Sunday, July 26, 2015

द गोल्डफिंच

     केव्हातरी आलेल्या सणकेत मी असं ठरवलं की इंडियन इंग्लिशच वाचायचं. कारण बाकीचं इंग्लिश आपल्याला परकं आहे. मार्खेज असेल किंवा बोलानो, शेवटी ते वास्तवाचे जे तुकडे जगले त्यांचा आपल्याशी ओढून ताणून संबंध आहे. थेट काही नाही. मुराकामी थोडा जवळचा असेल, पण शेवटी वेस्टर्न म्युझिक ऐकणारी आणि बीअर सिप करणारी त्याची रिअॅलिटी आपली नाही. आता असं ठरवण्याला काही अर्थ नाही. वाचन हे कसलीही ठाम युटिलिटी नसलेली गोष्ट आहे आणि तिच्याकडे एक कमी-जास्त तीव्रतेचे व्यसन म्हणून बघणे अधिक बरोबर आहे. पण असे निष्कर्ष फार काळ तग धरत नाहीत, आणि परत आपल्या कृतीत सामाजिक, वैयक्तिक अशी काहीतरी युटिलिटी मी शोधू लागतो. मग मी विचार करतो की कशाला वाचायचं? समजून घ्यायला!! काय चाललंय आपल्या आजूबाजूला ते समजून घ्यायला (हा!हा!!) त्यामुळे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांच्या जातकुळीशी जुळणारी पुस्तकं मी वाचायला हवीत. मग मी इंडियन इंग्लिश नावाच्या ढिगात स्वतःला लिमिट ठेवायला बघतो.
       ह्यांत काही चूक नाही असा कौन्सीलरी सल्ला मी माझाच मला देऊ शकतो. आणि अर्थात इंडियन इंग्लिशमध्ये काही खरोखर हिडन जेम्स आहेत. जसं ‘लिटनीज ऑफ डच बॅटरी’. किंवा मनू जोसेफ किंवा फॅमिलीज अॅट होम.
       पण बाकी बऱ्याच पुस्तकांना आणि वर म्हटलेल्या पुस्तकांना एक ठाम पॅटर्न असल्यासारखा आहे. लिहिणारा हा सरकारी नोकर किंवा प्राध्यापक/अॅकॅडमिक किंवा पत्रकार आहे. आणि त्याच्या बालपण-तरुण आयुष्याच्या अनुभवांवर त्याने त्याचं बेस्ट लिखाण केलेलं आहे. म्हणजे हा अगदी पक्का प्रकार नाही. मानू जोसेफने त्याच्या कादंबऱ्या ह्या बऱ्याच अभ्यासाने, रेफरन्स घेऊन लिहिल्या आहेत. त्याच्या पेशाचा स्वाभाविक रेफरन्स त्यात तसा थोडा येतो, पण त्याच्या पत्रकारितेचा त्याला फायदा झालेला आहे.
       आणि ह्यातून कसे भारतीय इंग्लिश लेखक नल्ले असंही म्हणायचं नाहीये. बालपण-तरुणपण हेच कदाचित लिहायच्या प्रक्रियेची सुरुवात आणि इंधन असतं. नंतर जे लिहिलं जातं ते केवळ इथे तयार झालेल्या मुळातल्या आकाराला अधिकाधिक सुबक करणं असंही आपण म्हणू शकतो. आणि हे साऱ्याच लेखकांना लागू असेल.
       असो. सांगायचा मुद्दा हा की इंडियन इंग्लिशच्या ह्या गाठोड्याचा नंतर मला कंटाळा येऊ लागला. त्यात डोक्यात जाणारी आणि घुसळून काढणारी किक फार काही नाही असं मला जाणवायला लागलं. तेच, तेच, तसेच मवाळ हळवे सूर असलं.. थोडक्यात माणूस असण्याचं ठाम लक्षण असलेला कंटाळा आला.
       मग लॉर्ड ऑफ द रिंग्स. जंप इन टू फँटसी. आपल्यातल्या वेगाने बथ्थड होत जाणाऱ्या संवेदनेला काल्पनिक हाय. एस्केप रूट.
       पण मग फ्रोडो जातोच ग्रे हेवन्सना. आणि मीही लोकल ट्रेन्समध्ये परत.
(‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ च्या मराठी अनुवादाबद्दल मला असलेलं स्वारस्य ‘स्वामी मुद्रीकेचे’ ह्या नावाने बऱ्यापैकी थोतरीत बसल्यागत झालेलं आहे. आणि बुकगंगावर मला अनुवाद मिळालेही नाहीत.)
       मग आता? काहीतरी थिअरी? का माहिती, इतिहास, इंटरप्रिटेशन आणि काउंटर इंटरप्रिटेशन. बौद्धिक हस्तमैथुन. आहा... बोअर होईपर्यंत.
       नोप, नोप. वयाच्या तीशीला तुम्हाला स्वतःच्या सवयींना आणि कमकुवत दुव्यांना सिरीयसली घ्यावं लागतं.
       कमकुवत दुवा: लोकल ट्रेनमध्ये स्पार्टन आणि उंदीर वर्तन करणे. किंवा अशा वर्तनात न पडता वृक्षासनाच्या व्हेरिएशन्स करीत वेळ काढणे.
       आवश्यक सोल्युशन: वेळ काढणे.
       उपलब्ध पर्याय: पिक्चर किंवा पुस्तक, थोडक्यात स्टोरी.
मग मी पुस्तकाचा पर्याय निवडतो. कारण वेगाच्या अपरिहार्य नशेने पकडलेल्या फास्ट लोकल ट्रेनमध्ये इअरफोन आणि हातातील स्क्रीन ह्यांचे जवळचे नाते सांभाळणे हे काहीवेळा जिकीरीचे ठरते. आणि समजा सिनेमात कोणी  एकमेकांच्या जवळ आले की आपले सहप्रवाशीसुद्धा जवळ येऊ शकतात. आणि कानात घातलेले असल्याने काही हुकमी संवाद आणि ज्ञानशिंतोडे ह्यांपासून वंचित अवस्था येते.
       म्हणजे पुस्तक. कुठलं?
--
       द गोल्ड्फिंच मी अगोदर छान विकत घेतलेलं ई-बुक. पण मग मॅनहटन, आणि तिथे पडणारा पाऊस आणि आई आणि ह्या सगळया आठवणी अॅमस्टरडॅममधल्या एका हॉटेलात. असल्या ग्लोबल गोष्टींशी आपल्याला काही घेणं-देणं नाही असं ठरवून मी ते पुस्तक परत करून सारे पैसे परत मिळवले.
       मग कोणाला तरी एकदम हे पुस्तक हाताला लागलं आणि त्यांनी जवळपास रात्रभर पुस्तक कसं वाचलं हे माझ्या वाचनात आलं. मग मला वाटलं की आपल्या कमकुवत दुव्यावरचा उपाय हा तर नाही!
       मग मी पायरसी केली आणि परत सुरू.
       आणि धिस टाइम देअर इज नो कमिंग बॅक. एस्केपरूट आणि मनोरंजन, पर्पज सर्व्हड.
       शेवटापर्यंत जवळपास मी ह्याच निष्कर्षाला होतो. लेखिकेची प्लॉटवर कमांड हुकमी आहे, कसं आणि किती सांगायचं ह्याचा सराईतपणा आहे, निरीक्षणं, विशेषतः आवाज किंवा वातावरणाची व्हेरिएशन्स सांगताना त्याला ती जी विशेषणे देते ते तर अफलातून आहे. म्हणजे वयाच्या १४ ते २५ वर्षांत थिओच्या आयुष्यात ही गोष्ट घडत असल्याने सगळया सांगण्याला अधिरा पण ताकदवान यंग आवाज देण्यात लेखिका यशस्वी झालेली आहे. पण हे तर सगळं समीक्षकी झालं.
       गोष्टीच्या शेवटी असं होतं की शेवट होतो पण सांगणं संपत नाही, किंवा उरतं शेवट व्हायचं काहीतरी. आणि तिथे सांगणारी स्टाईल, निष्कर्ष, कथेचा वेग सगळं सोडून देऊन बस्स आपल्याला सांगायला लागते. एकदम चांगदेव पाटीलसारखा किंवा ‘चाळेगत’ च्या सुरुवातीला येणारा मोनोलॉग. धबाबा सांगत जाणं, जे जसं भिडून दिसलं आहे, आणि मग तिथे लिहिलेलं, लिहिणारा अगदी पारदर्शक होत होत आपल्याला दिसतं की हे आपल्याबद्दल आहे. कदाचित हे इल्यूजन असेल, पण इट इज कॅप्टीव्हेटिंग.
       मी माझ्या आजूबाजूचे लोक बघतो. मागच्या काही दिवसांत मी ट्रेनमध्ये पाहिलेली पुस्तकं कोणती? सायन ऑफ ईश्वाकू, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉज, नोट्स. सगळ्यात जास्त लोक काय करतात, तर तत्कालीन सिनेमे मोबाईल वर बघतात. नाहीतर व्हॉटस अॅप किंवा गेम्स. किंवा मग सवयीच्या ग्रुप बडबडी. एस्केप रूट आणि मनोरंजन.
       पेंटींग्जवर केंद्रित पुस्तकं कोणती? माय नेम इज रेड.
       मराठीत ऋषिकेश गुप्ते ह्यांची एक कथा पेंटिंग भोवती आहे, ‘त्या वर्षी’ मध्ये काही आहे. ‘ऑक्टोबर एंड’, पण ते तितकं माहित नसलेलं.
--
       ‘शोध’ नावाचं नवं मराठी पुस्तक वाचायचं मी ठरवतो आहे. सोशल मिडिया आणि पी.आर. रेफरन्सेस असल्याने.
       किंवा मी ‘२६६६’ किंवा मार्खेज परत वाचेन. किंवा सॉंग ऑफ आईस अँड फायर.
       माझा कलिग माझ्याशी चर्चा करतो की कशी वाचनाची आवड घटत चालली आहे आणि त्याचे केवढे तोटे आहेत? मी त्याला माझं मत सांगतो की वाचनाची कोणतीही ठाम युटिलिटी नाही. वाचन हे स्पष्ट, तर्कशुद्ध  विचारांची नेसेसरी किंवा सफिशिअंट कंडीशन नाही. एकतर आपले विश्वास ठाम होण्यासाठी आपण प्रपोगंडा काही वाचावं आणि ठाम विश्वासाच्या पायावर आंधळ्या कृतींना निश्चिंत व्हावं. किंवा मग काय चाललंय, कशाला चाललंय अशा झांगड्गुत्त्याला गुंगारा द्यायला वाचावं, जसं गर्दुल्ले अभावितपणे करीत असावेत. माझा कलिग माझ्याकडे सहानुभूतीने बघतो.

       टी.व्ही.वर लोकांच्या उद्धारासाठी जीवन वेचलेल्या माणसाच्या आयुष्यावर बेतलेल्या पिक्चरचे प्रोमोज लागतात. सतत गळा भरून येणाऱ्या थोर अभिनेत्याच्या त्या जाहिरातींनी मला आधी चीड, मग शीण आणि शेवटी कर्तव्याच्या थोर गाळात रुतलेला काहीही न वाटलेपणा येतो. पण त्या आधी मला असं वाटतं की इह-परलोकी कारणी लागण्याचं गाढव आपल्या मागे लागल्याने आपण असे आहोत, गाढवालाही मजा नाही, आपल्यालाही नाही, बस केवळ शर्यत.                          

दिवाळी अंक २०१७ -२

५. एडीट मित्र  प्रकाशन , ग्रंथ व्यवहार ह्या विषयाला वाहिलेला आणि चोखंदळ वाचक ह्यांनाच लक्ष्य करू पाहणारा हा अंक. सुरुवातीचाच ‘ विद्येच्...