Saturday, December 4, 2010

डिसेंबर

अजून एक अर्धवट विझला दिवस मनात साठवत तो चालायला लागला. असा एकदम मानगूट पकडणारा कंटाळा त्याला आता सवयीचा झाला होता. कंटाळा म्हणजे एकच रंगाचा चष्मा लावण्यासारखं आहे, त्यातून सगळ्या गोष्टी अर्थहिनतेच्या गर्तेत जाताना दिसतात आणि आपण ते पहात राहण्यापलीकडे काही करू शकत नाही. संध्याकाळ होत आलेली, थंडीचे दिवस असल्याने उन्हाने लवकरच काढता पाय घेतला होता. पश्चिमेला लालसर सूर्यबिंब क्षण-दोन क्षण प्रत्येक बिंदूशी थांबत, प्रत्येक स्तब्ध क्षणात ढग आणि आकाश यांच्यातल्या मोकळ्या पडद्यावर रंगांचा व्याकूळ, निशब्द पट मांडत मावळत होते. ह्या वेळेला , इतक्या वेळा पाहूनही तेच तुटल्यासारखं का वाटतं? कोणीतरी अपार मायाळू ओळखीचा भेटावं, आणि अशा एखाद्या कुशीत हा भयकाल संपेपर्यंत, उरातले अस्थिरतेचे कंप मिटेपर्यंत चेहेरा लपवून पडून रहावं.... जाणारा प्रत्येक दिवस या कोलाहलाला माझ्यासाठी परका करून जातो आहे, दिवसेंदिवस एक अतृप्त कोरडेपण येते आहे सगळ्यावर.... कशाचा डंख लागत नाही, कशाने मन पालवून निघत नाही, आणि पाय घासत निघालेल्या निर्वासित कळपासारखा निरुद्देश रस्ता पसरला आहे समोर..... आता का? कुठे? कशासाठी ? अशा प्रश्नांचेही वादळ येत नाही..... बस,,,ही एक संध्याकाळ येते.... समोरच्या धूसर पडद्याडच्या इमारती, त्यात हजारो माणसे, त्यांचे एकमेकांशी संबंध..... ह्यात कशात कुठे आपण नाही.... आपली नोंद नाही त्यातल्या एका प्रकाशित चौकोनावर.... आत्ता वाट पाहणारही कोणी नाही म्हणून कुठे जायची घाईही नाही..... हा पत्करलेला का ओढवलेला एकटेपणा... आणि तरीही जीव जळत जाणारी तगमग कुठेच शमलेली नाही....
समोर एक फुगेवाला होता.... तसे आता फुगेवाले कमी दिसतात.... बासरीवालेही कमी दिसतात.... कल्हईवाल्यांची हाक ऐकू येत नाही.... ठीके.... आता फक्त फुगेवाला आहे समोर.....
तिला फुगा विकत घेतलेला आपण एकदा.... आधी तिला विचारलं तेव्हा तिला वाटलं मी गम्मत करतोय....म्हणून हो म्हणाली.... मग हातात एक भला मोठा गोल फुगा दिला तेव्हा गोंधळली....मग तसाच तो फुगा मिरवत चालायला लागली.... त्याच्या मागे ती लपून जायची.... मग कुणालातरी धक्का लागायचा.... मग ती फुग्यामागून डोकवायची...तिच्या चेहेर्यावर तिचं ते 'पोर' हसणं... समोरच्याला 'सॉरी ' म्हणायची.... आपणच कानकोंडे झालेलो तिच्या सोबत चालताना....मग एका हाताने आपला हात पकडून आणि दुसर्या हातात फुगा पकडून रस्ता पार केला.... मग कुठेतरी त्या फुग्याकडे बघणाऱ्या रस्त्यावरच्या मुलाला देऊन टाकला तो फुगा आम्ही.... आम्ही... का मी....का मी आणि ती....
ती नाहीये ह्याचीही सवय झालीये आता.... ती नाहीये म्हणजे....ती आहे.... एका अर्थाने तिने असायला हवंय तिथे आहे.... आणि ती नेहेमी सांगायची तशी डिसेंबर मध्ये आहे ती तिच्या आवडत्या शहरात....
डिसेंबर.....
सगळ्या वर्षाच्या आठवणी ह्या एका महिन्यात येऊन कोलमडणार.... मग हळूहळू त्यांच्यात हरवायचं.... राहुल शर्माचा 'डिसेंबर' ऐकलेला अशा एक थंड होत गेलेल्या रात्री.... कॉफी...अंगावर मध्येच येणारं शहारा... कोणी काही बोलायचं नाही.... संतूरचे सूर त्यांच्या नाद-निनादांचे कोश विणत जायचे.... मग मध्येच ती सांगायची.... रजईत गुरफटून जायच्या आठवणी.... मग असंच कशा-कशावर बोलत जायचं.... आणि मग केव्हातरी ती निघून जायची.... आत्ताही ती निघून गेली आहे..... ही संध्याकाळ बाकी आहे, हा डिसेंबर बाकी आहे... तिची आठवण जागवणारे संदर्भ सोयीस्कररित्या विसरायला शिकलो आहे आता.... कॉफीचा मग वापरायचा नाही... काही गाणी ऐकायची नाहीत....काही जागी जायचा नाही.... आणि तरीही काहीवेळा एकदम तिचं कडवट होत निघून जाण असं एकदम ..... ते तेवढे क्षण जाळून गेल्यासारखे.... पार राख राख.... एखाद्याच्या निष्पाप असण्याला चरा पडणं यापलीकडे भेसूर काहीच नसतं.... गर्दीत एखाद्या मुलाचा हात आईच्या हातातून निसटला कि कसं कावरं-बावरं होतं ते पोर.... पुढे जाऊन कदाचित ते आईचा दुस्वास करेल....पण म्हणून आपण एकटे आहोत, एकटे होणार आहोत याची भयप्रद जाणीव करून देणारे ते क्षण माफ होत नाहीत.... तिच्या आतलं कुठलंही सोंग न घेता जगाकडे अनिमिष डोळ्यांनी पाहणार मुल कुठे गेला.... ते फुगा घेऊन रस्ताभर भटकणारे ... टाळ्या पिटून कुठेही हसणारं....कुठेही घरच्या आठवणीने चुरगाळून जाणारं....
कदाचित तिने इथे यायलाच नको होतं.... जर-तरचे हजारो फासे जरी टाकले तरी आज तिच्या कोडग्या मौनामागे दफन झालेलं तिच्यातला लहान मुल.... आणि त्याच्या अकाली संपण्यात तू सामील आहेस .... तूच सूत्रधार आहेस त्याचा.... तुझ्या शब्दांनी गळा घोटालय त्याचा.....
सभोवतालचे सारे जण पाहतायेत आपल्याकडे आणि जर मनात उमटणारे हे शब्द त्यांना दिसले तर....
सवयीने गुदमरवणारे हे क्षण थोपवून धरू आपण.... पण असे व्रण साठून साठून आता कुठलाही आनंद आपण कधीही पूर्णांशाने भोगू शकणार नाही.... अशा प्रत्येक क्षणी तिची आठवण येणार आहे.... संदिग्ध शब्दांचा आणि निर्माल्य होऊन गेलेल्या पण कधीतरी तीव्र असलेल्या भावनाचा एवढा पालापाचोळा आहे कि मी आता तिच्याकडे बघून साधा ओळखीचं हसूही शकणार नाहीये.... तिच्या आयुष्याला आता आपण स्पर्श करू शकत नाही हे बरं मानायचा आणि त्याचवेळी इतक्या आतवर रुतलेल्या माणसाला अनोळखी मानायचा अशक्य आटापिटा करत रहायचं...
ओरबाडत जाणार्या ह्या द्वन्द्वाकडे पहात तो आपल्याशीच हसला..... हे असं कोलमडतो आहोत एवढं तरी....
सारे विचार फेकून देत तो बाजूच्या बाकावर बसला..... समोर फुगेवाल्याकडे एक मुलगी फुगा विकत घेत होती.... सूर्य कधीच मावळला होता.... आणि आता त्याच्या भोवती एक मंद वार्याची झुळूक होती.... डिसेंबरमधली....

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...