Sunday, July 16, 2017

मकरंद साठे ह्यांचे ‘काळे रहस्य’ आणि बाकी काही वाचले-पाहिलेले

प्रतिमा सौजन्य: बुकगंगा 

मकरंद साठे ह्यांचं ‘अच्युत आठवले आणि आठवण’ हे मी वाचलं आहे. पण जेव्हा ‘सध्या नवी कोणती मराठी पुस्तके वाचावीत’ ह्या एका फेसबुक पोस्टमध्ये (जी माझ्या फेसबुक फ्रेंडलिस्टमधली नव्हती) त्यावर कुणीतरी लिहिलेल्या १५-२० पुस्तकांच्या यादीत मला ‘काळे रहस्य’ आणि त्याच्या लेखकाचं नाव दिसलं तेव्हा मला ह्यांनीच ‘अच्युत आठवले आणि आठवण’ लिहिलं आहे हे अजाबात क्लिक झालं नव्हतं. हे क्लिक झालं मध्येच केव्हातरी पुस्तक वाचताना. मग ते कन्फर्म करायला पुस्तकाच्या सुरुवातीला पाहिलं तर ‘सूर्य पाहिलेला माणूस’ हे नाटक पण मकरंद साठे ह्यांनी लिहिलं आहे हे पण माझ्या लक्षात आलं आणि ‘काळे रहस्य’ ची पुस्तकाच्या नूराशी एकदम फटकून असणारी, भावनिक वाटू शकेल अशी ‘अर्पणपत्रिका’ (किंवा ‘ह्यांना’ पत्रिका) हीपण लक्षात आली. 

मला पुस्तक आवडलं का नाही असा एकदम ढोबळ प्रश्न घेतला तर ‘आवडलं’ या बाजूला झुकणारं उत्तर मी देईन. पण त्याचवेळी जसं मला ‘शोध’ हे पुस्तक आवडलं, किंवा अरुण साधू ह्यांचं ‘सिंहासन’ किंवा ‘मुखवटा’ आवडलं तसं आवडलं का असं विचारलं तर मला ‘नाही’ कडे झुकणारं उत्तर द्यावं लागेल. 
आपल्या जगण्याबाबतच्या निरीक्षणांना गोष्टीच्या मिषाने निबंध-कम-संवाद-कम-निरीक्षण-कम-सिनिसिझम अशा अत्यंत फ्लुइड अशा स्वरुपात सरकवणं/सादर करणं ह्या जॉनरला काय म्हणतात? ‘क्वाझाय(quasi) -कथा’ असं त्यांना म्हणता येईल. असं जॉनर करावं लागेल असं म्हणायला मी सध्या वाचतोय ते आनंद जातेगावकर ह्यांचं ‘अस्वस्थ वर्तमान’. 
‘काळे रहस्य’ सणसणीत सुरू होते. प्रारंभापासूनच वर्णनाची खोचक शैली लक्ष वेधून घेते. त्या सुरुवातीनंतर ती थोडी मंदावते, फैलावते, वेगवेगळ्या व्यक्तींची, जशी ‘चांगदेव चतुष्टय’ किंवा ‘हिंदू’ मध्ये धुतली आहेत तशी धुणी धुतली जातात (आपल्या समकालीन आणि सहमार्गी लोकांन फिक्शनलाईझ करून त्या बाहुल्यांना खेळवणं हा काव्यगत न्याय का!) आणि एकदम ब्रिस्क अशा पद्धतीने ‘काळे रहस्य’ संपते. एका अवास्तव भासणाऱ्या बिंदूभोवती निरीक्षणपूर्ण वास्तविक मांडणी करणं आणि त्यात गोष्ट सांगू पाहणं हे ‘काळे रहस्य’ करू पाहतं. हे वेगळेपण जसं ‘काळे रहस्य’ ला ताकदवान करतं तसंच त्याचं अपिलही मर्यादित करतं. बलाढ्य भावनाविवश संवाद नसलेल्या पण काटेकोर उभ्या केलेल्या नाटकाची शिस्त एकेकदा ‘काळे रहस्य’ मध्ये जाणवते, पण काहीवेळेला ते उगाच घोटाळत राहतं. 
सुरुवातीपासूनच ही नुसती गोष्ट नाही, कमेंट आहे, गोष्ट सांगण्याचा प्रयोग आहे हे सगळं सांगण्याचा कधी त्रयस्थ, काही थेट लेखक-वाचक संवाद असा पवित्रा लेखक घेत राहतो. ही गोष्ट काय आहे, ही कमेंट काय आहे हे अत्यंत तटस्थपणे नोंदवून देण्याचा प्रयत्न लेखक करतो. हा तटस्थपणा आणि त्यातून नोंदवायची सिनिकल अशी अप्रत्यक्ष कमेंट लेखकाला साधली आहे. पण ही गोष्ट नाही. ही एक अस्वस्थता आहे. ह्या अस्वस्थतेचं तात्पर्य सोप्पं नाही, पण तिच्यावर आपल्यापरीने एक उपाय करण्याचा थॉट एक्सपिरिमेंट म्हणून गोष्ट लिहावी असं ‘काळे रहस्य’ आहे. त्या प्रयोगाच्या रचनेने आलेली स्वाभाविक रंजकता एवढीच ‘काळे रहस्य’ च्या रंजकतेची व्याप्ती आहे. बाकी ‘काळे रहस्य’ वाचताना येणारी मजा ही सखोल आहे, स्वाभाविक पुस्तक-वाचनाच्या रंजकतेची नाही. 
--
त्या आधी ‘कोसला+चांगदेव’ चं आधुनिक पण अपडेट केलेलं आणि थोडं सोबर व्हर्जन वाटावं अशी ‘नामशेष होणारं माणूस’ वाचली. एक गोष्ट इथे स्पष्ट केली पाहिजे कि नेमाड्यांच्या लिखाणाबरोबर तुलना हा लेखकाला कमी लेखायचा भाग नाही. हा लेखनाच्या वर्गीकरणाचा टॅग आहे. अर्थात कोसला+चांगदेवमध्ये टोकदार व्यक्ती पर्स्पेक्टीव्ह आणि आजूबाजूचे कंगोरेदार पण दुय्यम फोकस केलेले सामाजिक-राजकीय संदर्भ अशी रचना आहे. ‘नामशेष होत जाणारं माणूस’ मध्ये हे कंगोरे अधिक धारदार होतात, प्रसंगी तेच गोष्ट बनतात. कादंबरीचा नायक एका राजकारणातून निवृत्त झालेल्या, पण पीळ राखून असलेल्या नेत्याच्या आत्मचरीत्राबाबत त्याच्याशी भेटतो-बोलतो हा धागा ‘नामशेष..’ ने चांगला डेव्हलप केला आहे. ‘नामशेष..’ ने पृष्ठसंख्या आणि कादंबरी नायकाचा प्रवास ह्याबाबतीत अजून थोडी मजल मारली असती तर मजा आली असती असं वाटतं. 
--
काल ‘प्रीथ्वी’ नाट्यगृहात, अत्यंत हिप अशा क्राउड आणि माहौलमध्ये ‘गजब कहानी’ हे नाटक पाहिलं. 
प्रतिमा सौजन्य: http://www.mumbaitheatreguide.com
५०० रुपये तिकीट गेल्याने हा नाटकाबाबत काही शब्द बोलणं भाग आहे! सारामागोच्या ‘एलीफंट’स जर्नी’ ह्या कादंबरीवर आधारित हे नाटक होतं. मध्यंतर नसलेला २ तासाचा प्रयोग खरंतर जरा जास्त वाटला. (हे ‘पृथ्वी’ला ९ चा शो असल्याने झालं काय?) नेपथ्य, मंचावर जे घडणार त्याचे व्हिज्युअलायझेशन अशा अर्थाने आणि ‘पृथ्वी’ ला अत्यंत जवळ बसून नाटक बघणं ह्या अनुभवाने मजा आली. पण आपल्याला काही हिट(लागणं अशा अर्थाने) होत नाही, जसं ‘हंडाभर चांदण्या’ बघताना होतं. 
सारामागोची मी वाचलेली आणि थॉट एक्सपिरिमेंटचा एक बाप प्रकार म्हणून म्हणता येईल अशी कादंबरी म्हणजे ‘ब्लाइन्डनेस’. मी ‘एलीफंट’स जर्नी’ वाचलेलं नाही. 
थेट नाटक लिहिणं आणि कथा-कादंबरी ह्यांचं नाट्य-रुपांतर ह्यांमध्ये काही मूलभूत फरक राहतातच का? 
नाटक हे दृश्य, प्रेक्षक त्यांच्या भौतिक, जिवंत डोळ्यांनी पाहणार असं माध्यम आहे. जरी 
लिखाण वाचताना होणारं व्हिज्युअलायझेशन हे वाचणाऱ्याच्या मनात आहे.
जरी नाटकही सरतेशेवटी मनाशीच पोचणार असलं तरी त्याच्या दृश्य मानसिक प्रतिबिंबाला प्रत्यक्ष नाटक कसं दिसलं ह्याचाच बेसिस राहणार आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकाला मिळणाऱ्या अनुभवाला एक स्वाभाविक चौकट आहे. हत्ती, मांजर, टेबल बोलणं, व्यक्त होणं हे अवास्तव नाटकात उघडं पडतं. तुलनेने कादंबरी ह्या अवास्तवाचा अवकाश जास्त ताकदीने मांडू शकते. कारण कादंबरीचा-कथेचा अनुभव हा तेव्हा उघड होणाऱ्या कुठल्याही फिजिकल क्ल्यूवर जन्मलेला नाही. वाचणाऱ्याच्या अगोदरच्या अनुभवांच्या उरलेल्या सांगाड्यातच कथेचा खेळ उलगडणार आहे. ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ फॅंटसी नाटकाला झेपेल का? नाटकातील नेपथ्याने पुरेशी मजल गाठली की नाटक म्हणून लिहिलेलं नाटक आणि कथा-कादंबरीतून अंतरित केलेलं नाटक ह्यांच्यात असू शकतो असा फरक नष्ट होईल का? 
--                   

वाचलेले-पाहिलेले काही

वाचलेले  १. एम. जे. अकबर ह्यांचे 'Kashmir: Behind the Vale'.  इस्लामच्या माझ्या आकलनाची सुरुवात हे अकबर ह्यांच्या 'Shade of S...