Tuesday, November 30, 2010

रिकामटेकडा

खिडकीतून येणाऱ्या प्रकाशाच्या स्पर्शाने त्याची झोप चाळवली. थंडी पडायला सुरुवात झाली होती आणि पांघरूणात गुरफटून घेऊन झोपावं असं त्याला वाटत होतं.. पण त्याचं लक्ष आपसूक घड्याळाकडे गेलं. ८.३० वाजत आले होते..आणि हा शनिवार किंवा रविवार नव्हता .... त्याने कूस बदलली आणि बाजूला पाहिलं तर त्याचा १ मित्र उठून स्वतःच्या घरी गेला होता आणि एक उठून अंथरूण आवरत होता... तोही उठला....रात्री फूटबॉलचा सामना बघून केव्हातरी तो झोपलेला.... त्या आधी जग-दुनियेच्या चर्चा, इकडे-तिकडे फिरायला जायचे बेत आणि मग आपण काही ना काही करण्यात गुंतलेल्या जगातले काही शेवटचे रिकामटेकडे लोक आहोत अशी भोवर्यात अडकल्यासारखी जाणीव..... आपण अजूनही एखादा पिक्चर बघून त्यावर तासन-तास गप्पा मारतो, एखादा लेख वाचून त्याच्यावर समीक्षक मारामारी करू पाहतो, मग शेवटी माणूस असा का करतो ह्याच्या आंधळ्या टोकाला पोचतो, कुठेतरी पोटभर चरतो, कधीतरी आपला दिवस येईल याची उमदी स्वप्ने पाहतो आणि रात्री आपली घरात उंची मावत नाही आणि पिचत जाणार्या घरात साराच जीव ठेचाकाळला जातो म्हणून असे कुठेतरी येऊन लपतो.... उद्यावर ढकलतो आज रिकामं असण्याची तगमग, जिथे असायला हवं तिथे नसल्याचं हरवलेपण त्वेषाने सामाजिक फुत्कार टाकून भरतो आणि झोपतो....स्वप्नांच्या हल्ल्यात दचकतो आणि दर सकाळी जागे होतो एका नवीन दिवसाचा तेच तेच ओझं डोक्यावर घ्यायला....
त्याने फटाफट अंथरूण-पांघरूण आवरलं....दाराशी आलेल्या पेपरावर एक नजर फिरवली.... दिल्ली ते गल्लीच्या घोटाळे, कपात आणि खटला अशा बातम्या पाहून पेपर बाजूला टाकला . ... आपली पोतडी उचलली, मित्राला येतो म्हणून तो बाहेर पडला.....
आज मंगळवार आहे आणि आज किमान सही तरी केली पाहिजे ऑफिसात जाऊन.... म्हणजे जे काही महिन्याचे हातात लागतात ते तरी कटणार नाहीत.... पण म्हणजे आता लोकल मध्ये चढा, गरम दमट डब्यात २ तास घालवा, मग बसमध्ये चढा हळूहळू.... मग पोचा, अपराध्यासारखी सही करा....थोडावेळ इकडे, तिकडे घुटमळा, चहा प्या, भूक असेल तर नाश्ता करा, फार कोणी ओळखीचं असेल तर उसन्या अवसानाने गप्पा मारा, मग होस्टेलच्या खोलीत काही न बोलणारं एकटेपण आहे, त्याच्यात घुसून निपचित पडून राहा,,,एक दिवस अजून वजा...किंवा एकही दिवस नाही....आज असं अस्तित्व असायला काही घडल्याची खूण उमटायला हवी, ती कुठे आहे आपल्या दिवसांवर....
तो रस्त्याला आला सोसायटीचे गेट ओलांडून.... रस्त्यावर लगबग, वर्दळ कुठेतरी निघालेल्या माणसांची.... कितीवेळा हा रस्ता चाललोय आपण.... घरापासून १० पावलांवर.... ही जागा ओळखीची आहे म्हणून उबदार वाटते का ओळखीची आहे म्हणून आपण असे कोणाचीही नजर पडू नये असे चाललो आहोत.... भीती वाटते कि कोणीतरी भेटेल, काय करतोस असा अटळ प्रश्न विचारेल, आणि मग आपण चाचरू, मी करतोय काहीतरी असं त्यांना किंवा स्वतःलाच दाखवण्याची धडपड करू, मग समोरची व्यक्ती सांगेल, नव्या नोकरीबाबत, नव्या घराबाबत, किंवा लग्नाबाबत, किंवा अजून कोणाच्या ह्याच गोष्टींबाबत.... हेच खरे सुखी असण्याचे अक्षांश-रेखांश....आपण एक भरकटलेले जहाज, नव्हे होडी आहोत.... जहाज तर शेकडो लोकांना अंगा-खांद्यावर खेळवते....आपण स्वताच्याच एकट्या असण्यातही कोलमडणारी फुटकी होडी आहोत....चुकलेली, आणि एखाद्या लाटेने बुडून जाणारी....
घरी जायचं....मग आई, ती काही बोलणार नाही, पिंजारलेले केस पाहून, जागरणाने सुजलेले डोळे पाहून, किंवा आता आपण जी पिणार आहोत त्या सिगरेटचा वास आला तरी.... ती विचारणारही नाही कदाचित अजून घरीच का आहेस... किंवा फोन का बंद आहे.... ती काहीतरी खायला देईल, आणि तिच्या डोळ्याखालची वर्तुळे, सतत कामात असणारे हात घरात बसू देणार नाहीत.... पोपडे उडणार्या भिंती, सतत येणाऱ्या धुळीचा घरातल्या प्रत्येक वस्तूवर साठलेला तवंग, आणि त्याहीपेक्षा हे असं घुसमटून टाकणारा जगणं स्वीकारलेली माणसे,,,, जगण्याला असे लुचत का राहतो आपण....
तो टपरीवर पोचला.... सिगारेट शिलगावली, अण्णाला एक चहा सांगितला....इथेपण भेन्च्योत माणसे भरलेली... आणि ह्याच्या दररोज चर्चा...इथली जमीन, तीकरची जमीन, ह्याची बायको, त्याचा बंगला...आणि मध्ये-मध्ये चहा...एक कटिंग, एकात दोन.... म्हणजे इथेतरी निवांत बसून जरा शब्द घासून-पुसून घ्यावेत, किंवा काळजाला धग देणारे दोन कश मारावेत तर ही माणसे, मग त्यांच्या चेहेर्यांना सांभाळून धूर सोडा, लपलप चहा प्या....
काय हवंय आणि काय आहे ह्यांच्या मधली ही पोकळी कशी ओलांडायची.... आणि हे जे झपाट्याने मागे पडतोय आपण शर्यतीत त्याचं काय.... रस्तावर नजर टाकली कि शहर सांडतय प्रत्येक रस्ता, बोळ, गल्ली मध्ये... चौखूर उधळलेली वाहने मग भिडली आहेत एकमेकांना... माणसे मिळेल त्या कोपर्यात, चालत, धावत, रेंगाळत, रडत-रखडत.... आणि होईल तसं हे शहर जुन्या शांततेचे सारे अवशेष व्यापून टाकतंय.... इमारतींच्या रांगांमागून रांगा.... आणि त्यात साचून दबा धरून बसलेली माणसे.... दिवसभर शहराच्या काही डबक्यात ही माणसे काम म्हणून जमणार....तिथे ह्यांच्या आकांक्षा, इच्छा एकमेकांना दाबत, सांभाळत जिवंत राहणार...गर्दीच्या लोंढ्यात हे 'हर हर महादेव' करणार....दोन दिवस सुट्टीचे तिथे झोपणार, गच्च जेवणार, किंवा स्वतःच्या अनंत प्रतीकृत्या शहरात आहेत त्यातल्या अजून कोणाला भेटणार....पण येत्या आठवड्यासाठी मोर्चेबांधणी करून तयार.... हे सारं शहर आक्रमक होत चाल्लय, मैत्री-आनंदाच्या पडद्याआडून प्रत्येक जण इतरांशी पावलं मिळवून चालायच्या धडपडीत आहे.... छुपे रस्ते, पळवाटा शोधून प्रत्येक जण अंगाला जाणवणाऱ्या समाधानाची जी थोडी बेटे ह्या शहरात आहेत तिथे पोचायची धडपड करतोय... आधी आपण, मग आपले, मग कदाचित थोडे दूरचे आपले.... आणि त्यावेळी मंद गंधित फुलांचे ताटवे असलेले ते रस्ते आक्रसत चालले आहेत.... पानांचे कोवळे पोपटी रंग गाड्यांच्या बंध-रहित रेषात हरवले आहेत.... आणि आपण या शहराच्या तुकडे-तुकडे जमवण्याच्या कोड्यात कुठेही न बसणारा एक तुकडा आहोत, अजून कुठल्याही तुकड्याच्या कडांशी न जुळणारा, आणि तरीही ह्याच कोड्याचा अविभाज्य भाग....
सिगरेट संपली.... दिवस भर वेगात पळतो आहे, माणसांनी त्यांची त्यांची लय पकडली आहे, पोरं, म्हातारे, तरणे, पांगळे जे ते आपल्या आपल्या लढाईला तयार झाला आहे, लक्षावधी माणसांच्या स्वार्थ-परमार्थांच्या उभ्या-आडव्या रेषात, आपले-परकेपणाच्या भिंती-पडद्यात प्रत्येकाला एक संदर्भ मिळाला आहे, आपल्या वाट्याचा अंधार उद्याच्या कुशीत येणाऱ्या तलम हिरवळीवर सोडत अनेक जण आपली आपली एक एक वीट रचतायेत, शहराच्या रेशमी, आरस्पानी टोकांवर पोचलेले कुंपण उभारण्यात मग्न आहेत... गर्दीचा ओहोळ दररोज सीमा विस्तारत जातो आहे, आणि प्रत्येकावर शिक्का ठोकतोय, पळण्याचा, काहीतरी असण्याचा, हळूहळू स्वतःभोवती वस्तूंची, माणसांची जाळी जमत जातायेत....
आणि आपण उभे आहोत इथे फक्त.... कुठे न जाणारे, कुठे जायचय हे माहित नसणारे, आणि जिथून आलो ते गाव, त्या स्तब्ध वेळा, ती हसणारी- न खुपणार्या ओळखीच्या नजरा असणारी माणसे या गर्दीत अजूनही शोधत बसणारे...

Thursday, November 25, 2010

सूर्यास्त

समोर उंचच उंच इमारती आहेत, म्हणजे स्कायस्क्रेपरस... आणि ही संध्याकाळ आहे.... काही दिवसांपूर्वी 'जल' नावाच्या चक्रीवादळाच्या कारणाने वातावरण ढगाळ होतं... पण आता ते चक्रीवादळ हे कारण उरलेलं नाही..पण वातावरण ढगाळ असतं....रात्री पाउस पडतो...दिवसभर तो ओलसरपणा उरतो....उन्ह कुठेच नसतं.... आणि मग संध्याकाळ येतं....दिवस होतं एवढं दर्शवण्यापुरता उन्ह स्पर्श करून जातं.... आणि त्या उन्हाच्या उबेचा स्पर्श साठतोय तोच संध्याकाळ येते.... संध्याकाळ अस्ताची एक जाणीव असते....जे आहे, सुंदर आहे किंवा आहे ते संपणार आहे त्याची जाणीव....माणसाच्या मर्यादित अस्तीवाची, जाणिवांची जाणीव.... त्यात उदास होणं आहेच, पण समजूतदारपणे जर ते उदास होणं टाळला तरी एक निस्तब्धता उरतेच....समोर अस्ताला जाणारे सूर्यबिंब आहे आणि मला कोणाला तरी सांगावासा वाटतंय जे माझ्या मनात उचंबळून येतंय हा समोरचा सूर्यास्त पाहताना.... माझ्या डोळ्यातून पाहावा कोणीतरी हा क्षण....माझ्या शब्दांत कोणीतरी भोगावा हा क्षण.....
समोर दोन उंच इमारती आहेत....त्यांचं बांधकाम चालू आहे अजून.... किमान २० मजल्यांच्या आहेत ह्या इमारती.... आणि अजून तरी क्षितिजरेषेवर कोणीच नाही त्यांच्या एवढं उंच.... आजचे सूर्यबिंब नेमके ह्या इमारतीच्या मागे आहे.... आणि आता अस्ताला जाताना ते ह्या इमारतींच्या मागे अस्ताला जाईल...अस्ताला जाईल म्हणजे? मला काहीकाळ दिसणार नाही प्रकाश..अंधार नावाची एक जाणीव व्यापून राहील... पण उद्या असणार आहे..... परत प्रकाश, परत दिवस, परत तेच आशांच्या हिंदोळ्यावर झुलणं... आणि मग हा अस्ताचा क्षण.... संपण म्हणजे काय? मरणं म्हणजे काय? पुन्हा कधीही नसणं म्हणजे काय?
माणसाने कायम स्वतःच्या मर्यादाना आव्हान दिलं आहे...ह्या समोरच्या इमारती म्हणजे एक आव्हान आहे....माणसाच्या उंचीच्या कितीतरी पट उंच ह्या इमारती..क्षितीजालाही उंचावणाऱ्या....आणि आता तर त्या त्यांच्या मागे त्या साक्षात सूर्यबिंब दडवातायेत.... म्हणजे माणसाने काही कायमस्वरूपी बदल केला का? एवढी उंची वाढवून त्याने स्वतःच्या अटळ नष्ट होण्यात एखादा चिरस्थायी क्षण जमा केला का? उद्या असणार नाही का? उद्या म्हणजे? आज म्हणजे?
प्रश्नाचे आवर्त स्थिरावले आहे ह्या क्षणापुरते..... समोरचे केशरी लालसर सूर्यबिंब झपाट्याने त्या इमारतींच्या उंचीमागे लपते आहे.... दिसेनासे होते आहे.... कदाचित ह्या प्रचंड शहरात असाच कोणीतरी हा सूर्यास्त पहात असेल....उदासीच्या ओलसर काळोखात बुडून जाताना त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असेल.... आणि त्याच्या समोर ह्या इमारती नसतील तर कदाचित अंधाराच्या स्तब्ध, नितळ प्रवाहात मिळून जाण्याचा क्षण त्याच्यासाठी थोडा अजून लांबला असेल...पण येईल.... सगळ्यासाठी एक दिवस हा दिवस संपेल.... म्हणजे जगण्याच्या नष्टप्राय होणार्या प्रवाहात स्वतःची खुण सोडण्याचा अजून एक दिवस संपेल....
....मला आठवण येतीये तुझी.... शक्यतांच्या व्यापक पाट चाचपताना वाटतंय कि तू असतीस आत्ता बाजूला तर हा क्षण एवढा जाणवला असता का? तुझं नसणं हे माझ्या संवेदनांच्या टोकदार असण्याचा कारण आहे.... कदाचित काही नसणं हे असण्याची धडपड अजून अजून तीव्र करत जातं.... पण जेव्हा मिळतं तेव्हा ते मिळालं हे जाणवतही नाही....जाणवतं ते हे कि नसण्याची मायाळू जाणीव हरवत चालली आहे....
माणसाला 'आहे' हे समजतंच नाही कधी.... काय 'नाही' तेच टोचत रहाते, डाचत रहाते....
बघ 'उद्या' येईल....म्हणजे आपण आपल्या नष्ट होण्याची अटळ जाणीव पुढे ढकलू.... आशांचे मोहर येतील.... त्यांच्या क्षणभंगुर फुलांवर आपण आपला जीव ओवाळून टाकू.... आणि एकदम असा एखादा क्षण येईल... माणसांच्या शक्यतांच्या उंचीसमोर अस्ताला जाणारे हे सूर्यबिंब सार्या व्याकूळ जाणीवा सोबत आणेल.... आणि मग समोरच्या सौन्दर्यासमोर निशब्द होताना आपल्या आठवणींचे कढ येतील, चुरल्या-विरल्या स्वप्नांचे ढीग विरत जातील आणि एक निरव जाणीव ओथंबून जाईल जीवात....

कबड्डी-कबड्डी- पूर्वार्ध

एक पडकी जागा....जिथे आधीच्या वास्तूचे भग्नावशेष आहेत....आणि तिथे एखादी स्कायस्क्रेपर होण्यापलीकडे काय होणार या मुंबईत.... पण मुंबई एक वेगळी चीज आहे....
ती पडकी जागा साफसूफ होते.... तिथली जमीन सपाट केली जाते....त्यावर नवीन मातीचा थर टाकला जातो आणि एका संध्याकाळी आता या नवीन बनलेल्या मैदान-सदृश जागेच्या चारी कोपर्यानावर क्रिकेटच्या मैदानावर असतात तसे चार प्रखर प्रकाशझोत लागतात....मैदानाच्या एका बाजूला मध्यवर्ती स्टेज बनते... प्रचार नाही,नवा पक्ष नाही, मग आता ही सभा कोणाची..... पुढच्या दिवशी काही कार्यकर्ता वाटणारी माणसे होर्डींग्ज वगैरे घेऊन येतात....राजकीय नेत्यांच्या प्रतिमांनी बरंच भाग व्यापलेला असलं तरी त्या होर्डींग्जवर स्पष्ट असतं त्या मैदानावर होणार्या 'इवेन्ट' चं नाव.... 'महाराष्ट्र राज्य कबड्डी स्पर्धा'
जिथे स्पर्धा होणार त्याच्या एका बाजूला उच्च-मध्यमवर्गीय वस्ती तर लागून असलेल्या रस्त्याच्या दुसर्या बाजूला मराठी आणि उत्तर भारतीय अशी मिश्र वस्ती.... वस्तीला एक मैदान नाही, आहे त्या मोकळ्या जागेत क्रिकेट शिवाय काही खेळलं जात नाही... स्पर्धा बघायला प्रेक्षकांना ४ सज्जे बनवले आहेत...कोण येणार बघायला....
शनिवार २० नव्हेंबर ची संध्याकाळ.... महाराष्ट्रातल्या जिल्हाचे महिला व पुरुष संघ दाखल होऊ लागतात.... त्यांची वर्दळ, तयारी मैदानाच्या आसपास जाणवू लागते.... आणि 'भैसाब, याहन क्या हो राहा है' असा प्रश्न विचारत अनेक जण तिथे दाखल होऊ लागतात....स्पर्धेचे स्वयंसेवक आणि सुरक्षारक्षक त्यांना प्रेक्षकांच्या जागेत बसायची विनंती करतात जी साहजिक धुडकावली जाते..... मुंबई शहर आणि उपनगर संघ येतो त्याबरोबर त्यांचे चाहतेही येतात...ते प्रेक्षकांसाठीच्या जागेत बसतात....त्यातले काही माजी खेळाडू, जे इतर जिल्ह्यातल्या खेळाडूना ओळखतात..हळू-हळू कोण 'बादशा' आहे, कोणाचा गेम आताएवढा राहीला नाही अशी इतिहासाची आणि सांख्यिकीची उजळणी होते.... आणि मंचावरून आवाज येतो.... पहिले वाद्य आणि मग गाणं ''''खेळू कबड्डी अभिमानाने....अभिमानाने'''
राजकीय नेत्यांच्या सहस्त्रानामानंतर पहिला सामना घोषित होतो.... 'अहमदनगर विरुद्ध वाशीम'' सहा मैदाने, विद्युत प्रकाश-झोतात न्हाऊन निघालेली, प्रत्येक मैदानाजवळ इलेक्ट्रोनिक गुण-फलक, प्रत्येक मैदानापाशी सांख्यिकीची टीम, पंच, सामनाधिकारी, दोन्ही संघाचे खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, पुरस्कर्ते, आणि काही खास पाठीराखे.... खेळाडू सराव करतायेत, धावतायेत, पकडीचा सराव करतायेत, उड्या, स्ट्रेचिंग.... थोड्याच वेळात नाणेफेक होते.... दोन्ही संघ त्यांच्या बाजू घेतात.... पंच दोन्ही संघाशी बोलतात आणि शिट्टी होते... सामना सुरु..... बघे सरसावतात....कुतूहलाने बघू लागतात....सुरुवातीच्या २-३ सावध खेळीनंतर एक सर्विस..... रायडर दम घेतो आहे....उजव्या कोपर्यात खोलवर घुसून बोनस गुण साधू पाहतो आहे....तेवढ्यात त्याचा उजवा पाय पकडला जातो,,, तो कोपराराक्षकाला मध्यरेषेकडे खेचतो...पण डावीकडच्या कोपर्याने त्याला आता घेरला आहे... तो त्यांना घेऊन मध्यारेषेला स्पर्श करणार इतक्यात त्याचा खांदा अडवत त्याला परत आतमध्ये खेचला जाता....पंच शिट्टी मारतात....पहिला गुण.... आणि बघ्यांच्या नकळत त्यांचा आवाज थांबलेला.... आणि हात टाळ्या वाजवू लागलेले..... स्वयंसेवक आणि सुरक्षारक्षक परत त्यांना प्रेक्षकांसाठीच्या जागेत बसायची विनंती करतात.... आणि आता ती स्वीकारली जाते.... जाते....फक्त आत्तासाठी नाही... पुढचे ४ दिवसही.....

Saturday, November 6, 2010

दिव्या दिव्या दिपत्कार

या दिवसात दुख वगैरे गोष्टींची आठवणच यायला नको. उदास वाटायला नको, चुकीच्या जागी अडकून पडलो आहोत असं वाटायला नको, जवळपास खूप माणसे असण्याचा कंटाळा यायला नको, अगदी जवळचं माणूसही गाभ्याशी आपल्याशी अनभिज्ञ आहे असा साक्षात्कारही व्हायला नको. होतोय एवढं खरं, असं वाटतंय एवढं खरं...
काल लोकलमधून येत होतो. एक भिकारीण, थकलेली, त्वचेवर सुरुकुत्यांचा जाळे , अनेक वर्षापूर्वी डोळ्यांवर आलेला आणि आता काहीही कामाचा न उरलेला चष्मा, विरलेली, विटलेली आणि तरीही अंग झाकून असलेली साडी, खांद्याशी एक प्लास्टिकची मातकट पिशवी, हाताची ओंजळ पुढे पसरलेली, आणि किनार्या दुखर्या आवाजात सवयीने म्हटलं जाणारं दीनवाणा गाणं....दिवाळीचे दिवस हे बोनस मिळण्याचे किंवा अर्थव्यवस्थेची पातळी उंचावण्याचे असतात अशाने म्हणून कि काय भिक मागणारे एकूणच शहरात वाढलेले आहेत सध्या....तान्ही पोरं थानाशी घेतेलेल्या तरण्या बाया, आंधळे, जुनिअर कडकलक्ष्मी, हिजडे, पांगळे आणि अनेक प्रकार.... कदाचित ह्या आजी हंगामी नसाव्यात... त्यांना द्यायला माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. दहा रुपयाची नोट द्यावी असं वाटत नव्हतं आणि अशी भिक मागून जगण्यापेक्षा मेली तर बरी असही त्यांच्याकडे बघून वाटत होतं... अर्थात हे सगळं माझा पोटभरीचा ज्ञान.... लोकलच्या वेगाशी जमवत, पाय सरकवत सरकवत आजी माझ्याजवळून गेल्या....त्या म्हणत असलेली ओळ होती,, 'वाट माहेरची दूर''
कुठला माहेर आठवत असेल आत्ता तिला...ज्याने कोणी ही ओळ लिहिली त्याला कदाचित पारमार्थिक अर्थ अभिप्रेत असेल, पण आत्ता ह्या बाईच्या रखरखीत संदर्भात 'माहेर' कुठे आहे....महाराष्ट्राच्या उण्या-पुर्या ३० जिल्ह्यात ४० एक वर्षापूर्वी असलेल्या एखाद्या लहानश्या गावात, का या शहराच्या एखाद्या अंधार्या कोपर्यात तगून राहिलेल्या तिच्या कुडीत
का एकाही उजळ रेषा दिसत नसलेल्या तिच्या उदयात..... का काहीच आकळत नाही म्हणून माहेर दूर आहे....जगण्याचा तंतू तुटत नाही म्हणून माहेर दूर आहे का....
आत्ता रात्री ती काय जेवेल...तिला ढास लागली तर भांडभर पाण्यासाठी ती काय करेल, कोणी असेल तिच्या सोबत.. ती मेल्यावर आपली म्हणून म्हणून तिला जळणारा वगैरे....हे प्रश्न माझे नाहीत, तिचं अंधारही माझा नाही...कारण तिच्या वंशरेशेने मला छेडलेला नाही.... पण तिने माझ्यावर चरा तर सोडला आहे....
मागच्या वर्षी असंच एका रोशानाईत मग्न रस्त्याच्या कडेने चालणारा एक लंगडा म्हातारा दिसला होता... हातात एक पिशवी, कुबडी आणि आपल्याच पायात घुटमळत जाणारी पराभूत नजर....त्याच्या कोसळलेल्या आयुष्यात काहीच नाही आता पेटण्यासारखा कदाचित.... आठवणींची काजळी जपत खंगत तेवढं जायचं असंच असेल कदाचित....
असं विचार करत राहीला तर कोणालाच आनंदी रहाता येणार नाही... माणसाचं आयुष्य काळाच्या रेषेवर सरळ जसं पसरलेलं असतं तसं त्याच्या अवती-भवती ते अडवारलेलही असतं....त्याचा काल आणि उद्या त्याच्या आजूबाजूला नांदत असतो...अगदी त्याचा नाही, पण त्याच्याहून खास वेगळाही नाही.... आपण तो बघत नाही, बघितलं तर सोयीस्कर अर्थ लावतो, दुखला-खुपला तर शहामृगासारखी आपल्या वाळूत मान घालतो किंवा पिढ्यान-पिढ्या जपत आलेल्या उद्याच्या स्वप्नांवर अर्थ नसण्याचं दुखरेपण सोडून देतो....
एक मैत्रीण सांगत होती कि लहानपणी ती खूप आवडीने फटके लावायची...मग एक दिवस तिच्या लक्षात आलं कि आपण एकच क्रिया परत-परत करतो आहोत...एका ठिकाणाहून आग घ्यायची, दुसर्या ठिकाणी लावायची आणि आवाज ऐकायचा किंवा प्रकाश पाहायचा....आणि मग तिला फटके लावावेसेच वाटेनात....पर्यावरणाची काळजी वगैरे थोर काही नाही....बस कंटाळा.... कळायला लागलं कि अर्थहीनता जाणवते....आपलं सुख किंवा दुख आपण अगोदर मनाशी जुळवलेल्या किंवा जुळवायच्या राहिलेल्या जगाच्या प्रतिमेवर अवलंबून असतं... ते सुख किंवा दुख मुळात नाहीचे, ते आपल्या आतल्या प्रतिमेची सावली किंवा पोकळी आहे असं जाणवलं कि काहीच जाणवत नाही....फक्त 'मग काय' असं कृष्णविवर... अर्थाभासाच्या आकर्षणात जाणीवेचा सारा प्रकाशही खेचून घेणारं...त्याच्या मुळाशी काही असेलही,,,पण ते कोणी कोणाला न सांगू शकणारं....अगदी अगदी माझं....
जगणं स्थिर होऊ नये हेच बरं किंवा खरं....म्हणजे मग ते कशावर स्थिर आहे.... इंद्रियांच्या सुस्त जाणीवांवर का खर्या-खुर्या सुखावर असला भयाण प्रश्न पडत नाही.... जगणं स्थिरावला तरी ते एखाद्या वेडसर लयीच्या आवर्तांवर असावं.... ती लय ओसरावी आणि असणंही मालवून जावं...
शहराच्या उजळून निघालेल्या, स्वतःभोवती गिरक्या घेणाऱ्या लहान मुलीसारख्या आत्म-निमग्न आनंदात चाचपडणारी, अंधारी आयुष्ये दिसतही नाहीयेत.... त्यांच्या काजळ-कोपर्यांचे ठसे तेवढे शब्दांवर राहिलेत माझ्या.... फटाक्यांच्या आवाजात मला त्या म्हातारीचा 'वाट माहेरची दूर' एवढं कापरा आवाज ऐकू येतोय, हळू-हळू विरत जाणारा.... जल्लोषाच्या वैभवी नृत्यात मला ठेचाकालणारा म्हातारा दिसतोय.... सारी लय हरवून हळू-हळू गोठत जाणारा....
आयुष्याच्या गर्तांची जाणीव खोल उमटो माझ्यावर . ... आयुष्याचा दिवा जळो... आणि विझाण्याधी त्यातून जाणीवेचा एखादातरी प्रकाशकण प्रकटो ...
दिव्या दिव्या दिपत्कार....

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...