Tuesday, November 30, 2010

रिकामटेकडा

खिडकीतून येणाऱ्या प्रकाशाच्या स्पर्शाने त्याची झोप चाळवली. थंडी पडायला सुरुवात झाली होती आणि पांघरूणात गुरफटून घेऊन झोपावं असं त्याला वाटत होतं.. पण त्याचं लक्ष आपसूक घड्याळाकडे गेलं. ८.३० वाजत आले होते..आणि हा शनिवार किंवा रविवार नव्हता .... त्याने कूस बदलली आणि बाजूला पाहिलं तर त्याचा १ मित्र उठून स्वतःच्या घरी गेला होता आणि एक उठून अंथरूण आवरत होता... तोही उठला....रात्री फूटबॉलचा सामना बघून केव्हातरी तो झोपलेला.... त्या आधी जग-दुनियेच्या चर्चा, इकडे-तिकडे फिरायला जायचे बेत आणि मग आपण काही ना काही करण्यात गुंतलेल्या जगातले काही शेवटचे रिकामटेकडे लोक आहोत अशी भोवर्यात अडकल्यासारखी जाणीव..... आपण अजूनही एखादा पिक्चर बघून त्यावर तासन-तास गप्पा मारतो, एखादा लेख वाचून त्याच्यावर समीक्षक मारामारी करू पाहतो, मग शेवटी माणूस असा का करतो ह्याच्या आंधळ्या टोकाला पोचतो, कुठेतरी पोटभर चरतो, कधीतरी आपला दिवस येईल याची उमदी स्वप्ने पाहतो आणि रात्री आपली घरात उंची मावत नाही आणि पिचत जाणार्या घरात साराच जीव ठेचाकाळला जातो म्हणून असे कुठेतरी येऊन लपतो.... उद्यावर ढकलतो आज रिकामं असण्याची तगमग, जिथे असायला हवं तिथे नसल्याचं हरवलेपण त्वेषाने सामाजिक फुत्कार टाकून भरतो आणि झोपतो....स्वप्नांच्या हल्ल्यात दचकतो आणि दर सकाळी जागे होतो एका नवीन दिवसाचा तेच तेच ओझं डोक्यावर घ्यायला....
त्याने फटाफट अंथरूण-पांघरूण आवरलं....दाराशी आलेल्या पेपरावर एक नजर फिरवली.... दिल्ली ते गल्लीच्या घोटाळे, कपात आणि खटला अशा बातम्या पाहून पेपर बाजूला टाकला . ... आपली पोतडी उचलली, मित्राला येतो म्हणून तो बाहेर पडला.....
आज मंगळवार आहे आणि आज किमान सही तरी केली पाहिजे ऑफिसात जाऊन.... म्हणजे जे काही महिन्याचे हातात लागतात ते तरी कटणार नाहीत.... पण म्हणजे आता लोकल मध्ये चढा, गरम दमट डब्यात २ तास घालवा, मग बसमध्ये चढा हळूहळू.... मग पोचा, अपराध्यासारखी सही करा....थोडावेळ इकडे, तिकडे घुटमळा, चहा प्या, भूक असेल तर नाश्ता करा, फार कोणी ओळखीचं असेल तर उसन्या अवसानाने गप्पा मारा, मग होस्टेलच्या खोलीत काही न बोलणारं एकटेपण आहे, त्याच्यात घुसून निपचित पडून राहा,,,एक दिवस अजून वजा...किंवा एकही दिवस नाही....आज असं अस्तित्व असायला काही घडल्याची खूण उमटायला हवी, ती कुठे आहे आपल्या दिवसांवर....
तो रस्त्याला आला सोसायटीचे गेट ओलांडून.... रस्त्यावर लगबग, वर्दळ कुठेतरी निघालेल्या माणसांची.... कितीवेळा हा रस्ता चाललोय आपण.... घरापासून १० पावलांवर.... ही जागा ओळखीची आहे म्हणून उबदार वाटते का ओळखीची आहे म्हणून आपण असे कोणाचीही नजर पडू नये असे चाललो आहोत.... भीती वाटते कि कोणीतरी भेटेल, काय करतोस असा अटळ प्रश्न विचारेल, आणि मग आपण चाचरू, मी करतोय काहीतरी असं त्यांना किंवा स्वतःलाच दाखवण्याची धडपड करू, मग समोरची व्यक्ती सांगेल, नव्या नोकरीबाबत, नव्या घराबाबत, किंवा लग्नाबाबत, किंवा अजून कोणाच्या ह्याच गोष्टींबाबत.... हेच खरे सुखी असण्याचे अक्षांश-रेखांश....आपण एक भरकटलेले जहाज, नव्हे होडी आहोत.... जहाज तर शेकडो लोकांना अंगा-खांद्यावर खेळवते....आपण स्वताच्याच एकट्या असण्यातही कोलमडणारी फुटकी होडी आहोत....चुकलेली, आणि एखाद्या लाटेने बुडून जाणारी....
घरी जायचं....मग आई, ती काही बोलणार नाही, पिंजारलेले केस पाहून, जागरणाने सुजलेले डोळे पाहून, किंवा आता आपण जी पिणार आहोत त्या सिगरेटचा वास आला तरी.... ती विचारणारही नाही कदाचित अजून घरीच का आहेस... किंवा फोन का बंद आहे.... ती काहीतरी खायला देईल, आणि तिच्या डोळ्याखालची वर्तुळे, सतत कामात असणारे हात घरात बसू देणार नाहीत.... पोपडे उडणार्या भिंती, सतत येणाऱ्या धुळीचा घरातल्या प्रत्येक वस्तूवर साठलेला तवंग, आणि त्याहीपेक्षा हे असं घुसमटून टाकणारा जगणं स्वीकारलेली माणसे,,,, जगण्याला असे लुचत का राहतो आपण....
तो टपरीवर पोचला.... सिगारेट शिलगावली, अण्णाला एक चहा सांगितला....इथेपण भेन्च्योत माणसे भरलेली... आणि ह्याच्या दररोज चर्चा...इथली जमीन, तीकरची जमीन, ह्याची बायको, त्याचा बंगला...आणि मध्ये-मध्ये चहा...एक कटिंग, एकात दोन.... म्हणजे इथेतरी निवांत बसून जरा शब्द घासून-पुसून घ्यावेत, किंवा काळजाला धग देणारे दोन कश मारावेत तर ही माणसे, मग त्यांच्या चेहेर्यांना सांभाळून धूर सोडा, लपलप चहा प्या....
काय हवंय आणि काय आहे ह्यांच्या मधली ही पोकळी कशी ओलांडायची.... आणि हे जे झपाट्याने मागे पडतोय आपण शर्यतीत त्याचं काय.... रस्तावर नजर टाकली कि शहर सांडतय प्रत्येक रस्ता, बोळ, गल्ली मध्ये... चौखूर उधळलेली वाहने मग भिडली आहेत एकमेकांना... माणसे मिळेल त्या कोपर्यात, चालत, धावत, रेंगाळत, रडत-रखडत.... आणि होईल तसं हे शहर जुन्या शांततेचे सारे अवशेष व्यापून टाकतंय.... इमारतींच्या रांगांमागून रांगा.... आणि त्यात साचून दबा धरून बसलेली माणसे.... दिवसभर शहराच्या काही डबक्यात ही माणसे काम म्हणून जमणार....तिथे ह्यांच्या आकांक्षा, इच्छा एकमेकांना दाबत, सांभाळत जिवंत राहणार...गर्दीच्या लोंढ्यात हे 'हर हर महादेव' करणार....दोन दिवस सुट्टीचे तिथे झोपणार, गच्च जेवणार, किंवा स्वतःच्या अनंत प्रतीकृत्या शहरात आहेत त्यातल्या अजून कोणाला भेटणार....पण येत्या आठवड्यासाठी मोर्चेबांधणी करून तयार.... हे सारं शहर आक्रमक होत चाल्लय, मैत्री-आनंदाच्या पडद्याआडून प्रत्येक जण इतरांशी पावलं मिळवून चालायच्या धडपडीत आहे.... छुपे रस्ते, पळवाटा शोधून प्रत्येक जण अंगाला जाणवणाऱ्या समाधानाची जी थोडी बेटे ह्या शहरात आहेत तिथे पोचायची धडपड करतोय... आधी आपण, मग आपले, मग कदाचित थोडे दूरचे आपले.... आणि त्यावेळी मंद गंधित फुलांचे ताटवे असलेले ते रस्ते आक्रसत चालले आहेत.... पानांचे कोवळे पोपटी रंग गाड्यांच्या बंध-रहित रेषात हरवले आहेत.... आणि आपण या शहराच्या तुकडे-तुकडे जमवण्याच्या कोड्यात कुठेही न बसणारा एक तुकडा आहोत, अजून कुठल्याही तुकड्याच्या कडांशी न जुळणारा, आणि तरीही ह्याच कोड्याचा अविभाज्य भाग....
सिगरेट संपली.... दिवस भर वेगात पळतो आहे, माणसांनी त्यांची त्यांची लय पकडली आहे, पोरं, म्हातारे, तरणे, पांगळे जे ते आपल्या आपल्या लढाईला तयार झाला आहे, लक्षावधी माणसांच्या स्वार्थ-परमार्थांच्या उभ्या-आडव्या रेषात, आपले-परकेपणाच्या भिंती-पडद्यात प्रत्येकाला एक संदर्भ मिळाला आहे, आपल्या वाट्याचा अंधार उद्याच्या कुशीत येणाऱ्या तलम हिरवळीवर सोडत अनेक जण आपली आपली एक एक वीट रचतायेत, शहराच्या रेशमी, आरस्पानी टोकांवर पोचलेले कुंपण उभारण्यात मग्न आहेत... गर्दीचा ओहोळ दररोज सीमा विस्तारत जातो आहे, आणि प्रत्येकावर शिक्का ठोकतोय, पळण्याचा, काहीतरी असण्याचा, हळूहळू स्वतःभोवती वस्तूंची, माणसांची जाळी जमत जातायेत....
आणि आपण उभे आहोत इथे फक्त.... कुठे न जाणारे, कुठे जायचय हे माहित नसणारे, आणि जिथून आलो ते गाव, त्या स्तब्ध वेळा, ती हसणारी- न खुपणार्या ओळखीच्या नजरा असणारी माणसे या गर्दीत अजूनही शोधत बसणारे...

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...