Tuesday, April 3, 2012

चंद्रमाधवीचे उरले चांदणे


 तू गेलास म्हणून मला हे लिहावसं वाटलं. खरंतर कोणीही कवी गेला कि त्याच्यापाठोपाठ भावनांचे विलक्षण खेळ करणाऱ्या श्रद्धांजल्यांची धांदल उडते. आणि बरेचदा कवी भावनाविवश हार-फुलांत हरवून जातो आणि माणसाचे वर्णनच कवी म्हणून केले जाते. तू मेलायेस, तुझ्या दाढी-मिशा, तुझ्या कविता ज्या हातानी लिहिल्या गेल्या असतील ते हात, संध्याकाळ  प्रतिबिंबित झालेले तुझे डोळे वगैरे वगैरे ज्याचे होते तो माणूस , त्याचा देह आता नाही. कवी मरतो जेव्हा त्याच्या शब्दांनी जे सांगायचे ते ऐकणारा कोणीच उरत नाही. तू अजून जिवंत आहेस त्यामुळे...
  ह्याच्या आधीही असेच काही कवी असेलेले मनुष्य गेले. अजूनही त्यांच्या स्मरणाचे ताबूत दरवर्षी कोणी ना कोणी बांधतोच. तुझेही असतील. परवा असेच तुझ्या आठवणी सांगणारे, अपरिहार्यपणे तुझ्या मनुष्य म्हणून असण्याचा लेखा-जोखा मांडणारे काही दिसले. एक तुझ्या मित्राचा लेख सोडला तार बाकीचे मी फार वाचलेच नाहीत. हा तुझा मित्रही शब्दांचे भोग भोगणारा कलंदर. त्यानेही असंच म्हटलंय, त्याच्या कविता आहेत तोवर तो आहेच...
  तू, म्हणजे तुझ्यातला कवी. मला खरंतर तुझं नाव थट्टा म्हणूनच  कळलेलं. तू म्हणायचास तशी तुझ्या शब्दांना स्पर्शण्याआधी त्यांची दुर्बोधतेची बेसरबिंदी चमकायची. आणि त्या चमकीनेच तुझे शब्द अस्पर्श रहायचे. मग अचानक एक दिवस हातात 'मितवा' आलं. आणि मग 'वैराणसूक्ताचे अधांतर', 'दंतकथांचे संदर्भ' घेत दुखाच्या अपार मायेचा लळा केव्हा लागला ते समजलही नाही. पण इथेही तुझ्या-माझ्यात जे आहे ते फक्त औपचारिक आहे, वाचलेल्या पुस्तकांची यादी वाढवणाऱ्या श्रद्धाळू वाचकाने तुला पत्र टाकावं असं. तुझ्या शब्दांच्या अभिजात जन्मकथांनी भारावलेला, त्यातल्या विलक्षण अवतरणात तुझ्या कवितांची बीजे शोधणारा यापलीकडे काही नाही. 
   आणि अजून असणार तरी काय? शेवटी आपल्या मनात येणारी प्रश्नचिन्हे, कल्लोळ, आपल्या अभोवातीच्या असण्याचा कस लावताना उरणारे शेवटचे शब्दातीत हे सगळे आपण जगतो त्या भवतालाचेच परिणाम. तुला मिळाला असेल तसा निसर्गाच्या बदलत्या चित्रांमधला, माणसांच्या रंगबिलोरी आयुष्यांचा भवताल मला नाही. हे माझे रडगाणे नाही. पण स्वातंत्र्यांची असंबद्ध काव्यात अखंड चालू असणाऱ्या शहरात पानगळीचे ऋतू काय किंवा भयकम्पांची शापित संध्याकाळ काय? भोगण्याच्या आणि जगण्याच्या अटळ नियमांवर घरघरणाऱ्या या चक्रात अर्थहीन साम्ग्रतेपलीकडे कसलाही साक्षात्कार नाही. त्यात तू आर्ष शोकाच्या अनुवंशाचा  कवी, आणि तुझ्या भवतालच्या दुखसंपन्नतेने तुझे शब्द उजळून निघालेले. मला तुझा हेवा वाटतो ह्यात नवल काय? पण तुला जे लाभले ते अजूनही कित्येकांना लाभले होते. पण कदाचित त्यांची आयुष्ये उथळ होती, किंवा तत्वे आणि विचातांच्या जाळी आड  जाऊन विरोधाभासाच्या अनवट विणीने बनलेले आयुष्य त्यांना दिसलेच नसेल. तुझ्या शब्दांत त्याचे प्रतिबिंब दिसते. पण आकलनाचा तीर सोडून होत जाण्याच्या कोसळत्या प्रपातात स्वतःला सोडले कि जे सारे काही दिसेल ते तुझे शब्द दाखवत राहिले. 
   तुझे आयुष्य आणि तुझे शब्द यांचा परस्पर संदर्भ मांडायची बौद्धिक हातचलाखी मला करायची नाही. त्यार्थाने मी तुझ्या फार जवळ वगैरे नव्हतो हे बरेच. माझ्यालेखी तू म्हणजे तुझ्या कविता, आणि कवित्नाचे कुल सांगणारे तुझे शब्द. आणि कवी, लिहिणारा म्हणून तू कदाचित आधीच संपला होतास. आत्महत्या करणारे सोडले तर कदाचित सारे असेच उरतात. आयुष्याचे करडे हिशेब कवीच्या स्वैर आयुष्याला कायमच बंधू पाहतात. त्यांच्याशी जुळवत कवी म्हणून शिल्लक उरण फारच कठीण आहे. कारण करडे हिशेब आपल्याला एका जगी बंधू पाहतात तर कविता ही जगण्याला झंकारून सोडणारा बेभान अस्थिर क्षण शोधत आपल्या गतीत जात रहाते. तो क्षण उमटावा, त्या क्षणाने आतवर चिरून टाकणारा खोल ठसा सोडावा असे जोवर घडत रहाते तोवरच कवी जिवंत राहतो. त्यानंतर एक जिवंत सांगाडा उरतो, आणि त्या सांगाड्याने जपलेला आधीच्या कवितांचा इतिहास. शरीराच्या मर्यादा, नवे काही पूर्ण उन्मुक्तपण अंगावर घ्यायची मनाची उर्मी हे सारे काळाच्या पुढे पुढे जाणार्या रेषांनी ओसरत जाते. तिथेच कुठेतरी लिहिणारा हरवतो आणि त्या लिहिणाऱ्याच्या आठवणी हाडा-मासांत खिळलेला तडजोड्या मनुष्य उरतो. तूही तसाच उरला असणार, कदाचित मध्ये मध्ये मागचे सारे परततही असणार. आणि आता तू त्याच्याही पलीकडे गेला आहेस.
    इतिहास, चळवळी, सामाजिक प्रश्न अशा तमाम भोज्याना कविता हात लावत असताना तूझे शब्द जाणीवेच्या धुकट वाटेवर चालत राहिले. त्यात उमटणारा काल, त्यात उमटणारा भवताल, त्यातला रौद्र, सुंदर, शोकमग्न निसर्ग,जाणिवांच्या तळाशी दिसतील- न दिसतील अशा उमटणाऱ्या क्षणभंगुर गडद रेषा, आणि अजून न उलगडलेले, तुझा मित्र म्हणतो तसे अबोध, अस्फुट असे सारे... त्या तुझ्या कविता. तुला वाटले त्यातले किती तुझ्या शब्दांत आले असेल, आणि त्यातले खरेच तू किती लिहिलेस.. लिहिलेस ते असे स्वप्न संचित होऊन उरलेले. तुझ्या जाण्याचा शोक नाही, कारण अक्षर बनलेल्या तुझ्या कविता असणार आहेत, संध्याकाळ असणार आहे, आणि त्या संध्याकाळी तू लिहिलेला शोकगर्भ प्रश्नही..
        या इथे झाडांना उदासीन करणाऱ्या संधिप्रकाशात
        मी जेव्हा ईश्वरी करूणांची स्तोत्रे म्हणू लागतो
        मावळतीला, शेवटच्या किरणांची फुले समुद्राच्या 
        दिशाहीन पाण्यात बुडून जातात...कुठे जातात?      
                     
 (शेवटच्या कवितेच्या ओळी:  कविता- प्रार्थना, कवी- ग्रेस, 'संध्याकाळच्या कविता' )

हंपी

       कुटुंब-कबिला घेऊन आनंदी वाटायला जाण्यासाठी हंपी नाही. संपन्न होणारी, विस्तार पावू इच्छिणारी, प्रतिस्पर्धी साम्राज्यांना धुळीस मिळवू...