Saturday, December 9, 2017

दिवाळी अंक २०१७ -२

५. एडीट मित्र
 प्रकाशन, ग्रंथ व्यवहार ह्या विषयाला वाहिलेला आणि चोखंदळ वाचक ह्यांनाच लक्ष्य करू पाहणारा हा अंक. सुरुवातीचाच विद्येच्या माहेरघरातील पुस्तक व्यवहार हा शरद गोगटे ह्यांचा लेख प्रवाही आणि मुद्देसूद आहे. अंकात पुढे जे लेख आहेत, प्रामुख्याने प्रकाशक, वितरक किंवा पुस्तक दुकान असलेल्यांचे त्यात मध्ये मध्ये अतार्किक (म्हणजे मार्केटप्लेस लॉजिक न मानता वाचकांनी भावनिक व्हावे अशा आशयाचे) उमाळे येतात ते शरद गोगटे ह्यांच्या लेखात नाहीत. मराठी ही वाचन-लेखनाची भाषा भविष्यात कुठवर राहील ही जी भीती अनेकांचा मनात आहे ती शरद गोगटे ह्यांच्या लेखात डोकावते. पण ती मूळ मुद्द्यांना दाबत नाही.
ह्याव्यतिरिक्त राम जगताप ह्यांचा वापरलेली पुस्तके जिथे मिळतात अशा विक्रेत्यांबद्दलचा लेख चांगला आहे.
ग्रंथालयांच्या वाचकांची आकडेवारी, किंवा त्यांनी वाचलेली पुस्तके हे आजच्या संगणकीय नोंदणीच्या काळात मिळवणे शक्य आहे. अशा स्वरूपाचा लेख असता तर एडीट मित्र चा अंक अधिक गुणवान झाला असता असं वाटतं.
६. मनोविकास 'इत्यादी'
       भरपूर वाचनीय घटक असलेला अंक. कथांपेक्षा माहितीच्या आधारे मांडणी करणारे नॉन-फिक्शन लेख लक्षात राहिले आहेत. त्यातला माझ्यामते सर्वात बेस्ट म्हणजे गोष्ट गृहलक्ष्मीच्या ट्रेनिंगची हा Domesticity books/guides ह्या पुस्तक प्रकारांबद्दलचा चिन्मय दामले ह्यांचा लेख. इंग्रजांच्या राज्यांत प्रथा आणि आधुनिकता ह्यांचे मिश्रण करणारी मांडणी केली जात होती ह्याची उदाहरणे विचारात पाडतात. त्यानंतर मातृत्वाचा असर्जनशील प्रवास हा डॉ. बाळ फोंडके ह्यांचा लेख. ओघवता, नेमका आणि शास्त्रीय शब्द न टाळता पण तरीही परिभाषेच्या बोजड ओझ्यात न अडकणारा, पण किंचित जड. माझ्या उपजीविकेनिमित्त Journal of Economic Perspectives नावाचे जर्नल मी अनेकदा चाळतो आणि त्यातले काही पेपर्स वाचतो. हे पेपर्स हे एकून संशोधनाचा लेखाजोखा मांडणारे असतात. डॉ. फोंडके ह्यांचा लेख त्याच तोडीचा आहे. नेहमीप्रमाणे हे नेमकं कोण वाचणार आहे, आणि विशेषतः अशा रिव्ह्यू आर्टिकलची अधिकाधिक उपयुक्तता असलेला विद्यार्थीदशेतला वाचकवर्ग किती हे कुतूहल आहे. (मी शाळेत असताना डॉ. फोंडके आणि मोहन आपटे ह्यांची पुस्तकं मला समजत कमी होती, पण स्तिमित खूप करत होती. त्या awe चा काहीएक परिणाम माझ्या पुढच्या निर्णयांवर आहे. असो.)
 प्राण्यांचे प्रणयी जीवन हा लेख केवळ वर्णन करतो, पण वेगळा असल्याने आणि शैली चांगली असल्याने मजा येते. अभिजित रणदिवे ह्यांचा युरोपिअन सिनेनायक खूपच लवकर संपतो. ह्या लेखातल्या सूत्राची आज काय परिणीती आहे असा विचार डोक्यात येत राहतो. दीपा देशमुख आणि अच्युत गोडबोले ह्यांचा सती प्रथा आणि राममोहन रॉय’, औद्योगिक मानसशास्त्राचा आढावा हे लेखही वाचनीय आहेत.
आदिवासी संगीत आणि वादविवादांचे मोहोळ हा प्राची दुबळे ह्यांचा लेख उत्सुकता जागवतो. हा त्यांचा संशोधनविषयही असल्याने पुढे मागे त्या ह्याच्यावर सविस्तर लिखाण करतील अशी आशा आहे.
 निळू दामले ह्यांचा लेख एकाच चक्रात सावकाश फिरतो असं वाटतं आणि त्यांत फार मांडणी होत नाही. अनुभव विषण्ण करणारे आहेत, विशेषतः सुरुवातच.

'दुर्गा आणि घुर्ये' -अंजली कीर्तने - हा लेख नेमक्या माहितीचा आहे, लक्षणीय आहे. 'घुर्ये' ह्या आडनावाला 'दुर्गा' हे नाव निवडलं ह्यातून जो संघर्ष सूचित होतो तितका संघर्ष लेखांत टिपलेला नाही. लेख हा घुर्यांच्या स्वभावदोषांवर अधिक फोकस होतो.
 'बालगुन्हेगारांच्या निष्पाप जगात' भाबडा वाटतो. 'गणप्रिय गणिका' आणि 'इस्लाम: युद्धपरंपरा आणि हिंसाचार' हे लेख आपल्या भूमिकेची पाठराखण करायला लिहिलेले वाटतात, पटत नाहीत.
आंतरराष्ट्रीय संबंधांवर असलेले लेख मी मराठीत वाचत नाही, कारण असं वाचन इंग्रजीत होत राहतं. त्यामुळे अशा लेखांवर मी टिपणी करू शकणार नाही.
 'सामग्रीचे मूल्यभाग' गरजेहून जास्त सिनिकल वाटतं, पण एकूणच मला स्वतःला सिनिसिझमबद्दल जे पोकळ वाटू लागलंय त्याचा हा परिणाम असू शकतो.  
कथांच्या बाबतीत -
'स्पेशल वन आणि चालणारं काष्ठशिल्प' महत्वाकांक्षी आहे, पण कथेच्या मर्यादित परिघात नेमकं काहीच येत नाही. विशेषतः सुरुवात ग्रीपिंग होते पण तो ताण नंतर फार पटकन विरघळू दिला जातो. तसंच थोडं 'कासव' चं आहे, किंबहुना त्यातला 'रिलीव्हड वाटण्याचा' जो कोअर भाग आहे तो अपील होतो, पण मग कथा नेमकं काय होती असं वाटत राहतं. अर्थात हे माझं एकदम वैयक्तिक मत समजावं.
पंकज भोसले ह्यांची इत्यादी मधली कथा मी त्यांची ह्याच वर्षी अजून एक कथा वाचली (रेषेवरची अक्षरे मध्ये) त्याच 'स्पेस-टाईम' मध्ये घडणारी आहे असं वाटलं. थंड कोडगा सिनिकल व्ह्यू ते फार जबरी वापरतात. आणि घटनांच्या फिरकीचक्राला तपशील, स्वभाववर्णने ह्यांची जोड येऊन त्यांच्या कथा वाचायला मजा येते. पण ते ह्याच 'स्पेस-टाईम' मध्ये लिहित राहतील का? हा प्रश्न मला अनेक लेखकांबद्दल पडतो म्हणा, आणि कदाचित हा प्रश्न असण्यापेक्षा प्रत्येक लेखकाचा एक डिफाईन 'स्पेस-टाईम' असतो असं गृहीतकच असावं.
'बिचारा' कथा फार काही मजा देत नाही. अराजकाचा अदृश्य चेहरा -  प्रवीण बांदेकर -कथा नसून लेख का आहे? - आगामी कादंबरीतील अंश म्हणून? एकूणच political कमेंट कथेतून करण्यापेक्षा डेटा घेऊन आणि थेट राजकीय भूमिका घेऊन करावी. कसं सगळं राजकारण केवळ स्वार्थाचा खेळ बघा अशी मान-हलवी किंवा सिनिकल किंवा सरतेशेवटी काय हातात अशी रिकामी भूमिका रूपकांच्या माध्यमातून किंवा पात्रांच्या मार्फत घेणं हे आता 'अतिपरिचयात अवज्ञा' पातळीला पोचलं आहे. राजकीय पार्श्वभूमीच्या आधारावर मानवी संबंध आणि त्यांचे पेच पकडणं हे करताना फार सावकाश जाणं महत्वाचं आहे आणि मुळात नाट्यमयता असलेली आणि वास्तवाला फटकून न जाणारी कथा ह्या सगळ्याच्या मुळाशी असणं गरजेचं आहे असं वाटतं. तसं नसेल तर केवळ बौद्धिक कारागिरी एवढंच उरतं आणि ते बोरिंग होतं.  
कविता - नेहमीप्रमाणे झेपल्या नाहीत.
७. इत्यादी बदलायला गेलो आणि मिळाला मौज 😊
 मौजच्या दिवाळी अंकाचे माझ्या मनात एक खास स्थान आहे. दिवाळी अंक म्हणून जो prototype माझ्या डोक्यात आहे तो मौजचा आहे. लिखाणाचा माणसाच्या कृतीवर, कृतीपाठच्या मूल्यांवर, वर्ल्ड व्ह्यूवर परिणाम होतो ह्याचा माझ्यापुरता दाखला जो आहे त्यांत मौज दिवाळी अंकातले लेख आहेत. पहिला म्हणजे २००२ च्या अंकातला डॉ. अभय बंग ह्यांचा. त्यानंतर २००५ च्या अंकातला गिरीश संत ह्यांचा प्रयास बद्दलचा. आणि तिसरा म्हणाला तर ह्यावेळच्या २०१७ च्या अंकातला डॉ. बाळ फोंडके ह्यांचा सुख म्हणजे नक्की काय असतं?’ हा लेख. हा एक अव्वल लेख आहे. अंकांत तो ललित ह्या वर्गीकरणात आहे, पण त्यांत काही उत्तम संदर्भही आहेत आणि खरंतर तो संशोधनाचा रिव्ह्यूच मानला पाहिजे.
ललित लेखांमधले अन्य काही लेखही लक्षात राहिले आहेत. सूर-संगत (आशा बगे) आणि महाभारत आणि संस्कृत नाट्यसृष्टी हे लेख सौंदर्याचे उत्तम विवेचन करतात. अश्विन पुंडलिक ह्यांचा सर्वात्मका सर्वेश्वरा (त्यातला स्युडो आध्यात्मिक = स्युडो सायन्स असा टोन वगळून) पणन वेगळा आहे. विनया जंगले ह्यांच्या सापांबद्दलच्या लेखात डॉ. श्मिट ह्यांच्याबद्दलचा भाग स्तिमित करतो. मेरी ओडिंगा कथाच वाटावी एवढा सहज आहे.
 'इथे उजळला मृत्यू' च्या आधी spoiler अलर्ट द्यायला हवा होता. सई परांजपे ह्यांचा 'अंगुठाछाप' केवळ वर्णन आहे. ज्योती मोकाशी ह्यांचा लेख सुरू चांगला होतं, पण मग सामाजिक जाणिवेची डूब असलेल्या छान छान पणात विस्कळीत होतो. मियांव मला आवडला, पण त्याचं कारण मांजर आहे, ह्या लेखातली चित्रं पण आवडली.
कवितांचे मोठे सेक्शन आहे. त्यातली सतीश काळसेकर ह्यांची असे तर बिलकूल नाही तेवढी लक्षात राहिली आहे. बाकी कवितांमध्ये अनेकदा वैयक्तिक अनुभवांना कवितेचे सार्वत्रिकपण देण्याचा प्रयत्न जाणवला. पण इथे फार काही मत नाही.
मौज मध्ये तीन कथा आवडल्या. मोनिका गजेंद्रगडकर ह्यांची दीर्घकथा सावकाश डेव्हलप होते. दुःखाच्या जाणीवेचा एक सूर ह्या कथेने अचूक पकडला आहे. कथेत एक इंटरेस्टिंग स्टेक लावलेला आहे आणि मग त्याच्या अवतीभवती असणारे ताणेबाणे नीट पकडले आहेत. ह्या कथाबिजाची (क्लीशेड? पण अचूक आहे बहुतेक!) अधिक विस्तारित मांडणी व्हावी असं वाटत राहिलं.
सानिया ह्यांची कथाही अशाच अवकाशात आहे, पण ती अधिक फ्री स्पिरीटेड आहे. मला झुम्पा लाहिरी ह्यांच्या Lowland’ ची आठवण येत होती. अपघाताने/arrangement ने एकत्र आलेले नवरा-बायको ह्या कथेच्या सुरुवातीने असावं.
शर्मिला फडके ह्यांची कथा मी लोकल ट्रेनमध्ये खिडकीत घोटभर हिवाळ्याचे सुख घेत वाचली. तिला एक व्याकूळ आणि शेवटी समाधानाकडे झुकणारा सूर आहे. मला कथा आवडली.
विलास केळसकर ह्यांची कथा मध्येच चमकून येते, आणि मध्येच abstraction च्या जाळीत घुसून दिसेनाशी होते.
मौज च्या अंकाने अपेक्षेपेक्षा जास्त मजा दिली!
८. किस्त्रीम
केवळ हिंदुत्ववादी विचारसरणीची री ओढणे, ओढूनताणून बचाव करणे हा उद्देश आहे अंकाचा असं वाटत राहतं. आणि असं असणं ह्यात गैरही काही नाही. पण हे करताना लिखाणाच्या गुणवत्तेकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. मी पूर्ण वाचूही शकलेलो नाही  




  

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...