Saturday, June 7, 2014

तीन मरणांच्या बातम्या

      बघ्या सकाळी उठतो. उठल्या उठल्या तो घड्याळ बघतो. बघ्याला असं उगाच एक वाटतं की समजा आपण एका ठराविक वेळेच्या आधी उठू शकलो तर आपण वेळेची जी निर्दय गती आहे तिला फसवून दिवसभर हवं ते करत राहू शकतो. पण समजा आपण अशा कुठल्या एका वेळेच्या नंतर उठलो तर गेला आपला दिवस. बघ्याची दिवस असतात कुठे आणि जातात कुठे असे प्रश्न त्याने फार वर येणार नाहीत ह्याची काळजी घेतलेली आहे. बहुतेकवेळा घड्याळ बघितल्या बघितल्या जगाच्या गर्दीभरल्या चक्राचा एक एक आरा आपल्यापासून निसटून चालला आहे आणि आपण आता दिवसभर त्यांच्यापाठी कसेबसे धावत असणार आहोत अशी जाणीवेची खप्पड थोबाडीत बघ्याला बसते. आजही बसली. त्या अदृश्य फटक्याचा मार जिरवत जिरवत बघ्या जागे व्हायच्या लहानपणापासून शिकवलेल्या एक एक प्रक्रिया पर पाडत जाऊ लागला. त्या उरकून खुर्चीत कॉफी पीत बसत बातम्यांच्या वर्षावात भिजायला आतुर बघ्याला मोबाईल वर मित्रांनी फार काही मेसेजेस टाकले आहेत असं दिसलं. आणि तिथे बघ्याला पहिली मरणाची बातमी मिळाली.
       ह्या बातमीत मेलेल्या मनुष्याचा बघ्याच्या अमुक एक प्रकारच्या जातीय, अमुक एक प्रकारच्या विचारसरणीय, आणि अमुक एक प्रकारचे लोक आसपास असण्याच्या प्रकाराशी बादरायण संबंध आहे. असं आहे की काही एक दैवी योगांचा भाग किंवा लहान मुलांची अत्यंत सजग अनुसरणक्षमता ह्यामुळे आपल्या अख्खी सकाळ खुर्चीवर बसून पेपरवाचन करणाऱ्या आजोबांना बघून बघ्याही लवकरच बातम्या वाचण्यास शिकला. आणि पुढचा दैवी योग म्हणजे बघ्याचे हे स्वाभाविक सहजशिक्षण घडत असताना देशात एक इमारत पाडली जात होती. बघ्याची आजोबा ह्या इमारत पाडण्याच्या प्रकाराचे खुर्चीवर असलेले प्रखर समर्थक होते. बघ्याच्या आजूबाजूच्या कुटुंबातही अशा कार्याबद्दलची कदर होती. आपण (गांडू असल्याने, अर्थात बघ्याला हे पुढे जाऊन कळले) अशा पाडापाडीत्मक विधायक कार्यात जाऊ शकलो नाही, पण आपण अशा कार्याच्या आदराचा फैलाव तर करू अशा भावनेने एक व्हिडीओ सुद्धा बघ्याच्या शेजार-पाजारच्या कुटुंबांनी मिळून बघितला. बघ्या काहीतरी खात खात मध्येच झोपून गेला, पण त्याच्या लक्षात राहिले ते मोठया फळ्यासदृश्य ढाली घेतलेले सैनिक, त्यांच्या लाठ्या आणि घोषणा देत त्यांच्या कडे येणारे लोक आणि सैनिक काठ्या चालवू लागले की पळापळ करणारे लोक.
       तिसरा दैवी योग म्हणजे बघ्याची आजोबा हे ज्वलंत स्वरूपाची वृत्तपत्रे वाचत. आणि त्यानंतर त्या वृत्तपत्रांची आजूबाजूच्या घरांशी अदलाबदली करताना कसले जबरी लिखाण आहे किंवा कसे मारले भोसडीच्याना अशा प्रतिक्रियाही दिल्या जात. बघ्या एकदा घरात ‘भोसडीच्या’ असे म्हटल्यावर त्यास संस्कारक्षम मार मिळाल्याने त्याने असे शब्दप्रयोग केवळ शाळेत करायचे असतात हे समजून घेतले.
       तर अशा ह्या बालपणीच्या सुखावह काळात, जिथे बाकी मुले नव्याने लागू लागलेले केबल चॅनेल, डब्ल्यू.डब्ल्यू.एफच्या कुस्त्या, हिंदी सिनेमातील गाण्यातून शारीरिक शिक्षण अशी बोधप्रद गाणी अशा गोष्टीत व्यस्त असताना बघ्याला हे समजले होते की हा देश आपला आहे आणि काही लोक इथे परके आहेत. ज्वलंत लिखाण करणारे हे बरोबर आहेत आणि ते ज्यांना शिव्या देतात ते चूक आहेत. परदेशातून येणारा एक प्रकल्प समुद्रात बुडवायचा आहे. दुबईतील एक गुंड हा विमानाने आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत फिरतो. आणि एक माणूस आहे जो सहजी हा प्रकल्प समुद्रात बुडवू शकतो आणि त्या गुंडाला पकडून आणू शकतो.
       बघ्याला अशा माणसाबद्दल तेव्हा नवल वाटत असे, आणि त्याने बरोबर मार्गावर असलेल्या ज्वलंत लोकांबरोबर युती केली आहे ह्याचेही बघ्याला नैतिक समाधान असे.
       त्या बालपणानंतर पुढे बघ्या हा शाळेतील मुली, शाळेतील स्पर्धक आणि संध्याकाळचे क्रिकेट ह्यांत जास्त रमू लागला. त्याने भारतीय क्रिकेट टीम आणि सैनिक ह्यांवर देशभक्ती सोपवून दिली. त्याच्या वयाला झेपणारी आणि तापणारी अशी सारी पुस्तके त्याने वाचली. त्यात ह्या माणसाबद्दल फार काही वाटायचे राहून गेले.
       खरे आत्ताही त्याला असे काही वाटायची गरज नाही. एकाद्या माणसाबद्दल भले-बुरे काही वाटलेच पाहिजे अशा कुठल्या भाबड्या नैतिक कवचात बघ्या नाही. बघ्याला खरे ह्या एका मृत्यूच्या घटनेचे काही वाटतही नाही. त्याला गंमत वाटते आहे ती त्या मरणावर उठणाऱ्या सार्वजनिक हुंदक्यांची आणि ज्यांचे हुंदके झाले त्यांच्या अन्य उमटण्याची. बघ्याला आठवतं की सार्वजनिक नैतिकतेच्या डूज अँड डोन्टस् मध्ये ‘मरणान्ति वैराणी’ असं पण असतं. मरेपर्यंत चालवावं असं वैर बघ्याचं अद्याप कोणाशी नाही आणि जर ‘मेरे झिंदगी का एक्के मक्सद है, बदला’ असं झालं आणि त्यात कोणी एक मेला तर पुढे काय नेमकं व्हावं ह्याचं मेमेल्याला काय पडलं असेल असं बघ्याला वाटतं. पण बातम्यांची वेबसाइट, त्याच्या सोशल मिडीयाच्या भिंती ओल्या होतात, ज्यांच्या जास्त ओल्या झाल्यात ते कारस्थान-कारस्थान असं ओरडू लागतात, आणि ज्यांना असं ओरडायचं नाही ते कोण नाही रडलं बरं, चला घेऊ त्याची असं करू लागतात. ज्यांना एवढं सकळिक काम करायचं नसतं ते रिपरिप करू लागतात. बघ्या बघबघ करू लागतो.
       मध्ये एकदा, म्हणजे नाश्त्याची प्लेट घेऊन जे चाललंय त्यावर सावकाश रवंथ करताना बघ्या असा विचार करतो ‘मरणान्ति वैराणी किया मरणान्ति अतिशयोक्तिनि?’ पण बघ्याला अशा कुठल्या थोर व्यक्तीचे वैयक्तिक अनुभव नाहीत. तो त्याच्या स्थानिक नगरसेवकाला ओळखतो. पण उद्या हा नगरसेवक अपघातात मेला तर बघ्या त्याच्या अंत्ययात्रेला जाईल असे नाही.
       बघ्या एकदा कॉलेजात एक खूप प्राचीन सार्वजनिक गणेशोत्सवात गाण्याचा कार्यक्रम ऐकत असताना असेच एक स्थानिक नेते गेले म्हणून कार्यकम आध्यात्मिक गाणे गाऊन बंद करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी त्या नेत्याच्या आध्यात्मिक कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल जाळले. मग बघ्याला एक मित्र म्हटलेला की हा काही अपघात नव्हता, त्यांना मारलं होतं. इट्स ऑल पोलिटीक्स.
       मध्ये बघ्याचा मित्र त्याच्याशी चॅट करताना म्हणतो की आता त्यांच्या घरातच तिकीट मिळेल कोणालातरी. पुढे एका न्यूजमध्ये पण तो असंच काही वाचतो एका तज्ञाने लिहिलेलं.
       बघ्याला असं कोणालाच विचारत नाही की ते इतके ग्रेट होते तर त्यांचा जिवंतपणीचा परफॉर्मन्स त्यांच्या श्रद्धांजली लेखांहून छोटा का वाटतो. पण बघ्याला ठाऊक आहे की बघ्याच्या एक भौगोलिक, आर्थिक, जातीक, शैक्षणिक कोपऱ्यातून त्याला जे कळतं आणि जे कळत नाही ते एकमेकांशी जुळतंच असं नाही. बघ्या गुमान आपला प्रश्न दुमडून, दडपून ठेवतो आणि परत गंमत बघू लागतो.
--
       त्याच्या बघण्यात त्याला परत एक बातमीचा छटाकभर कोपरा दिसतो ज्यांत एक ऐंशीहून अधिक वर्षाच्या, प्राध्यापकी सोडून संपादकी वगैरे करणाऱ्या माणसाच्या मृत्यूबाबत असतं. बघ्यासाठी हा मृत्यू त्याच्या जवळच्या पेरीफरीत आलेला आहे. कधीकाळी, जेव्हा वेगवेगळया माणसांना भेटून बोलल्याने काही होतं असं बघ्याला वाटत असे अश्या अशा कोवळ्या च्युत्या काळात त्याने केव्हातरी ह्या माणसाला भेटायचा बेत आखलेला होता. त्याच्या एका मित्राच्या ओळखीने तो भेटायला जाणार होता. पण असं काही झालेलं नाही. परत एकदा बघ्या थोर माणसांच्या वैयक्तिक ओळखीपासून पारखा राहिला आणि त्याची ज्यांच्याशी ओळख आहे ती माणसे थोर होण्यापासून.
       बट दॅट्स नॉट इट. बघ्यासाठी हा मृत्यू जवळच्या पेरीफरीमध्ये आहे कारण बघ्याने ह्या माणसाने लिहिलेलं एक पुस्तक वाचलेलं आहे. आणि तेही अशा दिवसांत, जेव्हा कधीकाळी हमखास भावूक होऊन टिपे गाळू शकणारा बघ्या हमखास कोडगा होऊन राहिला होता. आणि तरीही त्या पुस्तकाच्या शेवटानंतर बघ्याला एक आतल्याआत खेचत जाणारी अवस्था आली, जशी त्याला ‘लिटल प्रिन्स’ नंतर आली होती आणि तेव्हा बघ्याला जाणवलं की आपण जगत जातो त्याचा एक निष्कर्ष असा असतो की आपण सुरुवात करतो तेव्हा आपण नाव ना देता अनेक गोष्टींना आपले मानत जातो, पण पुढे पुढे ह्या एक एक गोष्टी संपून, हरवून जायच्या अनुभवांनी, किंवा नुसत्या भीतीने, किंवा पोट आणि अन्य अवयव भरायच्या धबडग्याने आपण असे होतो की आपल्याभोवती असतं बरंच काही आणि आपण कशाचेही नसतो. आपल्या आत असलेले निरागस भाबडेपण आपणच मध्ये मध्ये निर्दय ठेचत जातो आणि असे करावेच लागेल अशी एवढी समजूत आपण आपली घालतो की मोजमाप करून छाटून नीट बनवलेल्या आयुष्यापलीकडे जे काही दिसेल त्याला आपण खोटे समजू लागतो. किंवा असे शब्दांत काही कन्क्ल्युजन नाही. पुस्तक संपल्यावर आपण आपल्याशी थोडे फार दाटलो तेवढा वेळेचा तुकडा खरा. बाकी शब्द नुसते दिखावा.
       बट दॅट्स नॉट इट. बघ्याला आठवलं की लहानपणी त्याच्या एक उनाड आयुष्य जगलेल्या रीश्तेदाराने त्याला एक मांजराचं पिल्लू भेट दिलेलं. बघ्याने त्या पिल्लाला त्या पिल्लाला न कळणारं पण बघ्याला कळणारं एक नाव दिलेलं. असं तर झालं नाही की ते पिल्लू बघ्याच्या कुशीत येऊन झोपत असे की बघ्याच्या मागेमागे फिरत असे. जे होतं ते बघ्याचं इमॅजिनेशन आणि त्या इमॅजिनेशनमध्ये एक आपल्याला हवं तेव्हा म्यांव म्यांव करणाऱ्या आणि आपल्याला नको तेव्हा शेपूट वर करून निघून जाणाऱ्या, झोपल्यावर मांडीवर मावणाऱ्या मांजराच्या पिल्लाला एक खास राखीव जागा होती. पण बघ्याच्या घराच्या रिअॅलिटीमध्ये त्या पिल्लाच्या हगण्याचा वास आणि घाण होती, दूध सांडणं-लवंडणं होतं, आणि रात्री-बेरात्री त्या पिल्लाने घरात ओरडणं हा प्रचंड न्यूसंस होता. बघ्याच्या ऑब्जेक्शनला दूर सारत पिल्लाला रात्री घराबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. दुसऱ्या दिवशी कचरेवाल्या बाईने त्या कोणीतरी मारलेल्या पिल्लाला शेपटाने पकडून घरातील भाज्या, कागद, प्लास्टिक, बल्ब ह्यांच्या कचऱ्यावर भिरकावलं. आणि शाळेतून दुपारी घरी येऊन पिल्लाला नावाने हाक मरत रडवेल्या झालेल्या बघ्याला त्याच्या आईने असं सांगितलं. रात्री मध्येच केव्हातरी बघ्याला जाग आली, त्याला असं वाटलं की ते पिल्लू त्याच्या उशीपाशी बसलेलं आहे आणि मग एकदम त्याला आठवलं आणि बघ्या आवाज न करता उशीवर तोंड दाबून रडत केव्हातरी झोपला.
       कदाचित बघ्याच्या चौकटबंद आयुष्यातील ह्या छटाकभर अनुभवाची आणि ‘ज्योडी’ च्या गोष्टीची बघ्याने आपल्यापुरती गाठ मारून घेतली. आणि मग अपरिहार्य नोस्टॅल्जियाच्या नशेत बघ्या व्याकुळ होऊन गेला.
       बघ्याला आठवतं की पुस्तक वाचून झाल्यावर त्याच्या क्वार्टरभर अॅनॅलिसिसमध्ये बघ्याला असं वाटलं होतं की आपल्या आयुष्यात आपले शारीरिक वय आणि मानिसिक वय ह्याच्या मध्ये एक मोठ्ठा खड्डा आहे. त्या खड्यात आपल्याला खेचून तळाशी नेऊन गुदमरवून टाकेल असा नोस्टॅल्जिया आणि फुकाचे प्रश्न आहेत. आणि आपण त्या खड्ड्याच्या अत्यंत धोकादायक जवळून चालत आहोत. आणि समजा आपण अशी कोणतीही पुस्तके वाचत राहिलो तर केव्हातरी आपण ह्या खड्ड्याच्या तळाशी जाऊ. आपण जबाबदारी नावाचा एक दोर स्वतःला बांधून घेतला पाहिजे. त्यामुळे आपण खड्ड्यात पडण्यापासून वाचले जाऊ, म्हणजे कोण न कोण आपल्याला दोराने ओढेल. आणि मग जमेल तशी ह्या खड्ड्यातील, आसपासची सुपीक माती वापरून आपण त्यांत कविता, लेख, कथा अशी फुलझाडे लावू. ती फुलझाडे बाल्कनीत लावू. आणि आरामखुर्चीवर निवांत रेलून त्यांना न्याहाळू.
       तेव्हापासून बघ्या त्याचा संबंधही येत नाही अशा देशांबद्दलची किंवा इतिहासाची पुस्तके वाचतो. तरीही केव्हातरी बघ्याला वाटतंच की असा कुठला ना कुठला खड्डा बघ्याला ओढणारच. इंजिनिअर किंवा एम.बी.ए. न होऊन त्याने प्रगतीचा रस्ता सोडला तिथेच त्याचे खड्ड्यात जाणे अटळ होते असा तो आपल्या अल्कोहोलिक रिअलायझेशनचा शुद्धीतला अर्थ काढतो. पण जेव्हा तो अल्कोहोलिक होतो तेव्हा सारे अर्थ त्याला एक मोठया दरीकडे जाणाऱ्या साईनबोर्ड सारखे वाटतात.
--
       वर उद्धृत केलेल्या आशयाची स्वप्ने आणि भास असणाऱ्या झोपेतून बघ्या उठतो आणि परत आपल्या सोशल प्रोफाईलला जुगतो. त्याला एक तरुण मुलाची प्रोफाईल दिसते. तिथे त्याच्या मित्रांनी लिहिलेलं असतं, आणि कोणी थेट लिहिलेलं नसलं तरी बघ्याला अर्थ जाणवतो.
       बघ्याला इथे एक सूक्ष्म हादरा बसतो. बघ्या ह्या तरुण मुलाला ओळखतो, त्याच्या घरच्यांना ओळखतो. बघ्याला वाटतं की शिक्षण पूर्ण केलेल्या, नोकरी करू लागलेल्या ह्या मुलाने आत्महत्या तर केली नाही ना. पण त्याच्या मित्रांच्या शोकसंदेशांत असलेली अटळता बघ्याला अशा निष्कर्षांपासून मागे आणते. बघ्या कोणालातरी विचारतो आणि मग कळतं की ब्लड कँन्सर.
       एक बाजूने बघ्या स्तब्ध कोडगेपणाने हळहळ व्यक्त करतो. दुसऱ्या बाजूला तो विचार करतो की त्याच्या कुटुंबात कोणाला कँन्सर झाला तर तो काय काय करेल. तिसऱ्या बाजूला तो त्याच्या शेजारच्या एकट्या राहणाऱ्या म्हाताऱ्या आजींचा विचार करतो ज्या मरतील तर सुटतील असे सहानुभूतीदार मत आसपास बनलेले आहे. चौथ्या बाजूला तो प्रश्न टाकतो की आयुष्याची कसलीही धड चव न घेता हा मुलगा मेला ह्या घटनेला काय एक्स्प्लेन करणार. मग बघ्या आपल्या वर्तुळातले कोणी न मेल्याने जमू शकणारी स्थिरचित्त मुंडी हलवतो.
--
       बघ्या क्रमाक्रमाने विचार करतो की तो मेला तर बाकीच्यांना असतात.काय काय वाटेल. समजा बघ्या दैवी कृपेने थोर झालाच तर त्याच्या पश्चात कशा प्रकारचे हुंदके येतील. आणि नाही झाला तर किस तरीके की मौत बघ्या मारेल. मग बघ्या पलटून विचार करतो आणि त्याच्या आजूबाजूच्या एकेकाला मारून त्याला काय वाटेल ह्याचा विचार करतो. म्हणजे बघ्याची आजोबा, आई, बाबा, बायको, काका, मित्र, वीस वर्षे राहिलेले घर. बघ्याला आठवतं की त्याची नळ्या-नळ्या खुपसलेली आजी मेली हाच त्याचा क्लोजेस्ट अनुभव आहे. आणि तेव्हा ती मरावी अशीच प्रार्थना नास्तिकतेच्या वाटेवर असलेल्या बघ्याने आपल्या रेअर मागणीत केली होती. तिच्या प्रेताला जाळून झाल्यावर बघ्या घरी येऊन चहा प्यायला होता आणि तिसऱ्या दिवशी कोलेजला पण गेला. पुढे केव्हातरी मध्येच घरात रिकामी खुर्ची दिसली तेव्हा बघ्या भडभडून रडला. बघ्याच्या आत्ताच्या इमॅजिनरी इक्सरसाईज मध्ये त्याच्या आवडत्या स्थितप्रज्ञपणे तो एक एक मृत्यू निभावून नेतो. प्रत्येकाला तो शब्दांमध्ये नीट समराइज करतो आणि त्याच्या एक एक कप्प्यांत ठेवून देतो.
--
       बघ्याला दरी दिसते, तळ न दिसणारी, काळीशार, थंड हवेचे झोत वर सोडणारी दरी. त्याच्या आजूबाजूला कोणी तिथे जाऊ नये म्हणून लावलेले एक एक साईनबोर्ड्स. बघ्या एक एक साईनबोर्ड वाचत वाचत जातो. सर्वांत शेवटी एक साईनबोर्ड असतो ज्यांवर लिहिलेलं असतं ही काही खरी दरी नाही, ही काल्पनिक आहे. तरी कृपया इथे जाऊ नका.
       बघ्या दरीकडे पाहतो. तिथे एक मुलगा त्याला बोलवत असतो. बघ्या साईनबोर्ड ओलांडत पुढे जातो तेव्हा त्याला साईन बोर्ड्सच्या मागच्या बाजू दिसतात. त्यांना त्याच्या ओळखीच्या माणसांचे चेहरे असतात. दरीकडे चालणाऱ्या बघ्याला पाहून ते चेहरे माना फिरवतात, टिपे गाळतात, हाका मरतात. बघ्या बिचकतो.
       तो मुलगा बघ्याला त्याचे हात वर करून दाखवतो. त्याच्या हातात बघ्याच्या घराच्या कचऱ्यात मेलेलं मांजरीचं पिल्लू असतं, त्या मुलाच्या हाताला मान घासत. मग त्या मुलाच्या पाठून, दरीच्या काठाने बसलेली एक म्हातारी बाई तिच्या हातातलं पुस्तक मिटत बघ्याकडे पाहते. मुलगा पुढे येऊन बघ्याचा हात पकडतो, पिल्लू त्याच्या हातांत ठेवतो. बघ्या त्या पिल्लाला साशंक कुरवाळतो तशी तो मुलगा त्याच्या कोपऱ्याला ओढत दरीकडे नेतो. बघ्या दरीच्या काठाला पोचतो. ती म्हातारी म्हणते ऐका मी तुम्हाला ह्या दरीच्या तळाला काय ह्याची गोष्ट सांगते. बघ्या त्या मुलाच्या आणि म्हातारीच्या मधे बसतो. ते पिल्लू त्याच्या पायाच्या बोटांना आपली मान घासत पुढे-मागे फिरत राहते.    
     

          

हंपी

       कुटुंब-कबिला घेऊन आनंदी वाटायला जाण्यासाठी हंपी नाही. संपन्न होणारी, विस्तार पावू इच्छिणारी, प्रतिस्पर्धी साम्राज्यांना धुळीस मिळवू...