकदम ओठात हसत आणि गालात लाजत मान खाली घातली आणि तिच्या अजून काढून घ्यायच्या राहिलेल्या दोन बोटांत आपली दोन बोटं अडकवून तो चालायलालागला.
नवजात सिद्धता केव्हाची ओघळून पडली होती. त्याला आता अगदीच एकटा वाटू लागलं. आणि हे एकटेपण ह्या अंगावर येत चालेल्या शहरात अगदीच रुतत चाललं आहे असं त्याला जाणवू लागलं. बाकी काही नाही, पण या गर्दीत बोट पकडून चालता येण्यासारखं, फोनवर बोलत राहण्यासारखं, किंवा शांतपणे सोबत बसता येण्यासारखं कोणीतरी असायलाच हवं एवढं एकच त्याला वाटायला लागलं. आणि असं कोणी नाही हाच एक आपल्या सार्या दोलायामानतेचा मुलभूत उगम आहे हे त्याने ठरवून टाकलं. पण मग आता हा उगम कशा प्रकारात संगम करावा असा प्रश्न त्याला पडला. आणि हे सतत प्रश्नच पडत आहेत, कारण आपण प्रत्येक प्रश्नाची साल सोलत त्यात नवे प्रश्न पाडून घेत आहोत असा अगदीच दारुण शोध त्याला लागला. आणि तो चालत राहीला खरा, पण हे चालणं आणि विचार हे दोन्ही कुठेही न जाणारे आहेतअसा शेवट त्याने करून टाकला.
गुंतून पडण्यासारखा काही यायला हवं होता. म्हणजे एखादं वाद्य, बोटात एखादी कला किंवा मग वेड्यासारखा गणित. म्हणजे जिकडे तिकडे ते वेडच फक्त. त्यात अर्थ आहे का नाही अशा नपुंसक तर्कीकतेपेक्षा करण्याचा निखळ आनंद का नाही? कशावर विश्वास नसण्याच्या अधांतरापेक्षा एखाद का होईना पण जुळलेला आणि विचारांनी न पोखरलेला धागा ठेवायला हवा होता. ज्याला प्रश्न विचारताच येणार नाही असं काही पण जे जाणवेल माझं म्हणून. लहानपणी संध्याकाळी खेळून घरी आला कि आईने लावलेल्या समईच्या ज्योतीकडे बघून कसं आश्वस्त वाटायचं, मग ती ज्योत रात्री विझण्याआधी फडफडताना दिसली कि कसं त्यात लगबगीने तेल घालायचं आणि मगती ज्योत परत तिच्या शांततेत तिच्या भोवतालचा इवलासा आसमंत निर्धाराने उजळून द्यायची.
तो घरापर्यंत पोचला. दारापाशीच बसलेल्या आजीकडे बघून त्याला अजून पिचल्यागत वाटलं. आजीचा चेहेरा मागे टाकत, चपला काढत तो सैपाकघरात पोचला. आई अजून आली नसल्याने अंधार होता. त्याने पायावर पाणी घेतलं. चेहेर्यावर पाणी मारलं. देव्हार्यात झिरोचा दिवा अशक्तपणे तेवत होता. त्याने समई घेतली. वातीवरची काजळी काढली. समईमध्ये तेल घातलं. समई देव्हार्यात ठेवली. काडेपेटी घेवून त्याने वातीपाशी काडी पेटवली. वात पेटली आणि क्षण- दोन क्षणात त्याच जुन्या सवयीच्या शांततेने ज्योत तेवू लागली. बाजूचा अंधार तसाच होता पण त्या तेवढ्याश्या एका कोपर्यात एक आश्वस्त स्निग्धता होती. काडेपेटी जागेवर ठेवून तो देव्हार्यासमोर आला आणि समोरच्या ज्योतीकडे बघत, मायाळू भूतकाळ आणि बोचाकारणारे येणारे दिवस यांच्या मध्ये उरलेल्या त्या ओळखीच्या प्रकाशाकडे पहात बसला.

Saturday, June 26, 2010

पुन्हा पावसालाच सांगायचे

हि शेवटचीच रात्र. ते दूर शहराचे दिवे चमचमतायेत. पाउस पडतोय, कधीच, आणि धारांच्या पडद्याआड दूरवर पसरलेलं हे शहर. पण हे माझं गाव नाही ग. मी ओळखत नाही इथे कोणाला. रस्त्यातून चालताना शोधत चालतो, तुझा चेहेरा, तुझ्या चेहेर्यावर माझ्यासाठी असणारी ओळख. तू खरंच ओळखतेस ना मला? मला प्रश्न पडतो हा आजकाल, म्हणजे इथे एक पक्षी मरून पडलेला काल, आणि मग झाडावर उगाच कल्लोळ होता कोणीतरी हरवल्याचा. त्यांना जाणवत असेल ना कोणी एक कमी आहे. पण कोणी येऊन थांबत नाही त्या मेलेल्या पक्ष्याच्या शवापाशी. फक्त उद्ध्वस्त हाका ऐकू येतात फडफडीत लपलेल्या. आणि संध्याकाळ उगाच अजून दाटत जाते.... ओळखतेस ना तू मला?
आणि गातंय कोणीतरी, का मीच गातोय? uncertain narrator झालोय मी. म्हणजे मी सांगतोय त्यावर नंतर माझाच विश्वास बसत नाही. मीच आधी लिहिलेल्या कविता वाचतो तेव्हा वाटतं हे लिहिणारा माणूस कुठे गेला? नदीचा काठ प्रवाहाने क्षरण होत जावा तशी झीज होतीये माझी, आणि तीही पार पेशी-पेशीतून. वरकरणी हसतो मी तसा, पण पोकळ होत चाललोय आतून. कुणाशीही बोललो कि थोडावेळ तिथेच थांबतो मी. दुसरं माणूस गेलं कि तिथे उरलेल्या आवाजांना कोणीतरी सांभाळायला हवं ना... आपलेच शब्द का कोणी इतके पोरके सोडतं ?
मोठा झाड होतं घरासमोर. उन्हातून जाताना हाक मारून सावलीत घेणारं. एक संध्याकाळी त्याला तोडायला सुरुवात केली. खूप घाव घातल्यावर झाड हलायला लागला, आणि मग त्याच्या फांद्यात, ढोलीत अडकलेले पक्षी उडायला लागले. आणि त्यांना माहीतच नव्हतं कुठे जायचय. फिरून तिथेच परतायचे. यायचे तोवर त्यांची घरटी तुटलेली असायची. मग आक्रोश त्यांचा. तेव्हाही पाउस होता. मग पावसात भिजणारे बेघर पक्षी मिळेल त्या आडोशाला थांबले, सकाळी झाड नव्हताच तिथे. त्याचं न उखडता आलेलं मूळ तेवढं उरलं होतं. आता खूप मोठा रस्ता आहे, धूळ आहे, आवाज आहे, झाडाची वाळली पानं आता अंगणात येऊन थांबत नाहीत, ना झुळूक येतेशीळ घालत. त्या पक्ष्यांचा आवाज तेवढा उरला आहे, कुठल्याच शब्दांत न लिहिता येणारा.
आठवणींचा तर केवढा तरी गोंधळ आहे. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या जाणवणार कि सकाळ काही खरी नाही, कुठेतरी आत्ता संध्याकाळ पण असणार. पाऊसही खरा नाही, कुठेतरी आत्ता नुसतंच कोरडं आकाश असणार. मग मी काखरा आहे? कुठेतरी अशी वेळ असणार जिथे मी नाहीच आहे? यात आठवणी कुठे आल्या म्हणा? पण, आता जे वाटतय ते एकदम पुढच्या क्षणी आठवण होऊन जातं ना?
जपून जगत असतात इथे सगळे. म्हणजे केव्हातरी हसतात, अगदी वेड्यासारखे... पण बहुतेकदा ते पहात असतात कि त्यांच्या सोबत जे आहे ते कसं टिकत राहील, वाढत राहील? मग त्यांना काही हसता येत नाही.
हे काही पत्र नाही तुला लिहिलेलं. आणि हा आत्मचरीत्रातला उतारा पण नाहीये माझ्या. हे काय आहे तेवढं विचारू नकोस....
सगळेच पुढे निघून गेलेत, आणि मी म्हटलं कि येतो मागून सावकाश. पण आता असं वाटतंय कि चालताना सोबत हवं कुणीतरी. नाहीतर एका जागी थांबलो काय, किंवा चाललो काय. कशाच्यातरी सापेक्षच एकूण हा जगण्याचा खटाटोप आहे. आता हे अगदीच philosophical होऊ लागलं. म्हणजे आपल्याच पायात प्रश्नचिन्ह अडकवून घ्यायचा प्रकार, आणि मग जिकडे जाऊ तिकडे प्रश्न, हे असं का, हे तसं का?
आणि केवढं लिहून ठेवलाय? सगळीच दुख आणि सुख गाळून त्याचा अर्क एव्हाना उतरवून झाला असेल. पण तरी दुसर्या कोणाचा काही आपल्याला जगता येतच नाही. उगाच काही वांझ भास जाणवतात , पण शेवटी हाडा-मासाचा जगणं हेवेगळंच....
बर झालं कि तू नाहीयेस इथे....नाहीतर अशी शकलं सांभाळता सांभाळता काय उरली असतीस तू? सारं सौंदर्य कुरुपतेच्या गृहीतकावरच उभं असतं ना?
अजूनही ओळखतेस तू मला.... माणसे का एकमेकांना एवढी धरून राहतात...
एक गृहस्थ राहायचे आमच्या शेजारी.... त्यांना एक मंदबुद्धी मुलगा होता... त्याला दररोज संध्याकाळी फिरायला घेऊन जायचे. वाटेत भेटणार्यांची ओळख करून द्यायचे. मग तो हसायचा. त्या हसण्यात ओळख नसायची, पण दुरावाही नाही. फेन्गाडे फेन्गाडे हात-पाय सांभाळत बापाचा हात धरून चालायचा तो. आणि तिरकस कुठेतरी आकाशात बघायचा. पाय ओढायचा, बापाच्या खांद्यावर लाळ गाळायचा. देवळात देवाकडे पाठ करून हात जोडायचा. मग बाप फिरवून मूर्तीकडे तोंड करायचा. मग मेला तो एकदा. मग तो बापही आक्रसत गेला. म्हणजे त्याचं जगायचं प्रयोजनच संपलं असावं. ते दुख तरी का होईना त्याला धरून जगता येत होतं, त्या पोराला जन्म दिलेली बायको तर मेली, तिची हि अशी आठवण, तीही गेली..... मग? एक दिवशी तो माणूस गेला. पण म्हणजे आता कोणीच दिसत नाही रस्त्यात असं नाही. आत अजून एक माणूस चालतो, गोरापान, उमदा, आणि त्याचं बोट पकडून तशीच एक तिरकस नजर. कशाशीही हेवादावा नसलेली.....
मलाही आहेत आई-बाप. आणि मध्ये-मध्ये ते आठवतात मला. आजकाल बाप जास्त आठवतो. म्हणजे मी होऊ शकलो तरी बापच होऊ शकतो म्हणून कदाचित. किंवा लहानपणी बाप एवढा आठवला नसावा त्याची भरपाई म्हणून. लंगडतो आता. मला पुस्तक आणता आणता साले त्याचे पाय तेवढे झिजले रस्त्यात, त्याच्या खांद्यांना घत्ते पडले. कधीच आयुष्याला नजर भिडवली नाही त्याने, आणि मोठा झालाच नाही कधी. मग मरेल आता एक दिवशी. तेव्हा खूप रडेन मी, म्हणून आत्ताच लिहितो काय...
असं सगळं आहे.. म्हणजे होतंच....
आता जातो काय... असेच एकदा जात होतो... रिक्षात बसून...आई आणि मी...एकदम एक ६-७ वर्षाची मुलगी आली...हातात मोगर्याचे ताजे गजरे...'ताई ,घ्या ना, ताई ताजा आहे, ताई एकतरी घ्या ना. सकाळपासून एक पण गेला नाही ताई, एक घ्या ना ताई..' कदाचित शिकवला असेल तिला असं बोलायला. पण म्हणून मला तिला खोटं नाही पाडता येत... अजून रस्त्यात भिक मागणारा कुणी दिसलं कितीच आठवते... असं लाचार का होतं कुणी...
पण मी असाच निघून जातो.... म्हणजे तसं तू कधीचच सारं आवरून ठेवलं आहेस...पण मी असा आठवणींच्याच पडक्या राज्यात रमलोय....
पाउस पडतोय... आणि आता गाण्याच्याही शेवटच्या ओळी आहेत.....
या पावसाचा जमाखर्च मांडून घेशील तेव्हा तुला काय आठवेल? तू तरीही ओळखशील मला?
पाउस आता स्पर्शतोय मला....केसात, खांद्यावर, पाठीशी.... पावलात.... डोळ्यांमध्ये आहे तोही पाऊसच समज.....

Thursday, June 24, 2010

केव्हातरी

एकमेकांना ऐकवत होतो थेंबांचे आवाज
तुझ्या माझ्यातल्या अंतरात पावसाची धून होती
केव्हातरी तो थांबणार होताच बरसायचा
केव्हातरी ओल्या मातीतल्या खुणा पुसायाच्याच होत्या

पेलवणार नाही जगण्याला एवढं स्वप्नांचं ओझं
पायांनी केव्हाच स्वीकारलेलं अधांतर
केव्हातरी मौन गाठणार शब्दांना
केव्हातरी कवितांना मनातच थांबवायचे होते

Wednesday, June 23, 2010

नेमेचि

थोड्या वेळापूर्वी इथे
हवेला ओला शहारा होता,
तरल थेंबांच्या पडद्याआड लपलं होतं शहर
रस्ता होता ओलाकच्च
माणसे लपली होती छत्र्या रेनकोटच्या आड
कुणी एकटा उगाच भिजणारा उनाड
उजेडाचा नव्हता कुठलाच ठसा
विजेचाच तेवढा क्षणभंगुर दृक-श्राव्य प्रयोग

आता, रस्यावर उरलेल्या डबक्यात तेवढे
पावसाचे वारस तग धरून आहेत
बाकीचे वाहून गेले गटारातून
रस्त्यानेही ओली ओळख सुकवून घेतलीये
आता सत्तेवर आलेल्या विरळ सूर्यकिरणात
ढगानी घेतलीये मुत्सद्दी माघार आणि
दूरच्या डोंगरांच्या आड दबा धरून आहेत
छत्र्या मिटत माणसे चालू लागलीयेत गपगुमान
झाडांनी पांघरालय नव्या उन्हाचा सदरा
मनसोक्त अंघोळीनंतर

आता हे ढग अजून कुठे बरसत असतील
वार्याच्या भुलावणीला हुरळून
हे कुठचे दूर देशाचे वारे
दरवर्षी हिमालयाची भिंत तोडू पाहतात
आणि करत राहतात धिंगाणा दरसाल येणाऱ्या अपयशाचा
आधी पळवतात ओलावा समुद्राच्या अथांग निळाईवरून
आणि मग येन-केन नदी,नाले,ओढे बनवून परतवून टाकतात

होत आलंय असंच आपल्या बापजाद्यांनी डोळे उघडले त्याच्याही आधीपासून
हा मान्सून येताना त्या समुद्राच्या पोटातले शब्द घेऊन येत असावा
उगाच का एवढ्या पावसाळी कविता उगवून येतात
एका पावसाहून काय वेगळा असेल दुसरा, तिसरा किंवा हजारावा पाउस
कि दरवर्षी निघावं कवितांचा पिक

आता परत ढगांनी चालवलाय गनिमीकावा
शरणागतीच्या छत्र्या उघडतीलाच माणसे आता
मी सांभाळून आणतोय हे शब्द, न भिजवता
अर्थात भीती नाही,
हा नाही तर आहेच पुढचा पावसाळा....

११३ वर्षे आणि भुसभुशीत जाणीव

प्रत्येक काळात जगण्याकडे बघायची, स्वतःच्या आणि आपण ज्या समूहात स्वतःला identify करतो त्या समूहाच्या म्हणून असणाऱ्या जगण्याची एक धाटणी असते. प्रत्येक माणूस जरी असं विचार करून जगत नसलं तरी त्याच्या निर्णयांमध्ये त्याने हे implicit norms पकडलेले असतात. मला काय हवं आणि काय नको हे प्रत्येकजण स्वतःच्या बुद्धीने ठरवत नसतो, किंवा प्रत्येक गोष्टीत ठरवत नसतो. अशा वेळी त्या त्या काळात असणारे चांगल्या-वाईटचे निकष लावून निर्णय घेतला जातो. अर्थात हे निकष मान्य नसणारे कोणी ना कोणी समाजात असते. मग केवळ बंडखोरी म्हणून काही संकेत धुडकावून लावले जातात. काही वेळा 'मी हे का करतो आहे' ह्या मूलभूत प्रश्नाला साद घालून प्रस्थापित आणि दृढ वाटणार्या संकेत किंवा नियमांविरुद्ध काही जण वागतात. जेव्हा समाजातले काही स्वतःच्या कृतीतून, स्वतःला आलेल्या अनुभवातून नियम धुडकावण्याची किंवा समाजमान्य नसलेले आचरण करण्याची कृती करतात तेव्हा ताबडतोब समाज त्यांच्या पाठी उभं रहात नाही. पण समाज हा कधीही पूर्णपणे स्थिर अशा अवस्थेत नसतो. प्रत्येक माणूस हा त्याच्याभोवतीच्या बदलांचा धांडोळा घेतच असतो. त्या बदलांना दिले जाणारे प्रतिसाद माणसागणिक बदलत राहतात. अगदी ताबडतोब पचनी न पडणारे बदलही कालांतराने रुजतात कारण सर्वसामान्य माणूस किंवा त्या बंडखोरीला सहानभूती असणारे प्रस्थापित छोटे छोटे बदल घडवतात. समाजात होणारा बदल हि बहुतेकवेळा एक सलग चालणारी प्रक्रिया असते. त्यात सुरुवातीचे, समाजाचा रोषही पत्करू शकणारे जितके महत्वाचे असतात तितकेच हा रोष अंगावर न घेता शक्य तितके स्वतःला बदलत जाणारे आणि ह्या पहिल्या दोन टप्प्यांना पाहून जुन्या व्यवस्थेला शेवटचा धक्का देणारे अशा सगळ्यांनी बदल पूर्ण होतो किंवा नव्या बदलाकडे जातो. मागचा १५० वर्षात महाराष्ट्रातच घडलेल्या कुठल्याही सामाजिक बदलात हि प्रक्रिया दिसेल किंवा अजूनही घडत असेल. स्त्री-शिक्षण, अस्पृशता निर्मूलन, पर्यावरणाशी सुसंगत जीवनशैली, आंतरजातीय किवा विधवा पुनर-विवाह अशा अनेक ठळक सामाजिक बदलात या प्रक्रिया दिसतील.
'न्याय' हि एक भुसभुशीत संकल्पना आहे. तिची काल-किंवा स्थल निरपेक्ष व्याख्या करणे कठीण आहे. तसेच एखादी कृती हि अनेक बाह्य संदर्भांवरून आणि करणाऱ्याच्या हेतूनुसारही न्याय्य किंवा अन्याय्य ठरते. पण हि भुसभुशीत संकल्पना समाज सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाधिक सूक्ष्म नियम बनवून 'न्याय' आणि त्या अनुषंगाने माणसाचे deviant वर्तन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रयत्न कोण करतं? तर त्या त्या वेळी राज्य करणारी शासन व्यवस्था किंवा समूह. जर शासन व्यवस्था हि अंतिमतः लोकाभिमुख (answerable to people) असेल तर 'न्याय' हा भुसभुशीत असला तरी त्याला सामाजिक नेतृत्वाच्या सदसद्विवेकबुद्धीचा आधार मिळतो. जर शासन हे एखाद्या गटाच्या हितासाम्बंधाशी निगडीत असेल तर 'न्याय' नावाची भुसभुशीत जाणीव आणि सरकारी प्रक्रियेची ताकद यांची मिळून एक दलदल निर्माण होते. मग काहीजणांना स्वतःला त्यात रूतावतच, प्रसंगी विसर्जित करत, चालता येईल अशी जमीन बनवावी लागते. तत्वाद्यानाचा एवढा मोठा डोस द्यायचे कारण म्हणजे आज चाफेकर बंधूंनी केलेल्या Rand हत्येला ११३ वर्षे पूर्ण होत आहेत.
चाफेकारांचे हे कृत्य हा त्या वेळच्या समजत असणाऱ्या असंतोषाची परिणीती होती. जरी ह्या हत्येमागचे तात्कालिक कारण हे चाफेकरांचा वैयक्तिक क्षोभ हे असले तरी त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांवर शासन काही लादण्याचा प्रयत्न करत आहे, हि बाबही त्यांच्या क्षोभाला कारणीभूत होती. त्यांच्याकडे ब्रिटीशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेवून कोर्ट-कचेरी करण्याचा मार्ग होता. किंवा अन्य मार्गांनी स्वतःचा निषेध नोंदावायचाही विचार त्यांना करता आला असता. चाफेकरांनी हिंसा शेवटचा पर्याय म्हणून निवडली किंवा अन्य पर्यायांचा विचार न करता निवडली हे आज सांगता येणार नाही. पण मला ११३ वर्षानंतर ह्या घटनेच्या तपशिलाची चिकित्सा करायची नाही किंवा भूतकाळातून एक नवा नेता आणि पर्यायाने अनुयायांची आंधळी गर्दीही उभारायची नाही. मला महत्वाची वाटते ती चाफेकरांनी त्यांच्या भोवतालच्या घडामोडींना दिलेली प्रतिक्रिया. मला, मी ज्यांच्या सोबत जगतो आहे त्यांना, त्यांना मान्य असलेल्या पद्धतीप्रमाणे जागू न देता, त्यांच्या बळजबरीने बदल लादला जात असेल किंवा त्यांना बदल हवा असता करू दिला जात नसेल, त्यांच्या जगण्याच्या मूलभूत सुरक्षिततेलाच जर धोका निर्माण होत असेल आणि शासन ह्या सार्यात सहभागी असेल, निष्क्रिय किंवा जाणीवपूर्वक शिथिल असेल तर मला हि विस्कटलेली प्रक्रिया परत सुरळीत करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी हे केलं. असं करणारे ते काही पहीले नव्हते. आणि त्यामुळे हा त्यांच्या कृतीचे ढोल वाजवण्याचा प्रयत्न नाही. पण आज आपण काही विसरतो आहोत त्याची ह्या दिवसाचे निमित्त करून आठवण करून द्यायचा प्रयत्न आहे.
भोपाल वायूगळतीच्या खटल्याचा निकाल आणि त्यानंतरची धूळवड आपण वाचतो, पाहतो आणि विसरतो आहोत. २६ वर्षाच्या दिरंगाईनंतरही परत एकदा न्यायालायांचाच दरवाजा ठोठावला जात आहे. मला कोणत्याही मार्गाने हा न्यायसंस्थेवरचा विश्वास वगेरे वाटत नाही. हि शुद्ध हतबलता आहे. जेव्हा तथाकथित 'न्याय' ज्यांच्याकडून मिळतो तेच अन्यायाच्या उभारणीचे वाटेकरी असतात, तेव्हा स्वतःच्या सारासार विचाराने न्याय-अन्याय्य ठरवायचे असते. वायू गळतीत जे मेले ते परत येणार नाही आहेत. कंपनीच्या अधिकार्यांना शिक्षा व्हावी हि मागणी जरी रास्त असली तरी त्यात मृतांच्या नातलगांची सूडभावना किती आणि हि शिक्षा उदाहरण बनून असे निष्काळजीपणाचे प्रसंग टाळावेत असं विचार किती? जर सूड हवाच असेल तर तो काय न्यायालय घेऊन देणार नाही. तो ज्याला हवा आहे त्याने परिणामांची पर्वा न करता स्वतःच घ्यायला हवं. उधमसिंगने जालियानवाला बाग हत्याकांडाचा सूड घेताना रस्ता दाखवलाच आहे. आणि ११३ वर्षापूर्वी चाफेकरानीही. अशी हत्या, वैयक्तिक क्षोभातून केलेली राजकीय किंवा व्यापक सामाजिक सूडहत्या हि कितीही क्रूर वाटली तरी बेलगाम आणि स्वार्थी शासनावरचा शेवटच अंकुश तोच आहे. मुळात अशी हत्या हि अजूनही समाजातल्या दररोज शांतपणे जगणाऱ्या माणसाचे मन त्याच्या भवतालासाठी संवेदनशील आहे आणि वेळप्रसंग पडल्यास, हिंसेचा धाक म्हणून वापर करण्यास सिद्ध आहे ह्याची निदर्शक आहे. 'खटासी असावे खट, उद्धटसी उद्धट' ह्या व्यावहारिक सत्याचाच तो क्रूर अविष्कार आहे.
मी अशा रीतीने हिंसेचे समर्थन करतो आहे ते मी हि हिंसा अनावर होऊ शकते हे विसरून गेलो आहे म्हणून नाही. अनेकजण स्वतः घाबरत असतात आणि स्वतःचा भित्रेपणा लपवण्यासाठी हिंसा किंवा संघर्ष वाईट अशी भूमिका निर्माण करतात. ह्या on average घाबरटपणाचा फायदा घेऊनच काही थोडे जण अनेकांना वाकवत असतात. आपल्यातली हिंसा कुठेच गेलेली नाही. ती आपला मूळ भागच आहे. तिच्यात स्व-संरक्षणाची क्षमता आहे. कदाचित आता ह्या सुरक्षिततेची काळजी नसल्याने आपण हिंसेकडे एक कृत्रिम प्रवृत्ती म्हणून पहात असू तर तो आपल्या सुखासिनतेचा परिणाम झाला. स्वतःच्या आयुष्याची, नात्यांची किंवा सामाजिक स्थानाची, म्हणजे कशाचीच ओढ नसणारा निसंग माणूसच अहिंसक होऊ शकेल. बाकी जो कोणी समाजात आहे त्याने कुठल्या ना कुठल्या मार्गाने हिंसेला स्वीकारलेच आहे. पोलीस हे हिंसेचेच नियंत्रित रूप आहे (काही भागात अनियंत्रित!) शासन जर समाज टिकेल, मिळवेल आणि मिळवलेले टिकवून वाढवेल अशा प्रकाराने वागत नसेल तर असे शासन उलथून टाकावे लागते. सैद्धांतिक दृष्ट्या हे उलटणे मतपेटीद्वारे करावे लागते. पण प्रत्यक्षात शासन विविध स्तरावर आहे, एकच मतपेटी सारे स्तर बदलू शकत नाही आणि हे सारे स्तर सुसंघटीत नाहीत. निवडणुका आणि सत्ता टिकवण्यासाठी करावयाच्या उलाढालींचा खर्चच एवढा आहे कि उद्योगांना favor दिल्याशिवाय पक्ष चालूच शकणार नाहीत. आणि हि बाब भारतात नाही तर सर्वच देशांत लागू आहे. प्रश्न असं आहे कि अशा उलाढाली होताना त्यात अनेक सामान्य लोक चिरडले जातील अशा तडजोडी होऊ नयेत.
भोपाल वायू गळतीशी थोडीफार सारखी घटना मेक्सिकोच्या आखतात घडते आहे, ती म्हणजे बी.पी. च्या तेलाविहीरीच्या गळतीची. याविरुद्ध अमेरिकेत तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अध्यक्षांनी ठराविक मुदतीसाठी मेक्सिकोच्या अखातातील तेल काढण्याची प्रक्रिया बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बी.पी. कडून बंद पडणाऱ्या तेल विहिरीचे कर्मचारी, बेकार झालेले मच्छिमार आणि वेटर, किनारपट्टीचे नुकसान आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अपव्यय भरून काढण्यासाठी २० billion dollars घेण्यात येणार आहेत. फ्री मार्केट व्यवस्था लोकांचा विचार करत नाही असे नाही आणि अशी बरीच उदाहरणे देता येतील. अमेरिकेत असे घडू शकते कारण अशा घटनेनंतर तिथे माणसाच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून विचार केला जातो. अमेरिकन वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारे लेख पाहीले तर घटनेच्या किती बाजूंचा विचार मांडला जात आहे ते दिसतं. पण ह्या विचाराबरोबरच अशी कृती व्हावी म्हणून राजकीय दबावही निर्माण केला जातो. बी.पी. च्या C.E.O.ला अमेरिकन संसदेसमोर शपथेवर बोलावे लागते आणि Anderson भारत सरकारच्या विमानातून जातो. बी. पी. हि ब्रिटीश म्हणजे अमेरिकच्या पिल्लू देशातील कंपनी आहे आणि तरीही तिच्याकडून नुकसान वसूल केले जाईल असे बराक ओबामांनी म्हटले आहे. चीदम्बरमनी नुकसान भरपाई वाढवली आहे आणि ती सरकारच देणार आहे. Dow ने भरपाईची जबाबदारी घ्यायला नकारच दिला आहे. आणि त्याबद्दल सरकारकडून काहीही विधान नाही. हि चूक सरकारची नाही. आपली आहे. आपण प्रतिक्रिया द्यायला हवी. ज्या स्केलवर आपल्याला शक्य आहे तिथे. प्रतिक्रिया हि स्वतःला तोशीस पाडूनच द्यावी लागेल.
त्यात निदर्शने असतील, लिखाण असेल, भाषणे असतील, राजकारणात सहभाग असेल, अ-सरकारी संस्थांमध्ये काम असेल आणि निर्वाणीचा उपाय म्हणून 'गोंद्या आले रे' हि वापरायला लागेल.
भगत सिंगच्या डायरीमध्ये एक वाक्य होतं- I am a man and whatever affects mankind affects me. हि mankind म्हणजे समस्त मानवजात असली तरी तिचं सर्वात जवळचं रूप मी ज्यात जगतो तो भवताल असतो. आणि तो जगण्याला अनुरूप ठेवण्याची, त्याला विकसत ठेवण्याची जबाबदारी माझी असते. कोणी जर यात अडथळा आणत असेल तर तो दूर करण्यात मी सहभागी झालो पाहिजे. माझ्या कृतीतून मी विरोधाचे पर्याय निर्माण केले पाहिजेत.
झोपलेत माळ अजून तापवित काया
असंख्य ह्या नद्या अजून वाहतात वाया
अजून हे अपार दुख वाट पाहताहे
अजून हा प्रचंड देश भिक मागताहे
-केव्हातरी ह्या ओळी खोट्या ठरायला हव्यात....

Sunday, June 20, 2010

संध्याकाळच्या विखुरण्याची प्रक्रिया

कुठेतरी अडकून पडलेली आहे हि संध्याकाळ. काही पत्रं आलेली आहेत आणि त्यावरच्या अक्षरांची शाई काल रात्री जाळलेल्या स्वप्नांच्या काजळीतलीच आहे. वाचल्यावर समोर काहीच न दिसणारं राखाडी आकाश तेवढं आहे. दूर कुठेतरी क्षितिजाच्या रेघेपाशी उडत चाललेत पक्षी. ते जातील का जिथून हि पत्रं आली आहेत? ढगांनी दिवसाचा झळाळ केव्हाच झाकोळला होता. आणि अस्तरंगांची उधळणही त्यांनी सावळ्या पडद्याआड दडवून ठेवली आहे. कविताही वाचवत नाहीत. कविता संपल्यानंतर उरणारे विराण शहर, आणि ओळखीचे सारे कोपरे बोथट झालेत धुळीच्या वादळात. काल इथे काही मित्र बसले होते, एकजण सहज त्याच्या कविता म्हणत होता. त्याच्या कवितांची अक्षरे अजून आसपास विखुरलेली असावीत, पण एकट्याने लागणारा अर्थ वेगळा आणि कोणी ऐकताना लागणारा अर्थ वेगळा.
ग्रेसच्या कवितात त्याने संध्यासूक्त ओवूनच ठेवले आहे... नामविहीन व्याकूळ तालावर निनादणारे...
'हसतात माझे सगळे अवयव, स्वतःशीच, पृथकपणे.
प्रत्येकाची वेगळी साद ऐकू
येते मला.
संभवापूर्वीच गोळा करून ठेवले होते मी,
माझ्या निर्मितीचे पुरेसे क्षण. '

केव्हाचा सांगतो आहे माझ्या एकटेपणाचा अविभाज्य मंत्र तिला... आणि ती त्याला निरोपाची विराणी समजून बसते...

शहराने आता रात्रीच्या कृष्ण पटलावर तोडके रंग ओतायला सुरवात केली आहे.... पक्षी केव्हाचे फांद्यांवर ओथंबून बसले आहेत....रात्रीच्या भयाचे कंप त्यांच्या थरथरत्या पंखात....
कुठेच न पोचणारे शब्द मी त्या पडझडीच्या अवशेषात सोडून देतो...उत्खननात सापडतील तेव्हा शब्दांना सांजभूल येण्याची प्रक्रिया ते विशद करतील.....

Cannery Rows

आठवणींचा कचरा होतो असं म्हणून गेलाय कुणीतरी. इतके लोक लिहितायेत, आणि त्या लिखाणापाठी त्यांच्या जगण्याच्या अनुभवातून, त्यांच्या स्वतःच्या अनुभवांकडे बघण्याच्या चौकटीतून काय काय जन्माला येतंय. Illusions मध्ये जो मसीहा असतो तो म्हणतो कि आपला भूतकाळच आपण भविष्य म्हणून प्रोजेक्ट करत असतो. म्हणजे जसा आपण आपल्या भूतकाळाचा अर्थ लावतो, त्याच्याकडे बघण्याची जागा आणि अन्तर बदलत राहतो तसं आपल्या भोवतालच्या सार्या घडण्याचा किंवा न घडणार्याचा अर्थही बदलत राहतो. अगदी आपलं असं, किमान माणसांच्या बाबतीत तरी मला काहीच मत किंवा वाटणं नसावं. जे आहे ते कुठेतरी मी साठवलेल्या आणि नव्याने भर पडत राहणाऱ्या अनुभवांच्या साठ्याकडे पाहून ठरवलेलंच आहे. म्हणजे हवामान खताच्या किंवा एखाद्या फिल्ड वर्कारच्या विश्लेषानासारखा. जे पाहिलं, नोंदवलं त्यात दिसणाऱ्या patterns वरून काढलेला अर्थ. जर जे दिसलंय त्या सोबत अजून काही दिसलं असतं तर कदाचित वाटतंय त्यापेक्षा वेगळं वाटलं असतं. म्हणजे एखाद्या अफाट समुद्रात तरंगणाऱ्या तराफ्यावरच उभा आहे मी आणि त्या प्रवाहपतित अवस्थेत मी प्रवाहाचा अर्थ लावू पाहतोय. Camus म्हणूनच सगळ्याला absurdity म्हणून गेला असावा. नाहीतर काय म्हणणार? काही म्हटलं कि त्यापेक्षा वेगळं असं काही आहेच. मग काय म्हणायचा? किंवा जे काही ते आपल्यापुरतंच खरं आहे असं डिसक्लेमर लावायचा जिथे तिथे आणि सापडल्याच्या आनंदात मश्गुल रहायचं. छान!
म्हणून बरेच जण अशा अर्थाच्या भानगडीत पडत नसावेत. आणि मला वाटलं ते लिहिलं असं अंग झटकूनही टाकता येत नाही. माझ्यापुरतं असेल तर मुळात माझ्याबाहेर कागदावर का उतरवलं? स्वतःच्या आत उमटलेले शब्द स्वतःच्या आतल्या अंधारात दिसत नाहीत म्हणून इतरांच्या असण्याचा उजेड वापरायचा आणि वर म्हणायचा कि हे माझ्यापुरतं! मला नाही जमत. आणि बाकी बर्याच जणांना जमत नसावं. मी हे का करतो आहे हा प्रश्न पडताना मी त्या देहापुरता मर्यादित नाही उरत. तो आपल्या साऱ्यांमध्ये असणाऱ्या आदिम सारखेपणाला असणारा सामूहिक प्रश्न असतो. मी का आहे, तो का आहे आणि आपण सगळे का आहोत? वयाने विस्तारत जाते जाणीव. आणि तितकीच ती जाणीव व्यक्त करण्याची, त्या जाणिवेशी जुळणारा, तिला अजून फुलवणारा आणि ह्या जाणीवेच्या मुळांचा शोध आनंदी करण्यापुरता तरी अर्थ मिळण्याची अस्वस्थताही. आपण आपल्या एकट्यातच काय काय शोधणार? म्हणून मग मी पाहतो, माझ्यासारखे अनेक जे जगाच्या कानाकोपर्यात, सतत नाही पण काही अस्वस्थ, बैचेन क्षणांपुरता तरी हा उद्योग करतात. त्यात मिळणारं चित्र स्वतःच्या कुवतीत चितारतात, त्यात स्वतःच्या भवतालचे, संस्कार आणि जगणाच्या काढलेल्या अर्काचे रंग भारतात आणि ठेवतात. माझ्या काही अनुत्तरीत प्रश्नांना तिथे आपसूक उत्तरे असतात, काही वेळा अनुभवाच्या गठ्ठ्याला पहायला वेगळा कोन मिळतो, काही वेळा आजवर मिळालं असं मानलेलं उत्तर तोकडं आहे इतकं खोल प्रश्नचिन्ह आणि काहीवेळा स्वतःला छिन्नी मरत बसलेला अजून कोणी न बोलता धीर द्यायला.
आठवणींचा डोह म्हणून एवढा प्रसिद्ध आहे. त्यात ना हवं तसं, हवं तितका डुंबता येतं. वाटलं तर शांतपणे घाटावर बसून राहून संदर्भांचे दगड फेकून येणारे तरंग पाहता येतात, कधी एखाद्या परिचित जागी पाय सोडून बसता येतं पाण्यात आणि ते पाणी तळपायाला हळवासा स्पर्श करत रहात, तेवढा आणि तेवढ्यापुरताच. किंवा कधी पार सूर मारता येतो डोहात, अगदी तळाला स्पर्श करणारा, मग त्या नितळ निळाईचे सारे कोपरे चाचपायचे. किंवा कधी त्या डोहावर नव्या अनुभवांची रिमझिम पहायची, त्यातला एखादं थेंब तळाशी पडलेल्या मिटल्या शिंपल्यात जाणार आणि मग एक नवा अर्थ उलगडणार. हे सगळंही अगदीच नको वाटलं तर आपल्याच एकटेपणाची सोबत धरून निरव रात्री बसून रहायचं डोहाच्या स्तब्धतेवर प्रतिबिंबित आकाशाला पहात.
John Steinbeck चं कॅनेरी रोज वाचलं. मला हा लेखक आवडतो. म्हणजे तो जिथे राहतो तिथे रूजल्यासारखा वाटतो. आणि असं रूजूनही काही फार मोठा डामडौल नाही शब्दांचा. आणि रुजलाय म्हणून काही पाहणं सोडून देऊन आपल्याच गुडघ्यात जीव दुमडून, त्यात दिसतंय त्याच्यासाठीच लिहित बसलाय असही नाही. साधी असतात त्याची माणसा, सुख जगू पाहणारी आणि नाही मिळालं तरी आपल्या परीने तिथवर जाऊ पाहणारी. तो त्यांच्यावरच एक खुळेपणा पांघरतो आणि त्या गबाळ चादरीला आतून कुठे कुठे शहाणपणाचा रेशमी तुकडा लावून देतो, निष्पाप आणि म्हणून चटकन मळणारा. सुरेश भटांच्या ओळी आहेत ना
;साधीसुधी हि माणसे माझी कवित्वाची धनी' तसं त्याच्या शब्दांत ह्या अनेकात अनेक मिसळून गेलेल्या, त्यांच्या मर्यादित परिघापलीकडे काहीही अस्तित्व नसलेल्या माणसांच्या गोष्टी डोळ्यांचा कडा ओलावणारा काहीतरी घेऊन येतात.
'Cannery Row' च्या सुरुवातीला तो म्हणतो; 'How can the poem and the sink and the granting noise-the quality of light, the tone, the habit and the dream- be set down alive? When you collect marine animals there are certain flat worms so delicate that they are almost impossible to capture the whole, for they break and tatter under the touch. You must let them ooze and crawl of their own will onto a knife blade and then lift them gently into your bottle of sea water. And perhaps that might be the way to write this book- to open the page and let the stories crawl in by themselves.
Cannery Row मध्ये चक्क एका संस्कृत कवितेचा अनुवाद आहे. आणि तोही Cannery Rowच्या शब्दांशी सख्खं नातं असलेला.
Cannery Row संपताना एक कविता आहे, मुग्ध आणि हळवे काही हळूच छेडणारी,
Even now,
I know that I have savored the hot taste of life
Lifting green cups and gold at the great feast
Just for a small and a forgotten time
I have had full in my eyes from off my girl
The whitest poring of eternal light-

तर अशा लिहिणार्याने उघडून ठेवलेल्या कोर्या पानावर अलगद आलेल्या ह्या गोष्टी. त्या येतात, त्यांचं एक साधसं जग विणतात आणि एका वळणावर आपल्याला सोडून जातात. मग मागे वळून पाहिलं कि त्यांच्या सोबत गेलेल्या तेवढ्या क्षणाचा एक मंद फुलोरा तेवढा आपली सोबत करत असतो.

Friday, June 18, 2010

प्राजक्त

अगदी एकटी अशी गोष्टच सापडणार नाही. झाड तर अजिबात एकट नसतं. ते मातीशी, हवेशी, ऋतूंशी, पक्ष्यांशी आणि सरतेशेवटी अपिराहार्यपणे माणसांशी जिवंत संबंध ठेवून असतं. काही वेळा झाड आणि माणूस दोन्ही गेले तरी आठवणींची मुळे मरत नाहीत. ती तशीच काळाच्या जमिनीखाली निश्चल पडून राहतात. कधीतरी एखाद्या जुन्या संदर्भांचा उबारा मिळाला कि पुन्हा त्यांना अंकुर फुटतो, आणि थोडाफार उगवून कोमेजून जातो. हि फुलांची एक साधी आठवण आहे. पण कोणतीच गोष्ट एकटी नसते आणि तिच्या, अगदी छोट्याश्या का होईना, अस्तिवाच्या इतिहासात कित्येक न उलगडलेले धागे दोरे असतात. 'Collapse' नावाच्या पुस्तकात Jared Diamond ने उंदरांच्या विष्ठेतून एका बेटाच्या विनाशाची कहाणी उलगडली आहे. फुलांमध्ये एवढी विलक्षण कहाणी नसेल, पण अनेक अबोध कविता नक्की सापडतील.
अंगणात प्राजक्ताचं एक झाड होतं. जुनं. त्यावर चढूनही बसता यायचं, अर्थात फार वर नाही, पण जमिनीपासून ३-४ फूट वर एक खोबण तयार झाली होती. सकाळी उठून अंगणात आलं कि झाडाने फुलांचा भार जमिनीवर हलका केलेला असायचा. ५-६ पाकळ्या, एकमेकांशी सुरेख अंतर आणि जवळीक ठेवून असलेल्या, त्यांच्या गोलसर आणि मध्ये किंचित बाक घेतेलेल्या कडा आणि वर त्या शुभ्रतेला साजेसा एक केशरी देठ. आणि अगदी नाजूक जीव. खाली पडली फुलं कि पाकळ्यांवर कुठेतरी एखादं डाग यायचा, वेचता वेचता एखाद्या फुलावर पाय पडायचा, किंवा एखादं फूल मुळातच अधुरं उमललेलं असायचं. मग त्यांना बाजूला सारायचं. अंगणाच्या कुंपणाच्या कडेशी ठेवून द्यायचं, त्यांचं छोटसं साजिरा आयुष्य संध्याकाळ पर्यंत निर्माल्य होऊन गेलेलं असायचं. वेचलेली फुला देव्हरयातून निर्माल्यात जायची. अंगणात उरलेली फुलं कचरा म्हणूनच गणली जायची. पण आदल्या रात्री झाडावर उमलून येताना कुठल्याच फुलाला त्याच्या प्रवासाची रेष माहिती नसणार. कधीतरी मी हि फुलं ओवून त्यांचा हार बनवायचो. प्राजक्ताच्या फुलांचा हार करणं एकदम सोपं. देठाच्या वरच्या छिद्रातून सुई घालायची आणि पाकळ्यांच्या थराच्या केंद्रातून अल्लद बाहेर काढायची. एक काळजी मात्र घ्यावी लागते. सुई देठातून कुठेही घुसता कामा नये. त्या केशरी देठाचा तोरा अगदी नाजूक असतो. सुईच्या इवलाश्या वेदनेनेही ते सारं फूल मिटून घेणार. सुईच टोक बोटाला टोचणार असं देठातून घुसला कि, आणि त्यासोबत त्या किंचित धसमुसलेपनानेही संपलेल्या फूलपणाचा एक ओलसर स्पर्श व्हायचा बोटावर. जसं काही त्या फुलाने त्याच्या सार्या लहान पण तजेलदार अस्तिवाला साजेसा एखादा अश्रू मागे ठेवलेला असायचा. मग ते फूल परत परडीत ठेवून द्यायचं. आरतीच्या शेवटी परडीतली उरली सुरली सारी फुलं देवावर वाहिली जायची, त्यात हेही असणार. गर्दीत नाही जसे आंधळे, लंगडे, पांगळे कोणी चटकन समजून येत नाहीत, तसं हे फूलही लपून जाणार. आणि उद्या निर्माल्य तर सार्यांचाच आहे, हाराचही आणि त्या आधीच पंगू झालेल्या फूलाचही.
आजोबांचा खूप जीव सगळ्याच झाडांवर. त्यात प्राजक्ताच्या झाडावर विशेष. घरासमोरच अंगण तुटून तिथे रस्ता होत असताना सगळी झाडं तोडली गेली. कुण्या गावाचे मजूर सहज पहारी पारून झाडं उपसून काढत होते. प्राजक्ताच्या झाडापाशी आल्यावर आजोबांनी सांगितला कि झाड तसच्या तसं परसदारात लावायचं. मग सावकाश स्वतः काम करून ते झाड तसच्या तसं उचलून परसदारी लावलं. आणि तिथेही त्याने काही वर्ष चांगली काढली. पण आपली मूळ जागा गेल्याचं दुख कुठेतरी आतवर त्याला होत असावं. अंगणात त्याला एक त्याचा कोपरा होता. परसदारात अनेक झाडांच्या भाऊगर्दीत, एखाद्या घरंदाज गायकाने नाईलाज म्हणून कोरस मध्ये गावं तसं ते बिचारं उभं राहिलं.
गणपतीच्या दिवसात सकाळी लवकर उठून प्राजक्ताची फुलं वेचायची. तोवर फुलं पडलेलीही नसायची. पावसाच्या एखाद्या सरीने ओलसर पानं, त्यांच्या खाली जाणवणारा ओलसर अंधार, आणि फांद्यात हात घालून वेचताना झाडाला लागणाऱ्या धक्याने अंगावर पडणारी फुलं. तेव्हा असं सांगता आलं नसतं, पण त्या वेळेत रमून जायला व्हायचं. अगदी परडी भरून, ओसंडून फुलं मिळायची. मग हौसेने त्या फुलांनी गणपतीची आधीच लहानशी मूर्ती भरून टाकायची. दुसर्या दिवशी, विसर्जन होऊन आल्यावर तलावाच्या पाण्यातली राख परसदरात फेकायला जाताना मन आणि तो प्राजक्त दोन्ही ओकबोकं वाटत रहायचं.
पुढे घुशीने प्राजक्ताची मुळे पोखरून काढली. त्याला पानं, फुलं येणं थांबलं आणि झाड वठून गेलं. मग एक दिवशी कोणी एकाने विचारून त्याचं जाडसर खोड तोडून नेला. एक खड्डा उरला, जिथं कधी टपटपणार्या फुलांचा घर होतं आणि प्रसन्न सकाळच्या आणि उदास पण शांत संध्याकाळच्या, आजोबांच्या निर्धास्त करणाऱ्या स्पर्शाच्या आठवणींची सुरुवात होती.
परवा असंच परसदारात उभा होतो. आता तिथे काय काय बांधून रया पार घालवलेली आहे. कधीतरी चाळ तुटणार म्हणून झाडांकडेहि लक्ष देणं थांबवलं आहे. आता त्या झाडांशी घुशी, उंदरा, एखादी चुकार खार, चिमण्या आणि मांजरं बोलत असतात. कोणीही त्यांना ओरबाडून त्यांची फुलं काढू शकतो. त्यांच्यावर उष्ट-खरकटे फेकू शकतो. मला आधी असा करणार्यांना ओरडवासा वाटायचं. कोणीतरी घरात घुसून काही चोरातायेत असं वाटायचं. मग कळलं कि परसदारच्या झाडांची कुटुंबाच्या assets मध्ये मोजणी होत नाही आणि ज्यापासून काही मिळणार नाही अशा ठिकाणी शहाण्या माणसाने जीव लावायचा नसतो. मीही सोकावत गेलो. पाउस पडून गेला होता नुकताच आणि आता उन्ह आलं होतं. झाडं शुचिर्भूत दिसत होती. पानांचा हिरवा रंग नव्या तजेल्याने चमकत होता. पावसाचे उरलेले थेंब पानाच्या कडांवरून सावकाश ओघळत जमिनीवर पडत होते. टोकांशी असणाऱ्या त्या लाम्बोळ्या थेंबात प्रकाश काही एक कोन करून शिरत होता आणि दुसर्याच कोनाने बाहेर पडत होता. त्यामुळे कोवळी चमक अजून वाढली होती. आत कुठेतरी पंखांची फडफड दिसली. पिसांचा फुलोरा करून एक नवीनच पक्षी तिथे बसला होतं. थोडा इकडे तिकडे उडायचा आणि परत मूळ जागी येऊन बसायचा. मग निवांत पंखांच्या फुलोर्यात चोच फिरवायचा, अंग झडझडवायचा. संपून जाणार्या प्रदेशातही हे नवे पक्षी का येतात?
मनातच उगवलेली झाडं खरी हि. आता दाट जंगल झालंय त्यांचं. त्यात एका कोपर्यात प्राजक्त उभा आहे. नवा पक्षी त्याच्या फांद्यांत रमला आहे. इवल्या पांढर्या केशरी फुलांचा सडा पडला आहे. आणि एक लहान मुलगा आजोबाच बोट धरून तिथे केव्हाचा उभा आहे.....

Thursday, June 17, 2010

Robinhood

हा माझा चित्रपट परीक्षण करण्याचा प्रयत्न नाही. हे काम आणि समीक्षण अनेक जण across the web अत्यंत कौशल्याने करत आहेत. चित्रपट पाहताना सर्वात आधी मी स्वतालाच त्या चित्रपटातल्या एखाद्या भूमिकेत, बर्याचदा मध्यवर्ती भूमिकेत पाहतो. मग स्वतःच्या अजून टिकून राहिलेल्या सवयीवर हसायला येतं. मग विचार येतो कि आपण हा चित्रपट का बघतोय. आणि चित्रपट पाहिल्यावर डोक्यात घोळत राहत कि काय बरं होतं ह्या चित्रपटात ज्यासाठी काही तास आणि केलेच असले तर पैसे खर्च केले. Robinhood पाहायला जाताना Ruseel Crow आणि Ridley Scott चा चित्रपट पाहायला जातो आहोत हे डोक्यात होतं. आता 'अशा ' धर्तीतले चत्रपट म्हणजे एखादं खलनायकी पात्र, अन्याय आणि अत्याचार ह्याखाली पिचली जाणारी जनता, हार समोर असताना काही एक प्रेरणा आणि उदात्त ध्येय घेऊन लढणारा नायक आणि त्याला साथ देणारी आणि अर्थात सुंदर अशी एक स्त्री एवढ्या गोष्टी असणारच आहेत हा भाग येतोच. बर्याचदा 'असे' चित्रपट पाहायला जाण, जे खरतर उगाच रम्य भूतकाळात स्वतःला बुचकळून काढण्यासारखं आहे, हे स्वतःला steroid देण्यासाठी असतं. आता असं हातघाईवर मी लढणार आहे का, चांगलेपण्याच्या टोकाला जाण्यासाठी जी अत्यंत वाईट माणसे लागतात ती असणारेत का माझ्याभोवती आणि last but not at all least, ती कुठे आहे जिला समजणारे मी हे चित्रपट का पाहतोय.... पण मी आपलं जातो, आयुष्य अगदी वाकवायला आणत असतानाही ताठ कण्याने लढणारी आणि बाणेदार संवाद फेकत मारणारी पात्रे पाहतो. थोडाकाळ माझ्या रक्ताला आणि मेंदूला उकळी येते, एखाद्या मित्राला झणझणीत sms लिहिलं जातो आणि मग परत एकदा मलूल पडलेल्या वास्तवाशी जुळवायला सुरुवात होते. तर Robinhood ह्याला अवपद नाही. आता थोडी 'अशा' धर्तीतल्या मला माहिती असलेल्या चित्रपटांची यादी देतो- ३००, Gladiator, King Arthur, The Last Samurai, Troy आणि हा Robinhood. हि 6 चित्रपटांची नवे म्हणजे यादी होत नाही हे जाणकार वाचकास कळेलच, पण यादी अजून वाढवता येण्याइतपात प्रस्तुत लेखक चलाख आहेच.
पण तरीही हे चित्रपट अपील करतात. आणि हेच का, inspirational ह्या प्रकारात मोडणारे चित्रपट पाहीले तर दरवर्षी प्रसिद्द्धी मिळवणाऱ्या चित्रपटात, म्हणजे 'अरे हा पाहिलास का असं सांगून जे एकमेकांना सांगितले जातात ते चित्रपट, inspirational चित्रपट भरपूर असतात. माझा प्रश्न सरळ सोपा आहे. लोक हे चित्रपट का पाहतात?सोपं उत्तर तर आहे कि Inspiration मिळावी म्हणून. पण मग मी विचारेन त्यांना अशी कंची डोंबलाची inspiration मिळते? मुळात आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतातच आणि ज्या गोष्टी आवडतात त्यात चवीला म्हणून तरी का होईना एखादा तुकडा अविश्वसनीय असावा लागतो. मी दररोज काय करतो हे मी गोष्ट म्हणून सांगू लागलो तर मुळात ती गोष्टच नव्हे. (अर्थात 'नवकथा' किंवा 'अतिनवकथा' किंवा गेला बाजार 'न-कथा' या प्रकारात तिला समीक्षक मिळूनच जातील हि बाब अलाहिदा.) पण समजा मी एखाद दिवशी जीवनास आत्यंतिक कंटाळून रस्त्याने जात असताना कशी एक गहिरे डोळे असलेली तरुणी किंवा तेजपुंज असा व्यक्ती मला भेटला आणि त्याने माझ्या तसूभर दुखाचे कण उडवून लावून माझ्या आयुष्याला एक नवी दिशा दिली हे मी, त्या दुखांच्या उत्पत्ती कथेसह सांगितले, तर मोठीच मजेदार कहाणी बनेल.
Larger than Life नायक हि माझ्या मते तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनात असणारी प्रतिमा असते. पूर्णांशाने नाही, पण जमेल तशी आपल्या आजूबाजूच्या लोकांत आपल्याला ती दिसत असते. आता आपण कदाचित हे गृहीतच धरतो कि प्रत्येकाचे पाय, किंवा एखाद बोट तरी मातीचं असणारच. आणि अशा एखाद्या व्यक्तीची, तिच्या जीवनाच्या अ-सार्वजनिक बाजूची माहितीही वेगाने पसरत असल्याने असे Larger than Life नायक आज कमी दिसत असावेत. किंवा असा कोणी दिसू लागलं कि लगेच त्यावर प्रश्नाचीन्हांकित बोट उगारणारे आज बरेच झाले असावेत. कदाचित समाजाने काय करावं हे सांगणार्याची गरज आज कमी कमी होत जात आहे. 'दिनांचा कैवारी' असा कोणी बनू लागलं कि लगेच हा कैवार किंवा निरलस सामाजिक भाव नसून डावपेच आहे, ह्यात काही एक अंतस्थ हेतू नक्कीच असणार असा आज नक्कीच वाटतं. शहरीकरणाच्या प्रक्रियेची एक खासियत अशी आहे कि नफा-तोट्याच्या गणितात न बसणारे व्यवहार ती मोडकळीत काढते किंवा त्यांना अशा पद्धतीने बदलवते कि ते 'market capture' च्या गणितात महत्वाचे ठरू लागतात आणि त्यांचं निखळ आशय गढूळ होत जातो. दुसरी एक बाजू अशी आहे कि, जी काही अर्धवट शिजलेली राजकीय प्रक्रिया देशाने स्वीकारली आहे ती पाहता, समाज ढवळून काढणारे, समाजाला 'हे किंवा ते' असा निर्णय करायला लावणारे प्रश्न आज कमी निर्माण होत आहेत. कदाचित स्वताचे आयुष्य स्वतःच्या पद्धतीने घडवायची संधी शिक्षणातून मिळू शकत असल्याने अशा एखाद्या राजकीय किंवा सामाजिक विचारधारेला आणि तिचं नेतृत्वाला मानण्याची अपरिहार्यताही नष्ट झाली आहे. 'पिचली जाणारी जनता' हा शब्दप्रयोग किमान शहरांतून तरी हद्दपार झालं आहे. अगदी शहरात झोपडपट्टीत राहणारे गरीबही स्वताची 'Nuisance Value' ठेवून आहेत आणि 'Trickle Down' चा परिणाम म्हणून जगत रहाता येईल इतपतकमवायच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. समाजाला नेतृत्व हे कसोटीच्या प्रसंगात हवे असते. जागतिक सपाटीकरणाने कुठल्याही जोडल्या गेलेल्या देशात येणाऱ्या कसोटीच्या प्रसंगांची खोली आणि तीव्रता मंदावली आहे. जिथे लोकसमूह अशा आणीबाणीच्या प्रसंगातून जात आहेत, तिथेही बहुपर्यायी नेतृत्व आहे. पण 'एकच एक व्यक्ती आणि त्यापाठी उभे असलेले लक्षावधी लोक' हि आता दुर्मिळ गोष्ट होत चालली आहे. ideologies चा पगडा संपला आहे अशी बाब नाही, पण कुठल्याही अस्मितेचा नारा आज जगाला दोन भागात विभागू शकणार नाही. एक मोठा समूह असा निर्माण होत आहे ज्याला अशा अस्मितांमध्ये स्वताची ओळख गवसत नाही. स्वतःचा माणूस म्हणून असणं विचार करणारा माणूस जास्त सहजपणे स्वीकारू लागला आहे.
एक गमतीशीर भाग, जो माझ्या मित्राने मला दर्शवला होतं, कि Larger than Life नायक असलेल्या चित्रपटात सुद्धा कायम माणसाच्या स्वातंत्र्याची हाळी दिलेली असते. आणि अनेकांच्या आयुष्याला मातीमोल करू पाहणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध नायक उभा ठाकलेला असतो.
माहितीचे वेगवान प्रवाह हे आजच्या काळाचा वैशिष्ट्य आहे. माहितीच्या ह्या वेगवान प्रवाहात आयुष्य जगण्याच्या नवीन संधी निर्माण झाल्या कि त्यांची माहिती संधींचा तुडवडा असलेल्या भागात पोचते किंवा पोचवली जाते. नेतृत्वाची किंवा विचारधारांची गरज माणसाला तोवर असते जोवर त्याच्या भवतालावर त्याचे नियंत्रण नसते आणि हा भवताल बदलायाचेही स्वातंत्र्य त्याला नसते. हा भवताल सोडून दुसरीकडे जाण्याचे स्वातंत्र्य मिळत असेल तर नेतृत्व आणि विचारधारांची गरज कमी होते आणि मी स्वतः विचार करून माझे आयुष्य बदलू शकतो हा विश्वास अनेकांच्या मनात वाढत जातो.
तरीही समाधानाची तहान न शमलेलीच रहात असावी. किंवा सोप्या आयुष्याचा कंटाळा काही जणांना मुळातच येत असावा. शहाणपण वाढत गेला तरी सगळ्याच कोड्यांची उत्तरं त्याला सुटत नाहीत. आणि, शरीर-मनाच्या मर्यादा उल्लंघून जगण्याची असोशी तर जुनीच आहे. म्हणून मग भव्य-दिव्य संकटे आणि त्यातूनही तारून नेणारी माणसे गोष्टींमध्ये जन्म घेतात. आपण जे आहोत ते उलगडत नाही म्हणून तर माणूस आपण जे नाही त्यात रमत असतो का?

Tuesday, June 15, 2010

शेवटचे घरटे

'आई, बटन तुटलंय ग शर्टचा...आणि बघ ना किती खराब झालाय तो...' महेश दारातून ओरडतच येत म्हणाला. महेशचा आवाज ऐकून तिने पटकन रिकाम्या डब्याचं झाकण लावलं. डाळ उरलीच नव्हती डब्यात. तसंच डबा बाजूला ठेवत ती महेशकडे वळली. महेश पोळीच्या डब्यात कालची उरलेली पोळी आहे का ते बघत होता. 'आई, पोळी नाही? ' महेशच्या प्रश्नावर तिला भडभडून आलं. कसनुसा हसत ती म्हणली. 'करणार रे पोळी. जा, तू बाबा आले का बघून ये'. 'कुठे गेले बाबा?' महेशचा पुढचा प्रश्न. तोंडावर आलेला उत्तर तिने थांबवलं, आणि सावकाश ती म्हणाली, 'तुला नावं शर्त आणायला.' महेशचा चेहेरा खुलला. तो नाचतच अंगणात जाऊन बाबांची वाट पाहू लागला.
तिने शेगडी पेटवली. तांदळाच्या डब्यात उरलेला मूठभर भात तिने कुकरमध्ये शिजवायला लावला. शिजवतानाच त्यात थोडे कांदे आणि मसाला घातला. कुकर व्हायची वाट पहात ती ओट्याजवळ उभी राहिली. कुकर नवर्याने हौसेने आणलेला. घरातला बाकीचं सगळंच मोडून झालं होता, तेवढा एक कुकर तिने अजून विकला नव्हता. बाकीचं समान असंच कुणी दिलेला लग्नात. तेव्हा जे कोणी यायचं काय काय घेऊन यायचं, आणि तीही आल्या-गेल्याचा करण्यात रमून जायची. पण मग २ वर्षात... तिला त्या दिवसाच्या आठवणीने गरगरल्यासारखं झालं. अजूनही तिला खोटं वाटायचं, एखाद्या स्वप्नासारखा. तिला मिठीत घेऊन गुदमरवणारा नवरा जेव्हा त्याचा एक थोटा हात आणि तुटका पाय घेऊन केविलवाण्या चेहऱ्याने घरी यायचा तेव्हा तिला उन्मळून जायला व्हायचं. अपघातातून सावरल्यावर तिने त्याला सरकारी दाखला आणून एखादी नोकरी करण्यासाठी सुचवला. महेश तेव्हा जेमतेम वर्षाचा होता. नवर्याने ऐकलं नाही. त्याचे मित्र यायचे आधी आधी, काही करण्यासाठी सुचवून पाहायचे. तो झिडकारायचा , म्हणायचा, 'पांगळा आहे म्हणून दया नको तुमची.' मग महेशकडे आणि दाराआडून पाहणाऱ्या तिचा निरोप घेऊन आलं माणूस निघून जायचा. काहीच सुचला नाही कि तो कुबड्यांवर स्वतःला ढकलत ढकलत निघून जायचा कुठेतरी. मग घरी यायचं घामाघून होऊन, तिच्याकडे बघायचाही नाही. भरपाईचे पैसे घराखर्चात आणि महेशाला शाळेत घालण्यात संपले. महेशाची शाळा सुरु झाल्यावर तिने उमेदीने स्वत नोकरी करू पाहिली. पण तिने आणलेलं काही तो खायचा पण नाही. महेशला सांगायचा कि तो काम करेल, त्याला खूप मोठा करेल. त्याला हसवायचा. आणि मग स्वताचे डोळे टिपत आकाशाकडे बघत बसून रहायचा. एक दिवस त्याने गाडीखाली जीव द्यायचा प्रयत्न केला. लोकांनी वाचवला, घरी आणला. तेव्हापासून तो अजून आक्रसत गेला. ती जवळ आली कि रडायचा. तुझ्या जीवावर जगतो, मरू पण शकत नाही आपल्या मर्जीने म्हणायचा. ती कामावर गेली कि निघून जायचा कुठेतरी. कोणाकडून तरी पैसे मागून महेशला काही घेऊन यायचा. एक दिवशी कोणीतरी म्हणाला कि जगतो कसा मस्त बायकोच्या जीवावर. ते जिव्हारी लागल्यागत घरी आला, आणि तिला नोकरी सोडायला लावली.
मग घर रिकामं होत गेला. महेशचा रिझल्ट लागला शाळेचा आणि आता ५वित प्रवेश घ्यायचा होता. भरायला पैसेच नव्हते. उद्यापासून शाळा सुरु होणार होती. महेश विचारायचा पुस्तक, वही, कंपासपेटी केव्हा घ्यायची. ती वेळ मारून न्यायची. मग बाबाकडे गेला कि बाबा त्याला काय काय सांगून रिझवायचा.
तिने कुकर उतरवला. ताटे घेतली. तेवढ्यात महेशचा बाहेर आवाज आलं, 'आई, बाबा आले. आणि मला नवा शर्ट आणि पुस्तक पण आणलंय.' गोष्टींचं पुस्तक घेऊन महेश तिला बिलगला. त्याच्या खांद्यावर नवर्याने नवा शर्ट पांघरला होता. तिला आवडणारा आकाशी रंग.... 'आणि बाबांनी हे तुला दिलंय. तिने पिशवी घेतली. त्यात एक फूल आणि डबा होता श्रीखंडाचा. तिने फूल ओट्यावर बाजूला काढून ठेवलं.
काल रात्री त्यांचं बोलणं झालं. तिने त्याला उरलेले पैसे दिले होते.
कुबड्या भिंतीच्या कडेला टेकवून तो खाली बसला. महेश त्याच्या बाजूला बसून पुस्तक वाचत होता. तिचे डोळे उगाच भरून येत होते. तिने ताटात भात वाढला. कडेला श्रीखंड वाढलं.
तेवढ्यात मनी आली दारातून आणि म्याव म्याव करत महेशच्या पायात जाऊन बसली. महेश तिचे लाड करत तिला गोष्ट सांगायला लागला. आणि ते वेडं मांजर पण मान त्याच्या मांडीवर ठेवून जसं ऐकायला लागलं.
किती दिवसाने ते गप्पा मारत मारत एकत्र जेवले. खूप दिवसांनी आज गोड खायला होतं. महेशने आवडीने श्रीखंड खाल्लं. आणि मनूने पण महेशच्या ताटातलं श्रीखंड खाल्लं. जेवण झाल्यावर गप्पा मारत ते तिथेच बसले. मनू महेशच्या मांडीवर गुपचूप झोपली होती. हळूहळू बाबाची गोष्ट ऐकता ऐकता बाबाच्या कुशीत महेश झोपून गेला. तिने ताटे उचलली. कुकर आणि श्रीखंडाचे रिकामे भांडे बेसिन मध्ये ठेवले. ओट्यावरचे फूल तिने हातात घेतलं आणि नवर्याकडे पाहिलं. तो भिंतीला मान टेकवून झोपला होता. त्याचा रापलेल्या गालांवर, खुरट्या दाढीत त्याच्या डोळ्यांतून ओघळलेले अश्रू लपले होते. तिने ते फूल घेतलं, आपल्या बाजूला ठेवलं आणि तिथेच लवंडून ती झोपली.

....... दुसर्या दिवशी पेपरात आलेल्या बातमीत अपंग तरुणाची बायको आणि मुलासह आत्महत्या एवढाच मथळा होता. त्यांची घरभर विखुरलेली स्वप्नं, त्यांच्या गप्पांचे आवाज, गोष्टीचं नव पुस्तक, एकदाच घातलेला आकाशी शर्ट, मरून पडलेलं मांजर आणि तिच्या कुशीत सापडलेलं कोमेजलेलं फूल ह्यांचा उल्लेख तसा महत्वाचा नसतोच म्हणा....

Friday, June 11, 2010

Easing Out

सकाळ अशी वेगळी नसतेच....म्हणजे मुळात रात्र अशी झालेलीच नसते.....कसलीही दगदग न घेता उगवणारे दिवस फार थोडे असतात....पावसाच्या अस्पष्ट आवाजात झोप चालवली जाते....कुणाचातरी फोन येऊन सुरु होते सकाळ...आणि सुरुवातीलाच तिच्यात एक मुग्ध अबोली संध्याकाळ गोंदली जाते. शब्दांच्या तराफ्यावरून जे बोलायचं त्याच्या कडेनेच चाललेले संभाषण....हळूहळू अलोख्या-पिलोख्यातून निसटत जाणारी रात्र...आठवणींच्या रानात जमा होणारी....
म्हणजे माणसांचे दोन प्रकार असावेत....म्हणजे आनंदासाठी जगणाऱ्या माणसांचे...बाकीच्यांच्या कितीही प्रकारचा मी काय करणार...तर पहिला प्रकार म्हणजे साला गाडून मेहेनत करणारे...कामाच्या छोट्या छोट्या कोपर्यांना तासणारे, आकार देणारे....मग ते कामच बोलत असता अशा माणसातून...अशा प्रकारांना एकूण येणारा दिवस हा एक नवीन कॅनवास वाटत असावा, रंगवा, चित्र, आणि अवघा अस्तित्व थकवणारी एक धुंद पांघरुन घ्या....
दुसरा प्रकार, आपण ह्या पहिल्या प्रकारात असं वाटणार्या पण सरतेशेवटी पहिल्या प्रकरणी निर्मिलेल्या गोष्टींचा आनंद घेण्यातच रमलेल्या माणसांचा प्रकार....म्हणजे माझा प्रकार...माझ्या बर्याचश्या मित्रांचा प्रकार...आणि जगावर चौफेर धुळवड करण्याच्या मैफिलीत ज्यांची नावं आदराने घेतली जातात असे पहिल्या प्रकारातले लोक...
मग काय....पाउस येतो....आधी असं सगळ्या झाडांशी लागत, मग त्यांना घुसळत, त्यांना बेभान स्पर्शत तो खिडक्या दारातून खोलीत शिरतो....मग त्याला जाणवतं खोलीत आधीच आलाय पाउस...मग तो आपलं रेशमी वलय सोडतो त्या वेळेभोवती....
'ती गेली तेव्हा रिम-झिम पाउस निनादत होता....'
कधीही न आलेली ती अशा वेळेला, 'घनव्याकूळ' वेळेला वेड्यासारखी आठवायला लागते....पाउस ना नर आहे...तसं तो असेल लिंग-आकार-विभक्तीहीन, पण मला तो आदिम नरासारखा वाटतो... गूढ काळोख्या रानातून, अपार पसरलेल्या समुद्रानवरून, बेलाग फकीर पर्वतांवरून, आवेगी फेसाळ प्रपातातून येणारा आदिम हुंकार.... आणि तो हिंडत असतो, शोधत असतो प्रणयाचा दिसेल ते रूप, उमलवत, जोपासत, खेळवत आणि प्रसंगी उद्ध्वस्त करत.... कोणासाठी...कोणाचा होऊ शकतो तो....जमिनीचा, त्याच्यावर ओवाळून जाणार्या विजेचा,त्याच्या वेगात उखडून निघणार्या वेड्या वेलींचा कि त्याच्यातूनच उमलणार्या आणि त्याच्या विराट सागर रूपात स्वतःला संपवणाऱ्या नदीचा...
मला माझ्या आतही असे आदिम हुंकार जाणवतात, स्वतावर चढवलेल्या अनेक मुखवटे कोलमडून येणारी जाणीव.... आणि त्या जाणीवेला पेरावं असं वाटतं एखाद्या आश्वस्त जमिनीत... हाच असेल ना माणसाला असलेल्या पुनरुत्पादन जाणीवेचा खरं अर्थ.... आधी स्वताची जाणीव उमलणं आणि मग हि जाणीव बहरला येऊन कोमेजनारही आहे त्या आधी, तिच्या बहराच्या उन्नत अवस्थेत तिला जोडणं, अस्तित्वाच्या अविरत प्रवाहाशी हेही समजणे.....
पावसाचा असं असतं वेडे, तो कानात सांगून जातो कविता आणि बोटांवरून घेऊनही जातो अलगद... माझ्या त्वचेवर उरतात ते हे थेंब....

Wednesday, June 9, 2010

उत्सर्जन

उत्सर्जन' आणि 'सर्जन' हे शब्द एकच मुळापासून उगवले असावेत...
तसं दोन्ही होण्याच्या प्रक्रियेत फारसा फरक नाहीये...
फरक असेल, असला तर तो कशापासून काय होता ह्यात आहे....

लिहिणारा दोन्ही करत असतो, 'सर्जन' आणि 'उत्सर्जन'
जगण्याच्या सलग अवस्थेत काय काय आदळत असता आपल्यावर...
घुसत असता आत, काही शोधत असतो टे मिळत नसतं...
काय काय साचत असता, पचत नसतं, पचले तरी त्यातही काही टाकाऊ बनत असता..किंवा एकट्यानेच न सोसवणारा
मग लिहितो...उत्सर्जन...
म्हणजे संध्याकाळी, पावसाने दिवसाचे सगळे प्रहर व्यापून टाकण्याधी काही दिवस तो नुसताच आभाळ भारत बसतो...
मग दाट सावळ्या ढगांच्या कडेने रंगांची महिरप बनते...
अल्पस्वल्प निळ्या आकाशात उरलेला प्रकाश....आणि त्याला तितकीच साथ देणारं झाकोळ
थेंब थेंब पडत राहतात, पावसाला स्वतःला एवढाही धरता येत नाही आवरून
उंच इमारतींनी व्यापलेल्या त्रिमित सपाचे मधून आकाशाच्या दिसणाऱ्या तुकड्यात हा असं खेळ रंगलेला
वारा मानेवरचे घामाचे थेंब स्पर्शात राहतो ... मग चुकार झुळूक शर्टाच्या आत शिरून त्वचेला छेडत रहाते ...
संवेदना एकट्याच भोगता येत नाहीत .... त्यांचे सिग्नल्स बनवून प्रक्षेपित करावे लागतात
आणि कोणीच त्या सिग्नल्सना रिसीव करत नसेल तर....

शब्दांना पोरकं सोडलं तर ते केविलवाणे वाटतात....

शब्द्नाचा थर बायपास करून नेमकं काय वाटतं तिथ पोचला पाहिजे....
जे जाणवतं त्याचे लगेच शब्द होतायेत....काय करायचेत एवढे शब्द...
आहे जागा म्हणून मांडत राहायचे....

बरंच हलकं झालं पोट, म्हणजे मेंदूतला पोटाचा भाग....
आता परत चरायला मोकळा आणि नंतर उत्सारजायलाही..

पाउस शिरतोच शब्दांत शेवटी

उन्ह दररोज पडतं, जगाच्या काही भागात थंडीपण नियमित असते, पावसाचा मात्र अंदाज वर्तवला जातो...
पावसाच्या कविता मात्र नियमित असतात..

नेहमीसारखा आजही त्याच वळणावर गेलो
या वळणावर का आलोत असं विचारायला लागलो एकमेकांना
मग हा प्रश्न पडलाच नाहीये असं सांगून बोलू पहिला
घुसमटलो
पहिल्याच 'बाय' ला 'बाय' म्हणत थांबवलं
परत होणारच सुरु, अशी निघून जाणार असतीस तू
तर एवढ्या कविता झाल्या नसत्या....
तू अशा अपरिहार्य वेदेनेसारखी आहेस, आणखी काय असतीस...

मग 'द ब्रिजेस ऑफ madisan कंट्री'
मी पण आयोवा मध्ये, तू आहेस तिथे जवळपास म्हणून
किंवा माझ्या भटक्या कुळाशी नातं जोडत होती गोष्ट म्हणून
एका वाक्यासाठी वाचत होतो
'this kind of certainity comes once in a lifetime'
आणि जाणवत होती तुझी माझी गोष्ट याच रस्त्याने समांतर जाणारी

मध्ये मध्ये नेहेमीचे सोबती, चहा , सिगारेट आणि यांनी

तरीही नाहीच काही, तरीही तेच कशात तरी बुचकळून काढल्यासारखा
आठवणीत , विचारात , स्वताच्याच तुकडा तुकडा गवसण्यात

मागच्या कितीतरी रात्री अशाच अधांतर
एकटेपणाच्या सुळक्यावर तोललेल्या

मग पाउस....पहाटेचा येऊ घातलेला दिवस ढगांनी आधीच पळवलेला
दूरचे डोंगरही दिसत नाहीयेत ....नुसतेच ढग ....
आता पावसाचा आवाजही वाढला ....संथ संतत लय
मग मी गच्चीवर ....
एकदा नागडंच भिजून घ्यायला हवाय ...पण सध्या अर्धनग्नताच बरी
एक कावळाही भिजतोय ...
मी आल्यावर संकोचला ...कावळेही असे सुरुवातीच्या पावसात भिजत असावेत ....
मग 'कावळा ब्लोग विश्व ' वर अपडेट करत असावेत ....

आता मी भिजतोय ...कानात गिटार 'into the wild' मधली


आता मला सुचतंय आज करायचं काय होता ...
आणि काय काय होणार नाहीये...

माझे एक नातेवाईक मेले 13 दिवसांपूर्वी .....स्मोकिंगमुळे
त्यांना श्रद्धांजली म्हणून मी आज 13 सिगारेट प्याव्यात का?
13 दिवस जसे ते आय .सी .यु . मध्ये होते तसं पडून राहावा का नळीने श्वास आणि अन्न घ्यायचा प्रयत्न करत....

काही कावळ्यांच्या पाठीवर पांढरे ठिपके दिसतायेत...कदाचित न झोपल्याचा परिणाम असावा किंवा कोपर्य कोपर्यात घुसणाऱ्या ग्लोबल वार्मिंग चा.....

बराच ओलावलोय....मेंदूत शब्दही बरेच साठलेत...
असे पैसे का साठत नाहीयेत....किंवा समाधान?

आता झोपायचं....म्हणजे अगदी खोल घुसून...
बेडकासारखं... उठल्यावर टुणूक टुणूक उड्या मारायला उत्साह हवं...
हे मागचे अनेक दिवस एकच लांबलेला दिवस आहे...किंवा rewind होणारा...

कुठेच न जाणारा संभाषण...
एकटे पडणारे एकटेपण...
वाचून वाचून शब्दांचा येणारा सुन्नपणा
आणि झोपेच्या नावाखाली मिळणारी pirated dvd

Sunday, June 6, 2010

पावसाची अजून एक कविता

बाहेर पावसाची झाड, भिंतींच्या पडद्याडून पोचणारा पावसाच आवाज
परिघाच्या पल्याड जाणवणारा उष्ण तृप्त मृदगंध
कितीतरी कविता येतायेत उमलून
आणि सहज मिटूनही जातायेत
माझ्यासाठी पाउस असा काय वेगळा असेल..

असाच असेल ना जसा होता कित्येक वर्ष
तसंच जमिनीच्या असंख्य छिद्रातून जिरू पहाणारा
दृश्य अदृश्य प्रवाहातून खळखळू पहाणारा
ढगांचे मंडप उभारून मैफिल मांडणारा
वार्याच्या क्रुद्ध निश्वासांतून गर्जालणारा

मग, मी काय लिहेन असं
जे नंतर मलाही आठवत राहील
इतका सवयीचा झालेला पाउस
आणि तरी त्यातून एवढे शब्द का उगवून येतात

हे असेच भिजले रस्ते, दूरवर दिसणारे त्रिमित सघन
मंद पाउस धारांच्या आड येणारे आठवणींचे कढ
तशीच गाणी दरवर्षी जपलेली
तसेच तुषार त्वचेवर उमटू दिलेले
संयत होत गेलेलं वेडेपण

हे सगळं आत्ताही उमटत असेल अजून कुठेतरी
पाउस कोणाचाच नसतो इतका वैयक्तिक
सार्याच रोपांना तो हात देतो
शेतात, बांधात किंवा अपरिचित कोपर्यात

मग अजूनही का अतृप्ती
अजूनही तृषा अनिवार

या सगळ्या पावसाळी कवितांच्या होड्या करून
सोडून देणारे एखाद्या नाल्यात
एखादी होडीने गाठावा तिचं गाव, खूप दिवसात जिथली खबर नाही
एखाद्या होडीने अरबी समुद्राच्या लाटेत जीव सोडावा
एखादी होडी, तिच्यावरच्या अक्षराची शाई फुटून,
कागद फाटून, लगदा होऊन विरघळून जावी पाण्यात
पुढच्या पावसात तेच शब्द एखाद्या रानाफुलात उगवून यावेत

Saturday, June 5, 2010

संसर्ग

आत्ता तरी थंड आणि निर्विकार आहे,
थोड्याच वेळात तो माणसात जाईल,
चालायला लागेल स्तब्ध पाने झुलावणाऱ्या झाडांजवळून
मग त्याला जाणीव होईल कि त्वचेवर उमटतायेत शब्द अजून
अजूनही शांतता घुसली नाहीये पेशींच्या केंद्रात

मग लोटच्या लोट उनाड कवितांचे
शब्दांच्या तरल अस्तिवाचा स्पर्श
आणि स्वतःच्या नपुंसक अनुभवांची विदारणी
तो बसलेला किंवा उभा सापडेल
कुठल्याही कोपर्याच्या मर्यादित संदर्भ चौकटीत
त्याच्या असण्यावर जाऊ नका
त्याच्यापाशी एकूणच जाऊ नका

जगाला शिवायचे तात्विक कपडे मापत बसला असेल तो
किंवा माणसाच्या स्वभावाला पहात असेल
तटस्थतेच्या सूक्ष्मदर्शकाखाली
हे असले येडझवे धंदे

कोणाशीही बोलत बसेल चिक्कार जुन्या ओळखीसारखा
नाहीतर निघून जाईल अनोळखी मुखवटा ओढून चेहेर्यावर

चिमटीभर दुखालाही सजवेल
उद-धूप लावून
बोजड वांझ प्रश्न फेकेल
दुखाच्या कल्पनीत अस्तिवाला सुरुंग लावू जाल तर

चालू द्या त्याला तो बरंय लांब आहे आपल्यापासून
उगाच व्हायचा संसर्ग आणि
आपलेही दिवस उजाड व्हायचे
प्रश्नांचे निवडुंग उगवून

Friday, June 4, 2010

उगाच

हा असा इथे आलोच कसा,
अबब हे एवढे भलेमोठे रस्ते, हि वेगवान धावणारी वाहने, आणि हि माणसे सतत काहीतरी शोधणारी..
इथेच कुठेतरी जन्म झाला म्हणे माझा, मग वाढलो आपसूक, आणि आता भांबावलो आहे...

म्हणजे खूप पूर्वीपासूनच हि हुशार माणसे चालत होती, त्यांच्या स्वप्नांना जोपासत होती
मग त्यांनीच ठरवलं कि जोडून टाकू एकमेकांच्या गरजांना
मग उभा केलं त्यांनी एवढा मोठा डोलारा, मधमाशीच्या पोळ्यासारखा
कामकरी माशा आणि राणी माशी,
कामकरी माशा गुन गुन करत हिंडत असतात शहरभर
राणीमाशी देत असते आकार पोळ्याच्या मधाळ अंतर्भागाला
मी कसा आलो इथे, राणी माशी म्हणून का कामकरी माशी म्हणून कि मी सापडलोय पोळ्यात निरुपयोगी मेणासारखा

हा एवढा प्रकाश कुठला, हि एवढी निवांत गुळगुळीत वस्ती
हा घामट वास कुठला, हि बेजार पिचली माणसे

का असा हवेला दारुगोळ्याचा वास येतोय
झाडांच्या पानातून विमानांची घरघर का ऐकू येतीये
कवितेच्या ओळींतून का ऐकू येतायेत अर्थहीन प्रश्न
देवळात सांगाडे का उभे करून ठेवलेत

कोणीतरी तासत बसला आहे आयुष्याला
बरंच तात्विक रंधा मारून कस गुळगुळीत केलं आहे सगळं
कोणीतरी रंगांचे समुद्र ओतता आहे माणसांवर
आणि ओळखी बदलतायेत रंगाच्या छटा बदलताना

गच्च डोकं धरून बसावा झाडाच्या गार सावलीत
तर तिथे झाडांचेच हुंदके ऐकू येतायेत
पाडू गेलो भूल थेटराच्या अलिशान पडद्याची
तर दिसतायेत बरेच पिचके देह

आईची आठवण येतीये खूप
समोरची बाळाला पाजणारी भिकारीण पाहताना
दर वर्षी एकाने वाढवते कळप
आई आणि बाई दोन्ही होत रहाते आलटून पालटून

आता गहिरी नशा लोटून द्यावी या शहरावर
एक गच्च कश मारावा गांजाचा
धुराचे अपार लोट ढकलून द्यावे या शहरावर
मग दारूचे सर साठे बरसवून टाकावेत
जीव घेऊन वाजवावा ताणलेला चामडी ढोल
रस्ते रस्ते थिरकत्या पावलांनी भरून जावेत
भिडवा शरीराला शरीर
ओठाला ओठ
मादीला नर

कोपर्याकोपार्यात बारबेक्यू लावावेत
सार्या कोंबड्या, बोकड, शेळ्या आणि जमेल ते
अगदी निरुपयोगी माणसांची आतडी
लावावं भाजायला आहे नाही त्या झाडांची भट्टी पेटवून

मग जंगलं तोडावीत
डोंगर खुडावेत
समुद्रात ढीग ढीग माती फेकून द्यावी
सपाट जमिनीवर बांधावेत अलिशान महाल
सजवावेत झुंबर, गाड्या, तावदाने आणि कळस बांधून

रात्र समजणार नाही एवढा प्रकाश सोडावा सगळ्यावर
दिपून जावेत डोळे आणि अंधाराचीच ओढ वाटावी

एवढा सगळं झालं कि बघतो
कोण कोण शिल्लक उरलंय
गप्पा मारत बसू

Tuesday, June 1, 2010

आता पाउस येणार

आता पाउस येणार...

वेधशाळा अंदाज देणार..
सरकार सूचना देणार...
धोक्याचा इशारा देणार...
अतिवृष्टीच्या दिवशी सार्वजनीक सुट्टी देणार...
आता पाउस येणार..

वारा डोंगराच्या भक्कम अडथळयाला थडकणार...
काळ्या ढगांचा तांडा आकाशात भरकटणार...
थेंब थेंब झेलताना पंख पंख फडफडणार..
आता पाउस येणार..

पोरं आता रस्त्यात वेड्यासारखी नाचणार...
आसुसलेली माती टपोर थेंब वेचणार..
आकाशाची हक रंध्रारंध्रात पोचणार...
आता पाउस येणार..

तयार असेल शेत आता हात पाय चिखलात घुसणार..
पोरीच्या लग्नाचं स्वप्न डोळ्यांना दिसणार..
यंदाचा हंगाम कर्जाचा शिक्का पुसणार...
आता पाउस येणार...

आता ट्रीप निघणार..
अनुभवांच्या मांडवावर शब्दांचे वेल चढणार..
पेपर सदर लिहिणार...
कढई भजी तळणार....
आता पाउस येणार...

छत्री, चप्पल, बूट, कोट विकायला येणार...
झोपडीचं छप्पर टप टप गळणार...
रस्ते, खड्डे, गटार, नाला, ओढा, नदी आता भरून भरून वाहणार...
आता पाउस येणार...

तलाव आणि धरण आता १०० टक्के भरणार
तो आणि ती आता पावसामध्ये फिरणार..
अचानक आलेला शिडकावा काळजामध्ये शिरणार..
आता पाउस येणार...

मुंबई भिजणार आणि दांतेवाडाहि भिजणार...
कापूसही भिजणार आणि ऊसही भिजणार...
वेगळेपणाचे भेद पावसाला कसे कळणार...
ज्याला त्याला त्याच्या तहानेचा वाटा मिळणार...
आता पाउस येणार...

झाकून ठेवा जमेल ते...
तरी पाउस घुसणार..
दडून बसलेल्या अंकुराला
हालहवाल पुसणार...
सिमेंट, माती, कातळ फोडून
नवा कोंभ दिसणार....
आता पाउस येणार...

Liu Cixin ह्यांची Three Body Problem

              Liu Cixin ह्या चायनीज लेखकाच्या तीन सायन्स फिक्शनना मिळून ‘ थ्री बॉडी प्रॉब्लेम ’ असं म्हटलं जातं. खरंतर ‘Remembrance of E...