Saturday, June 27, 2015

किल्ला

दोन दिवसांत दोनदा बघितला मी पिक्चर. कशासाठी? चिन्मय आणि त्याचे मित्र ह्यांच्या सीन्स साठी, त्या सीन्सपाठच्या म्युझिकसाठी, आणि आपल्या मानेमागे हात ठेवून रेलून शब्द नसलेले क्षण आपल्या मनात निनादण्याचे, त्यांच्या येण्याने निर्माण होणाऱ्या बिंब-प्रतिबिंबाच्या साखळीचे सुख अनुभवण्यासाठी.
       माझ्यासाठी काही हा नॉस्टॅल्जिया नाही. मी अशा शाळेत, अशा गावात कधीच नव्हतो. मला असे मित्रही कधी नव्हते आणि मी किंवा त्यांच्यातला कोणी बाकीच्यांना सोडून जाण्याबद्दल सुद्धा मला काही अनुभव नाही.
       मला माझी शाळा आठवते तेव्हा काय आठवतं? स्पर्धा, अगदी तीव्र स्पर्धा, माझ्या मनातली, माझ्या पालकांच्या, आजूबाजूच्या मुलांच्या, त्यांच्या पालकांच्या, शिक्षकांच्या मनातली, त्यांच्या अॅम्बिशन्स. मग आठवते ती कळप म्हणून असण्याची क्रूरता. फुलपाखरू, गोगलगाय, चतुर, गांडूळ अशा आपल्यापेक्षा कःपदार्थ गोष्टींना संपवण्याची. आणि मग आपल्यातल्या दुबळ्या, नेभळ्या मित्रावर फोकस होणारी. मग सेक्स, थेट नाही, पण मनातला, सगळीकडे भरलेला.
       पण मला त्याचं फार वैषम्य वाटत नाही. आणि असंही नाही की मी ती फेज एन्जॉय केलेली नाही. क्रिकेट नावाची एक गोष्ट आणि त्या गोष्टीने वेडावलेले मित्र ह्यामुळे कायमच त्या साऱ्या दिवसांना मजा होती.   शाळा म्हटली की माझ्या मनासमोर दुपार येते. निवांत जडावून पसरलेली दुपार. फार रखरखीत नाही, पण चकचकीत. वर्गात फिरणारे पंखे, आणि मागच्या बाकांपैकी एका बाकावर बसून कधी खिडकीकडे, कधी वर्गातल्या बाकीच्यांकडे बघणारा एक मुलगा, आणि गोठून गेल्यासारखी वेळ.
       स्वतःबद्दल बोलावसं वाटणं हे न संपणारं व्यसन. त्याला फिक्शनमध्ये टाकून सामाजिक ग्राह्यता मिळवता येते.
--
       कधी कधी वाटतं की आपल्या भोवती एका शिस्तशीर कुरूपता भरत चालली आहे. आणि कोणालाच ह्या शिस्तशीर, पठडीबाज कुरुपतेने आपली स्पेस व्यापली जाण्याची पडलेली नाही. आपण बोलावून बोलावून सांगतो आहोत की हे कुरण, हा नदीकाठ, हा डोंगर, हा बाजूला चार बाकं टाकलेला शांत अरुंद रस्ता, इथे तुम्ही घरं बांधा उंच उंच सिमेंटच्या काडेपेट्यांची. आणि आम्ही त्यातल्या कशाकशाने तरी घासून पेटणा-या काड्या बनू. आम्ही भाषेने पेटू, आम्ही देशाने पेटू, आम्ही जातीने पेटू, आम्ही वर्गकलहाने पेटू. पण आमच्या भोवतीची ही शांतता भरून टाका. कारण त्यात आम्हाला काही सुचत नाही. आम्हाला आमच्या शांततेचे मालकी हक्क द्या आणि टूरिस्टि तुकडे द्या. पण बाकी वेळ आवाजाने, जाहिरातीने, पुढे कसं होईल माझं, माझ्या पुढच्याचं, माझ्या मागच्यांचं ह्या भीतीने, विकत घेण्याच्या पाशवी भुकेने भरा. आम्हाला शांतता नको. येऊ दे, येऊ दे, निळ्या काचांची कॉंक्रिटी स्काय्स्क्रेपर कुरूपता येऊ दे. येऊ दे, येऊ दे, फ्लायओव्हर्सची, मेट्रो आणि मॉलची भरधाव कुरूपता येऊ दे. आमची गर्दी, आमची वखवख साऱ्याला सामावून घेईल.
मी जेव्हा ‘किल्ला’ बघतो, आणि जेव्हा त्यातले समुद्राच्या पार्श्वभूमीचे, तंतुवाद्याच्या स्वरांनी तोललेले क्षण पाहतो तेव्हा मला असं काही वाटत नाही. मी कुरुपतेच्या व्यापत्या जाणीवेला गुंगारा देतो.
सुख. असण्याचे, असू शकण्याच्या अलवार शक्यतांचे सहन न होणारे हळवे, हलके सुख.
--
       आपण खरोखर जेव्हा ८-९-१० वर्षाचे असतो तेव्हा निरागस असतो, म्हणजे निरागस क्रूर, निरागस कुतूहल असलेले, निरागस चिडके, निरागस दुखावले जाणारे, निरागस भित्रे. आपण कसं असावं ह्याचं काहीच आपण आपल्यावर पांघरलेलं नसतं. पण हळूहळू आपल्याला कळतं की आपण कोणता मुखवटा निवडायचा. ज्याला लवकर कळतं तो लवकर शहाणा होतो. किंवा येऊन बसतोच एखादा मुखवटा आपल्यावर, आपण काढून दुसरा काही लावेपर्यंत. आपण त्याला मोठं होणं का म्हणतो, खोटं होणं का म्हणत नाही?
--
       ‘लंपन’ मोठा झाला असता तर तसाच राहिला असता का? का जगानं त्याची घे घे मजा घेऊन त्याला वेगळाच करून सोडला असता? माझ्यातला सिनिक म्हणतो की लंपन मोठा होऊन गेला असता परदेशात, आणि त्याला कायमच नॉस्टॅल्जियाग्रस्त राहायची मुभा राहती. शेवटी नोस्टॅल्जिया म्हणजे काय, स्पेस किंवा टाईम बदलला की बाकी राहणाऱ्या इमेजेस.
--
       शाळेत एक धडा होता, ललितलेख असं त्याचं वर्गीकरण होतं. त्यात एका कवीची शेवटची इच्छा होती, त्याच्या बागेतल्या झाडांखाली झोपून मरण येण्याची.
       मला वाटतं कधीकधी की वयाच्या अशा एका टोकाला येऊन लटकलो आहे की माझ्याकडे सेल्फडील्यूजन करण्याची ताकद नाही, माझ्याकडे गर्दीच्या प्रवाहात स्वतःला सोडण्याची हिंमत नाही आणि कुठल्याही मॅडनेसचा बबल नाही. मी गुदमरत जातो आणि कुठल्याही निवडीची दोरी न मिळाल्याने कोसळतही. मला काहीतरी निवडलं पाहिजे किंवा सगळ्या निवडी संपवण्याची निवड. इट्स सो फक्ड अप.
       दहावीला ‘कोसला’ होता, कादंबरीचा तुकडा असलेला एक धडा. घिरट्या घालत येणारे दुःख आणि झोपलेला बुद्ध, अजंठा मधला. आणि मर्ढेकर, घोटभर उरणाऱ्या गोड हिवाळ्याचे.
       मी माझ्या घराच्या सिलिंगकडे बघत विचार करतो, मरणाचा. अ फिलोसॉफीकल पर्स्पेक्टिव. मरण म्हणजे कशाची भीती वाटते नेमकी? बहुतेक सारं, त्याच परिघात, त्याच आवर्तनात सुरू राहील आपल्यामागे. आपण सुटलो काय, आपण असलो काय.
       पण आपल्याशी उरून राहिलेले केवढे क्षण आहेत, उबदार प्रकाशाचे, मंद, आश्वस्त. आणि त्यांच्यापाठी एक म्युझिकपण, आपले आपल्यालाच ऐकू येणारे.
--
       ‘विहीर’ पहिल्यावर, ‘लिटील प्रिन्स’, पाडस’ वाचल्यावर मला वाटलेलं की आपण आपल्या आतल्या हरवून गेलेल्या, कदाचित आपल्या कल्पनेचाच खेळ असलेल्या एका स्पेसला स्पर्शत आहोत. शक्य असतं तर त्या बबलमध्येच आपण राहिलो असतो.
       पण बबल जातो, फुटत नाही, बस त्यातली स्पेस सवयीच्या, हव्यासाच्या शिस्तबद्ध कुरुपतेने भरून जातो. आणि मग त्याच जड नशेत आपण घरंगळत राहतो.
       कुठेतरी थांबतो, आणि आपल्याशी बेवफाई न करणाऱ्या वेळचा तुकडा पांघरून निवांत होतो, असोशी आणि सुखाच्या हद-अनहद मध्ये.  

       ‘किल्ला’ साठी.                              

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...