Tuesday, June 26, 2012

बाई


तू माझे सारे काने-कोपरे कुशीत घेणारे मायाळू पांघरूण झाली असतीस
तर मी तुझ्या उबट सवयीत गुदमरलो असतो
मला तुझ्या कुशीत बसून तुझ्या ओटीपोटाशी कपाळ घासणारं मांजर बनायला आवडलं असतं
जे कधीही शेपटी उगारून लांब पळून गेलं असतं
अधिक-अधिक स्पष्ट होत जाणारे निरभ्र सर्वंकष एकटेपण
पोखरायला मध्ये-मध्ये मला तुझे सुरुंग पेरावसे वाटतात
आणि मग त्या सुरुंगांच्या कानठळ्या बसतानाच मला तुला दूर लोटावंसं वाटू लागतं
ह्या सगळ्यात तू, हरकामी ‘क्ष’ सारखी नावे-चहरे बदलवत
आणि दरवेळी ती तूच असूनही तुझ्या नव्या ओळखीचे लाख मोहर मला फुटलेले
आणि व्याख्याहीन उत्सुकतेने घमघमणारा रस्ता त्याच सवयींच्या पोचट चौकात
जिथे नात्याचा झेंडा वर्षानुवर्षे उभ्या ध्वजस्तंभावर मान टाकून पडलेला
तुझ्या हरहमेश तूच असण्याच्या स्वायत्त आविष्कारावर टाचून ठेवलेले
कवितांचे टीचभर अवकाश
माझ्या आकलन त्रिज्येच्या वर्तुळात न मावणाऱ्या उन्मन नशेला
बिलगून बसलेली कोण ती?  

Friday, June 15, 2012

पुनरावृत्ती


मी चहा पीत बाल्कनीत बसतो तेव्हा समोरचं झाड सळसळतं
मान्सूनपूर्व गडद वाऱ्यानं.
फांद्यांच्या आडोश्याला कावळे एकटक काव-काव करत, पंख झडझडवत
येणाऱ्या विस्तृत संध्याकाळीवर सोडतात
विरूप गांभीर्याची काळमोहोर.
मी पुस्तकांच्या निरुपयोगी ढिगातून उचलतो कवितांचे जुने पुस्तक
आणि त्यात मला कवी दिसतो अशाच कोनातून तोलणारा
भवतालच्या लयीत संथ झुलणारी कविता.
आह...
हेही माझे नाहीतर.

 माझ्या जाणीवांवर कुठे होते हे अदृश्य ठसे, का माझ्या आकलनाच्या सिस्टीममध्येच
कवितांचा गाळ मुरला आहे.
म्हणजे मला वाटणारे शब्द माझे नाहीतच का,
मला दिसणाऱ्या प्रतिमांवर पूर्वसुरींचे समंध ठाण मांडून बसलेले.
माझ्या प्रश्नांच्या घर्षणातून पडणारी ठिणगी हेही प्रतिबिंबच
आधीच्या जाळ, वणवा अगर शेकोटीचे
जी कोणीतरी पेटवलेली अस्तित्वाच्या मुर्दाड हिवाळ्यात
जिवंत रहायला.

मी समीक्षेचे बरड माळरान चालू पाहतो
जिवंत नव्या आवाजांचे इतिहास पहात
तिथे एकमेकांच्या तुकड्यांच्या कवडश्यांत दिसते मला कविता,
नवे असे काय होते, जे आधी कुठेच स्फुरले नव्हते
फायद्याच्या असीम लालसेचा भूगोल सर्वत्र पसरण्याआधी
जिथे-तिथे असतील जिथले तिथले मुलभूत आवाज
पण मी तर आहे भाषा, वेश, शब्द, रंग, वेदना, सुख सारे एकजिनसी होत जाण्याच्या
शहरी वंशाचा
मला आहेत कुठे माझे असे कोपरे
मी माहितीच्या अखंड स्त्रोतांत परिपुष्ट झालेला
माहिती, प्रतीमाच्या, ध्वनींच्या स्मरणाचे अंश साठलेला मी
आता मी म्हणजे ज्ञात-अज्ञात इतिहासाची पुनरावृत्ती. 

Tuesday, June 5, 2012

गच्च गांजेकस नशेत

गच्च गांजेकस नशेत,
स्त्री देहाच्या त्रिमित सघन तुकतुकीत प्रतिमा
समोरच्या पडद्यावर नाचत राहतात..

आणि हळूहळू शरीराच्या दंशाना परका होत
मला एकटेपणाच्या पाताळात गडद बुडून
जावसं वाटतं

किंवा तुझ्या शरीराच्या गर्द-जड लाटेत
तुझ्या, म्हणजे तुझ्या चेहेऱ्याचे व्यक्तिगत कंगोरे
काढून टाकले कि राहणारी तू
म्हणजे बाई...
कोणीही..जिच्या अंगांत आमंत्रण आहे.

अहं, असं काहीच होत नाही
आणि काल्पनिक तलम सुखात विरघळणारी रात्र
परत तशीच, निष्पर्ण काळी..

बनव एक जॉईन्ट मित्रा,
मग गांजाच्या गच्चकस नशेत
मी तुला अरेबिअन नाईटस् सारख्या सहस्त्र सुरस कथा सांगेन
आणि प्रत्येक कथेनंतर
शब्दांच्या नशेने क्षणमात्र तरंगताना मित्रा
मला झोपून जाऊ दे..

आह, आत्ता नाही झोप येते
आत्ता उगाच शब्दांच्या सचित्र सळसळीने
मला उगाच सुन्न वाटतंय

हे शब्द येडझवी गोष्टय
तुला हे ठाऊकच आहे,
मग मी तुला नवीन काय सांगूमी का विकिपिडियाय
बोलुयाच नको आपण,
आपण नुसते हा उष्ण धूर
नाकापुड्यातून घशात खेळवत
किंचित अडवत
सावकाश बाहेर सोडत सोडत
धुरात अस्पष्ट होत जाणारे एकमेक पाहू
किंवा काहीच नको पाहू

तरीही मला दिसेलच
तुझे ठाऊक नाही..
आत्ता याक्षणी माझी जाणीव
नशेच्या गच्च गांज्यात
माझ्याभोवती वेधली गेल्ये..
अहं, माम, मया
आणि मग आता मला स्मरणाच्या मिथेनी दलदलीतून
काहीही वरती येताना दिसतंय

तू एक जॉईन्ट बनव
आणि गांज्याच्या नशेच्या गच्चीत बसून
आपण हे तरंगते शहर पाहू
आपण निऑन लाईटस्च्या पिवळ्या डोहात
विरणारे चांदणे पाहू
आपण अंशतः ढगाळ आकाशात
आपला अंशतः नशाळ धूर सोडू
आणि मग ज्या आकाशगंगेच्या कोपऱ्यावर आपण बसलो आहोत
तिथून ह्या आकाशगंगेच्या शरीरात
हि गच्च गांजेकस नशा पेरून देऊ
म्हणजे मग उद्या
प्रकाश मउसूत थांबेल खिडकीच्या नोस्तालीजिक कवडश्यांत
दुपार अल्लड बोलेल
आणि संध्याकाळ तहेदिलसे बोलावेल
रात्रीच्या मयकशी शामियान्यात

पुरे झालं म्हणतोस ना हे वैश्विक, खगोलिक कवित्व
होय मित्रा
हा शेवटचाच
    
   

Liu Cixin ह्यांची Three Body Problem

              Liu Cixin ह्या चायनीज लेखकाच्या तीन सायन्स फिक्शनना मिळून ‘ थ्री बॉडी प्रॉब्लेम ’ असं म्हटलं जातं. खरंतर ‘Remembrance of E...