Saturday, November 6, 2010

दिव्या दिव्या दिपत्कार

या दिवसात दुख वगैरे गोष्टींची आठवणच यायला नको. उदास वाटायला नको, चुकीच्या जागी अडकून पडलो आहोत असं वाटायला नको, जवळपास खूप माणसे असण्याचा कंटाळा यायला नको, अगदी जवळचं माणूसही गाभ्याशी आपल्याशी अनभिज्ञ आहे असा साक्षात्कारही व्हायला नको. होतोय एवढं खरं, असं वाटतंय एवढं खरं...
काल लोकलमधून येत होतो. एक भिकारीण, थकलेली, त्वचेवर सुरुकुत्यांचा जाळे , अनेक वर्षापूर्वी डोळ्यांवर आलेला आणि आता काहीही कामाचा न उरलेला चष्मा, विरलेली, विटलेली आणि तरीही अंग झाकून असलेली साडी, खांद्याशी एक प्लास्टिकची मातकट पिशवी, हाताची ओंजळ पुढे पसरलेली, आणि किनार्या दुखर्या आवाजात सवयीने म्हटलं जाणारं दीनवाणा गाणं....दिवाळीचे दिवस हे बोनस मिळण्याचे किंवा अर्थव्यवस्थेची पातळी उंचावण्याचे असतात अशाने म्हणून कि काय भिक मागणारे एकूणच शहरात वाढलेले आहेत सध्या....तान्ही पोरं थानाशी घेतेलेल्या तरण्या बाया, आंधळे, जुनिअर कडकलक्ष्मी, हिजडे, पांगळे आणि अनेक प्रकार.... कदाचित ह्या आजी हंगामी नसाव्यात... त्यांना द्यायला माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. दहा रुपयाची नोट द्यावी असं वाटत नव्हतं आणि अशी भिक मागून जगण्यापेक्षा मेली तर बरी असही त्यांच्याकडे बघून वाटत होतं... अर्थात हे सगळं माझा पोटभरीचा ज्ञान.... लोकलच्या वेगाशी जमवत, पाय सरकवत सरकवत आजी माझ्याजवळून गेल्या....त्या म्हणत असलेली ओळ होती,, 'वाट माहेरची दूर''
कुठला माहेर आठवत असेल आत्ता तिला...ज्याने कोणी ही ओळ लिहिली त्याला कदाचित पारमार्थिक अर्थ अभिप्रेत असेल, पण आत्ता ह्या बाईच्या रखरखीत संदर्भात 'माहेर' कुठे आहे....महाराष्ट्राच्या उण्या-पुर्या ३० जिल्ह्यात ४० एक वर्षापूर्वी असलेल्या एखाद्या लहानश्या गावात, का या शहराच्या एखाद्या अंधार्या कोपर्यात तगून राहिलेल्या तिच्या कुडीत
का एकाही उजळ रेषा दिसत नसलेल्या तिच्या उदयात..... का काहीच आकळत नाही म्हणून माहेर दूर आहे....जगण्याचा तंतू तुटत नाही म्हणून माहेर दूर आहे का....
आत्ता रात्री ती काय जेवेल...तिला ढास लागली तर भांडभर पाण्यासाठी ती काय करेल, कोणी असेल तिच्या सोबत.. ती मेल्यावर आपली म्हणून म्हणून तिला जळणारा वगैरे....हे प्रश्न माझे नाहीत, तिचं अंधारही माझा नाही...कारण तिच्या वंशरेशेने मला छेडलेला नाही.... पण तिने माझ्यावर चरा तर सोडला आहे....
मागच्या वर्षी असंच एका रोशानाईत मग्न रस्त्याच्या कडेने चालणारा एक लंगडा म्हातारा दिसला होता... हातात एक पिशवी, कुबडी आणि आपल्याच पायात घुटमळत जाणारी पराभूत नजर....त्याच्या कोसळलेल्या आयुष्यात काहीच नाही आता पेटण्यासारखा कदाचित.... आठवणींची काजळी जपत खंगत तेवढं जायचं असंच असेल कदाचित....
असं विचार करत राहीला तर कोणालाच आनंदी रहाता येणार नाही... माणसाचं आयुष्य काळाच्या रेषेवर सरळ जसं पसरलेलं असतं तसं त्याच्या अवती-भवती ते अडवारलेलही असतं....त्याचा काल आणि उद्या त्याच्या आजूबाजूला नांदत असतो...अगदी त्याचा नाही, पण त्याच्याहून खास वेगळाही नाही.... आपण तो बघत नाही, बघितलं तर सोयीस्कर अर्थ लावतो, दुखला-खुपला तर शहामृगासारखी आपल्या वाळूत मान घालतो किंवा पिढ्यान-पिढ्या जपत आलेल्या उद्याच्या स्वप्नांवर अर्थ नसण्याचं दुखरेपण सोडून देतो....
एक मैत्रीण सांगत होती कि लहानपणी ती खूप आवडीने फटके लावायची...मग एक दिवस तिच्या लक्षात आलं कि आपण एकच क्रिया परत-परत करतो आहोत...एका ठिकाणाहून आग घ्यायची, दुसर्या ठिकाणी लावायची आणि आवाज ऐकायचा किंवा प्रकाश पाहायचा....आणि मग तिला फटके लावावेसेच वाटेनात....पर्यावरणाची काळजी वगैरे थोर काही नाही....बस कंटाळा.... कळायला लागलं कि अर्थहीनता जाणवते....आपलं सुख किंवा दुख आपण अगोदर मनाशी जुळवलेल्या किंवा जुळवायच्या राहिलेल्या जगाच्या प्रतिमेवर अवलंबून असतं... ते सुख किंवा दुख मुळात नाहीचे, ते आपल्या आतल्या प्रतिमेची सावली किंवा पोकळी आहे असं जाणवलं कि काहीच जाणवत नाही....फक्त 'मग काय' असं कृष्णविवर... अर्थाभासाच्या आकर्षणात जाणीवेचा सारा प्रकाशही खेचून घेणारं...त्याच्या मुळाशी काही असेलही,,,पण ते कोणी कोणाला न सांगू शकणारं....अगदी अगदी माझं....
जगणं स्थिर होऊ नये हेच बरं किंवा खरं....म्हणजे मग ते कशावर स्थिर आहे.... इंद्रियांच्या सुस्त जाणीवांवर का खर्या-खुर्या सुखावर असला भयाण प्रश्न पडत नाही.... जगणं स्थिरावला तरी ते एखाद्या वेडसर लयीच्या आवर्तांवर असावं.... ती लय ओसरावी आणि असणंही मालवून जावं...
शहराच्या उजळून निघालेल्या, स्वतःभोवती गिरक्या घेणाऱ्या लहान मुलीसारख्या आत्म-निमग्न आनंदात चाचपडणारी, अंधारी आयुष्ये दिसतही नाहीयेत.... त्यांच्या काजळ-कोपर्यांचे ठसे तेवढे शब्दांवर राहिलेत माझ्या.... फटाक्यांच्या आवाजात मला त्या म्हातारीचा 'वाट माहेरची दूर' एवढं कापरा आवाज ऐकू येतोय, हळू-हळू विरत जाणारा.... जल्लोषाच्या वैभवी नृत्यात मला ठेचाकालणारा म्हातारा दिसतोय.... सारी लय हरवून हळू-हळू गोठत जाणारा....
आयुष्याच्या गर्तांची जाणीव खोल उमटो माझ्यावर . ... आयुष्याचा दिवा जळो... आणि विझाण्याधी त्यातून जाणीवेचा एखादातरी प्रकाशकण प्रकटो ...
दिव्या दिव्या दिपत्कार....

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...