Thursday, June 12, 2014

अ लोनली अँड फ्रेंडली जिबरीश

सकाळी हगताना माझ्या डोक्यात दिवसभराच्या अडाणचोटपणाचे प्रश्न येत असतात. माझ्या मते माझ्या भिरभिरत जगायची सवय झालेल्या मेंदूला कालच्या दिवसाचा हँगओव्हर उतरत असताना आज साठी काहीतरी चढवून घ्यायची गरज असते. मग मी असे प्रश्न घेतो.
       तर हा प्रश्न काय होता की आपण सत्य असं जे काही असतं त्याला फिक्शनने सबस्टिट्यूट करू शकतो काय. सकाळी सकाळी वाटतं तसं मला हा प्रश्न एकदम फंडामेंटल वाटला. मग ब्रश करताना, दातांचे एक एक प्रकार टप्प्याटप्प्याने घासताना मी माझ्या प्रश्नाचा तुकड्या-तुकड्याने आणि टप्प्या-टप्प्याने विचार करू लागलो. आणि पहिल्या टप्प्याला हिंदकळलो.
       तुम्ही गेस केलं असेल तर हा पहिला तुकडा म्हणजे ‘सत्य’ काय असतं बुवा. म्हणजे ह्यावर थोर थोर विचारवंत वगैरे खल करून गेले आहेत. आणि आपला काही असला पाड नाही. पण म्हणजे काही गोष्टी मला माहिती आहेत, मी त्या ऐकल्या-पाहिल्या आहेत, आपल्या त्वचेने, जिभेने अनुभवल्या आहेत. पण उद्या तुम्ही मला विचारलात की हं, कर पाहू सिद्ध आता तुला सत्य वाटणाऱ्या ह्या गोष्टी तर मी त्यातल्या काही गोष्टी सिद्ध करूच शकणार नाही. आता हे सिद्ध करणं काय आहे? तर म्हणजे तुम्ही तुमच्या तर्काच्या आधाराने निष्कर्ष काढू शकाल असं काहीतरी पुराव्यासारखा मी तुम्हाला दिलं पाहिजे. म्हणजे मी अमुक एक बाईचे अपत्य आहे हे सिद्ध करायचं आहे मला तर मी तुम्हाला डी.एन.ए. टेस्ट वगैरे करून त्याचे निर्णय देऊ शकतो. पण वयाच्या अमुक एक वर्षी मी पहिल्यांदा हस्तमैथुन केलं ह्याचा काही पुरावा सद्यस्थितीत मी तुम्हाला देऊ शकणार नाही. हे उदाहरण थोडं असांस्कृतिक आहे, पण ते जबरी असल्याकारणाने दिलं होतं. थोडं मधलं घ्यायचं म्हणाल तर मी अमुक एक दिवशी अमुक एक माणसाबरोबर चित्रपट पहायला गेलो होतो ह्याच पुरावा मी तुम्हाला काय देऊ शकतो? माझ्याकडे आता त्या शोचे तिकीट तर नाही. पण मग मी तुम्हाला त्या अमुक माणसाचे होकारार्थी उत्तर देऊ शकतो. पण आता हे सत्य तुम्ही मी अमुक एक बाईचा मुलगा आहे ह्या सत्याच्या एवढेच पक्के सत्य मानाल का थोडे कच्चे सत्य मानाल? कारण असं असू शकतं की त्या माणसाने अंदाजे हो म्हटलं आहे किंवा तो धादांत खोटं बोलत आहे. सत्याच्या अशा पातळ्या असतात काय? सत्य हे वैयक्तिक अनुभवांचा भाग असते का सार्वत्रिक? म्हणजे आम्ही ३ मित्रांनी मिळून ग्रहण पहिले होते ह्याला तीन वैयक्तिक सत्ये मानायची का एक सार्वत्रिक सत्य?
       आधी म्हटलं तसं हे अडाणचोट प्रश्न आहेत आणि त्यांचा व्यवहारकुशल माणसाला काही उपयोग नाही. व्यवहारात सत्य ही पॉप्युलर चॉईस सारखी गोष्ट असते. म्हणजे ५०० रुपयाच्या नोटेचे मूल्य ५०० रुपये आहे कारण आपण सगळे तसं मानून चालतो आहोत. उद्या समजा ५०% लोकांना एकदम असं वाटायला लागलं की नाही, बहुतेक ५०० रुपयाच्या नोटा ह्या खोट्या आहेत तर तिची किंमत १०० च्या ५ नोटा अशी राहणार नाही. किंवा शाळेत माझा एक मित्र असे प्रश्न विचारून मार खायचा, की तीनला तीन का म्हणतात, चार का नाही, खडूला खडू का म्हणतात असं. पण असं काही नाही.
       माझे एक शिक्षक म्हणायचे की सत्य असं काही नसतं. प्रत्येक विधान हे संभाव्यता असतं. म्हणजे खरंतर आपण बतुतेक, बऱ्याचदा असे शब्द वापरून बरीचशी वाक्ये बोलली पाहिजेत. जसं मी बहुतेकदा च्युत्याप करतो. किंवा ‘क्ष’ व्यक्ती हा बहुतेकदा महापुरुष होता. पण काही वाक्य आपण निर्विवाद सत्य म्हणून सांगू शकतो, जसं मी होमो सेपियन आहे. मी नर आहे. अमुक एक माणूस माझा बाप आहे. इथे बहुतेक वगैरे नको.
       पण अमुक एक माणूस माझा खापर पणजोबा होता असं म्हणताना मी हे विधान सत्य का नाही हे कसं पारखावं? म्हणजे माझ्या घरात त्या माणसाचे फोटो आहेत, त्यांच्या नावाचे दस्ताऐवज आहेत. पण तरी हा माणूस माझा खापर पणजोबा आहेत ह्याचा थेट जैविक पुरावा मौजूद नाही. मग इथे काय करावं? हा माणूस बहुतेक माझा खापर पणजोबा आहे असं म्हणावं का माझ्या निर्विवाद सत्य होऊ शकणाऱ्या बापावर विश्वास ठेवावा? का तो खापर पणजोबा नाही असे सिद्ध करणाऱ्या पुराव्याच्या अभावाने सध्यातरी त्याला माझा खापर पणजोबा मानून चालावं?
       म्हणजे काही सत्ये अशी असतात का ज्यावर आपण विश्वास ठेवल्याने ती सत्य होतात? का असत्य म्हणून न दाखवता आल्याने उरलं काय ते सत्य अशी रेसिड्यूअल भूमिका घेऊन आपण सत्य काय ते ठरवतो? पण मग असत्य म्हणजे काय ते आपण कसं ठरवतो? म्हणजे तर्काच्या आधाराने आपण काहीतरी एकच जाणून घेऊ शकतो, सगळी साखळी नाही. सुरुवातीचा बिंदू म्हणजे आपला विश्वासच, बऱ्याचदा ठोकून घट्ट बसलेल्या खुंट्यासारखा.
पण हे एवढे प्रश्न आले कुठून? सत्य म्हणजे काय? आणि एखादी गोष्ट सत्य आहे का नाही हे माहीत  नसेल पण तरीही ती गोष्ट बोलायची असेल तर? माझा एक मित्र म्हणायचा, की आपण अॅबसुल्युटली फ्री नसतो. दुसऱ्यांना हानी न करता येईल एवढंच आपलं फ्रीडम असतं. म्हणजे आपलं सत्य आहे का नाही ह्याची शाश्वती नसलेलं काही बोलायचं फ्रीडम कुठपर्यंत आहे, तर दुसऱ्यांची हानी त्यात होत नाही तिथपर्यंतच? आणि कोणाची हानी होतीये म्हणजे नेमकं काय होतंय, हानी होते म्हणणारा खरंच हानी होतीये म्हणून म्हणतोय का, आणि न म्हणणाऱ्या कोणाची खरंच हानी होतीये एवढं सगळं तपासून घेईपर्यंत काय बोलायचं शिल्लक राहणार? बोलायचं असतं ते जिकीर करून, फिकीर करून नाही असं का?
असा सत्य वगैरे गोष्टींचा काही उपयोग असतो का लोकांना? माझा एक अॅस्ट्रॉनॉमी करणारा मित्र म्हणतो की काय उपयोग ह्या रिसर्चचा? आपण शोधलेल्या एखाद्या गोष्टीचा उपयोग, म्हणजे ती ओरबाडून आपल्या भुका भागवायला काही एक प्रकार अस्तित्वात येईपर्यंत आपल्या किती पिढ्या संपतील, त्यापेक्षा फिनान्स करावा. औषधं शोधणारे लोक असं म्हणत नसतील. व्हायग्रा नसती आली तर तोटा झालाच असता. आणि ती येण्यासाठी सत्य कळावं लागलंच. असं म्हणू नये खरं, पेनिसिलीन म्हटलं असतं तरी चालतं.
पण साहित्यिक, ऐतिहासिक सत्यांचा काय उपयोग असतो? म्हणजे महापुरुष क्र.१०४ हे दिवसातून ५ वेळा चहा पीत असं त्यांच्या किराणा मालाच्या बिलावरून आपण ९५% आत्मविश्वासाने म्हणू शकतो असं कळल्याने काय होईल? आणि समजा असं झाल्याने, आजवर ते दिवसातून दोनदाच चहा पीत असं वाटणाऱ्या लोकांनी आत्महत्या केल्या तर? ५% च्या नसलेल्या आत्मविश्वासाला एवढे बळी? हे अगदीच फाचाट हायपोथेटिकल आहे म्हणा, सिरीयस काय लिहिणार आपण ते सत्य आहे का नाही हे ठाऊक नसताना. मूळ प्रश्नाशी दगाबाजी नाही.
खूप झालं सत्याबद्दल. आता फिक्शनबद्दल बोलू.
--
मी एका पुस्तकात वाचलं होतं की फिक्शनल गोष्टी खऱ्या गोष्टींहून अधिक वास्तववादी असतात. अशा वाक्यांना मैलाचे दगड मानायच्या अडाणचोट दिवसांत वाचलेलं. अजून काय लिहिणार फिक्शनबद्दल.
--
पण म्हणजे काय पुस्तकांवर बंदी घालावी काय? माझा एक मित्र म्हणतो की बंदी घातलेल्या गोष्टींची डिमांड वाढते खरंतर. दुसरा म्हणतो की असं काही नाही. डान्सबारवर बंदी नव्हती तेव्हा मी पण जायचो, आता परवडत नाही.
पहिला म्हणतो की पण मुळात टेक्स्टबुक आणि रेफरन्स सोडले तर बाकी पुस्तके तर मनोरंजन म्हणूनच असतात. दुसरा म्हणतो असं काही नाही, जसं आध्यात्मिक. पहिला म्हणतो तसं मी हे तुला दाखवू शकतो, माझ्या व्याख्या वापरून की सगळंच मनोरंजन असतं पण जाऊ दे. दॅट विल बी टू मच.
पहिला म्हणतो की भले एका ठराविक भाषेत आजपर्यंत एकही उपयोगी पुस्तक नसेल, पण येणार नाही का ह्यापुढे. बंदी घातली तर समाजोपयोगी प्रतिभा वाया जाईल. दुसरा म्हणतो यू ब्लडी युटिलेटिरियन.
पहिला म्हणतो की का रे पण असं की एका भाषेत फिक्शन नाहीच. दुसरा म्हणतो की जिथे नशेला मान नाही, तिथे फिक्शनला कुठे. फिक्शन नशा यार, फिक्शन मॅजिक.
पहिला म्हणतो असं काही नाही यार. वी हॅव टू मॅच डिफरंट करंटस्. आपलं सोडून आपण सगळं असं दुसऱ्याचं कसं घेणार? दुसरा म्हणतो तुझं म्हणजे काय, युर पास्ट, ऑर युर फादर’स पास्ट का तुझी ही बॉडी, तुझी त्वचा, तुझी भूक, तुझी तहान, तुझे प्रश्न का तुझी मेमरी? वी आर डिफाइंड इन सो मेनी मॅनर्स माय फ्रेंड, ओन्ली कनक्ल्यूजन अॅव्हेलेबल टू अस इज टू मेनी कनक्ल्यूजनस्.
पहिला म्हणतो आय अॅग्री टू डीसअॅग्री. दुसरा म्हणतो यू फकिंग लिबरल. कम ऑन फाईट.
--
फिक्शन आणि सत्य ह्यांचा एकमेकांशी काय संबंध असतो? डोन्ट आस्क बिग क्वेश्चन्स फॉर सच अ पेटी मॅटर. आपले पेचात टाकणारे नैतिक प्रश्न आपण मोक्याच्या वेळेसाठी राखून ठेवू.
पण तुला हा श्रद्धा, बहुतेकांचे पत, न्यायनिवाडा आणि लिहिणाऱ्याच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सोडवावाच लागेल.
चील ड्यूड. तुला एक सांगू, हे लिहिणं, विचार ही अशी गोष्ट आहे ना जिचं मोठेपण सेल्फ प्रोक्लेमड आहे. तू जर दुनियेच्या ओपन मार्केटमध्ये टाकलंस तर तुला खरी गंमत दिसेल. इट्स कमोडिटी माय फ्रेंड. अ ड्युरेबल कमोडिटी. आणि इतर कुठल्याही कमोडिटीसारखी तिच्या डिमांडमुळे तिच्या इनपुट्सची किंमत ठरते. तिच्यात इंन्ट्रिसिक महत्वाचे काही नाही. असे महत्व हा फक्त मार्केटिंगचा प्रकार आहे, अ व्हेरी सक्सेसफुल मार्केटिंग. पण इथले लोक सगळं जाणून आहेत. म्हणूनच ते अग्रलेख सगळ्यात जास्त वाचतात, त्या खालोखाल इतिहास आणि उरलेले बाकीचे. दे नेव्हर बॉट धिस मार्केटिंग.
टू मच ड्यूड. यू टेक इट टू फार. मी तर एवढंच म्हणतोय की एव्हन फॉर अ कमोडिटी, यू कॅननॉट स्टॉप प्रड्यूसर जस्ट कॉज समवन हॅज अ साइड इफेक्ट. पॅसिव्ह स्मोकिंगने त्रास होतो म्हणून सिगरेट्सवर बंदी नाही घालत.
रीडीक्युलस उदाहरण, पण मुद्दा पोचला. पण तू श्रद्धेला अंडरएस्टिमेट करतोयेस मित्रा. मी तुला एक मूलभूत प्रश्न करतो मित्रा. जर तुला एखाद्या माणसाला विचार किंवा श्रद्धा ह्यापैकी एकच शिकवू शकणार असशील तर काय शिकवशील?
आह, हे असलं गुळचट नको मित्रा, डोळस श्रद्धा वगैरे. श्रद्धा इज फकिंग श्रद्धा, त्यात डोळस-अंध काही नाही. तुमचा विश्वास की असं एक ठाम काहीतरी आहे जे तुमच्या आयुष्यातले स्पष्टीकरण ण देता येणारे एक्स-फॅक्टर्स कंट्रोल करतं. आणि असं जे ठाम आहे ते बरोबर तुमचा हात पकडून तुम्हाला तुमच्या नियोजित आणि इप्सित ठिकाणी ठेवेल. आणि विचार म्हणजे तुम्ही असं एक्स-फॅक्टर काही मानणार नाही. फॉर यू, इट्स कॉज आणि इफेक्ट किंवा सरळ अर्थहीनता. त्यांच्या त्यांच्या प्युअर फॉर्मस् मध्ये ह्या दोन गोष्टी एकमेकांबरोबर जाऊच शकणार नाही. सो सांग मला, काय शिकवशील, स्केप्टिकल, सोलत सोलत जाणारा विचार का श्रद्धा?
तुझा सायलेन्स काय सांगतोय माहितीये की जरी तुला ‘विचार’ सांगावसं वाटत असलं तरी तुला असं ठाम सांगता येत नाही की श्रद्धेपेक्षा विचार बरा. कारण तू विचार करतोस. पण जर तू श्रद्धावान असतास तर तुझं उत्तर सोपं होतं. आणि इतक्या सगळ्यांना इतकं सगळं सोपं, सहज, गुळगुळीत ज्याने घसरता यावं आणि सावरताही यावं असं करून देणारी गोष्ट सोडून तू विचारांचं स्वातंत्र्य वगैरे सांगायला जातोस आणि खरंतर तुलाही माहिती नाही की ह्यातलं लोकांना जास्त उपयोगी काय.
       कदाचित. पण म्हणजे तू छुपा संस्कृतीरक्षक तर नाहीस? असे हुशारीचे शब्द वापरून तू मला जाळ्यात अडकवतोयेस आणि सांगतोयेस की जाळ्यातच भलाई आहे.
       नाही. तुझ्यासारखा मी पण कोड्यात पडलेला आहे, एका कोड्यातून दुसऱ्या कोड्यात. पण मला असं दिसतंय की श्रद्धेचे, विश्वासाचे हे सारे भक्कम अडसर का आहेत, त्यांच्या आड काय एवढं सांभाळलं जातं हे तर मला आधी शोधायला लागेल. पण म्हणून मी ते अडसर मोडून टाकत नाही की त्यांच्याकडे पाठ फिरवत नाही. असं केलं तर? समजा आपण असं ठरवलं की ह्यापुढे असं होतं का नाही असे प्रश्नच सोडून दिले तर? आपण ह्या सगळ्या गोंधळाला फिक्शनलाइज केलं तर? कदाचित ते जास्त खरं असेल का?
       पळतोयस तू
       असेल. आहेच कदाचित. पण असंही असेल की तपशिलांचे टवके उडवले की आतला सगळा कंटेंट मला मिळेल. कदाचित मी निवड करतोय आणि तू अडेलतट्टूपणा.
--
       चल आपण नॉस्टेल्जिक होऊ. शाळेत कसं शिकवलं तसं सुरुवात नाही पण शेवट कवितेच्या एका ओळीने कर. आणि नॉस्टेल्जिक होतोयेस तरी मुद्रण हक्क वगैरे एथिकल हवं बरं. चल सांग.
साल्या, कॅपिटलिस्ट, ऐक, तुकाराम महाराज म्हटलेले बरं असं, बाकी ठाऊक नाही, हवं तर खटला टाक.
काय करू आता धरूनिया भीड, निःशंक हे तोंड वाजविले
हा,हा. माझ्या लिबरल शहामृग मित्रा, तू असा इतिहासाच्या वाळूत तोंड खुपसून राहणार आणि तरीही म्हणणार की मला नवं दिसतं. अर्धी वापरलीस, पुढच्या ओळीसकट घेतास तर वेगळा राहता अर्थ.  काही म्हणूच नकोस पुढे, आपण इथेच मारू आधुनिक झेंडा आणि जाऊ मॅजिक पोएट्री चे प्याले रिचवायला.
जगती की शीतल हाला सी पथिक, नाही मेरी हाला
जगती के ठंडे प्याले सा पथिक नाही मेरा प्याला
ज्वाला सुरा जलते प्याले में दग्ध हृद्य की कविता है
जलने से भयभीत न हो आए मेरी मधुशाला
(काळ बदलले, भाषा, तरी अर्थ कसे जुळतात अशी कुजबुज मागे फक्त..)
१  १.  http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97’ ह्या लिंक वरून १२-०६-२०१४ रोजी २३.०६ वाजता
२ .‘http://www.ics.uci.edu/~ashish/madhushala.pdf’ ह्या लिंक वरून १२-०६-२०१४ रोजी २३.०६ वाजता 

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...