Sunday, July 9, 2017

अमेरिकन गॉडस्      ‘वेस्टवर्ल्ड’ बघितल्यानंतर इतकी डोक्यात जाणारी (म्हणजे गुंतवणारी, जीवनाचे मेटाप्रश्न (ह्या शब्दाच्या प्रेरणेसाठी जयदीप चिपलकट्टी ह्यांच्या ‘अल्बाट्रॉस सँडविच’ ह्या कथेला धन्यवाद) पाडू शकणारी, आणि त्यामुळे जो चाललाय तो वेळ थोडा गमतीत घालवायला मदत करणारी अशी) सिरीज परत लवकर बघायला मिळेल अशी आशा नव्हती. गणेश मतकरी ह्यांनी एकदा ‘अमेरिकन गॉडस्’ अमेझॉन प्राईमवर आहे ह्याची पोस्ट केली होती. त्यावेळी ह्या सिरीजचे रॉटन टॉमॅटोज वर चांगलं रेटिंग आहे एवढं मी बघून ठेवलं होतं. पण अमेझॉन प्राईमच्या स्वतःच लादून घेतलेल्या सेन्सॉरशीपबद्दल ऐकल्याने मी ते ह्या अगोदर सबस्क्राईब केलं नव्हतं. पण ‘डेथ इन द गुंज’ पण त्यावर आला आहे हे कळल्यावर मी ५०० रुपयेच वार्षिक फी आहे तर फाचाट तर फाचाट सेन्सॉर, पण अमेझॉन प्राईम सबस्क्राईब केलं.
      अमेझॉन प्राईमचं सेन्सॉरचे नियम थोडे फ्लुइड आहेत. म्हणजे काही फिल्म्सच्या बाबतीत कुसंस्कारी अपशब्द (उदा. ***, ****,** इ.), स्त्रियांची संपूर्ण उघडी छाती ह्या गोष्टी अमेझॉन छाटत नाही, पण प्रेक्षकाला ते पोचणार नाहीत ह्याची काळजी घेते. पण ‘अमेरिकन गॉडस्’ च्या बाबतीत पुरुषांची जननेंद्रिये एवढाच काय तो ब्लर करण्याचा विषय आहे, बाकी जे आहे ते आहे. अमेझॉनचे हे निर्णय म्हणजे त्यांची ऑप्टिमल डिसिजन मेकिंग आहे. भारतातील पहलाज आणि बात्रा ह्यांच्या कात्रीपासून वाचा आणि त्याचवेळी ग्राहकांना सुद्धा रिटेन करा ह्याचं संतुलन साधायचा प्रयत्न आहे. अर्थात ह्यापेक्षा आम्ही आहोत असे आहोत टाईपचं नेटफ्लिक्स बरं आहे म्हणा. वर्स्ट म्हणजे ‘हॉटस्टार’. त्यांनी ‘मसान’ असा छाटला आहे कि गोष्टीचा गाभा गायब आणि आपण इकडे-तिकडे टहळतो आहोत असं होतं. ‘हॉटस्टार’ वर कुठलाही पिक्चर किंवा सिरीज बघताना मला पायरेटेड प्रिंटेड पुस्तक वाचताना वाटणाऱ्या भितीसारखं वाटतं, मध्येच काही पानं नसली तर असं.

    असो. अशा विसंगत कोलांट्या आणि कडी लावा आतली हेच आपल्या सांस्कृतिक जीवनाचे आणि त्यातल्या राष्ट्रीय सांस्कृतिक शिलेदारांचे आणि त्यांनी निर्माण केलेल्या दहशतीतून जन्माला आलेल्या सेल्फ-सेन्सॉरिंगचे डीफायनिंग वैशिष्ट्य आहे.
--


     ‘अमेरिकन गॉडस्’ ह्या सगळ्या झ्याटू चाळ्यांना विसरायला लावेल एवढी कडक आहे. तिची ताकद ही म्हणायला हवी कि जगण्याच्या, लोकांच्या कृतीच्या, लोकांच्या गृहीतकांच्या पाठाचे अमूर्त प्रश्न काढताना पंचनामा किंवा गोष्टीच्या नावाखाली संवाद किंवा निवेदनातून तात्विक मुलामा ढाचणे (जसे ‘ट्रू डिटेक्टीव्हज’ चा पहिला सीझन किंवा काही प्रमाणात ‘हनिबाल’) असा प्रकार होत नाही आणि ह्याचे दुसरे टोक म्हणजे काहीही चव नसलेलं पण हाताला येईल तसं मायोनीज, चीज आणि काय काय सॉस मारलेलं अन्न खावं तशी सेक्स, सस्पेन्स, पंचेस ह्यांची भेळ विकणं (जश्या अनेक नेटफ्लिक्स ओरिजिनल) हेही होत नाही. रंजकतेची, घडण्याच्या उत्सुकतेची दोरी घट्ट पकडणं आणि त्याचवेळी काय चाललंय ह्याच्या अमूर्त किंवा अॅनॉलॉजिकल वर्णनातले प्रयोग करणं हे ‘अमेरिकन गॉडस्’ च्या पहिल्या सीझनला जबरी साधलं आहे.
     ‘हनिबल’ बनवणाऱ्या ब्रायन फुलरनेच ही सिरीज केली आहे. आपल्याला दिसणाऱ्या प्रत्येक फ्रेमच्या पाठी फार पक्की सोच आहे, तपशील अगदी बेहद बारकाव्याने आणि व्हिज्युअलायझेशनच्या टोकाला जाऊन पकडायची ख्वाईश जशी ‘हनिबल’ मध्ये आहे तशी ‘अमेरिकन गॉडस्’ मध्येही आहे. अर्थात ‘हनिबल’ मध्ये काही दुर्मिळ संवेदनशील माणसांच्या अत्यंत एका-या माणूसपणाचे प्रयोग आहेत तर ‘अमेरिकन गॉडस्’ आपलं समूह म्हणून जे वागणं आहे त्याच्या पाठच्या धाग्या-दो-यांशी खेळतं.

पार्श्वसंगीत, विशेषतः अनेक संवाद आणि प्रसंगांच्या पाठी येणारे डिस्क्रिट लयदार ड्रमबीट्स हे अफलातून आहे. जसं ‘हनिबल’ मध्ये आहे तशी एक फ्रेम पुढच्या फ्रेममध्ये बेमालूम जाऊन मिसळणं हे तर आहेच, ते इतक्या वेळेला आणि इतक्या सहजतेने होतं कि त्याचं काही वाटेनासं होतं. खास आहेत त्या एपिसोडच्या सुरुवातीला येणाऱ्या गोष्टी, किंवा ‘सूचककथा’. भूतकाळ आणि गोष्टीच्या वर्तमानात जे घडतं आहे त्यांची वर्तुळे निर्माण होतात आणि ती एकमेकांत विरत गोष्ट पुढे सरकते.

सिरीजचं नाव सिरीजबद्दल नेमकं सांगतं. ‘अमेरिका’/‘अमेरिकन’ आणि ‘गॉड’ ह्या संकल्पनाच ही सिरीज चिवडून, पालटून, विसकटून, धांडोळून बघते. असं होतं कि शेवटच्या एपिसोडमध्ये सिझन एका अंतबिंदूकडे नेणं हे कृत्रिम वाटून जातं, कारण तिथपर्यंत यायचा प्रवास जीव खिळवून जातो. रूपके, मिथके आणि अघटीते ह्याची इतकी चपखल, आपल्याला चपराक बसावी असा धक्का देऊ शकणारी सरमिसळ मिळणं कठीण आहे.

--
Neil Gaiman ह्यांच्या ‘अमेरिकन गॉडस्’ ह्याच नावाच्या कादंबरीवर ही सिरीज आधारित आहे. जायज आहे कि मी आता ही कादंबरी वाचून बघायचं ठरवलं आहे. ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ च्या चित्रपटांनी कादंबरीला ७०% न्याय दिला आहे असं म्हणता येईल. अर्थात गोष्टीचा गाभा, ज्यांत हॉबिटच्या रूपकाने जीवन साध्या शारीर आनंदात जगण्याची तहान आणि ही तहान आणि तिची शांती विस्कटून टाकणारे प्रश्न, हा काही चित्रपटांना फार पकडता येत नाही. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ने तर ‘सॉंग ऑफ आईस अँड फायर’ चा फोकसच उलटा करून टाकला आहे. वागण्याच्या स्टिरीओटाईपपासून सुरू करून मूळ कादंबरी पात्रांना अधिकाधिक सखोल डिस्कव्हर करते (म्हणूनच मुळात ३ भाग होतील असं जे जॉर्ज आर. आर.मार्टिनला वाटलेलं ते आता २०२४ पर्यंत सात भागात आटपेल असा अंदाज आहे.), त्याउलट ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ने आता ‘आम्ही एकशेपाच’ अशा सांस्कृतिक तात्पर्याकडे कूच केली असावी असं दिसतं आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ बघताना आता व्हिलन आणि हिरो अशी छान वाटणी झालेली आहे आणि त्यांची आखरी जंग आणि त्यातून ‘जय वेस्टरोजमाता’ असा आध्यात्मिक संदेश आणि सरतेशेवटी ‘मै समय हूं’ असं होऊन प्रकार सुफळ संपूर्ण होईल असं वाटतं आहे. मुळात आता मूळ कादंबऱ्या ह्या बेसिस नाहीच आहेत. ‘अमेरिकन गॉडस्’ मध्ये काय होतं बघायचं.
--
बाकी अमेझॉनने एवढा पैसा लावून सिरीयल काढली ती ‘ट्रू डिटेक्टिव्हज’ किंवा ‘हनिबल’ सारखी २-३ सिरीजमध्ये आटपायला लागेल, का मुळातच २-३ सिझनचाच आटोपशीर कारभार ठेवला आहे हे ‘येणारा काळच ठरवेल’ (हाहाहा). ‘अमेरिकन गॉडस्’ वर लागलेला पैसा आणि त्याला मिळू शकणारा प्रेक्षकवर्ग ह्या गणिताचं मला नवल वाटतं आहे. ‘नेटफ्लिक्स’ ने सोप्पा मार्ग अवलंबला आहे. ते दे मार धपाधप सिरीज बनवत आहेत आणि ह्या सिरीज एकमेकांशी प्रचंड substitutable आहेत. कधी super natural, तर कधी राजकीय साचा घ्यायचा आणि त्यात सेक्स, सस्पेन्स, भांडवलशाही विरचित व्यक्तिवादप्रणीत स्वार्थ आणि क्यूट परमार्थ ह्यांचे रोचक झगडे भरायचे आणि प्रत्येकाला थोडा वेगळा कलर देऊन सोडायचं असं काहीसं त्यांचं मॉडेल वाटतं. त्यांनी ‘ब्लॅक मिरर’ कुठून मिळवली कोणास ठाऊक!
--
असो. ‘अमेरिकन गॉडस्’ बघा, खुश रहा. मग, आपल्याकडे केव्हा बनणार असं असं म्हणा, संवेदनशील देशभक्तीची पावती फाडा, मग ‘चालतंय की’ असं काहीही बघा.
वेळ गेल्याशी मतलब.

अनेकदा सकाळी मी ज्या रिक्षात बसतो त्यात चालकाने डकवलेला मौलिक संदेश देतो आणि थांबतो:
‘जसा ज्याचा भाव तसा त्याचा देव’  😫🚮

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...