Skip to main content

शाळा

मोठा झालो असं अजून तरी वाटत नाहीये,
अजूनसुद्धा स्वप्न बघायची खोड कमी झाली नाही
कधीतरी विचार करतो असली भयानक सवय लागलीच कुठून मला
उत्तरांची रेघ शाळेच्या दाराशी जाऊन थांबते
गोठल्यासारख्या झाल्यात त्या भन्नाट दिवसांच्या आठवणी,
पण अजूनसुद्धा उब दिली की झटकन जिवंत होतात, वठल्या नाहीयेत
असा तरी काय होतं दिवसांमध्ये त्या
की म्हातारा न होताही उगाच आयुष्य सरकून गेल्यागत वाटावं
खरतर आत्ता चाललाय तो आयुष्याचा रस्ता असा नाही की आठवणींचीच सोबत लागावी बरोबर
जगणं कुणाच्यातरी सोबतीने सजवायचे हे दिवस।
पण काहीजण असतात असे जे बसत नाहीत आखून दिलेल्या चौकटीत
बऱ्याच जणांचे बरोबर हे माझं चूक असतं त्या हल्लीच्या दिवसांत
शाळा आठवते कारण तिथे
बर्याचदा मीही बरोबर असायचो
अजूनसुध्दा त्या इमारतीत जाणवत रहातात आपलीच
वाट चुकलेली स्वप्ने अणि काही
न पेरता आलेले कोंभ
गुंडाळून ठेवली खरी आठवणींची सारीच पुडकी
काही आठवणी कपाटाच्या खास कप्यात ठेवल्यायेत
जेव्हा डोळे स्वप्नांवर अविश्वास दाखवतात
आणि सार्या जगाची भाषा जेव्हा
स्वःतातच गुंतलेली वाटते,
तेव्हा परत एकदा शाळेत जातो
आपलाच आपल्याला पाहून घेतो
आपल्यात रूजलेला आपल्यावरचा विश्वास
बांधून घेतो स्वःताच्यात चिमूट चिमूट...

आज जाणवतयं तेव्हा बालीश भाबडे असलेले आपले मित्र
तरबेज झालेत दोन देण्यात, दोन घेण्यात
अजूनसुद्धा काहींच्या गाण्यांनी सूर पकडला नाहीये
आणि काहीनी बरच काही जमवत आणलयं
अणि तरीसुद्धा त्या सर्वांनाच मी अजून आपला वाटतो, तेव्हा
मला फक्त एवढच वाटतं
आजच्यापुरता तास संपला खरा,
वर्ग मात्र अजून पुढे चालू आहे
वर्ग मात्र अजून पुढे चालू आहे.....Popular posts from this blog

???

देशासाठी, समाजासाठी काहीतरी करावं असे समज असण्याचे दिवस होते, आपल्या भोवतालच्या लोकांच्या जगण्याचा स्तर जो आहे तो का आहे वगैरे प्रश्न पडू लागले तेव्हापासून ‘जात’ ही संपूर्णपणे चुकीची गोष्ट आहे हे मानत आलो आहे. आधी फारसा अभ्यास नसताना केवळ आदर्श समज म्हणून आणि आत्ता माझ्या आजूबाजूच्या लोकांना कसलेही कार्यकारणभावाचे पाठबळ नसलेल्या ‘जात’ नावाच्या दोऱ्यावर अभिमानाचे, द्वेषाचे, सोबतच्या माणसांना जातीच्या कप्प्यांत वाटण्याचे उद्योग करताना बघतो तेव्हा माझं मत दृढ होत जातं.        माझ्या इमारतीच्या आजूबाजूला, चौकांत, बाईक्सवर, फोर व्हीलरवर उद्या होणाऱ्या मोर्च्याची चर्चा आहे. फेसबुकवर तर मता-मतांचा कल्लोळ आहे. मोर्चा कसा केवळ जातीय नाही, त्यात स्त्रियांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत असं एकानं म्हटलंय. बरं, फेसबुकवर जे विचारसरणी निहाय अड्डे आहेत त्यात लिबरल, सुजाण अशा  अड्ड्यावर नेहमी असणारा माणूस. लिखाणावरून जर लिहिणाऱ्याच्या भूमिकेची परीक्षा होत असेल तर ह्या माणसाची भूमिका बाकीच्यांनी जात मानू नये, पण माझ्या जात वाल्यांनी मानली तर वाईट म्हणू नये अशी पकडायला लागेल. त्यावर कमेंट करणारा एकजण म्हणत…

हंडाभर चांदण्या

मागच्या वर्षी कधी वर्तमानपत्रात, कधी फेसबुकवर मी ‘हंडाभर चांदण्या’ बद्दल वाचलं होतं. मग केवळ १०० रुपये तिकिटात आपल्या शहरातील नाट्यगृहात ‘हंडाभर चांदण्या’ बघितलं. टँकरची वाट बघणाऱ्या एका गावातल्या एका दिवसाची गोष्ट असं अत्यंत तोकडं वर्णन ह्या नाटकाचं करता येईल. बघायला सुरुवात करताना माझ्याकडे तेवढाच दुवा होता. नाटक गावाच्या वेशीत घुसतं तिथपासून मला ‘वेटिंग फॉर गोदो’ आठवत होतं. ‘हंडाभर चांदण्या’ वर गोदोचा प्रभाव आहे असं मला अजिबात वाटत नाही. गोदो ज्या पोस्ट-मॉडर्न म्हटल्या जाणाऱ्या अॅबसर्ड असण्यासाठी प्रसिद्ध आहे तशीच अॅबसर्डिटी ‘हंडाभर चांदण्या’ मध्येही आहे. पण ‘हंडाभर चांदण्या’ आणि गोदो ह्यांच्या अॅबसर्डिटीमध्ये एक महत्वाचा फरक आहे: गोदो हा सगळं आटपून, पोटभर हादडून केलेल्या सूक्ष्मतर निरीक्षणाचा, बौद्धिक आनंदाचा परिपाक असेल तर ‘हंडाभर चांदण्या’ ही मेलोड्रामा व्हायच्या शक्यतेत जाऊ शकणारा आक्रोश व्यक्त करणारी कृती आहे. अनेकांच्या जगण्याला ग्रासणारा, जगण्याच्या किमान पातळीचा प्रश्न कथेच्या केंद्रबिंदूला असताना त्याला तात्विक, भावनाविवश करण्याचा मोहमयी रस्ता टाळून अॅबसर्डिटी आणि …

एका मेटाफिजिकल कारस्थानाची दास्तान – १

एकदा एक नवा नवा कवी आपल्या बॅचमेटच्या गाडीतून बॅचमेटच्या इगतपुरीच्या फार्महाउसला चाललेला असतो. नवा नवा कवी आणि गाडीचा मालक हे एका प्रथितयश कॉलेजात एकत्र असतात. पुढे तिथून त्यांना नोकऱ्या लागतात. पुढे तिथून ते परदेशात जातात. पुढे तिथून ते अशा मोडला येतात जिकडे त्यांच्याकडे मुबलक पैसा जमून गेलेला असतो, त्यांचं लग्न झालेलं नसतं आणि त्यांचे आई-वडील त्यांच्याशी विकली फोनवर आणि क्वार्टरली किंवा बाय-अॅन्युअली समोरासमोर फॅमिली हॉलिडेजना भेटत असतात. मग ह्या प्रदीर्घ का-या पण मुमुक्षू अवस्थेत त्यांना त्यांचा एक सुपर सिनियर भेटतो, जो मॅरेथॉन रनर असतो आणि व्हेन्चर कॅपिटलिस्ट. त्याला भेटल्यावर गाडीवाला मित्र एथनिक ठेपले आणि आचार विकण्याचा स्टार्ट-अप काढतो आणि उरलेला मित्र, ज्याला आपण नवा नवा कवी म्हणत आहोत, तो म्हणतो, आय विल आल्सो फॉलो माय कॉलिंग, मग तो कवी बनतो.        म्हणजे तो एका कॉलेजात व्हिजीटींग शिकवायला लागतो. बाकीच्या वेळात तो कविता करू लागतो, वाचू लागतो, फिरू लागतो. मग फेसबुक अनहर्ड व्होईसेस नावाच्या पेजला तो फॉलो करतो. मग ते सगळे पेजचे लोक महिन्यातून एकदा एकेका नामचीन ठिकाणी भेटून एकमेक…