Saturday, December 23, 2017

‘गच्ची’ आणि काही लोकल निरीक्षणे

  
      ह्या आधी दोन हातांच्या बोटावर मोजता येईल एवढ्या लोकांसोबत मी कधीही थेटरात सिनेमा पाहिला नव्हता. काल असा मौका मला मिळाला. मेट्रो आयनॉक्स ह्या ऐन मुंबई नगरीत असलेल्या थेटरात, उत्तम साउंडमध्ये ‘गच्ची’ पाहता आला. थीम, अभय महाजनचा अभिनय आणि संवाद ह्याचे अगदी पैकीच्या पैकी मार्क सिनेमाला द्यावे लागतील. सिन्स दाखवण्याची पद्धत आणि पार्श्वसंगीत हेही पूरक आहे. प्रत्यक्षातही काही तासांची गोष्ट सांगणारे, flashback किंवा गुंतागुंतीची backstory न वापरणारे पिक्चर असतात त्यात ‘गच्ची’ येईल. शेवतालाच चित्रपट आधी मेंटेन केलेलं प्रेशर सोडून एकदम सुट्टा, हलका होतो, पण ते चित्रपटाची मजा घालवण्याएवढं खुपत नाही.
Image result for gachchi abhay mahajan
      अभय महाजनच्या अभिनयाने मी इम्प्रेस झालेलो आहो. BhaDiPa च्या मराठी Sad-गृहस्थमध्येच मला तो आवडला होता.
      गोष्ट करूण किंवा थरार करण्यापेक्षा घडते तशी सांगत जाऊन एकप्रकारे विसंगत विनोदी करणं आणि तरीही अशा फॉर्मच्या वापराच्या प्रदर्शनात न जाता चित्रपट घडता ठेवणं हे दिग्दर्शकाला जमलेलं आहे.
     मला नेहमी पडतो तसा हे बघायला येणारे कितीजण असणार आहेत हा प्रश्न चित्रपटावर पैसे लावणाऱ्याला पडला असेल का हा प्रश्न मला कालही पडला. अर्थात ह्यांत कशाला काढता असलं काही असा उद्वेग नाही तर वेगळे प्रयोग करण्याचं आर्थिक गणित आणि आडाखे काय असतात ह्याचं कुतूहल आहे. चित्रपट बघायला आलेल्यांची तुरळक संख्या हे हा प्रश्न पडायचं एक कारण होतं.
      मुंबईच्या धडकत्या कोअरपासून दूर माझं जे धर्मशाळा उपनगर (Dormitory suburb- कारण दिवसभर लोक उपजीविका आणि कम्यूट करतात आणि रात्री झोपायला घरी येतात!) आहे तिथे ‘गच्ची’ चा पर थेटरी १ शो होता आणि तोही दुपारी १.३० किंवा २.३० चा. संध्याकाळचे किंवा रात्रीचे शोज सगळे ‘टायगर’ ला. मग मेट्रो आयनॉक्सला ६ चा शो आहे हे पाहून मला वाटलं कि त्यांना शोसाठी पब्लिक यायची थोडी ज्यादा खात्री असावी. पण आले होते ६ जण. मग जिथे दुपारचे शोज होते तिथे काय झालं असेल? J
 कदाचित काही दिवसांनी नेटफ्लिक्स किंवा Amazon वरच नवे प्रयोग करणारे चित्रपट येतील. That will be a good development and sound business model in my opinion.
--
                मोबाईलच्या मोठ्या स्क्रीनचा एक परिणाम म्हणजे लोक त्यांच्या मोबाईलवर काय करत आहेत हे दुसऱ्यालाही दिसू शकतं. हे वापरणाऱ्याला ठाऊक असतं. पण अनेकदा हे बेअरिंग जातं आणि मग मोबाईल स्क्रीन काय चाललं असेल वापरणाऱ्याच्या मनात/जगात ह्याचे इंटरेस्टिंग नमुने देऊ शकते. हे थोडं perversion आहे हे मला मान्य आहे. पण लोक काय करतात ह्याचा विचार करताना त्यांच्या वागण्याकडे निरखून बघणं ही सवयच मुळातली pervert असावी असा डिफेन्स मी देतो.
      तर एका गृहस्थाच्या स्क्रीनवर मला दिसला एक व्हॉटसअप मेसेज:
10 seats for the 11 am show for movie (नाव कळलं नाही, पण प्रादेशिक भाषेत). Can we have TZH for 11 am show till Monday? J
--
असा छान पिच्चर बघून, नीट पोटोबा करून ही सगळी मजा रिचवायला जणू छान पाचक व्हावे म्हणून लोकल ट्रेनने मी परत येत होतो.  
एक कम्युटर, गर्दीच्या धप्पाक लोंढ्याच्या अग्रब्भागी दादरला डब्यात आला. ट्रेन रात्री ९.४५ ची कर्जत फास्ट आणि डबा फर्स्टक्लासचा. सहा जण बसलेले आणि दोन जण उभे अशा एका खाचेत तो तिसरा उभा राहिला. ठाणे गेल्यावर उभ्या असलेल्या पैकी पहिला बसला. तिसऱ्याच्या आशा पालवल्या कारण आता ५ मध्ये २. पण पुढे काही हालचाल नाही. डोंबिवलीला जो उभ्या लोकांत दुसरा होता त्याने आशा सोडली आणि परित्यागी भावनेने तो खाचेतून बाहेर आला. आता तिसरा चांगलाच कावला होता. त्याला बदलापूरहून पुढे जायचं होतं. बसलेल्या लोकांपैकी ४ जण झोपले होते. २ कानांत घालून बसले होते. हा मनुष्य अजून कावत चालला. शेवटी रडतखडत लोकल कल्याणाच्या आधी आली तेव्हा एकजण बसा असं त्याला म्हणाला तेव्हा हा तिसरा तिरसटला. म्हटला, ‘नको. बसा. बसूनच रहा. कशाला कोणाला जागा द्या.’ जो जागा द्यायला चाललेला तो एकदम ओशाळला, पण परत बसला. मग परत उभा राहिला आणि मी कसा नेहमी मदत करतो, पण आज जरा बरं वाटत नाहीये म्हणून बसलो असं म्हणून आपली गिल्ट साफ करू लागला. वाफ निघालेला तिसरा आता बसला आणि म्हणू लागला ‘लोक तर काय सी.एस.टी. पासून बदलापूरपर्यंत बसतात, काही वाटत नाही. सहा लोकांत तीन उभे होते, तरी कल्याणपर्यंत मी उभा होतो. काय म्हणायचं’. मग त्याने आणि त्याला सीट दिलेल्यांनी खांदे पुरेसे हलवून जगाच्या वाईट असण्यावर खुंटा बळकट केला.
हे मी बघत उभा होतो, तसं माझ्यापुढे बसायच्या सोडतीत येउच न शकलेला आणि लोकल फारच वेळ दोन स्टेशनात उभी राहिल्याने आपण नेमके कुठे आहोत असा existential चिडीला आलेला एक कम्युटर पण होता. त्यांत त्याला उशीर होतोय ह्याने वैतागलेली एक व्यक्ती त्याला मेसेज करत होती. त्यामुळे त्याला तो बघत असलेला पिक्चर पॉज करून करून रिप्लाय करायचा होता. त्याचा एक रिप्लाय
Once our lives get on track, I swear we will never see these trains again.

मग गाडी हलली track वरून, पुढे गेली. मी उतरून घरी जाऊन झोपलो ‘गच्ची’ मधला टाऊनमधल्या चाळीत राहणारा ‘श्रीराम’ आठवत आठवत! परदुःख शीतल!!        😔

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...