Sunday, December 17, 2017

वाचलेले-पाहिलेले काही


१.     Empire of the Indus

नद्या आणि त्यांच्याभोवती असणाऱ्या सिस्टिम्स ह्याबाबत लिहिणाऱ्या परिणीता दांडेकर ह्यांच्या लिखाणात ह्या पुस्तकाचा उल्लेख माझ्या एका मित्राने वाचला. मग त्याच्याकडून मला ह्या पुस्तकाबाबत कळलं.
सिंधू नदीचा भूगोल आणि तिच्या अनुषंगाने आलेला काळाचा प्रवाह (इतिहास, राजकारण, माणसे) अशा दोन प्रतलात हे पुस्तक लिहिलेलं आहे. लेखिका पत्रकार आहे. पुस्तक हे academic नाही, पण म्हणून त्यात सरसकटीकरण नाही आणि लिखाण ससंदर्भ आहे. गुंतून एकसलग वाचत जावं असं पुस्तक आहे. पुस्तकाची सुरुवात आणि मध्यातला प्रामुख्याने सध्याच्या पाकिस्तानशी अनुषंगून असलेला सद्य आणि ऐतिहासिक भाग हे ताकदवान आहेत. शेवटचा तिबेटमधला भाग थोडा भावूक आहे.
२.     Empire of Indus  वाचताना पाकिस्तानबद्दल वाचावं असं मला वाटू लागलं. Pakistan: A Hard Country’ हे पाकिस्तानबद्दलचं एक उत्कृष्ट पुस्तक मी वाचलं होतं. पण भारत-पाकिस्तान संबंध हे त्यात फारसे आलेले नव्हते. त्यामुळे The Longest August:The Unflinching Rivalry Between India and Pakistan’ हे पुस्तक मी वाचायला घेतलं.
पुस्तकाचे लेखक दिलीप हिरो (Dilip Hiro) हे academician नाहीत किंवा पत्रकारही नाहीत. ते शिक्षणाने इंजिनीअर आहेत. पण पेशाने लेखक आहेत. मुस्लीम देशांच्या बाबतीतल्या इतिहास आणि राजकारण ह्यांवर त्यांनी भरपूर लिखाण केलेलं आहे आणि ही यादी स्तिमित करणारी आहे. संदर्भ आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी ह्यांची त्यांच्या लिखाणात कमतरता नाही. पण त्याचवेळी त्यांच्या लिखाणात ते निःसंदिग्ध भूमिका घेतात.
The Longest August मध्ये नेहरूंच्या self-righteousness वर त्यांनी वारंवार टीका केलेली आहे आणि अनेकदा त्यांचा हा स्वभाव चुकीच्या धोरणांना कसा कारणीभूत ठरला ह्याचीही मांडणी ते करतात. तसंच भारताची पाकिस्तान आणि चीनच्या संबंधातली भूमिका ही कधीही बोटचेपी नव्हती किंबहुना महत्वाकांक्षी होती ह्याचेही दाखले ते देतात. (भारताने आजवर म्हणजे मे २०१४ च्या अगोदर, आणि विशेषतः नेहरूंच्या काराकिर्दीत परराष्ट्र धोरणात मार खाल्ला आहे हि अनेकांना खरी वाटणारी मांडणी प्रत्यक्षात अत्यंत विसंगत आहे. दिलीप हिरो त्याचे अनेक दाखले देतात. केवळ दिलीप हिरोंनी केली आहे म्हणून मी असे म्हणत नाही. प्रत्यक्ष पुरावे आणि तर्कसुसंगत विचार केला तर हे कोणाच्याही लक्षात येऊ शकेल. पण आपल्याला आवडणारे नेते सोडले तर बाकी सगळ्यांचे राजकारण हे व्यक्तीहिताचे आणि देशघातकी ह्याच फ्रेमचा भारतातील ओपिनिअन मेकर्सवर किती पगडा आहे ह्याचे उदाहरण म्हणजे हि मिथके असावीत. किंबहुना ही मिथके काही एक हेतूनेच प्रसवली गेली असावीत असेच म्हणायला लागेल.)
       २०व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते २०१४ च्या मध्यापर्यंत एवढ्या वर्षांचा प्रवास गतिमानता आणि खोली ह्यांचे संतुलन ठेवून ४७५ पानांमध्ये (+ १०० संदर्भ आणि अन्य पाने) मांडलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील मुस्लीम मानसिकता, राजकारण आणि धर्म ह्यांची तेव्हापासून असलेली अपरिहार्य सांगड (जी नंतर ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक वापरली, आणि स्वातंत्र्यानंतर ती नव्हतीच असे भासवायचा किंवा होती ती केवळ मुस्लिमांची होती असे समज पसरवले गेले) आणि १९४७ नंतर राहिलेले कमी-जास्त वितुष्टाचे भारत-पाक राजकीय संबंध, भारताची त्याच्या आकार आणि इतिहासाने आलेली स्वाभाविक महत्वाकांक्षा आत्यातून जन्माला आलेली पाकिस्तानची स्वाभाविक आणि पायाभूत भारतभीती असे अनेक घटक दिलीप हिरो ह्यांनी स्पष्ट केलेले आहेत.
       स्वातंत्र्यपूर्व काळातील मुस्लीम मानसिकता, तिची मुघल सत्तेच्या ऱ्हासात असलेली मुळे आणि त्यातून द्विराष्ट्र सिद्धांताकडे झालेली वाटचाल ह्याबद्दल एम.जे.अकबर ह्यांचे Tinderbox: The Past and Future of the Pakistan हे पुस्तकही वाचण्यासारखे आहे.
३.     दिलीप हिरो ह्यांच्या वर उल्लेखलेल्या पुस्तकात झिया उल हक ह्यांच्या विमान अपघाताच्या वर्णनात मला A case of exploding Mangoes ह्या कादंबरीचा उल्लेख मिळाला. पाकिस्तानचे १९७० आणि ८० च्या दशकातले लष्करशहा झिया उल हक ह्यांच्या संशयास्पद विमान अपघाताचे fictional account ह्या कादंबरीत आहे. मनू जोसेफ ह्यांच्या लिखाणाशी साधर्म्य असणारा सिनिसिझम लेखक मोहम्मद हनीफ ह्यांचा आहे. फटाफट वाचून होणारी पण उथळ न होणारी अशी हि कादंबरी आहे. कादंबरीला एका सत्य घटनेची अपरिहार्य पार्श्वभूमी आहे आणि ही पार्श्वभूमी राजकीय असल्याने कादंबरीतील अनेक ताकदीच्या जागा कमी उठाव घेतात.

४.     Godless

Netflix वर ही एकाच सीझनची (अद्यापतरी!) मालिका आहे. Western ह्या genre मध्ये तिची गणना होईल. काय घडणार आहे हे तसं भाकीतेबल असलं तरी दाखवायची तऱ्हा म्हणून Godless पहावी. घोड्यांचा कथेतला वापर वेगळा आहे. शेवटच्या भागातली फाईट तर एक नंबर.

५.     Suburra: Blood on Rome  

रोम ह्या शहरांत घडणारी राजकारणी, माफिया आणि काही नामचीन अवैध कामे करणारी कुटुंबे ह्याबाबत च्या इटालियन टी.व्ही. सिरीजचा हा Netflix वरचा पहिला सिझन आहे. तशी मसाला सिरीयल आहे. पण टिपिकल अमेरिकन मालिकांच्या मायोनीज थरारापेक्षा वेगळी आहे. ह्याच नावाचा एक सिनेमाही आहे.

६.     मोह, माया, मनी

रणवीर शोरे, नेहा धुपिया ह्यांचा हा मध्ये केव्हातरी आलेला सिनेमा मी Netfilx वर पाहिला. फटाफट श्रीमंत व्हायचं आहे असा नवरा, नवऱ्यापासून लपवून आयुष्य जगणारी बायको आणि त्यांच्या आयुष्यात त्यांच्या निवडींनी होणारी उलथापालथ अशी गोष्ट आहे. पण फार काही मजा नाही.

७.     बापजन्म

हा सिनेमा Amazon Prime वर आहे. गोष्ट चांगली आहे, सादरीकरण तितकं गोळीबंद नाही. अजून आटोपशीर आणि कमी हुंदके देणारा चित्रपट करणं शक्य होतं असं वाटतं.

८.     अस्तु

हाही Amazon Prime वर पाहिला. चित्रपटाची गोष्ट संस्कृत प्रोफेसरची करून उगाच एलिट तोरा का दाखवत आहेत असं मला सुरुवातीला वाटलं. पण हळूहळू चित्रपट आपल्याला भिडतो, विशेषतः मोहन आगाशेंची भूमिका. पण त्यांचा प्रोफेसर म्हणून असलेला व्यासंग केवळ ते संस्कृत श्लोक म्हणतात त्यातून फार दिसत नाही. हा संबंध अगदी वरपांगी वाटतो. भैरप्पा ह्यांच्या वंशवृक्ष नावाच्या कादंबरीत एक असंच संशोधकाचे पात्र आहे, बहुतेक सदाशिव नावाचे. ते संस्कृतीबद्दल संशोधन करत आहेत एवढेच सारखे कादंबरीत येते, पण काय करत आहेत ह्याबद्दल काही जास्ती येतंच नाही. Poetry नावाची South Korean फिल्म आहे. म्हातारपण, स्मृती आणि चूक-बरोबर ह्याचं जजमेंट ह्यांची माझ्या डोक्यात रुतून बसलेली इमेज म्हणजे हि साउथ कोरियन मूव्ही. 'अस्तु' इतका रुतत नाही, पण खूण सोडू नक्की शकतो.             

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...