Monday, June 27, 2016

मारल्यासारखे आणि रडल्यासारखे

एका गावात एक नवा नवा आलेला सावकार असतो. म्हणजे आधी त्या गावात सावकार असतो म्हणा. पण तो म्हातारा होतो, त्याचे दात हलू लागतात तशी त्याची क्रूरतापण खिळखिळी होते. पैसे द्यायला पण तो उगाच करवादत असतो. आणि दिले तरी त्याचेच चेले त्याला उल्लू बनवायला लागतात. ते परस्पर लोकांकडून थोडे पैसे घेत आणि सावकाराला लोकांकडे काहीच नाही असं अगदी मनापासून सांगत. म्हाताऱ्या सावकाराला काही सुटत पण नाही आणि काही धरत पण नाही. अशातच त्याने अगदी उतारवयात ठेवलेली एक सोबतीण, म्हणजे गावातले लोक जिला आडून रखेल आणि समोरून काहीच न म्हणत, अशी बाई एकदा त्याची कीर्द-खतावणी घेऊनच घरातून पळून जाते. ती पळून गेल्याचं कळल्यावर सावकार अगदीच वेडापिसा होतो. कधी मनात आलं तर पैसे वाटू लागतो, कधी उगाच कोणाच्या दाराशी तगादा लावून बसू लागतो. लोक अगदी कंटाळतात अशा कंडम सावकाराला. आणि वर त्यांना अडी-नडीला कुठल्याही टग्या-टोणप्याकडे पैसे मागायला जावे लागल्याने ते जेरीला येतात ते वेगळेच. मग एक दिवस ती पळून गेलेली बाई येते. एकटी नाही. अगदी घुंगरू लावलेल्या, चटक-मटक बैलगाडीत बसून येते. तिच्या सोबत ४-६ नवे टगे येतात. ते एकदम सावकाराच्या वाड्याशीच येतात. पाठून सावकाश चालत, एक नाकेला तरतरीत माणूस येतो. त्याच्या पाठी त्याची बायको-पोरे, फेटा बांधणारे वडील, डोक्यावरून पदर घेणारी आई, असे सगळे येतात. अगदी वाड्याच्या तोंडाशी उभे राहतात. जुना, जीर्ण सावकार त्यांच्यावर ओरडू लागतो. तसा बाहेर उभ्या असलेल्या टग्यामधला त्यांचा लीडर की नाही एकदम पुढे होतो. तो रागाने बघणाऱ्या सावकाराच्या पायाशीच पिंक टाकतो. आणि त्याची गचांडी धरणार तेवढयात तो तरतरीत माणूस पुढे होतो. ‘थांब रे सुभ्या’ तसं सुभ्या हं म्हणत पाठी सरतो आणि इकडे-तिकडे दोन पिंका मारतो. तरतरीत माणूस म्हणतो, असं आहे जुने सावकार, तुम्ही हे घर गहाण ठेवलं होतं आमच्या आजोबांकडे. अगदी सुरुवातीची गोष्ट आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही नुकतीच सावकारी सुरू केली होतीत. आजोबा तुमची वाट पहात, लोकांना मदत करण्याची सुभाषिते सांगत, पण ते गेले. पण हिशोब मागे ठेवून गेले. आम्ही तुमची वाट पाहिली, पण तुम्हाला विसर पडलेला. मग मागे एकदा तुम्ही ह्या तुमची बाईंना म्हटलात की आता तुमच्याने काही हे सांभाळेना. त्या आल्या आमच्याकडे मदत मागायला. मग आम्ही धावून आलो, म्हटलं गावात सावकारी होईल, लोकांना मदत आणि आपला हिशोबपण चुकता होईल. जुन्या सावकाराला काही सुधरत नाही. तो काहीतरी तंतरून बोलू लागतो. तसं हा नवा माणूस म्हणतो, अहो, आम्ही काही तुम्हाला हाकलून देत नाही. फक्त आम्हाला घराचा ताबा द्या एवढंच म्हणतोय. मग तुम्ही जा ना कधीही. जुना सावकार काही म्हणेल तो सुभ्या त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. आणि आपल्या ओठाला आलेली थुक सावकाराच्या उपरण्याला पुसतो. त्याच्या पाठचे टगे पुढे सरसावतात. तो परत नवा माणूस अगदी तावातावाने पुढे येऊन म्हणतो, ‘अरे सुभ्या, काय ही दादागिरी? इतके जुने सावकार आहेत. असं वागतात? मग तो परत जुन्या सावकाराला म्हणतो, ‘माफ करा मला. तुमच्याबद्दल मी खूप ऐकून आहे. तुमचे चोख हिशोब, लोकांशी वागण्याची पद्धत वगैरे. तुम्ही आजवर गावची सेवा केलीत. पण कसं आहे.. कसं आहे..’ असं तो नवा माणूस मनातल्या मनात बाता केल्यासारखा बोलू लागतो. मागचा फेटेवाला जोरात हुंकार देतो. नवा सावकार डोळे पुसू लागतो. सुभ्या सावकाराच्या कनवटीहून चाव्या काढतो आणि नव्या सावकाराला देऊ करतो. ‘अरे, मोठया माणसांशी कसं वागाल? अरे ही पद्धत आहे का आपली? असं नवा सावकार सात्विक संतापाने मुसमुसू लागतो नि सुभ्याला खुणेने सांगतो. सुभ्या फेटेवाल्या माणसाला चावी देतो. नवा सावकार मग सावकाश मागे येतो, आपला कबिला घेऊन आत जातो. पाठोपाठ नटलेली बाई पण ठुमक्यात आत जाते, जाताना जुन्या सावकाराला ‘ए शेमल्या’ म्हणते, सुभ्या आता त्याच्या धोतरातच पिंक मारतो. बाकी टगे दणदणून हसतात. फेटेवाला आपल्या खानदानी बाईला जोरात हुंकारतो, तशी ती एकदम शिस्तीत त्याच्या मागे मागे चालायला लागते, बैलगाडीत बसते. मग फेटेवाला पण बसतो. आणि गाडी परत जाऊ लागते. -- नवा सावकार थोड्या वेळाने कपडे बदलून सोप्यात येतो. जुना सावकार तिथेच हतबुद्ध बसलेला असतो. त्याचं तहहयात प्राचीन मुनीमजी एका डोळ्याने जुन्या मालकाला बघत असतो, एका डोळ्याने खतावण्या तपासत असतो. सुभ्या चार मळके कपडे बांधून जुन्याच्या अंगावर फेकतो. ‘चल रे, चालू लाग इथून. तू ह्या गावचा पण नाहीस.’ जुना सावकार त-त-प-प करीत सुरुवात करतो आणि काही म्हणणार, एवढ्यात सुभ्याच परत म्हणतो, ‘अरे गावात ओळखीना तुला कोणी, तू करतोस काय इथे?’ तसे गावचे चार-पाच लोक वाड्यात शिरतात आणि सुभ्याला नव्या सावकाराला भेटायची इच्छा सांगतात. ‘येतायेत. पण एक सांगा, ह्यांना ओळखता का तुम्ही?’ एक म्हणतो, ‘ओळखतो, पण लई इरसाल बेणं. जाम छळतो पैश्याला.’ दुसरा म्हणतो, ‘अरे ह्याला काय ठावं आहे गाव-गावकी? दोन साल पैसे दिले नाही तर माझी बैलगाडी घेऊन गेला.’ तिसरा म्हणतो, ‘आणि वर बाई ठेवली. आणि तिच्या नादाने खुळावला ह्यो. मी तमाश्याचा फड लावू गावात म्हणून हजार रुपये मागून राहिलो तर देईना आणि बाईला गोफ आणि हार. अरं, हत तिच्या मायला.’ चौथा म्हणतो, ‘पण मला तर वाटतं, ते नव्या सावकारांचे आजोबा होते ना, तेच खरे सावकार. कधी कोणाच्या अध्यात-ना मध्यात.’ तशी सुभ्या म्हणतो, बरं बरं, आणि जुन्याचं धोतर फेडायला घेतो. नवा दारात येऊन बघत असतो. जुना सावकार काहीच करत नाही. मग आपणहून त्याला धोतर देतो, आणि वर लंगोटपण काढायला घेतो. तशी नवा सावकार एकदम पुढे येतो, आपल्या अंगाची शाल जुन्याच्या अंगावर पांघरूण म्हणतो, अहो, काय करून राहिलात हे? आणि सुभ्याला रागावून म्हणतो, ‘अरे सुभ्या, चालता हो इथून.’ सुभ्या छद्मी हसून जातो. जुना सावकार सावकाश धोतर नेसतो, एक जोडी कपडे वापरायला घेतो. आणि नव्या सावकाराला हात जोडून निघतो. सोप्यावर आलेल्या एका माणसाशी थांबून म्हणतो, कोणालाही द्या पैसे बाकी, ह्याला देऊ नका. ह्यांचाच वाडा मी ताब्यात घेऊन वापरत होतो. उरलेले तिघे त्या एकाकडे बघून हसतात. वाड्यात जातात. हिरमुसलेला तिथेच उभा राहतो. नवा सावकार त्यांना म्हणतो, या, ना, या. आपला दर सोप्पा आहे, दर साल दर शेकडा दहा. मुनीमजी मान डोलावतात.

दिवाळी अंक २०१७ -२

५. एडीट मित्र  प्रकाशन , ग्रंथ व्यवहार ह्या विषयाला वाहिलेला आणि चोखंदळ वाचक ह्यांनाच लक्ष्य करू पाहणारा हा अंक. सुरुवातीचाच ‘ विद्येच्...