Monday, November 23, 2009

शाळा

मोठा झालो असं अजून तरी वाटत नाहीये,
अजूनसुद्धा स्वप्न बघायची खोड कमी झाली नाही
कधीतरी विचार करतो असली भयानक सवय लागलीच कुठून मला
उत्तरांची रेघ शाळेच्या दाराशी जाऊन थांबते
गोठल्यासारख्या झाल्यात त्या भन्नाट दिवसांच्या आठवणी,
पण अजूनसुद्धा उब दिली की झटकन जिवंत होतात, वठल्या नाहीयेत
असा तरी काय होतं दिवसांमध्ये त्या
की म्हातारा न होताही उगाच आयुष्य सरकून गेल्यागत वाटावं
खरतर आत्ता चाललाय तो आयुष्याचा रस्ता असा नाही की आठवणींचीच सोबत लागावी बरोबर
जगणं कुणाच्यातरी सोबतीने सजवायचे हे दिवस।
पण काहीजण असतात असे जे बसत नाहीत आखून दिलेल्या चौकटीत
बऱ्याच जणांचे बरोबर हे माझं चूक असतं त्या हल्लीच्या दिवसांत
शाळा आठवते कारण तिथे
बर्याचदा मीही बरोबर असायचो
अजूनसुध्दा त्या इमारतीत जाणवत रहातात आपलीच
वाट चुकलेली स्वप्ने अणि काही
न पेरता आलेले कोंभ
गुंडाळून ठेवली खरी आठवणींची सारीच पुडकी
काही आठवणी कपाटाच्या खास कप्यात ठेवल्यायेत
जेव्हा डोळे स्वप्नांवर अविश्वास दाखवतात
आणि सार्या जगाची भाषा जेव्हा
स्वःतातच गुंतलेली वाटते,
तेव्हा परत एकदा शाळेत जातो
आपलाच आपल्याला पाहून घेतो
आपल्यात रूजलेला आपल्यावरचा विश्वास
बांधून घेतो स्वःताच्यात चिमूट चिमूट...

आज जाणवतयं तेव्हा बालीश भाबडे असलेले आपले मित्र
तरबेज झालेत दोन देण्यात, दोन घेण्यात
अजूनसुद्धा काहींच्या गाण्यांनी सूर पकडला नाहीये
आणि काहीनी बरच काही जमवत आणलयं
अणि तरीसुद्धा त्या सर्वांनाच मी अजून आपला वाटतो, तेव्हा
मला फक्त एवढच वाटतं
आजच्यापुरता तास संपला खरा,
वर्ग मात्र अजून पुढे चालू आहे
वर्ग मात्र अजून पुढे चालू आहे.....Thursday, November 19, 2009

एकटी संध्याकाळ

कधी वाटतं तू असावस जवळपास
माझ्य संदर्भाना असावं तुझं अधोरेखन
कधी वाटता बर हेच बैरागिपण,
का जीवाला उगाच आस
उगाच शब्दाना शब्द जोड़णे नाही,
आज हृदयाची कळ आणि उदया पायातले लोढणे नाही॥
आज वाटेल सुटला
पण उदया पेचात पकडेल असा गुंता
उगाच वाट पहायला नको
चालीन रस्ता आपल्यापुरता
दिला आहेस तेवढा
आठवणींचा शेला विणेन
येतील जेव्हा कढ अनावर
सवयीने त्यानाच सुख म्हणेन
स्वीकारलेल्या मौनामध्ये
काही घुसमटलेल्या संध्याकाळी
दिवस सोडून जातो अधांतरी
रात्रही नवथर अशा कातरवेळी
अशावेळी आठवेन शब्द आपलेच
जे सुटले पाठी
पेरून उजाडलेली स्वप्ने
अणि काही न सुटलेल्या गाठी
मस्त रहावा दुःखात आपल्या
जोखावं आपल्याला, चाखावं जग पुरेपुर
का उगाच आशांची पेरणी
मग न फुलण्याची हूरहूर
शब्द आले, बनले, गेले
दिवसांचे कापूर जळून खाक
ओसंडून भोवंडले विचार
खरडून आला पाठीला बाक
आता असेच अधून मधून
आपलेच शब्द चालीत जाणे
आता असेच अधून मधून
स्मरणे जुने हळवे गाणे
तुझ्यसाठी सोडून जातो
या कवितेच्या पाउलखुणा
शोधशील तर सापडेनही मी
फ़क्त राहिलो नसेन जुना

Wednesday, November 18, 2009

माझीच माझ्याशी ओळख पटत नसते तेव्हा....
जे जगत आलो ते पुढे जगवत नाही अणि
नव्या जगण्याची आस धरवत नाही तेव्हा....
कालासिद्ध चौकट जाचत असते खरी पण
स्वतःची चौकट उभारावी ही उभारीही येत नाही तेव्हा....
येणारा प्रत्येक दिवस ओझे वाटायला लागतो,
अणि जाणारी प्रत्येक रात्र हळहळत जाते तेव्हा....
तत्वज्ञान अणि अद्धयात्माच्या पांघरुणातही भोगाची तळमळ जाळत जाते तेव्हा....
अणि जगण्याचे सारे दरवाजे उघडले तरीही
एकही गात्र रसरसुन येत नाही तेव्हा....
अर्थाचे गुंते अणि त्यात कोळ्याच्या जाळ्यासारखे फ़सणं
हेच प्राक्तन असतं तेव्हा....
कृतीचा निर्व्याज आनंद,
परीणामांच्या संभाव्यतेत नासतो तेव्हा...
तेव्हा तरी,
तू नवे प्रश्न ठेवू नयेस माझ्य पदरात।
माझ्य भाळिचे पश्नाचिन्हांचे गोंदण तर तू पुसणार नाहीस,
पण तुझ्य शंकांचे खिळे तरी माझ्य क्रूसात रोवू नयेस।
जगण्याच्या प्रश्नावर्तात माझी पडझड होताना,
तुझ्य आठवणी मोरपीसांच्या रहाव्यात,
त्यांचे व्रण होवू नयेत....

Friday, November 13, 2009

कुणाच्याही संदर्भाने लिहू नये कविता
मग कवितेला त्या संदर्भाच्या अस्तित्वाची चटकच लागून जाते।
कविता भोगावी आपलीच आपल्यात,
जसे विराण रात्रींचे बोचरे एकटेपण।
रित्या आयु्ष्याचेही असते ,
जसे एक निनावी भरलेपण।
कागदावर न उमटलेल्या शब्दांचेही असते एक गाव,
कोणालाच न सांगावे असेही मनात असते एक नाव।
अर्थाचिही अटळ अट असू नये गाण्याला,
तालाचा आग्रह नसावा अनावर शब्दांना
कविताच असावी,
आनंदाचा उत्सव,
आणि दुखान्त मरणाची कळ।
सापडलाच कोणी जर श्वासांच्या परिघात
तर ऐकवावे त्याला गाणे,
नाहीतर आपल्याच चालत्या पायात वीणावि
कवितेची काळीजधून।
कवितेला देऊ नये ,
कुठल्याच अस्तित्वाचा भरजरी पण फाटका पदर।
बस्, इमान राखाव शब्दांशी,
भले तेही आपले नसोत.....

Liu Cixin ह्यांची Three Body Problem

              Liu Cixin ह्या चायनीज लेखकाच्या तीन सायन्स फिक्शनना मिळून ‘ थ्री बॉडी प्रॉब्लेम ’ असं म्हटलं जातं. खरंतर ‘Remembrance of E...