Monday, November 23, 2015

Borgen


(इथे मिळाले हे पोस्टर: http://i.jeded.com/i/borgen-first-season.4252.jpg)

Borgenहे डेन्मार्कची संसद जिथे आहे त्या इमारतीचे टोपणनाव आहे. आणि मी लिहितोय ते ह्याच नावाच्या डॅनिश टी.व्ही सिरीयलबद्दल. अर्थात तिचे तपशील तुम्हाला ह्या विकी लिंकवर मिळतीलच.
      गेम ऑफ थ्रोन्स, हाउस ऑफ कार्ड्स हे सगळं बघून मी गुगलमध्ये सर्च केलं, ‘बेस्ट युरोपिअन टीव्ही सिरिज’. त्यात मला ‘बोर्जेन’ सापडली. पॉलिटिकल थ्रिलर असं ढोबळ वर्गीकरण करता येईल ह्या सिरीजचं. पंतप्रधान पदाची १ टर्म पूर्ण करणाऱ्या आणि अशक्य असा वाटणारे राजकीय पुनरागमन करून दाखवणाऱ्या ब्रीगीट निबोर्ग ह्या बाईची गोष्ट. आणि Sidse Babett Knudsen ह्या अभिनेत्रीने ब्रीगीट निबोर्गची भूमिका केलेली आहे. किंबहुना तीच ह्या मालिकेचा लोकांच्या मनातला चेहरा आहे. (म्हणजे तुम्ही इंटरनेटवर पाहू गेलात तर!)
      राजकीय सिरीज असताना तिची सास-बहु किंवा का रे दुरावा, तू तिथं मी न होऊ देणं आणि त्याचवेळी उगाच सनसनाटसुद्धा न आणणं असा बॅलन्स ह्या सिरीजने साधलेला आहे. हाउस ऑफ कार्ड्स बघताना जे एक चीप थ्रील जाणवत राहतं किंवा एक समकालीन भेळेचा प्रयत्न जाणवतो तो Borgen बघताना जाणवत नाही. अर्थात कुठलीही निर्मिती काही अंशी जाणीवपूर्वक जोडलेले तुकडे आणि काही अंशी काहीतरी नवं असते तसंच मिक्स Borgen मध्ये आहे. पण हे मिक्स करताना लोकांना काय खपेल, काय रुचेल ह्यापेक्षा मला काय सांगायचं आहे हा विचार थोडा जास्त आहे असं दिसतं. लोकप्रियतेसाठी लागणारे सगळे पॅचेस, जसे तत्कालीन वादग्रस्त विषयांना स्पर्श करणं, लैंगिकता, व्यक्तिगत पातळीवरचे ताण-तणाव हे सगळे Borgen मध्ये आहेत. पण ते राजकीय कथेच्या आजूबाजूला राहतात. कथेचं जे मूळ बीज आहे, राजकारणात सेंटर/मॉडरेट बाजू घेऊन पॉलिसिमेकिंग करू पाहणारी एक स्त्री आणि तिच्या ह्या ध्येयासाठी तिने काटलेला रस्ता, हे कुठेही नजरेआड होत नाही. आणि Sidse Babett Knudsen ने अशा माणसाची अस्वस्थता, अशा माणसाला कराव्या लागणाऱ्या तडजोडी आणि तडजोडी करताना धरायच्या-सोडायच्या गोष्टी ठरवताना होणारी कसरत हे सगळं एक नंबर केलं आहे.
      हि सिरीयल बघताना डॅनिश राजकारण म्हणून जे समोर येतं ते फार हवंहवंसं वाटणारं आहे. टोकाचा आक्रस्ताळेपणा आणि बुद्धिबळच्या पटाची आखीव-रेखीव चालबाजी अशा धोपट मार्गाने सिरीयल जात नाही. लोकशाहीत कोणतेही निर्णय घेताना लागणारी संख्याबळाची कसरत, प्रगल्भ लोकशाहीत अनेकदा अपरिहार्य असणारे युती/बेरजेचे राजकारण आणि त्यामुळे बाकी पक्षांना रेटत, सामावून घेत प्रत्येक पक्षाची पुढे जायची धडपड हे ह्या सिरीयलमध्ये नीट आलं आहे.
      सिरीयल आपल्याला ज्यांच्या थ्रू दिसते ती आहेत काही मुख्य पात्रे आणि एक प्रमुख टी.व्ही. चॅनेल. मिडिया हा सुद्धा Borgen मध्ये एक प्रमुख घटक आहे. आणि केवळ पापाराझी अशा स्वरुपात किंवा स्टोरी पुढे नेण्याचा अपरिहार्य टप्पा म्हणून मिडिया न येता त्याचीही एक गोष्ट आहे. कदाचित दिग्दर्शक आणि कथा लिहिणारा/बनवणारा ह्यांना त्यातून सटल वगैरे असं काही सांगायचंसुद्धा असेल.
--
      डेन्मार्क हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये वरच्या क्रमाकांचा देश आहे. त्याची लोकसंख्या १ कोटीपेक्षाही कमी आहे. आणि लोकसंख्येची घनता जवळपास १२५ आहे.
      थोडक्यात डेन्मार्कची सिरीयल बघून मला माझ्या आजूबाजूचं काही समजायला फार काही मदत होऊ शकत नाही. पण तरीही त्यात ज्या पद्धतीचं राजकारण आलं आहे, ज्या पद्धतीची इश्यू बेस्ड डिबेट आली आहे तश्याचा आपणही भाग व्हावं असं वाटत राहतं. केवळ तुम्ही ह्या रंगाचे का त्या, तुम्ही जास्त गरम का मी अशी निव्वळ उष्णता निर्माण करणारी राजकीय सिस्टीम जाऊन थोडी सेन्सिबल सिस्टीम कशी येईल हाच किडा Borgen बघताना चावत राहतो.
--

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...