Thursday, June 23, 2016

आपण खिडकीतून पाऊस पाहू शकतो

आपण खिडकीतून पाऊस पाहू शकतो,
आपण त्या पाहण्यात पार्श्वभूमीला कातील गाणी लावू शकतो
आपण त्या पाहण्यात बाजूला चहा, कॉफी,सिगरेट किंवा दारू घेऊ शकतो.
आपण खिडकीतून पाहताना शहराने अर्धवट भादरलेल्या समोरच्या आकाशात दाटलेले सावळेपण किंवा निऑनी प्रकाशाचे चमचम तुकडे  
आपण खिडकीतून पाहताना पाण्याच्या थेंब पडद्याआड कर्तव्यरत विरक्त साईनबोर्डस आणि मोबाईल टॉवर्स
आपल्या खिडकीचा टपटप वाजणारा पत्रा
आपल्या इमारतीच्या मागून वाहणारा बेडौल गबदूल नाला
विटा-फरश्या, निळे टारपोलीन आणि अॅसबेस्टॉस पत्रे
फेंच विंडो, स्प्लिट ए.सी.चे उर्वरित तुकडे, डिश अन्टेना, खिडकीत वाळणारे कपडे
हे सारेसुद्धा
आपण खिडकीतून पाऊस पाहू शकतो
ते पाहताना ओला फसवा रस्ता दिसू शकतो
ते पाहताना रेनकोट, छत्री आणि माणसे दिसू शकतात
भिजल्या हवेत अडकलेला दिवाना सूर्यप्रकाश दिसू शकतो किंवा
उजेडाला अल्लद छेडणारे थेंब  
आपण पाहू शकतो पाऊस
आणि आपण पाहिलेला पाऊस पुढे गटारातून समुद्रात जाईल
किंवा नळाद्वारे आपल्या त्वचेवर येईल
आपण ह्या सगळ्याचा काहीही विचार न करता खिडकीतून पाऊस पाहू शकतो
आणि मागे फिरू शकतो वेळेचा एक भर ओसरल्यावर
दिसणाऱ्या आणि स्पर्शता न येणाऱ्या सुखावर
उसासा टाकून     

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...