Saturday, July 1, 2017

'रिंगण'

     
प्रतिमा सौजन्य: http://marathistars.com/movies/ringan-2017-marathi-movie/
 


‘रिंगण’ प्रातिनिधिक कथा नाही. म्हणजे खरंतर दिग्दर्शकाला आजच्या घडीला आपल्या आजूबाजूला जे जुनाट गंभीर प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे आणि त्यांचा उपाय म्हणून काही सुचावायचं आहे. त्याचवेळी माणसांच्या संबंधांची, त्यांच्या परस्पर व्यवहारांची गोष्ट त्याला सांगायची आहे.

अमुक एक सामाजिक, आर्थिक संदर्भ संदर्भ गृहीत धरूनच गोष्टी सांगितल्या जातात. जर गृहीत धरलेल्या संदर्भांतून गोष्टीत येणाऱ्या कृती, निर्णय हे सुसंगत वाटले तर आपण अशा कथा, गोष्टी, सिनेमे वास्तवावर भाष्य करतात असं म्हणू शकतो. पण जरी ही वास्तवाशी सुसंगत नाळ नसली तरी गोष्ट केवळ आपल्या-आपल्यात सुसंगत असू शकते. म्हणजे मोकाशींचे सिनेमे असे असतात. ‘एलिझाबेथ एकादशी’ मध्ये होता तसा मुलगा, तसे निर्व्याज मनोरथ आणि त्यांची सुफळ परिणीती हे सगळं घडण्याची संभाव्यता खूप थोडी आहे हे आपण जाणून असतो. पण तरी होऊ शकतं असं मानलं कि ते ज्या पद्धतीने पडद्यावर घडतं त्याची रंजकता हा आपला चित्रपटाच्या आस्वादाचा कणा बनतो.

‘रिंगण’ ह्या गोष्टीच्या आतल्या सुसंगतीमध्ये किंचित कमी पडतो. अर्थात ह्या त्रुटी उघड नाहीत, पण आहेत. अबडूची आई नेमका केव्हा मरण पावली हे सांगितलेलं नाही. पण ती नुकतीच मरण पावली समजावं तर सिनेमात १० वर्षाच्या असलेल्या अबडूला आईचा चेहरा आठवत नाही हे पटत नाही. आणि तिला जाऊन बरीच वर्षे झाली मानलं तर तिच्या नसण्याची अबडूला सवय नाही हे जुळत नाही. अर्थात दुसऱ्या शक्यतेला मी झुकतं माप देईन. अण्णा दुकानात कामाला लागतो आणि सहा महिन्यांत ५०००० जमवतो, म्हणजे त्याचा महिन्याचा पगार किमान ९००० तरी असेल ही बाब सुद्धा थोडी खेचल्यागत आहे. पण त्याचवेळी ह्या उणीवा गोष्टीवर फार मोठा ताण टाकत नाही.

‘रिंगण’ दोन ठिकाणी गंडतो असं मला वाटतं. पहिलं म्हणजे ‘अध्यात्मिक कमेंट’ करण्याचा प्रयत्न आणि दुसरं म्हणजे ‘शेतीच्या प्रश्नावर’ कमेंट करण्याचा प्रयत्न. अण्णाचा रस्त्यात सापडलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीसमोरचा प्रसंग एकदम नाटकी होऊन जातो. सारं काही विठ्ठलावर सोडणं, त्याला नावं ठेवणं वगैरे डेली सोपचे संवाद म्हणून ठीक वाटतं. ‘रिंगण’ सुद्धा ह्याच पठडीतला असता तर खपूनच गेलं असतं. पण तो तसा नाहीये. पात्रांच्या बटबटीत भावनिक चिखलांत लोळण्याचा सोप्पा मार्ग ‘रिंगण’ घेत नाही. त्यापेक्षा त्यांच्या मनोव्यवहारांकडे पाहायचा थंड, अनपेक्षित पण तरीही प्रभावी असा व्हिज्युअल मार्ग ‘रिंगण’ अनेक ठिकाणी घेतो. पण क्षमतेला पूर्ण न्याय देण्यासाठी एका मर्यादित प्रतलांत तपशीलवार जाण्यापेक्षा चित्रपट भिरभिरा होऊन जातो. मग ह्या भिरभिरलेपणात काहीवेळेला अत्यंत भाबडे आशावादी संवाद (गावाची जमीन सोडवल्यावर रावसाहेब म्हणतो तो) किंवा क्लीशेड सूचकता (मूर्तिकार घडवत असलेली मूर्ती) चित्रपटाची झेप तोकडी करतात.

अर्थात तरीही अल्फा-मराठी मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाच्या सुखद जागा कुरवाळू पाहणाऱ्या चित्रपटांच्या रांकेत ‘रिंगण’ सणसणीत वेगळा आहे. पण त्यामुळेच बाकी चित्रपटांना जी साऱ्या विसंगती माफ अशी मुभा मिळते ती ‘रिंगण’ ला मिळणार नाही. मर्यादित रिलीज, मर्यादित प्रसिद्धी ह्या दुव्यांवर मात करायची तर ‘रिंगण’ ने त्याच्या ताकदीच्या स्थानांना अधिक न्याय द्यायला हवा होता असं वाटत.

‘रिंगण’ च्या दिग्दर्शकाला ‘चला हवा येऊ द्या’ ने बोलावलं होतं आणि त्यावेळी त्याची भूमिका त्यांनी काही वाक्यांत मांडली. ‘माणसांनी एकमेकांना मदत करणं’ अशा अर्थाने काही वाक्ये ते बोलले. माझ्या मते त्यांचे प्रामाणिक, मेहनतकश आणि प्रांजळ तात्पर्यबोध देणारे प्रयत्न ‘रिंगण’ मध्ये दिसतात. त्यांची गोष्ट पडद्यावर सांगताना फ्रेम्स व्हिज्युअलाईझ करण्याची क्षमताही जबरी आहे.

चित्रपट पाहताना मला ‘एलिझाबेथ एकादशी’ आणि ‘ख्वाडा’ आठवत होते. अर्थात एक पंढरपूरच्या संदर्भाने आणि एक शशांक शेंडेच्या. शशांक शेंडे ह्यांनी ‘ख्वाडा’ मधला बापही सही केला होता. ‘ख्वाडा’ च्या दिग्दर्शकाने आपली जमीन वगैरे विकून चित्रपट बनवला असं तेव्हा ऐकण्यात आलं होतं. त्यांचा पुढचा चित्रपट ‘बबन’ नावाचा येतो आहे असं वाचण्यात आलं होतं. ‘ख्वाडा’ चे दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे, ‘किल्ला’ चे अविनाश अरुण आणि ‘कोर्ट’ चे चैतन्य ताम्हणकर ह्यांच्या यादीत मी ‘मकरंद माने’ ह्यांना ठेवेन.
         
        मोकाशी ह्यांचं विनोदाच्या अंगाने नवे प्रयोग करणं, ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ च्या उत्तरार्धातले नागराज मंजुळे ह्या सगळ्याने तांत्रिक दृष्ट्या प्रभावी पण समजेच्या अंगाने एका अत्यंत उथळ आणि छोट्या परिघात वावरणारा मराठी सिनेमा विस्तारतो आहे. ‘रिंगण’ त्या विस्तारातलं थोडं निसटलेलं, थोडं सावरलेलं आश्वासक पाउल आहे.

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...