Friday, April 20, 2012

निषिद्ध वळणापाशी


बोलून बोलून शब्द थकतात आपले, 
आणि खूप काही खुणावणारे मौन तरंगत राहते 
रात्र थांबते, रेंगाळते, उद्या वाटतो खूप दूर 
खरा नकोच असतो तो यायला, 
निग्रहाने जपलेले अन्तर एकदाच ओलांडून जावे
आणि...

होत नाही असं आणि गळा घोटणार्या शांततेला फोडावं म्हणून 
आपण परत हे-ते बोलू लागतो..
आपण कोण आहोत, एकमेकांचे?
काळ-वेळ जुळून आलेले सहप्रवासी, 
जे वेडसर एकटेपण रोखून ठेवण्यासाठी एकमेकांची सोबत देतायेत..
आणि सोबतीची सवय झाली तरी तिला काहीच नाव देत नाहीयेत...
आई-बाप नसलेल्या पोरासारखे क्षण आपले,
वेगळे झालो कि नव्हतेच काही म्हणायला मोकळे ठेवणारे..
सोय आणि सवय यांच्यामध्ये 
परत एकदा आलेली शांतता..
मला कुशीत शिरायचं तुझ्या..
मला तुझं बोट धरून तुला शोधायचय, तुझ्या गंधित मोकळ्या देहात...
मी यातलं काहीच सांगत नाही, 
आणि तूही काहीच बोलत नाहीस.. 

यापुढे दोन वाटा जातात जानम, 
एक तुझ्या त्वचेच्या तप्त कल्लोळात हरवणारी, 
मांसल, तलम वळणे घेत असोशीच्या क्षणिक तृप्तीशी जाणारी वाट...
आणि तिच्या पुढे, 
तू जगलेल्या पुरुषांच्या यादीत माझे एक नाव,
आपल्या आधीच केलेल्या करारांशी विश्वासघात
आणि एकमेकांशी अनोळखी होऊन सुट्टे सुट्टे, मोकळे श्वास घ्यायची धडपड...
मी उठतो, 
खिशात हात घालून खांदे उडवतो, 
कसाबसा निरोप घेऊन दुसरी वाट पकडतो, 
जी पहिल्या वाटेला निरखत निरखत 
तुझ्यापासून दूर जाते...

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...