Wednesday, July 6, 2016

कवी मेल्यावर

      तुळसी परब गेल्याची घटना फेसबुकवर कळली. ते सामाजिक कामांशी निगडीत होते, ते कसे दिसायचे हे सगळं फेसबुकवरच कळलं.
      मला तुळसी परब हे नाव माहिती होतं ते त्यांचा ‘मनोहर ओकच्या ऐंशी कविता’ च्या शेवटी त्यांचा मनोहर ओकांबद्दलचा एक लेख आहे म्हणून. त्या पुस्तकातल्या कवितांपेक्षा मी तो लेखच जास्त वाचला आहे. त्यात छाती पिटणारी वेदना नाही, तटस्थ होऊ पाहणारा गहिवर कधीतरी आहे, पण एकूणच त्या पूर्ण लेखाला सोसून शहाणी झालेली शांत दृष्टी आहे. त्याच लेखाच्या आधीचा चंद्रकांत पाटलांचा लेख तुळशी परबांचा लेख वाचल्यावर थोडा बेगडी, मी-मी असलेला वाटून जातो.
      बाकी मला काहीच माहिती नाही त्यांच्याबद्दल.
--
      ते कवी म्हणून खूप आधीच केव्हातरी मेले असतील. किंवा शेवटी त्यांच्यात एक दार्शनिक उरला असेल. मला माहिती नाही. एखादा माणूस म्हातारपणीपण कवी वगैरे रहात असेल असं मला वाटत नाही. माझ्यातला कविता वाचणारा किंवा त्याने खुळावणारा भागही संपून जातोय अशी मला भीती आहे.
      माणसातला कवी असणारा भाग तर आधीच मरत असावा. रसिक, समीक्षक किंवा बघणारा हे सारे अगदी त्याच्या शरीराच्या मरण्यापर्यंत राहू शकतात, जर त्या माणसाचा नुसताच गोळा सरतेशेवटी उरला नसेल तर.
      लोक कलाकार म्हणून ठाऊक शरीराच्या संपण्यावर एवढा शोक का करतात? ही शरीरे अजून काही दिवस टिकली असती तरी कलाकार म्हणून त्यांनी काय केले असते? नवेपण, भर आणि ओसर सारे जगून गेलेल्या अस्तित्वांचा शोक का करावा? 
      दुःख त्या शरीराच्या नाम-प्रतीमांशी जोडलेल्या आठवणींचे ठसे चिरडल्याचे असावे.
      तसेही वेळेचा रौंदा चालतच असतो त्यांच्यावर, आपण अध्येमध्ये चाचपून आपल्यावरचे हे ठसे जिवंत आहेत आणि दिसते आहेत ह्याची चाचपणी करून घ्यावी. नाही केली तरी बिघडत नाही.
--
      केशवसुत ह्यांच्या कविता, अपवादांचे शाश्वत सबूत सोडून, आज कोण शोधत असेल?
      आणखी ५० वर्षांनी आजच्या ५० वर्षापूर्वीचे कोण कोण कवी त्यांच्या कविता-संग्रहाच्या रुपात सापडतील?
      आजच्या मुलांनी कविता का वाचाव्यात? कुठल्याही माणसांनी कविता का वाचाव्यात?
      पुस्तके, कविता ह्यांच्या अजरामरत्वाचे, ह्यांच्या मूल्याचे दंभ केव्हा कोसळतील? आपण त्यांच्याकडे स्पेशल टाईप ऑफ एन्टरटेनमेंट, त्यातही बहुतेक एलिट एन्टरटेनमेंट असं केव्हा बघायला लागू? व्हिज्युअल मिडीयाची क्रांती केव्हा अक्षरांच्या अवशेषांना विस्मरीत करून टाकेल?   
--

      कविता जिवंत राहील कदाचित, माणसे आहेत तोवर त्यांच्यात सारेच प्रकार राहतील. तिची अक्षरे, तिचे दिसणे, ऐकू येणे सारे कायमच काळाच्या खाली गाडत गेले असेल, आणि म्हणूनच नवे रूप होऊन परत उगवले असेल. 

दिवाळी अंक २०१७ -२

५. एडीट मित्र  प्रकाशन , ग्रंथ व्यवहार ह्या विषयाला वाहिलेला आणि चोखंदळ वाचक ह्यांनाच लक्ष्य करू पाहणारा हा अंक. सुरुवातीचाच ‘ विद्येच्...