Sunday, July 10, 2016

ब्राह्मण नमन’ नावाचा (चित्रपट) प्रकार

ब्राह्मण नमन’ नावाचा (चित्रपट) प्रकार
      नेटफ्लिक्सने हा इंडिपेंडट सिनेमा अशा टॅगखाली येणारा आणि नेटफ्लिक्स ओरीजिनल्स असा हा चित्रपट रिलीज केलेला आहे. मी ‘मिंट’ वर्तमानपत्रात ह्या चित्रपटाबद्दल वाचलं होतं. नेटफ्लिक्स ओरिजिनल मधला ‘बीस्टस ऑफ नो नेशन’ मला आवडला होता. ह्या दोन कारणांनी मी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट बघितला.
      चित्रपटाचा दिग्दर्शक आहे Qaushik मुखर्जी. ज्यांनी ‘गांडू’ नावाचा प्रकार पाहिलेला आहे त्यांना Q ह्या नावाने हा दिग्दर्शक ठाऊक आहे.
      बंगलोरमधील अंडरग्रॅड ब्राह्मण तरुण (आणि काही तरुणी), त्यांचे जातीय नॉर्म्स, त्यांचा घोकूपणा, परंपरागत आणि कर्मठ संस्कार वगैरेच्या खाली असणारे सेक्स, दारू आणि जातीचा अहं आणि गंड ह्यांच्या भोवती चित्रपट फिरतो. पण एकूण चित्रपट सेक्स स्टार्व्हेशन, जातीवर करायची सटायर, गीकी पात्रे अशा बऱ्याच गुत्त्यात अडकून गंडलेला आहे. काही काही ठिकाणी विनोद आणि सटायर चुरचुरीतपणे येत असली तरी एकूण प्रकार तोच-तोच आणि मिळमिळीत होत जातो. मुळात स्टोरी एकदम थोडी, गर्वाचे घर खाली किंवा गर्जेल तो पडेल काय प्रकारची आहे. पण बोध, आकार, वळणे-फाटे-इंट्रीग असलेली स्टोरी असं काहीही नसून केवळ एकाकडून दुसरीकडे आपसूक जाणारी गोष्ट आणि त्यात मध्ये व्हिज्युअल इफेक्टस, स्त्रियांची मादक वगैरे शरीरे, पर्व्हर्जन, जातनिहाय स्टिरीओटाइप्स असं सगळं येत राहतं.
      गांडू मधील सेक्स सीनमुळे गांडूला कल्ट स्टेटस आहे. ‘ब्राह्मण नमन’ ते मिळवू शकणार नाही. आणि त्याशिवाय पहायचा तर तो जरा जास्तच गीकी आहे असा ह्या ब्लॉगरचा अंदाज आहे.
      मुळात सेक्स कॉमेडी हे जॉनरच गमतीशीर आहे. It is more like an excuse for not able to watch the porn.
      सो, (कन्नडिगा) ब्राह्मणांवर आचरट जोक्स वगैरेची आवड असेल तर, बिग बँग थिअरी सारखे गीकी/माहिती संपृक्त संवाद हवे असतील तर, गांडूच्या मुळे बनलेल्या अपेक्षांमुळे वगैरे वगैरे, बघू शकता.  

            

Wednesday, July 6, 2016

कवी मेल्यावर

      तुळसी परब गेल्याची घटना फेसबुकवर कळली. ते सामाजिक कामांशी निगडीत होते, ते कसे दिसायचे हे सगळं फेसबुकवरच कळलं.
      मला तुळसी परब हे नाव माहिती होतं ते त्यांचा ‘मनोहर ओकच्या ऐंशी कविता’ च्या शेवटी त्यांचा मनोहर ओकांबद्दलचा एक लेख आहे म्हणून. त्या पुस्तकातल्या कवितांपेक्षा मी तो लेखच जास्त वाचला आहे. त्यात छाती पिटणारी वेदना नाही, तटस्थ होऊ पाहणारा गहिवर कधीतरी आहे, पण एकूणच त्या पूर्ण लेखाला सोसून शहाणी झालेली शांत दृष्टी आहे. त्याच लेखाच्या आधीचा चंद्रकांत पाटलांचा लेख तुळशी परबांचा लेख वाचल्यावर थोडा बेगडी, मी-मी असलेला वाटून जातो.
      बाकी मला काहीच माहिती नाही त्यांच्याबद्दल.
--
      ते कवी म्हणून खूप आधीच केव्हातरी मेले असतील. किंवा शेवटी त्यांच्यात एक दार्शनिक उरला असेल. मला माहिती नाही. एखादा माणूस म्हातारपणीपण कवी वगैरे रहात असेल असं मला वाटत नाही. माझ्यातला कविता वाचणारा किंवा त्याने खुळावणारा भागही संपून जातोय अशी मला भीती आहे.
      माणसातला कवी असणारा भाग तर आधीच मरत असावा. रसिक, समीक्षक किंवा बघणारा हे सारे अगदी त्याच्या शरीराच्या मरण्यापर्यंत राहू शकतात, जर त्या माणसाचा नुसताच गोळा सरतेशेवटी उरला नसेल तर.
      लोक कलाकार म्हणून ठाऊक शरीराच्या संपण्यावर एवढा शोक का करतात? ही शरीरे अजून काही दिवस टिकली असती तरी कलाकार म्हणून त्यांनी काय केले असते? नवेपण, भर आणि ओसर सारे जगून गेलेल्या अस्तित्वांचा शोक का करावा? 
      दुःख त्या शरीराच्या नाम-प्रतीमांशी जोडलेल्या आठवणींचे ठसे चिरडल्याचे असावे.
      तसेही वेळेचा रौंदा चालतच असतो त्यांच्यावर, आपण अध्येमध्ये चाचपून आपल्यावरचे हे ठसे जिवंत आहेत आणि दिसते आहेत ह्याची चाचपणी करून घ्यावी. नाही केली तरी बिघडत नाही.
--
      केशवसुत ह्यांच्या कविता, अपवादांचे शाश्वत सबूत सोडून, आज कोण शोधत असेल?
      आणखी ५० वर्षांनी आजच्या ५० वर्षापूर्वीचे कोण कोण कवी त्यांच्या कविता-संग्रहाच्या रुपात सापडतील?
      आजच्या मुलांनी कविता का वाचाव्यात? कुठल्याही माणसांनी कविता का वाचाव्यात?
      पुस्तके, कविता ह्यांच्या अजरामरत्वाचे, ह्यांच्या मूल्याचे दंभ केव्हा कोसळतील? आपण त्यांच्याकडे स्पेशल टाईप ऑफ एन्टरटेनमेंट, त्यातही बहुतेक एलिट एन्टरटेनमेंट असं केव्हा बघायला लागू? व्हिज्युअल मिडीयाची क्रांती केव्हा अक्षरांच्या अवशेषांना विस्मरीत करून टाकेल?   
--

      कविता जिवंत राहील कदाचित, माणसे आहेत तोवर त्यांच्यात सारेच प्रकार राहतील. तिची अक्षरे, तिचे दिसणे, ऐकू येणे सारे कायमच काळाच्या खाली गाडत गेले असेल, आणि म्हणूनच नवे रूप होऊन परत उगवले असेल. 

Liu Cixin ह्यांची Three Body Problem

              Liu Cixin ह्या चायनीज लेखकाच्या तीन सायन्स फिक्शनना मिळून ‘ थ्री बॉडी प्रॉब्लेम ’ असं म्हटलं जातं. खरंतर ‘Remembrance of E...