Thursday, November 25, 2010

सूर्यास्त

समोर उंचच उंच इमारती आहेत, म्हणजे स्कायस्क्रेपरस... आणि ही संध्याकाळ आहे.... काही दिवसांपूर्वी 'जल' नावाच्या चक्रीवादळाच्या कारणाने वातावरण ढगाळ होतं... पण आता ते चक्रीवादळ हे कारण उरलेलं नाही..पण वातावरण ढगाळ असतं....रात्री पाउस पडतो...दिवसभर तो ओलसरपणा उरतो....उन्ह कुठेच नसतं.... आणि मग संध्याकाळ येतं....दिवस होतं एवढं दर्शवण्यापुरता उन्ह स्पर्श करून जातं.... आणि त्या उन्हाच्या उबेचा स्पर्श साठतोय तोच संध्याकाळ येते.... संध्याकाळ अस्ताची एक जाणीव असते....जे आहे, सुंदर आहे किंवा आहे ते संपणार आहे त्याची जाणीव....माणसाच्या मर्यादित अस्तीवाची, जाणिवांची जाणीव.... त्यात उदास होणं आहेच, पण समजूतदारपणे जर ते उदास होणं टाळला तरी एक निस्तब्धता उरतेच....समोर अस्ताला जाणारे सूर्यबिंब आहे आणि मला कोणाला तरी सांगावासा वाटतंय जे माझ्या मनात उचंबळून येतंय हा समोरचा सूर्यास्त पाहताना.... माझ्या डोळ्यातून पाहावा कोणीतरी हा क्षण....माझ्या शब्दांत कोणीतरी भोगावा हा क्षण.....
समोर दोन उंच इमारती आहेत....त्यांचं बांधकाम चालू आहे अजून.... किमान २० मजल्यांच्या आहेत ह्या इमारती.... आणि अजून तरी क्षितिजरेषेवर कोणीच नाही त्यांच्या एवढं उंच.... आजचे सूर्यबिंब नेमके ह्या इमारतीच्या मागे आहे.... आणि आता अस्ताला जाताना ते ह्या इमारतींच्या मागे अस्ताला जाईल...अस्ताला जाईल म्हणजे? मला काहीकाळ दिसणार नाही प्रकाश..अंधार नावाची एक जाणीव व्यापून राहील... पण उद्या असणार आहे..... परत प्रकाश, परत दिवस, परत तेच आशांच्या हिंदोळ्यावर झुलणं... आणि मग हा अस्ताचा क्षण.... संपण म्हणजे काय? मरणं म्हणजे काय? पुन्हा कधीही नसणं म्हणजे काय?
माणसाने कायम स्वतःच्या मर्यादाना आव्हान दिलं आहे...ह्या समोरच्या इमारती म्हणजे एक आव्हान आहे....माणसाच्या उंचीच्या कितीतरी पट उंच ह्या इमारती..क्षितीजालाही उंचावणाऱ्या....आणि आता तर त्या त्यांच्या मागे त्या साक्षात सूर्यबिंब दडवातायेत.... म्हणजे माणसाने काही कायमस्वरूपी बदल केला का? एवढी उंची वाढवून त्याने स्वतःच्या अटळ नष्ट होण्यात एखादा चिरस्थायी क्षण जमा केला का? उद्या असणार नाही का? उद्या म्हणजे? आज म्हणजे?
प्रश्नाचे आवर्त स्थिरावले आहे ह्या क्षणापुरते..... समोरचे केशरी लालसर सूर्यबिंब झपाट्याने त्या इमारतींच्या उंचीमागे लपते आहे.... दिसेनासे होते आहे.... कदाचित ह्या प्रचंड शहरात असाच कोणीतरी हा सूर्यास्त पहात असेल....उदासीच्या ओलसर काळोखात बुडून जाताना त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असेल.... आणि त्याच्या समोर ह्या इमारती नसतील तर कदाचित अंधाराच्या स्तब्ध, नितळ प्रवाहात मिळून जाण्याचा क्षण त्याच्यासाठी थोडा अजून लांबला असेल...पण येईल.... सगळ्यासाठी एक दिवस हा दिवस संपेल.... म्हणजे जगण्याच्या नष्टप्राय होणार्या प्रवाहात स्वतःची खुण सोडण्याचा अजून एक दिवस संपेल....
....मला आठवण येतीये तुझी.... शक्यतांच्या व्यापक पाट चाचपताना वाटतंय कि तू असतीस आत्ता बाजूला तर हा क्षण एवढा जाणवला असता का? तुझं नसणं हे माझ्या संवेदनांच्या टोकदार असण्याचा कारण आहे.... कदाचित काही नसणं हे असण्याची धडपड अजून अजून तीव्र करत जातं.... पण जेव्हा मिळतं तेव्हा ते मिळालं हे जाणवतही नाही....जाणवतं ते हे कि नसण्याची मायाळू जाणीव हरवत चालली आहे....
माणसाला 'आहे' हे समजतंच नाही कधी.... काय 'नाही' तेच टोचत रहाते, डाचत रहाते....
बघ 'उद्या' येईल....म्हणजे आपण आपल्या नष्ट होण्याची अटळ जाणीव पुढे ढकलू.... आशांचे मोहर येतील.... त्यांच्या क्षणभंगुर फुलांवर आपण आपला जीव ओवाळून टाकू.... आणि एकदम असा एखादा क्षण येईल... माणसांच्या शक्यतांच्या उंचीसमोर अस्ताला जाणारे हे सूर्यबिंब सार्या व्याकूळ जाणीवा सोबत आणेल.... आणि मग समोरच्या सौन्दर्यासमोर निशब्द होताना आपल्या आठवणींचे कढ येतील, चुरल्या-विरल्या स्वप्नांचे ढीग विरत जातील आणि एक निरव जाणीव ओथंबून जाईल जीवात....

हंपी

       कुटुंब-कबिला घेऊन आनंदी वाटायला जाण्यासाठी हंपी नाही. संपन्न होणारी, विस्तार पावू इच्छिणारी, प्रतिस्पर्धी साम्राज्यांना धुळीस मिळवू...