Sunday, November 16, 2014

छान!

       शाळेत मराठी शिकवायला ज्या मॅडम (चांगल्या यशस्वी मराठी शाळांत 'बाई' म्हणतात बहुदा!!) होत्या त्या अनेकदा, त्यांच्या पेट मुलांनी घाऊक भावूकतेने आणि क्लीशांनी भरलेले निबंध वाचून झाले की त्यांचा प्रमाणभाषा आणि प्रमाण शिक्षकागत दिसणारा चेहरा डोलावून आणि गोलावून ‘छान’ असं म्हणायच्या. आत्ता विचार करताना ही गोष्ट जेवढी मुंडेन आणि विनोदी वाटते तेव्हा काही तशी वाटत नसे. ‘एलिझाबेथ एकादशी’ पाहिल्यावर मला असं सारखं ‘छान’ वाटतं आहे.
       आता आपला निरुद्योगी सिनिकलपणा डीपरूटेड आहे. त्याला चेचून तिथे बहुगुणी आणि अल्पमोली अशी लागवड करण्याचा मी मध्ये मध्ये प्रयत्न करतो. तर आधी तसं करू.
       इट इज अ फाईन स्टोरी-टेलिंग. चित्रपट लांबत नाही, थांबत नाही. कास्टिंगमध्ये उघड उघड तर उणं काही सापडत नाही. ज्ञानेश, झेंडू, गण्या आणि बाकी मुलांचे अनुभव कॅडबरी डेरीमिल्क सारखे प्रेडिक्टेबल हिट आहेत. पण वनमाला किणीकर आणि विशेषतः नंदिता धुरी जबरदस्त. छाया कदम ह्यांच्या ‘फँड्री’ मधल्या आईच्या भूमिकेनंतर ही नंदिता धुरी ह्यांची भूमिका. नंदिता धुरी ह्यांना आधी मी ‘आयदान’ च्या नाट्य रूपांतरात पाहिलं होतं. त्यात शेवटी त्यांचा मुलाच्या मृत्यूनंतर आक्रोश करतानाचा प्रसंग आहे, मला तो लक्षात होता. सुलभा देशपांडे ह्यांनी तो प्रयोग दिग्दर्शित केला होता.
       म्हणजे खरंतर एकदम लिनिअर स्टोरी आहे. आधी एक चांगुलभरी सुरुवात, मग टर्न आणणारा मध्य आणि ‘जो जे वांछील’ शेवट. पण हे सांगताना त्या स्टोरीसोबत बाकी जे काही येतं चित्रपट म्हणून ते मजा आणणारं आहे. दगड-दगड-सूर्य-दगड, आई ज्ञानेशला शोधत निघते तेव्हा येणारं पार्श्वसंगीत, गल्ल्या-बोळ, ज्याचं-त्यांचं माउली माउली, फुकणीच्या आणि ढोकरीच्या. ज्ञानेशचं घर, त्याचे कपडे, त्याच्या आईचं दिसणं आणि राहणं, शेवटी १०-१० रुपये करत वेगवेगळया नावाने एकच काही विकणारा विक्रेता, पेढे आणि अन्य काही पदार्थ बनवतानाच्या, नोटा आणि चिल्लर मोजतानाच्या दृश्याचा वापर. अनेक गोष्टी थेट स्टोरीत काही आणत नाहीत, पण त्या नसत्या तर चित्रपट म्हणून स्टोरी-टेलिंग झालं नसतं, त्यात एवढी मजा आली नसती.
       आता मूळ स्वभाव.
१.       स्टोरीत कोणी वाईट नाही, गेला बाजार ग्रेपण नाही, किंचित तडका द्यावा तेवढा तो सुरुवातीचा शाळेतल्या बाईंचा ‘ब्लडटेस्ट केलीस का’ विचारणारा प्रसंग आहे आणि वर कसुरी मेथी टाकावी तसे ते स्वेटरचे पैसे न देणारे काका. बाकी सगळे सहृदयी तर आहेतच.
२.       व्हॉट इज द चान्स की ज्ञानेशसारखा मुलगा असेल? वन इन थाउजंड का वन इन टेन थाउजंड का वन इन मिलियन. आणि सहावी-सातवीतल्या वाटणाऱ्या मुलाला न्यूटन आणि आईनस्टाइन माहित असण्याचे, म्हणजे ते काय म्हणतात हे माहित असण्याचे चान्सेस किती? मी इथे सरकॅस्टिक पण नाहीये. पण माझी अशी उगाच एक समजूत आहे की जे जिनियस असतात सायन्स मधले वगैरे, जे शाळेनंतर पुढे त्या एका मार्गावरून पुढे जात जात ‘त्या’ एका ठिकाणी (देश आणि ज्ञान अशा दोन्ही अर्थाने हे एका ठराविक प्रकारच्या घरांत, ठराविक प्रकारच्या पालाकांत, ठराविक प्रकारच्या शाळांत असतात. बाकीचा निखळ उंदीरचाळा. अर्थात महाराष्ट्रातील निम-शहरी, कम-शहरी आणि ग्रामीण भागातील डेटा मिळवून आपलेच दात घशात घालून घ्यायला मी उत्सुक आहे. पण मी डेटा शोधतो आणि मिळतात अॅनेकडॉटल्स.
३.       ज्ञानेशचं आडनाव आणि पुढे अनुषंगाने जी जात नाही अशी ओळख काय?
हे वरचे सारे छिद्रान्वेषी प्रकार म्हणजे आनंदाचा विचका करणं आहे एक प्रकारे. चित्रपट बघायला आजूबाजूच्या सीटांवर असलेल्या प्रातिनिधिक बाई जशा उद्गारल्या तसं ‘छान आहे चित्रपट. काही मारामारी, कट-कारस्थाने नाहीत.’ (अधिक माहितीने असे कळते की कुण्या एका प्रमोशनल कार्यक्रमात चित्रपटाची समदी मंडळी अवतरली होती आणि त्यामुळे द्वेष, असूया, मत्सर, दैवी आणि अमर प्रेम, आरसा वापरून साईन होणारे स्काईप, सतत सेल्फ-हेल्प टाइप बोलणारे सिनियर सिटीझन अशा डेली चरस-गांज्यावर धुत्त अनेक गृहिणी एलिझाबेथ एकादशी चित्रपट बघायला आल्या होत्या.)
   बेसिकली फिक्शन आणि तिची वास्तवातली मुळे इथे मला कुतूहल आहे. जोवर तुम्ही ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’ सारखं काही सांगत नाही तोवर कुठल्या वास्तवाने ही फिक्शन जन्माला घातली हा प्रश्न येतंच राहील. कदाचित ते वास्तव कोणाच्या भूतकाळातील असेल किंवा अनेकांच्या वर्तमानातील. पण जिवंत अनुभवांचा आधार नसलेली आणि फँटसीही नसलेली फिक्शन ही मला अशक्य वाटते किंवा कृत्रिम, बेगडी. त्यामुळे ‘एलिझाबेथ एकादशी’ च्या पाठचं वास्तव किती ह्याचं मला कुतूहल आहे. मला खरंच असं सिरीयसली समजून घ्यायचं आहे की माहितीचं, सधनता आणि सोशल नेटवर्क (सोशल मिडिया नाही) ह्यांचं भांडवल नसलेल्या मुलाचे आज काय चान्सेस आहेत. आणि माझा गेस अजिबात आशावादी नाही.
   असंही नाही की चित्रपट असा घाऊक आशावाद विकतोय. चित्रपटाचा शेवट बघताना, जेव्हा ज्ञानेशचा मित्र त्याला हाक मारत येतो, त्या मित्राची आई येते, चांगला धंदा झाल्याची बातमी कळते, मुलं नाचू लागतात तेव्हा एकदम वाटतं की इथेच दिग्दर्शकाने सोडून द्यावा पिक्चर. मला एकदम ‘चिल्ड्रेन ऑफ हेवन’ ची आठवण झाली, शेवटी पाण्यात पाय सोडून बसलेली मुलं. तिथे थांबत नाही पिक्चर, थोडा पुढे जाऊन थांबतो, विज्ञान आणि अध्यात्म पेरलेला आशावादी शेवट.
   थोडा फुटकळ नॉस्टॅल्जिया. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ मी एका ओरिया आणि एका आसामी-बंगाली बरोबर बघितला होता. तेव्हा आम्ही दादासाहेब फाळके चित्रनगरी असं अधिकृत नाव असलेल्या आणि फिल्मसिटी नावाने फेमस असलेल्या भागाच्या जवळ राहायचो. ह्या बादरायण संबंधावर ते दोघं, अर्थात त्यातल्याच एकाचा लॅपटॉप घेऊन. त्यांना सगळ्यात जास्त अपील झाला तो कवितेचा वापर. घरकाम करताना बायको ‘तुतारी’ कवितेच्या ओळी म्हणते. एलिझाबेथ..’ मध्येही गाडगे बाबांची कीर्तने, संत न्यूटन आहेत. बाकी घरातील वस्तू विकण्याचे प्रसंग मोकाशींचे फार फेव्हरीट आहेत काय?
   ‘लय भारी.. मधल्या अँड्रेनलीन पम्पिंग पंढरी आणि विठ्ठलानंतर ‘एलिझाबेथ..’. मराठी सिनेमाची रेंज किती विस्तारते आहे नाही!
   पूर्णतः खुसपटे. 
   बाकी संस्कृती रक्षकांचे सदैव जागरूक थवे ‘एलिझाबेथ एकादशी’ वर नोच मारणार का नाही ह्याची मला उत्सुकता आहे. कारणे पुढीलप्रमाणे:
१.       एलिझाबेथ!! कम ऑन. दॅटस् कम्प्लीट देशद्रोही, कोलोनिअल मॅन. अलकावती म्हणायचंत, लीलावती तरी.
२.       मुलांच्या दुकानाचं नुकसान होतं ते जादूटोणाविरोधी बिलाच्या विरोधी आलेल्या लोकांच्या आणि पोलिसांच्या हातापाईत. हेच कारण मिळालं!! हा अपमान आहे. वर ‘ह्यात कसला आलाय संतांचा अपमान’ अशासदृश्य साधारण बायकांच्या कमेंट्स वापरून देश आणि संस्कृतीवर येणाऱ्या संकटाला डाऊनप्ले करण्याचा प्रयत्न!! जसं कॅप्टन ओबेरॉय ह्यांनी ताबडतोब ‘हैदर’ ची चिरफाड केली तसं आत्ता कोणीतरी येणार का?                     
३.       संत न्यूटन, संत आईनस्टाइन!! एकतर त्यांनी सगळं इथलंच प्लेजीअराइज केलंय. तुम्ही आर्यभट्ट, भास्कराचार्य का नाही म्हणालात?   
अर्थात असं काही न होता चांगलेच रिव्ह्यू मिळतील अशी आशा आहेच किंवा असे होण्यास प्रॉडक्शन समर्थ आहेच?!

       एकदा झेंडू म्हणते चित्रपटात, ‘मी पण गणिका होणार’, मग आजूबाजूच्या मार्केटच्या धामधुमीत तिचा आवाज लोपतो. अशा गणल्या- न गणल्या जागांचं गणित परेश मोकाशी आणि टीमला जमलं आहे. जे उरलं आहे तेही केव्हातरी होऊन जाऊद्या माउली.  

Saturday, November 15, 2014

अमनदीप संधू ह्यांची दोन पुस्तके

      ही दोन पुस्तके आहेत: सेपिया लीव्हज आणि रोल ऑफ ऑनर. असं म्हणता येईल कि फिक्शनपेक्षा हि खरंतर मेमॉयर आहेत. म्हणजे जरी त्यांचं क्लासिफिकेशन फिक्शन असं होत असलं तरी त्यातला गोष्टीला लिहिणाऱ्या माणसाच्या अनुभवाचा पक्का वास आहे.
      आणि हि पुस्तकं वाचणं हा पण तसा काही रंजक अनुभव नाही. कारण नाट्यमयता वगळून एका यथोचित शेवटाकडे जाणारी गोष्ट. आणि तीसुद्धा स्वतःच स्वतःला ओरबाडून काढणाऱ्या प्रश्नांची. आणि हि तडफड, काहीवेळा अगदी ढोबळ असे शब्द वापरून सुद्धा संधू मांडतात. लिखाणाचे तांत्रिक आणि गुणवत्तेचे निकष लावले तर हि पुस्तके फार काही नाहीत. काहीवेळा अगदी बोजड, ढिसाळ शब्दांचा वापर करून गोष्ट पुढे नेली जाते. पण लिहिणाऱ्याचे जे लिहिले गेले ते घडत असताना जे पिळवटून जाणे आहे (का कुणास ठाऊक, मला टी.व्ही. वर सतत दिसणारा एक चेहरा आठवतोय) त्यामुळे मी हि पुस्तकं वाचून काढली.
      का लिहिली जातात पुस्तकं हा माझा आवडता उंगली करण्याचा प्रश्न आहे. आणि त्यातही स्वतःच्या त्रासदायक अनुभवांची पुस्तके बनवावीत आणि छापली जावीत असं का करतात लोक? हे आहेच, कि असं करताना आशावादी कोंभ पेरले जातील ह्याची काळजी घेतली जाते. आणि त्यामुळे पुढच्यास दुःख मागच्यास प्रेरणा ह्या न्यायाने आपण युटीलिटी शाबित करू शकतो. पण वर मी म्हणतो ती पुस्तकं अशा प्रेरणेच्या फेरीवाल्यांची नाहीत. इट्स अ स्टोरी टेलिंग: अशी गोष्ट जिसमे बतानेवालाभी ट्रबल्ड और सुननेवालाभी ट्रबल्ड. का?
      मला कुठलाही समीक्षेचा निकष उभा करायचा नाही. ज्याने त्याने आपापला च्युतापा (वाचा: अभिव्यक्ती स्वातंत्र्य) करावे, अगदी डोळ्यास डोळा न्यायाने करावा असे माझे सध्याचे मत आहे. त्यामुळे वर म्हटलेली स्टोरीटेलिंग चूक का बरोबर, असावी का नसावी असा प्रश्न नाही.
      राजकारण हा लबाडांचा शेवटचा अड्डा असतो असं म्हणत आले आहेत. (ही म्हण पाश्चात्य असल्याने ती बदलून राजकारण हा विकासपुरुषांचा शेवटचा पाडाव असतो अशी म्हण लागू करण्यात यावी अशी मागणी आलेली आहे!) त्याप्रमाणे लिखाण हा बाकी भौतिक जगातील स्पर्धा, साठवण आणि पुढील पिढीत पाठवण हे नीट न करू शकलेल्या लोकांचा शेवटचा अड्डा असतो काय? आणि समीक्षा हा स्पर्धेत उतरलेल्यांचा आणि पुढे-मागे कुठेच न जाता येणाऱ्यांचा?
      इट इज सिनिकल टू थिंक लाईक धिस.
      मी सेपिया लीव्हज वाचलं कारण मी ‘एम अँड द बिग हूम’ वाचल्यावर ते वाचा असं अॅमेझॉनने सुचवलं. मला मानसिक आजारांवरची पुस्तके वाचायची आहेत असं बहुतेक अॅमेझॉनने ठरवलं असावं. कारण ‘सेपिया लीव्हज’ नंतर मला अशीच ४-५ पुस्तके सुचवली गेली होती. ‘एम अँड द बिग हूम’ वाचताना आपल्या अंगावर फार काही येत नाही. गोष्टीतील रंजकता न घालवता ती येते. बघायला गेलं तर ‘एम अँड द बिग हूम’ आणि ‘सेपिया लीव्हज’ दोन्हीत मुलगा आपल्या मानसिक आजाराने त्रस्त आई, आणि ह्या संदर्भाने वेढलेले मोठं होणं ह्याबद्दल बोलतो. आणि दोन्ही गोष्टी मरणाशी संपतात. पण त्यांचा बाज एकदम वेगळा आहे. म्हणजे हि निवडच आहे कि माझा अनुभव स्वतःला विस्कटवून मांडणार आहे. स्वतःला विखरायची, चिंध्या चिंध्या करत जायची ओपन एन्डेड अर्थहीनता. आपण एक प्रकारे ती एन्जॉय करतो का?
      ‘रोल ऑफ ऑनर’ मी वाचलं ते त्याच्या प्लॉटच्या समरी वरून. ‘सेपिया लीव्हज’ आणि ‘रोल ऑफ ऑनर’ हे एकाच माणसाच्या वेळेचे आणि त्या वेळेच्या घाव-व्रण-खाणा-खुणांचे छोटे-मोठे तुकडे आहेत. अर्थात रोल ऑफ ऑनर अधिक गोष्ट आहे आणि सेपिया लीव्हज अधिक जास्त मेमॉयर. ‘रोल ऑफ ऑनर’ ला पंजाब हिंसाचार, ऑपरेशन ब्ल्यू स्टार, इंदिरा गांधी हत्या अशी तगडी पार्श्वभूमी आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवर सैनिकी शाळेत शिकणाऱ्या एका १५-१६ वर्षाच्या मुलाच्या शाळेतल्या शेवटच्या वर्षाची गोष्ट. इट्स बेटर रीड, पण ते खिळवून ठेवतं म्हणून नाही. ते थोड्या वेगळ्या गोष्टींबद्दल बोलतं म्हणून बरचसं.
      एक त्रास आणणारा प्रामाणिकपणा असतो. ‘नाही जमत मला, नाही बदलणार मी स्वतःला, नाही स्वीकारणार मी काही एक पर्याय’ असा. तो नकारात्मक नसतो एक्झॅटली. त्यात एक स्वीकार असतो, काहीही न निवडण्याच्या भूमिकेचा आणि आपसूक स्वतःकडे काहीही नसण्याच्या रिकामेपणाचा. आणि हा रिकामेपणा दडवायचा काहीही प्रयत्न न करता येणारा प्रामाणिकपणा. हा प्रामाणिकपणा एक प्रकारे आक्रोश असतो जगाच्या नियमांविरुद्ध, स्पर्धेच्या, स्वतःचे हित बघण्याच्या, निब्बर होण्याच्या, बहुतेकांसारखे असण्याच्या. पण तो आक्रोश सुद्धा केविलवाणा नाही, उर फोडणारा नाही, नुसताच एकटा उभा असलेला.
      संधूंच्या दोन पुस्तकांबद्दल असं म्हणता येईल.
       

Thursday, November 13, 2014

व्हॅनिटी बाग


       काही ना काही कारणांनी मी जास्तीत जास्त इंडियन इंग्लिश (भारतीय लेखकांची इंग्लिश पुस्तके असं जर थोडं वैचारिक साउंड करायचं असेल तर) पुस्तकं वाचतो. त्यात बरं-वाईट पण भरपूर लिहिलं जातं. ह्या भरपूर लिखाणात काही ना काही थीमचे भोवरे असतात. म्हणजे मोठी शहरं, त्यातले श्रीमंत आणि झोपडपट्टीवासी गरीब आणि अॅस्पायरिंग अधले-मधले, हिशोबी क्रूरता आणि नपुंसक संवेदनशीलता, आई-बाप किंवा इंटरजनरेशनल नात्यांचे तणाव, मध्येच लिबरल सेक्युलर होऊन पहायला बघितलेले दंगे किंवा राजकीय चळवळी. मध्ये केव्हातरी रुरल काहीतरी. आणि ह्या सगळ्यात जोरकस एक्स्पेस होणाऱ्या स्त्री-पुरुष रिलेशनशिप. अनेकदा ही पुस्तकं वाचतांना एकच माणूस आपल्या कानात निरुपण करतोय असं वाटण्यासारखी अवस्था, एकाच आवाजाचा सूर. फार थोडी पुस्तकं हा ढाचा फोडून वेगळं स्टोरी-टेलिंग करतात. ‘व्हॅनिटी बाग’ त्यातलं एक.

       कदाचित ‘व्हॅनिटी बाग’ वेगळं वाटतं ह्याचं कारण अशा प्रकारच्या गोष्टी वाचायचा आपला आजवरचा एक जो साचा आहे, त्याला मोडून-ताडून गोष्ट सांगितली जाते. म्हणजे हिंदू-मुस्लीम संबंधांच्या गोष्टी जेव्हा जेव्हा आपण वाचतो तेव्हा दोन पार्टी क्लिअर असतात, एक भडक, राजकीय, हिंसेला तयार आणि एक समजदार, पसायदान पार्टी. आजवर बौद्धिक वर्तुळाची मक्तेदारी एका ठराविक प्रकारे कललेल्या लोकांकडे असल्याने वर उल्लेखलेल्या दोन पार्टीमध्ये कोण हिंदू आणि कोण मुस्लीम हेही ठरलेलं असायचं (भले ते अशी पुस्तके न वाचणाऱ्या लोकांच्या वर्तणुकीच्या पद्धतीहून कितीही भिन्न असो). ‘व्हॅनिटी बाग’ बिनधास्त गोष्ट सांगते. त्यात दोन्ही पार्टी मार खातात पण आणि मार देतात पण. त्यातला स्टोरी-टेलर त्याच्या सिनिकल आणि कोरड्या वाटणाऱ्या नजरेने आपली गोष्ट सांगतो. २०० पानांचही हे पुस्तक नाही. सुरुवातीला आपण काही बनी-बनायी आत्मकथापर दास्तान वाचतोय की काय असं वाटणारी गोष्ट निवांत करवट बदलते. आणि जेव्हा और थोडा चलता था असं वाटतं तेव्हा अचूक संपते.       

Tuesday, November 11, 2014

फॉरेन


‘फॉरेन’ नाव असलेली ही कादंबरी घडते विदर्भात. ही अगदी हलवून टाकणारी कादंबरी आहे असं म्हणता येणार नाही. खरंतर ‘हलवून टाकणारी कादंबरी’ हे तसं वाचणाऱ्या व्यक्तीच्या वाचनाच्या क्रमात केव्हा एखादी कादंबरी येते ह्यावर अवलंबून असतं. म्हणजे ‘ग्रेप्स ऑफ रॅथ’ मला हलवून गेली होती जेव्हा मी ती वाचली किंवा त्याच्याही आधी ‘मिडनाईटस् चिल्ड्रेन’ किंवा अगदी अमिताव घोषांची ‘हंग्री टाइड’. आपल्या नेहमीच्या गोष्टीच्या अपेक्षेबाहेरचं, आपल्या नेहमीच्या सांगण्याच्या आणि ऐकण्याच्या बाहेरचं काहीही सुरुवातीला हलवून सोडू शकतं. पण एकदा का अशा चौकटीबाहेरच्या एलिमेंटची पण सवय झाली की मग धक्के प्रेडिक्टेबल होतात. आणि ते हलवून टाकत नाहीत. मागच्या २ एक वर्षात असं जास्त धक्का देणारं काही वाचलं असेल तर ते म्हणजे बोलानोचं ‘२६६६’, कॅथरिन बूचं ‘बिहाइंड द ब्युटीफुल फॉरेव्हरस्’. इथे मी धक्का, म्हणजे वस्तुस्थिती च्या अशा अनपेक्षित उलगडण्याने येणारा धक्का असं मी म्हणतो. ‘धक्का’ आणि ‘किक’ ह्या दोन गोष्टी मी वेगळया करतो आहे. किक देणारं काही म्हटलं तर मग ‘लिटनीज ऑफ डच बॅटरी’ किंवा ‘फॅमिलीज अॅट होम’.    

       ‘फॉरेन’ ना तशी ह्या धक्का देण्यात बसते किंवा ‘किक’ मध्ये. प्रयत्नपूर्वक आलेलं फिक्शन रायटिंग, काही फिल्ड वरच्या अनुभवांचे क्रिटीकल परीक्षण, बांधीव आणि रंजक वळणे घेणारा गोष्ट सांगण्याचा फ्लो, क्लीशेड पण सार्वत्रिक फेमस असा स्वतःचा शोध वगैरे, आणि जाणीवपूर्वक ओपन एंडेड राहायचा प्रयत्न असे सगळे स्पष्टीकरणाचे मुद्दे आणता येतील. अर्थात ह्या एक्प्लेनेटरी मुद्द्यांच्या पलीकडे जाणारे प्रामाणिक आणि वेळ आणि ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट गेलेले ह्या पुस्तकात किती आहे हे मी पाहिलेलं नाही. पण गोष्ट सांगण्याची हातोटी आणि तदनुषंगिक आणि प्लॉटच्या मूळच्या डेप्थने येणारी गंभीर रंजकता ह्यामुळे ‘फॉरेन’ वाचण्याजोगी बनते.

       ‘द हिंदू’ च्या लिटररी फिक्शन मधल्या पुरस्काराच्या यादीत मला ‘फॉरेन’ सापडली. समरी द्यायची म्हटली तर यू एस मध्ये करिअर च्या चढत्या कमानीवर असलेल्या एका भारतीय वंशाच्या रिसर्चरचा मुलगा आजी-आजोबांना भेटायला भारतात येतो. आणि एकदम गायब होतो. रिसर्चरला आपल्या नको असलेल्या भुतकाळाकडे परत जाणं भाग पडतं. ह्या भूतकाळात तिचा एका अॅक्टिव्हिस्ट, वेल रेड पार्टनर आहे. तिची भारताबाबतची मतं आहेत. आणि वर्तमानात विदर्भातील एक गाव आहे आणि त्या गावातील आत्महत्या.

       ह्या पुस्तकाने बारोमास परत एकदा वाचावं असं वाटतं आहे.

Liu Cixin ह्यांची Three Body Problem

              Liu Cixin ह्या चायनीज लेखकाच्या तीन सायन्स फिक्शनना मिळून ‘ थ्री बॉडी प्रॉब्लेम ’ असं म्हटलं जातं. खरंतर ‘Remembrance of E...