Tuesday, June 5, 2012

गच्च गांजेकस नशेत

गच्च गांजेकस नशेत,
स्त्री देहाच्या त्रिमित सघन तुकतुकीत प्रतिमा
समोरच्या पडद्यावर नाचत राहतात..

आणि हळूहळू शरीराच्या दंशाना परका होत
मला एकटेपणाच्या पाताळात गडद बुडून
जावसं वाटतं

किंवा तुझ्या शरीराच्या गर्द-जड लाटेत
तुझ्या, म्हणजे तुझ्या चेहेऱ्याचे व्यक्तिगत कंगोरे
काढून टाकले कि राहणारी तू
म्हणजे बाई...
कोणीही..जिच्या अंगांत आमंत्रण आहे.

अहं, असं काहीच होत नाही
आणि काल्पनिक तलम सुखात विरघळणारी रात्र
परत तशीच, निष्पर्ण काळी..

बनव एक जॉईन्ट मित्रा,
मग गांजाच्या गच्चकस नशेत
मी तुला अरेबिअन नाईटस् सारख्या सहस्त्र सुरस कथा सांगेन
आणि प्रत्येक कथेनंतर
शब्दांच्या नशेने क्षणमात्र तरंगताना मित्रा
मला झोपून जाऊ दे..

आह, आत्ता नाही झोप येते
आत्ता उगाच शब्दांच्या सचित्र सळसळीने
मला उगाच सुन्न वाटतंय

हे शब्द येडझवी गोष्टय
तुला हे ठाऊकच आहे,
मग मी तुला नवीन काय सांगूमी का विकिपिडियाय
बोलुयाच नको आपण,
आपण नुसते हा उष्ण धूर
नाकापुड्यातून घशात खेळवत
किंचित अडवत
सावकाश बाहेर सोडत सोडत
धुरात अस्पष्ट होत जाणारे एकमेक पाहू
किंवा काहीच नको पाहू

तरीही मला दिसेलच
तुझे ठाऊक नाही..
आत्ता याक्षणी माझी जाणीव
नशेच्या गच्च गांज्यात
माझ्याभोवती वेधली गेल्ये..
अहं, माम, मया
आणि मग आता मला स्मरणाच्या मिथेनी दलदलीतून
काहीही वरती येताना दिसतंय

तू एक जॉईन्ट बनव
आणि गांज्याच्या नशेच्या गच्चीत बसून
आपण हे तरंगते शहर पाहू
आपण निऑन लाईटस्च्या पिवळ्या डोहात
विरणारे चांदणे पाहू
आपण अंशतः ढगाळ आकाशात
आपला अंशतः नशाळ धूर सोडू
आणि मग ज्या आकाशगंगेच्या कोपऱ्यावर आपण बसलो आहोत
तिथून ह्या आकाशगंगेच्या शरीरात
हि गच्च गांजेकस नशा पेरून देऊ
म्हणजे मग उद्या
प्रकाश मउसूत थांबेल खिडकीच्या नोस्तालीजिक कवडश्यांत
दुपार अल्लड बोलेल
आणि संध्याकाळ तहेदिलसे बोलावेल
रात्रीच्या मयकशी शामियान्यात

पुरे झालं म्हणतोस ना हे वैश्विक, खगोलिक कवित्व
होय मित्रा
हा शेवटचाच
    
   

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...