Friday, June 15, 2012

पुनरावृत्ती


मी चहा पीत बाल्कनीत बसतो तेव्हा समोरचं झाड सळसळतं
मान्सूनपूर्व गडद वाऱ्यानं.
फांद्यांच्या आडोश्याला कावळे एकटक काव-काव करत, पंख झडझडवत
येणाऱ्या विस्तृत संध्याकाळीवर सोडतात
विरूप गांभीर्याची काळमोहोर.
मी पुस्तकांच्या निरुपयोगी ढिगातून उचलतो कवितांचे जुने पुस्तक
आणि त्यात मला कवी दिसतो अशाच कोनातून तोलणारा
भवतालच्या लयीत संथ झुलणारी कविता.
आह...
हेही माझे नाहीतर.

 माझ्या जाणीवांवर कुठे होते हे अदृश्य ठसे, का माझ्या आकलनाच्या सिस्टीममध्येच
कवितांचा गाळ मुरला आहे.
म्हणजे मला वाटणारे शब्द माझे नाहीतच का,
मला दिसणाऱ्या प्रतिमांवर पूर्वसुरींचे समंध ठाण मांडून बसलेले.
माझ्या प्रश्नांच्या घर्षणातून पडणारी ठिणगी हेही प्रतिबिंबच
आधीच्या जाळ, वणवा अगर शेकोटीचे
जी कोणीतरी पेटवलेली अस्तित्वाच्या मुर्दाड हिवाळ्यात
जिवंत रहायला.

मी समीक्षेचे बरड माळरान चालू पाहतो
जिवंत नव्या आवाजांचे इतिहास पहात
तिथे एकमेकांच्या तुकड्यांच्या कवडश्यांत दिसते मला कविता,
नवे असे काय होते, जे आधी कुठेच स्फुरले नव्हते
फायद्याच्या असीम लालसेचा भूगोल सर्वत्र पसरण्याआधी
जिथे-तिथे असतील जिथले तिथले मुलभूत आवाज
पण मी तर आहे भाषा, वेश, शब्द, रंग, वेदना, सुख सारे एकजिनसी होत जाण्याच्या
शहरी वंशाचा
मला आहेत कुठे माझे असे कोपरे
मी माहितीच्या अखंड स्त्रोतांत परिपुष्ट झालेला
माहिती, प्रतीमाच्या, ध्वनींच्या स्मरणाचे अंश साठलेला मी
आता मी म्हणजे ज्ञात-अज्ञात इतिहासाची पुनरावृत्ती. 

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...