Tuesday, March 26, 2013

च्युXXकथा-१ : होळी रे होळी


इशारा: प्रस्तुत ब्लॉगपोस्ट ही ब्लॉग लिहिणाऱ्याच्या मनोरंजासाठी आहे. त्यात अन्य कोणाच्या मनोरंजनाचाही हेतू खरंतर नाही. तसे झाल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसेच सामाजिक संदेश, सामाजिक विधायक बदल, राष्ट्रनिर्मिती, संस्कार असा कुठलाही साईड इफेक्ट साधण्याचाही ह्या लिखाणाचा हेतू नाही. ब्लॉगरच्या क्षुद्र अस्तित्वापलीकडे हे सर्व आहे.
   
च्युXXकथा-१ : होळी रे होळी

      अम्या आणि पम्या हे खास मित्र होते. म्हणजे त्यांचे बालपण, त्यांची शाळा, त्यांचे तरुणपण हे सोबत गेले होते. पण त्यापलीकडे जाऊन ते एकाच प्रकारच्या पालकांच्या पोटी जन्माला आले होते. त्यांना एक एक धाकटी वगैरे बहिण होती. त्यांना शाळेत ८० ते ९० टक्केच्या दरम्यान मार्क मिळत. त्यांच्या आयांना ह्या गोष्टीचा सुप्त अभिमान वाटे. त्यांचे वडील तेच सरकारी ऑफिसात प्रामाणिक, निस्पृह असे (किंवा बाकी काही म्हणत तसे नेभळट किंवा गांडू) कार्यरत होते. त्यांच्या आधीच्या पिढ्या तश्याच कोणत्या गावी वगैरे असत, पण आता हे सारे पिढ्यान-पिढ्या नोकऱ्या करत कृथार्थ होत रिटायर होत. काही फरकही होते. जसे अम्या आणि पम्या हे कोणीही सरकारी कर्मचारी नव्हते. ते दोघेही जसे त्याच्या जवळपासचे सगळेच होत तसे इंजिनीअर होते. ते तसेच एखाद दोन वर्षे अमेरिकेत वगैरे जाऊन आले होते. त्यांना तसेच थोडेफार पोट, थोडे गाल आले होते. काही ठळक फरकही होते. जसे अम्याची आई त्याला नोकरी लागल्यानंतर लगेच वारली, किंवा गेली, किंवा मेली. त्यामुळे अम्या हा लगेच कर्ता, किंवा सवरता बनला. म्हणजेच त्याचे एका वर्षात लग्न झाले. ही मुलगी एक सूक्ष्म नोकरी करत असे. पण लग्नानंतर अम्याचे प्लानिंग का का जे असते ते फसलेच, आणि एकदम त्याची बायको गरोदर झाली. मग तिने सूक्ष्म नोकरी सोडली. त्यामुळे एकूणच अम्याच्या आर्थिक उन्नतीत त्याच्या खास मित्रांच्या तुलनेत फरक पडू लागला होता. त्यामुळे अम्या तेव्हाच अमेरिकेत गेला. तिथल्या दोन वर्षांच्या अनुभवाने आणि आर्थिक उबेने त्याला परत आल्यावर त्याच्याच शेजारात  नव्याने होऊ घेतलेल्या बिल्डींगीत एक हजारो स्क्वेअर फूटांचा फ्लॅट घेता आला होता. अर्थात अम्यावर त्याचे कर्ज होतेच. पण त्याचवेळी त्याच्या आजूबाजूंच्या अगोदर तो उन्नतीची शिडी चढू लागला होता.
      पम्याची गोष्ट इथे थोडी वेगळी होती. त्याची आई काही अशी वारली वगैरे नव्हती. त्यामुळे तो आधी २.७ वर्षे महाराष्ट्रातल्या एका विद्वान शहरात आणि नंतर आपसूक अमेरिकेतील एका ठिकाणी अशी नोकरी करत राहिला. त्याकाळात त्याने थोडे थोडे जग पाहिले. पण कुठेही तो आपल्या मार्गापासून ढळला नाही. म्हणजे तो नेमस्तपणे रहात असे, इथे-तिथे खर्च करत नसे. शक्य तितक्या स्वतात घरी फोन करत असे, स्वस्त तिकिटे मिळवत असे. मग त्याचे यथावकाश अशाच पद्धतीचे जीवन असणाऱ्या, पण मुलगी असणाऱ्या व्यक्तीशी लग्न झाले. त्याचे एक मोठेसे घरही झाले. आणि मग त्याला एक अपत्यही झाले.
      तर आता अम्याचे अपत्य, जे एक मुलगा आहे , ते सुमारे ११ वर्षांचे आहे तर पम्याचे अपत्य जेही मुलगाच आहे ते ५ वर्षांचे आहे. अम्याची पत्नी ही आता सुखवस्तू देहयष्टी (यष्टी हा शब्द इथे चुकतोच आहे) वगैरे असलेली आहे. त्याचा मुलगा अम्या सारखाच चांगली स्मरणशक्ती असलेला आहे. तोही ९० ते ९३.३७ ह्याच्या मध्ये पर्सेंट मिळवत असतो. पण अम्याच्या बायकोला, जी घरी असते, आणि त्यामुळे वर्तमानपत्रे, टी.व्ही., बिल्डिंग मधील इतर घरातील घडामोडी अशा रोचक विषयांची अपडेट ठेऊन असते तिला एकूणच तिच्या अपत्याच्या शैक्षणिक भवितव्याची आणि त्यानंतरच्या त्याच्या भवितव्याची आणि त्यानंतर त्याच्या पोटी येणाऱ्या नातवंडांच्या भवितव्याची चिंता सतावू लागली आहे. आणि त्यावर तिने आमटी, पोळी, कोशिंबीर बनवताना, किंवा दुपारी बाजूच्या बाईंच्या अमेरिकेतील मुलाच्या प्रगतीची साठा उत्तरी सफळ कहाणी ऐकताना उपायही माहित करू ठेवला आहे. आणि आता तिच्या मुलाला त्या उपायाच्या मार्गावर दौडवणे हेच तिच्या जीवनाचे ध्येय आहे.
     पम्याची बायको तशी कूल आहे म्हणता येईल. अर्थात इथे अम्याच्या आणि पम्याच्या बायकोची तुलना करण्यात अर्थ नाही. अम्याची बायको ही दुपारी तिसरीतील मुलांच्या शिकवण्या घेते तर पम्याची बायको तेव्हा वातानुकुलीत ऑफिसात काम (आणि फेसबुक) करत असते. अम्याची बायको ही संध्याकाळी गणपतीच्या देवळात जाऊन प्रदक्षिणा, गणपती स्तोत्र आणि मुलाच्य शैक्षणिक यशाची आराधना करत असते, तर तेव्हा पम्याची बायको लोकल मधून उतरून जिम मध्ये जाते.
      अम्या आणि पम्याच्या अशा आयुष्यातील एका समकालीन घडामोडीवर आपण येऊया. त्या आधी त्यांच्या अशा आदर्शवत आयुष्यातील एक काळी- किंवा धुरकट बाजू जाणून घेऊ. ती म्हणजे अम्या आणि पम्या हे दोघेही दिवसातून तब्बल तीन सिगरेट ओढत. म्हणजे आधी ते हव्या तेवढ्या सिगरेटी ओढत. पण नंतर जसे, जसे ते मोठे होऊ लागले तसे त्यांनी सिगारेट सोडायचे, किंवा कमी करायचे जे प्रयत्न केले त्याचे, किंवा त्याच्या बायकांच्या भावनिक दडपणाचे वगैरे परिणाम म्हणजे ते दुपारी पोळी-भाजी खाल्यावर, मग संध्याकाळी ऑफिसातून परतून घरापाशी आल्यावर आणि रात्री जेवणानंतर अशा तीन सिगारेटी ओढत. आणि रात्री अर्थातच त्यांना अत्यंत मानसिक तणावाखाली हे करावे लागे. केवळ रविवारी, जेव्हा अम्या आणि पम्या एकमेकांना भेटत तेव्हा चहाचा एक एक कटिंग आणि दोन सोगारेती आणि त्यासोबत चर्चा अशा सुखद आनंदाचा ते अनुभव घेत. अर्थात हेच सुख कधी कधी रविवार सोडून बाकीच्या सुट्टीच्या दिवशीही त्यांना मिळे.
      हा असाच एक दिवस आहे. ही धुळवडीची जिला आपण सगळे रंगपंचमी असेही म्हणतो त्या दिवसाची संध्याकाळ आहे. अम्याचा चेहरा हा किंचित लाल रंगाने रंगलेला आहे तर पम्याचा चेहरा हा आज होळी नव्हतीच असा आहे. थोडी पर्शाभूमी द्यायची झाली तर मागच्याच रविवारी, ह्या वर्षी होळी खेळावी ती कशी, किंवा ती खेळावी का नाही अशीही त्यांची चर्चा झाली होती. इथे हेही लक्षात घ्यायला हवं की मुळात असं तात्विक वादात पडणं ही अम्याची किंवा पम्याची, किंवा त्याच्या ह्या शहरात नोकरी करत कृतार्थ रिटायर झालेल्या खानदानांची पद्धत नाही. त्यांची पद्धत आहे सोय. म्हणजे जे करायचे आहे असे वाड-वडिलांनी सांगितले आहे ते सगळे करायचे, आणि त्याचवेळी ते सोयीच्या पद्धतीने वळवायचे असं. उदाहरणार्थ, पम्याच्या लग्नात मुहूर्त फारच उशीरचा आल्याने जेवणे, किंवा हस्तांदोलने आणि हसणे, किंवा काही काही भेटवस्तू नको नको म्हणत घेणे हे सारे आधीच पार  पडून मग उरलेले विधी केले गेले होते. किंवा अम्याची बायको तिसरीच्या मुलांना इतिहास शिकवताना मध्येच व्यंकटेश स्तोत्राच्या ओळी म्हणत असते. किंवा पम्याची बायको ही गणपतीत मोदक, किंवा होळीला पुरणपोळ्या हे सारेच आपल्या प्रकारच्या एका, ज्या गरजू असतातच, अशा बाईंकडून विकत आणते, किंवा अम्याच्या बहिणीच्या लग्नात अम्याला व्हिसाच न मिळाल्याने, पण त्याचवेळी होऊ घातलेला नवरा हाही प्रगतीच्या शिड्या सत्वर चढणार असल्याने त्याच्या अनुपस्थितीतच मंगल मुहूर्तावर लग्न झाले होते असे. अर्थात ह्यात काय चुकीचे म्हणा. गरजेप्रमाणे सोय ही छोट्या छोट्या बदलांची आया आहे असे म्हणता येईल.

इशारा: प्रस्तुत ब्लॉगपोस्ट ही ब्लॉग लिहिणाऱ्याच्या मनोरंजासाठी आहे. त्यात अन्य कोणाच्या मनोरंजनाचाही हेतू खरंतर नाही. तसे झाल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसेच सामाजिक संदेश, सामाजिक विधायक बदल, राष्ट्रनिर्मिती, संस्कार असा कुठलाही साईड इफेक्ट साधण्याचाही ह्या लिखाणाचा हेतू नाही. ब्लॉगरच्या क्षुद्र अस्तित्वापलीकडे हे सर्व आहे.

      तर त्या संध्याकाळी अम्या आणि पम्या भेटले. तेव्हा त्या सकाळी कशी काय झाली होळी हा त्याच्या चर्चेचा विषय होतंच. पण त्यातील खरं विषय होता तो त्यांची अपत्ये होळी बाबत प्रचंड एन्थू  असताना, आणि अम्या आणि पम्या हे होळीतील पाण्याच्या वापराबाबत चिंतीत असताना ह्या सगळ्या तात्विक गोंधळाचा काय जुगाड लागला. इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की अम्या आणि पम्या, किंवा ते ज्या एका वेगाने वाढणाऱ्या गटाचे चिन्ह आहे, त्यांच्या नैतिक घडणीकडे लक्ष दिले पाहिजे. १. तात्विक प्रश्नात न पडणे
२. त्याचवेळी आपण जे वागणार आहोत ते वागणे अडचणीत येईल असे न बोलणे (म्हणजेच वागे तैसा त्यातील थोडेफार बोले)
हे त्यांच्या नैतिकतेचे दोन प्रमुख घटक आहेत. मागच्या रविवारी हे दोन्ही घटक त्यांच्या चर्चेत आले होते. चर्चा सुरु झाली जेव्हा अम्याने पम्याच्या हातातील पोस्टर पाहिले जे पम्या आपल्या सोसायटीत लावणार होता. त्यावर कसे लोक पाण्यावाचून तडफडणार किंवा तडफडत आहेत, आणि आपण कसे पाणी उधळत आहोत, तर मग आपण कसे पाणी वाचवले पाहिजे, आपण कसे होळीत पाणी वापरणे टाळले पाहिजे, आपण कशी निव्वळ रंगानी होळी खेळली पाहिजे असे सारे मुद्दे असून त्यावर उपाय म्हणजे ‘यावेळी नको होळी, पर्यावरणाला द्या झळाळी’ असे यमकवाक्यही होते.
      अम्या त्या पोस्टरने प्रभावित झाला. अर्थात अशा कोणत्याही प्रभावाखाली फार वेळ न राहता बाहेर पडावे हा त्याचा स्वाभाविक गुणधर्मही जागा झाला. पण त्याचवेळी सिगारेटच्या ओढीने त्यांच्या आजूबाजूला जमलेल्या काही महानुभावांचे लक्ष त्या पोस्टर कडे गेले आणि चर्चेस प्रारंभ झाला. इथे हे लक्षात घेतले पाहिजे, की बाकीच्या आयुष्यात आपले कुटुंब आणि अपत्य, आपले जातभाई, आणि तद्नंतर किंवा सोबत आपले इष्ट-मित्र (आणि एवढेच) अशा प्रायोरिटी जरी असल्या तरी तंबाखू, सिगारेट किंवा दारू अशा व्यसनांत हे सर्व लयास जाऊन नशेच्या तरल अवस्थेचा जो अल्पकालीन बंधुभाव प्रस्थापित होतो त्यात कोणीही कोणाशी बोलू शकते.   
महानुभाव १: खरंय( पोस्टर कडे पाहून). अरे माझी बहिण आहे ...... तिथे शंभर रुपये देऊन दररोजचे पाणी द्यावे लागत आहे.
महानुभाव २: मग त्यांनी तिकडे होळी खेळू नये. आपल्याकडे पाणी आहे, आपण टँकर मागवू शकतो, मग आपण का होळी नाही खेळायची?
या प्रश्नावर तसे सारेच गप्प झाले. म्हणजे पैसे आहेत तो काहीही करेल ह्या सर्वमान्य तत्वाला तसा पटकन कोणता विरोधी मुद्दा सुचेना. तसे तिथे असलेले बहुतेकजण मुबलक, किंवा व्यवस्थित समृद्धी असलेले किंवा ती नसल्याने एक प्रकारचा नपुंसक नैतिक जळफळाट असणारे होते. पण तिथे अजूनही एक महानुभाव होते. त्यांनी एक बिनतोड मुदा मांडला.
महानुभाव ३: पण आज तिथे जे होतंय ते उद्या आपल्याकडे पण होईल. आणि तेव्हा हजारो रुपयांचा टँकर घेण्यापेक्षा आज काही शे रुपयांचं पाणी वाचवणं जास्त योग्य नाही का?
या व्यावहारिक नैतिक मुद्द्यावर माना डोलून एक प्रकारची सर्वसमावेशक शांतता आली. पण त्याचवेळी  महानुभाव २, ज्यांना तात्कालिक माघार घ्यावी लागली होती त्यांनी एक जबरी पेच टाकला.
महानुभाव २: पण लहान लहान मुले तर होळी एवढी एन्जॉय करतात. त्यांना काय सांगायचं? त्यांच्या आनंदाला काय पर्याय देणार?
इथे परत हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्याकडे महानुभाव २ ह्यांच्या प्रश्नासाठी काही उत्तरे असतील, जसे नैसर्गिक रंग, किंवा होळी ऐवजी एकत्र येऊन मुलांना एकत्र करून दम शेरास खेळणे आणि शेवटी बोधपर कथाकथन घेणे. पण इथे हेही लक्षात घेतले पाहिजे की तोंडाला रंग माखण्याची, पाठीवर जोरात फुगा फेकण्याची, किंवा चिखलात वगैरे लोळण्याची किंवा लोळवण्याची जी मजा आहे ती झ्याटभरही त्याच्या पर्यायांत नाही. किंबहुना आपले जे संस्कार वगैरे वाटतात ते बहुसंख्य मुलांना अत्यंत कंटाळवाणे असतात. किंवा माणसांत एकमेकांना छोटे छोटे सहन होण्याजोगे त्रास देऊन किंचित क्रूर आनंद घेण्याची वृत्ती आहेच. आणि सिगारेट प्यायला येणारी माणसे ही वरील तीन किंवा त्याच्या अन्य सब-प्रकारात येण्याची अत्याधिक शक्यता असल्याने महानुभाव २ ह्यांच्या प्रश्नावर खरेच सर्वजण गप्प झाले.
महानुभाव २ यांच्या प्रश्नाला उत्तर येत नाही असे दिसताच तेथे निर्माण होऊ पाहणाऱ्या तात्विकदृष्ट्या पेचदार शांततेची कोंडी तोडायला ‘नोस्टाल्जिया’ नावाच्या गोष्टीचा वापर सुरु झाला. म्हणजे आपल्या वेळेला कशी होळी आदर्श होती, आपण कसे पिचकाऱ्या वापरून कुरुक्षेत्रावरील धर्मायुद्धाप्रमाणे रंग खेळत असू, आता कसे कोणीही कुठूनही कुठेही पिशवी मारू शकते, तेव्हा कसे फुगे नळाला लावून लावून भरेतोच (फुगा आणि अन्य) फाटे, पण फुगा कसा कचकन लागे अशा नैतिकदृष्ट्या स्वच्छ भूतकाळापासून मग आपण कसे गच्चीवरून टाकलेला फुगा एका बाईच्या डोक्यावर पडला, तिने रस्त्यात कसा गहजब केला आणि मग असे केल्याबद्दल सलूनवाल्याने आपल्याला फुकट केस कसे कापून दिले, किंवा कसे होळीच्या निमित्ताने मुलींच्या गालाला, अंगाला आणि (...) स्पर्शता येत असे (असे न बोलता मनात हुळहुळणारे ), किंवा तेव्हा कसे पाणी मुबलक असे, कुठेच दुष्काळ नसे, अगदी भर उन्हाळ्यातही नळ धबधबा वाहत असे अभिमानास्पद सार्वजनिक, किंवा कशी लाकडे चोरली जात, कसे अंडी, सडकी फळे, चिखल, शेण यांचा वापर कॉलनीतील मुलांच्या सक्तीच्या चिखल लोळणीमध्ये होत असे असे तथ्यशील इंडिअन कन्फेशन आणि आता कसे सारेच बदलत काही मजा नसलेले होत चालले आहे असा सार्वत्रिक सुस्कारा आणि धूर टाकला जाऊ लागला. इथे अम्या आणि पम्या यांच्यातील अजून एक फरक लक्षात घेतला पाहिजे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आपण बदलायच्या नसतात, त्यांबाद्द्दल तक्रार करायची नसते तर त्यांच्याप्रमाणे बदलून नोकऱ्या करून आपल्या आई-वडिलांच्या आणि मुलांच्या पुढील २० वर्षांची सोय पाहायची असते हे अम्या आणि पम्या अनुवांशिकरित्या शिकले होते. त्यामुळे इथे ते नोस्टाल्जिया मध्ये सामील न होता मुलांनी होळी खेळावी का नाही, आणि ह्याबाबत जे काही ते (अर्थात वैयक्तिकरित्या) ठरवणार आहेत ते त्यांच्या कुठल्याही अन्य गोष्टीला धक्का न लावता कसे करता येईल याचा सूक्ष्म विचार करू लागले.
अम्या: हे पोस्टर बरोबर आहे. पण एकदमच होळी खेळू नका कसं म्हणणार? म्हणजे शेवटी सण आहे तो आपला.
पम्या: अरे हे सण आपण ‘त्यांचं’ बघूनच करतो आहोत. तिथे मुबलक पाणी वाहतं उन्हाळ्यात. सण तर फक्त होळी पेटवण्याचा आहे.
पम्याच्या ह्या प्रगतीशील बोलण्याने अम्या गप्प झाला. अम्या आणि पम्याच्या मध्ये ही एक दरार आहे. म्हणजे कदाचित लग्न उशिरा झाल्याने, किंवा अमेरिकेत ३.६४ महिन्यांचा जास्त काळ राहिल्याने, किंवा त्याच्या मित्र-परीवारामुळे पम्या हा त्याच्या प्रकारची अन्य कुटुंबे जे करतात त्यापासून बदलत चालला आहे. म्हणजे असे अम्याला वाटते. म्हणजे पम्याने आता गणपतीची कायमस्वरूपी मूर्ती आणली आहे आणि तीच तो दरवर्षी वापरतो. अम्या इथे शाडू मातीची मूर्ती आणू लागला आहे. पम्याने त्याच्या प्रकारचा बिल्डर किंवा लोक राहतात अशी नव्याने होऊ घातलेली बिल्डिंग सोडून एका ते सगळ्या प्रकारचे लोक राहतात अशा बिल्डिंग मध्ये जागा घेतली आहे. आणि त्यामुळेच तो असं काही बोलू लागला आहे.
पम्या: (अम्याची शांतता भेदत) अरे सणामागे उद्देश असतील पूर्वी, पण आता केवळ प्रथा आहेत. आणि शेवटी वी शुड थिंक अबाउट सस्टेनेबल फ्युचर (इथे एक जोरदार कश) आणि शेवटी तिथे दुष्काळात आहेत दोज आर अवर ओन पीपल यार.
अम्या: अरे पण मी माझ्या अपत्याला ती स्टेनगनवाली पिचकारी आणेन असं प्रॉमिस केलं आहे.त्याला कुठे हे सांगू सस्टेनेबल किंवा दुष्काळ वगैरे?
पम्या: आमच्या सोसायटीत आम्ही नॅच्युरल कलर्सची होळी ठेवली आहे १५ वर्षांखालील मुलांसाठी. पण पाणी नाही.
अम्या: पण घरी आंघोळीला लागेल ते?
पम्या: ते घरात होईल ना ज्याच्या-त्याच्या. प्रश्न एकत्र येऊन पाण्याची नासाडी करण्याचा आहे.
अम्याला तसा हा मुद्दा पटत नव्हता. पण तो प्रचंड सोयीचा आहे हे त्याला कळलं. आणि त्याने एकूणच चर्चा क्रिकेट, मार्केट, शेअर्स, मित्र, मृत व्यक्ती अशा हमखास मुद्द्यांकडे नेली होती.
      तर ही झाली होळी अगोदरच्या रविवारची पार्श्वभूमी. आणि आता होळीच्या संध्याकाळी अम्या आणि पम्या हे चहाचा कटिंग आणि दोन सिगारेटी असे सुख मिळवायला आलेले आहेत. अम्याचा चेहरा किंचित लालसर आहे तर पम्याचा अजिबात रंगलेला नाही. पण पम्या मध्ये एक सूक्ष्म बदल आहे. जो नंतर येईलच.
पम्या: काय रे खेळला वाटतं होळी?
अम्या: फक्त चेहऱ्यावर. ते पण खास ग्रामीण भागातून आलेल्या नैसर्गिक रंगांनी.
पम्या: आणि तुझे अपत्य?
अम्या: अरे तो तर एक किस्साच झाला. सकाळी सकाळी तो हट्ट करायला लागला स्टेनगन आणा, त्याचे मित्र एकत्र जमून खेळणार आहेत तिकडे न्या असा. आणि त्याच्या आईला जाम चालत नाही असं. त्याच्या मित्रांना एकतर ८५ ते ८८.४७ पर्सेंट किंवा ९३.७८ ते ९५.२३ पर्सेंट पडतात आणि अशा मुलांमध्ये त्याने अजिबात खेळू नये असं आहे तिचं.
पम्या: का रे?
अम्या: अरे खेळता खेळता ते सगळं विचारून घेतील तर त्याच्याकडून.
पम्या: काय?
अम्या: तेच, म्हणजे अभ्यास, अजून १७ महिन्यांनी कुठले कोर्सेस तो घेणार आहे, किंवा काय...
पम्या: ओह. मग?
अम्या: त्याची आई तर त्याला सोडत नव्हती बाहेर. मग आम्हीच बाथरूम मध्ये जुने कपडे घालून होळी खेळलो. म्हणजे असंच थोडं.
पम्या: त्याने ऐकलं एवढ्या लगेच?
अम्या: नाही रे. तो रडायलाच लागला होता. मग तो आंघोळीला गेला तेव्हा मी गुपचूप जाऊन त्याला थोडा नैसर्गिक रंग लावला. जुने कपडे दिले आणि जुनी पिचकारी पण दिली.
पम्या: पण हे तरी त्याने कसं अॅकसेप्ट केलं यार?
अम्या: कुठे केलं? पण आम्ही बाथरूम मध्ये असतानाच त्याच्या आईचा आवाज ऐकायला आला. त्यात गणपती स्तोस्त्राच्या ओळी हाय पीच मध्ये होत्या. मग आम्हाला दोघांना सिग्नल मिळाला. आणि नंतर मी त्याच्यासोबत चेस खेळलो. मग स्वारी खुश. आणि मग पुरणपोळ्या.
पम्या: त्या तर वाहिनी सॉलिड करतात यार.
त्यानंतर पम्या एकदम खोया खोया वाटू लागला. इथेच तो थोडा वेगळा वागतो आहे याची शंका अम्याला येऊ लागली. मग त्याने प्रश्न विचारण्याची भूमिका घेतली.
अम्या: तू काय केलं?
पम्या: नाही खेळलो. आपण पोस्टर लावलेले, आपणच कसे खेळणार यार?
अम्या: आणि अपत्य?
पम्या: हा हाहा. मी तर त्यालाही कार्टून लावून दिलं होतं डीव्हीडीवर. आणि मग गेम झोनला नेईन म्हटलेलं दुपारी.
अम्या: मग?
पम्या: तेवढयात सोसायटीचे सेक्रेटरी आहेत ताडकर. ते आले. सोसायटीच्या कमिटीसाठी खास थंडाई होती आणलेली.
अम्या: मग?
पम्या: जाम इनसिस्ट करतात यार. आणि त्यांनीच सगळं कलर्स वगैरे अरेंज केलेले. मग घेतला ०.३५६ ग्लास.
अम्या: मग?
पम्या: घरी गेलो तेव्हा ही जस्ट बाथ घेऊन आली होती. मग अपत्याला म्हटलं, कलर्स मध्ये खेळायची मजा कुठेच नाही. जा, सर्वांना नीट कलर्स लाव. तो तर तयारच होता.
अम्या: (घशातच) हं,हं,. हह.
मग सिगारेटी आणि चहा संपवून ते घरोघर परतले.  

इशारा: प्रस्तुत ब्लॉगपोस्ट ही ब्लॉग लिहिणाऱ्याच्या मनोरंजासाठी आहे. त्यात अन्य कोणाच्या मनोरंजनाचाही हेतू खरंतर नाही. तसे झाल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसेच सामाजिक संदेश, सामाजिक विधायक बदल, राष्ट्रनिर्मिती, संस्कार असा कुठलाही साईड इफेक्ट साधण्याचाही ह्या लिखाणाचा हेतू नाही. ब्लॉगरच्या क्षुद्र अस्तित्वापलीकडे हे सर्व आहे.

विशेष धन्यवाद: धवल जोशी, अच्युत आठवले आणि आठवण 

Thursday, March 14, 2013

साहिब, बीबी आणि...... ब्लॉगपोस्ट

     मी पहिल्यांदा 'साहिब, बीबी और गँगस्टर पाहिला तेव्हा एका परक्या शहरात वेळ घालवणं हा माझा उद्देश होता. पण एकदम ते जुगनी सुरु झालं, मग एकदम ते निवांत रस्ते, खानदान, राज्य अशा तमाम ऐतिहासिक धुंदीत जगणारी माणसे, इशाऱ्यागणिक उडणाऱ्या गोळ्या, आणि अदमास न येणारा शेवट असं आलं आणि मला तो साहिब, बीबी आणि गँगस्टर लक्षात राहिला. मग तीग्मांषु धुलिया भेटले ते गँग्स ऑफ वासेपूर मध्ये रामाधीर बनून, 'बेटा, तुमसे न हो पायेगा' ,'जबतक ये सानिमा है हिंदुस्तान मे लोग चुत्या बनते रहेंगे' वगैरे खास बोलताना. सोबत पानसिंग तोमर, आणि आता 'साहिब, बीबी अन्ड गँगस्टर रिटर्न्स'  ..
     मला तर हा पिक्चर आवडलेला आहे. तो मी तीन दिवसांत दोनदा पाहिलेला आहे. पण हे तर आत्मचरित्रपर झालं, आपण थोडं ब्रॉड होऊया.
    तर 'हासिल' मी जेव्हा पाहिला तेव्हा माझा भ्रमनिरास झालेला. माझ्या एका मित्राने युनिव्हर्सिटी पोलिटीक्स वगैरे कसं जबरदस्त आहे त्यात वगैरे सांगून मला तो बघायला लावला होता. आणि पहिला हाफ होताही ग्रीपिंग, छा जानेवाला इरफान खान असलेला. पण नंतर कुंभमेळा, हिरो-हिरोईन यांचं शाश्वत वगैरे मिलन अशा धोपट प्रकारात तो संपतो. त्यामुळे तीग्मांशू धुलिया प्रकाराबाबत मी जरा साशंक होतो. म्हणजे थोडं असं आहे की आपण रोहित शेट्टी घेऊ शकतो कारण तो काही लपवत नाही. मी चुत्या, तुम्ही बघायला आलेले चुत्ये आणि चला आता एकमेकांना चुत्या बनवत हिट चित्रपट करूया, सोपा सरळ मामला. पण बांधीव स्टोरी सुरु करून एकदम तिला धोबी-पछाड देऊन एक हिरो, एक व्हिलन, एक हिरोईन आणि दुर्जनांचा नाश, सज्जनांचे प्रतिपालन वगैरे आलं की माझी जरा गडबड होते. (इंडियात राहिल्याचा परिणाम म्हणा...!) साहिब,बीबी हे अशा वाटेला जात नाहीत. त्यात सारेच कमी-जास्त डिग्रीचे स्वार्थी आहेत, आणि ते बिनदिक्कत त्यांच्या आकांक्षा, त्यांचे स्वार्थ आणि यांच्या अधे-मध्ये असणाऱ्या त्यांच्या भावना यावर जगतायेत. आणि त्यांच्या या खेळापाठी कॅनव्हास आहे तो जुन्या संस्थानिकांचा सुंभ जाळून उरलेला पीळ आणि त्याचवेळी नव्या लोकशाही राजकारणात तगून राहायची धडपड ह्याचा. आणि तीग्मांशू धुलियाचे संवाद, दिग्दर्शन, लोकेशन्स आणि माही गिल, जिमी शेरगिल ह्यामुळे हा प्रकार लक्षणीय झाला आहे.
    मुळात साहिब, बीबी.. हे नावच एका क्लासिकची आठवण करून देणारं. आणि चित्रपटाचा प्राथमिक ढाचा त्या क्लासिकशी मिळता-जुळता. एक रंगेल साहिब, एक त्यावर बायको म्हणून प्रेम करणारी आणि त्याचवेळी स्वतःचे म्हणून डंख असलेली बीबी आणि मग त्या दोघांच्या मध्ये येणारा अजून एक. साहिब, बीबी और गुलाम मध्ये केवळ छोटी बहूच्या वैवाहिक आणि व्यक्तिगत जीवनाच्या एकमेकांना घासणाऱ्या प्रतालांची आणि त्यात आलेल्या भूतनाथ नावाच्या संवेदनशील पण निरुपद्रवी गुलामाची गोष्ट होती. तीग्मांशू धुलियाने ह्या गोष्टीच्या पाठी राजकारण, लालसा, आकर्षण आणि महत्वाकांक्षा यांचा अस्सल देसी मसाला घालून मजा आणला आहे. आणि पाहिला भाग रणदीप हुड्डाच्या राकट अभिनयाने लक्षात राहिला असेल, तर दुसरा भाग इरफान खान नामक जबरी प्रकारासाठी बघायला हवा.
     आपण संस्थानिक होतो ह्या माजावर जगणारा, रगेल आणि रंगेल पण त्याचवेळी भावनाविवश इंदरजीत सिंग इरफान खानने उभा केला आहे. पण ही ओळख पुरेशी नाही. चित्रपटातले प्रभू तिवारीच्या मुलाखतीचे आणि शेवटचा इंदरजीत सिंगच्या अल्टीमेट गॅम्बलचा प्रसंग पाहिला तर इरफान खानच्या ताकदीची कल्पना येईल. यातला शेवटचा प्रसंग तर एकदम घिसापिटा भावूक आहे, पण इरफान खानच्या सुजल्यासारख्या डोळ्यांनी, त्यात असणऱ्या हे होतं माझं पण मला मिळालं नाही ह्या घायाळ भावनेने तो प्रसंग लक्षात राहण्याजोगा झाला आहे.
    राज बब्बर आणि पदार्पण करणारा प्रवेश राणा ह्यांनीही जमेल तिथे पंच दिला आहे. प्रभू तिवारी, रुडी, कन्हैय्या ह्यांची जोड अचूक आहे.
    आता उरले जिमी शेरगिल आणि माही गिल. शब्दशः आणि सामार्थ्यानेही पांगळा झालेला आदित्य प्रताप सिंग जिमी शेरगिलला जमला आहे. तो अजिबात सज्जन किंवा तत्वे वगैरे असणारा नाही. तो महत्वाकांक्षी आहे, आणि तो चित्रपटाच्या कथेचा केंद्रबिंदू आहे. डायलॉग मारतानाचा आब. आपल्याला हवे ते करवून घेण्याचा निर्दयी हेकेखोरपणा आणि फारसा स्पष्ट न होणारा भावनांचा गुंता हे सगळं जिमी शेरगिलला जमलं आहे.
  माही गिलच्या बाबतीत बोलण्यापेक्षा तिच्या सायको अभिनयाची, तिच्या मिजासीची, तिच्या पैशांसाठी, शरीरसुखासाठी एकदम हपापले होण्याची आणि शेवटी एकदम चीतपट मारत डाव जिंकण्याची गंमत पहायची असेल तर तुम्ही साहिब, बीबी.. पहाच.
   बाकी ही काही 'प्रेमाची गोष्ट' नाही, त्यामुळे यांत खांस साजूक नैतिकता नाही. यांतले पुरुष तमाम इष्कबाजी, अय्याशी करूनही प्रेमात पडतात, त्यात मारतात-मरतात. ह्यातल्या स्त्रिया दारू पितात, त्यांचे यार वगैरे असतात , आणि तरीही त्यांच्या आत प्रेम, वासना आणि महत्वाकांक्षा यांना वेगळं करणारी रेष धगधगत असते.       त्यामुळे डिस्क्लेमर सह पहावा.
   आता थोड्या शिव्या.
     मुग्धा गोडसे का नाचवली आहे हे कळत नाही. तसाच एकदम बांधेसूद फर्स्ट हाफ नंतर चित्रपट इमोशनल वळणे घेत संपतो, का? हा का, अर्थात तीग्मांशू धुलियाच्या बहुतेक चित्रपटांना विचारता येईल. अगदी पानसिंग तोमरलाही.
   आता दोन शेपट्या.
    जुगनी नावाची थिरकती धून चित्रपटात आहे. त्या 'जुगनी' वरून आठवलेलं हे वाचलेलं काही. 'कारवा' नावाच्या अंग्रेजी मासिकात एक विचित्र लेख आला होता. बलात्काराबाबत थोडेसे सामाजिक, तात्विक प्रश्न उभा करणारा हा लेख एकदम जुगनी हा शब्द, त्याच्या छटा अशा काव्यात्म पद्धतीत जातो. पण तो लेख जरा वाचण्यासारखा आहे. किंबहुना हे मासिकच जरा चाळण्यासारखं आहे. ते थोडं डावीकडे जातं, पण तरीही.
   दुसरं, मला एकदमच असं वाटू लागलं आहे की अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज, तीग्मांशू धुलिया आदी लोक हे एक खास भारतीय जोनर उभं करत आहेत. कबूल, की गोष्टीचे काही ढाचे, जसे 'द गॉडफादर' हे मूलभूतच आहेत. पण त्यावर जो इमला उभा केला आहे तो खास इथला आहे. आणि मला ही मागच्या २० एक वर्षांत झालेल्या आर्थिक, इंटरनेट (आणि पायरसी) आणि थोड्याफार वैचारिक उघडणीची फळं वाटतात (एकदम वैयक्तिक मत बरं का!) आणि हे जोनर रंजकता आणि गोष्ट या दोन महत्वाच्या गोष्टींशी तडजोड न करणारं आहे हे महत्वाचं. म्हटलं तर ह्या गोष्टी त्याच स्टिरीओटाईप आहेत. तीच मारकाट, तेच शह-काटशह, तसाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सेक्स, पण त्याला चांगली-वाईट अशी दोन टोके नाहीत. त्यात माणसे आहेत, आणि मला ते आवडतं. नैतिक संदेश, घाऊक मजा यापलीकडे जाऊन डोक्याला झिणझिण्या देऊ पाहील, आणि चित्रपट बघून आल्यावर इमिटेट करण्याजोगं काहीतरी असेल असं काही बनतं आहे..
 
   आता स्मरणार्थ, उदाहरणार्थ एक तात्पर्यपर वाक्य: 'तुम्हे पता है मर्द इतनी गालिया क्यों देते है, ......, क्योंकी वो रोते कम है'  
  (तळटीप सुद्द्धा: 'मर्द' काढून वाचलंत तरी मजा येऊ शकेल)          

Monday, March 4, 2013

चाळेगत- कदाचित १


      हा मला मिळालेला एक प्राचीन खो आहे. जिथून हा खो उगम पावला आहे तिथे दोन प्रकारच्या गोष्टी उगम पावल्या आहेत, एक अशा कथा-कादंबऱ्या ज्या वाचक वर्गाने डोक्यावर तर घेतल्या आहेत, पण तशा त्या काही फार खास नाहीत. किंवा अशा काही कथा-कादंबऱ्या ज्यांत काहीतरी वेगळं, वाचनीय, अस्वस्थ करणारं किंवा आपल्याला न स्पर्श केलेलं आहे, पण अजून त्या कादंबऱ्यांना हवं तेवढं नाव, वलय, प्रसिद्धी नाही.
      पहिला कोणाची मारण्याचा प्रकार, वैयक्तिकरित्या मला खूप आवडत असला तरी आत्ता मला तो नेमका कशावर वापरावा हे सुचत नसल्याने बाद आहे. मग राहिला दुसरा.
      ‘चाळेगत’ बाबत मी पहिल्यांदा वाचलं होतं ते शांता गोखल्यांनी ‘मिंट’ नावाच्या एका पिंक पेपरच्या शनिवार पुरवणीत दिलेल्या एका मुलाखतीत. त्यात मराठीत दोन नवे उमदे लेखक कोण वाटतात ह्या बाबतीत त्यांनी दोन नवे लेखक आणि त्यांची आवडलेली पुस्तकं सांगितली होती. त्यात एक होते (जरी त्यांनी ‘अय्या’ नावाचा जबरी कलात्मक चित्रपट काढून मज सारख्या चाहत्यांच्या थोतरीत दिल्यासारखी केली होती) ते सचिन कुंडलकर आणि त्यांचे ‘कोबाल्ट ब्ल्यू’ आणि दुसरे म्हणजे प्रवीण बांदेकर आणि त्यांचे ‘चाळेगत’. मला ते नाव जाम आवडलं. त्याचा अर्थ भुताटकी सदृश्य काहीतरी होतो असंही शांता गोखल्यांनी म्हटलं होतं. त्यात हा लेखक मराठी विद्येचे, त्यामुळे विद्येतून प्रसावणाऱ्या लेखन, विचार, कला आदि (चौसष्ट बरं) कलांचे माहेरघर असं की असल्याने, किंवा अशा कलांचे कदरदान सासर, किंवा यार असणाऱ्या, अनुक्रमे पुणे आणि मुंबई अशा कोणत्याच ठिकाणचा नाही असं दिसत असल्याने तर माझे कुतूहल जामच चाळवले गेले होते. पण तेव्हा ‘चाळेगत’ कुठेच मिळाले नाही. मग एक दिवशी माहेरघरात ते मिळालं.
      मी हे पुस्तक विकत घेतलं तेव्हा माझी मनस्थिती काय होती? म्हणजे तात्कालिक म्हणा. तेव्हाची. मी आणि माझा मित्र, सांगली जिल्ह्यातल्या एका गावी चाललो होतो. तिथल्या पाणी प्रश्नाबाबत छापून येत होतं सारखं, तर काय आहे ते पाहू म्हणून. आणि सहा एक तासांचा बसप्रवास करताना मी चाळेगत वाचायला सुरुवात केली.
      शहरात जन्मलेल्या, वाढलेल्या मला, आणि मग कदाचित माझ्यासारख्या बाकी माणसांनाही शहराच्या सीमा विरत विरत डोंगर, नदी, मोकळी पठारे, मैदाने, शांत पहुडल्यासारखी वस्ती असं दिसायला लागलं की हे आपल्या अनुभवकक्षेत अजून आलेलं नाही असं वाटत राहतं. तेव्हा बसमधून जातांनाही असलंच काही वाटायला सुरुवात झालेली. आणि ‘चाळेगत’ चा संकासूर आला एकदम. त्या आधी पांडुरंग सांगवीकर, चांगदेव पाटील ह्यांना आणि अन्यांना वाहिलेली अर्पण(का तर्पण)पत्रिका आली. मग एकदम थेट बोलणारा, आणि मी बोलतोय ते कादंबरीतलं वास्तव, त्याचं खरं-खोटं, त्यातल्या भूमिका असं थोडसं गोंधळाचं, आत्मवृत्तपर फिक्शन देणारा नमनाचा भाग आला. मी वाटेत फलटणला प्रायोगिक तत्वावर एक मळीचा बार मारला, त्याचा शहारा अंगभर पसरून घामेघूम होत असतानाच आला एकदम संकासूर. आणि मग हळूहळू ‘चाळेगत’ ची तमाम गोष्ट.
मला इथे त्या गोष्टीबाबत काही फारसं बोलायचं नाही. मला विचार करावासा वाटतोय तो ह्या प्रश्नाबाबत की एखादी कादंबरी हिट, प्रसिद्ध का होते आणि एखादी का नाही. किंवा चाळेगत मी कुठल्या वर्गवारीत ठेवू. मला तिची किक का लागली? आणि माझ्या वैयक्तिक अनुभवापलीकडे तीच्यात खरंच काही आहे का?
एखाद्या कादंबरीचं हिट होणं, म्हणजे आवृत्तीमागून आवृत्ती, किंवा कायम वृत्तपत्रीय चर्चेत. मला स्वतःला एखादी कादंबरी हिट होते याचा चांगला निष्कर्ष म्हणजे तिची माउथ पब्लिसिटी. एक वाचणारा दुसऱ्या वाचणाऱ्याला हे वाचावसं आहे म्हणून कोणती नावं सांगतो ह्याचा विचार केला तर अशा प्रसिद्ध कादंबऱ्या कोणत्या हे लक्षात येईल. मला जिथून ‘खो’ मिळाला आहे तिथे ज्या कादंबरीचा  उल्लेख आहे तीही अशीच, एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला अशी सांगून, वाचायला देऊन, शेअर करून माहित झालेली कादंबरी. अर्थात माउथ पब्लिसिटी हा इतका चांगला निष्कर्ष नाही. किंवा त्याच्याशी लागून असलेला लोक एकमेकांना काय वाचायला देतात, किंवा त्याच्या आधी विकत काय घेतात ह्या निकषातही काही गोंधळ आहे. पुस्तकं विकायचा जो काही त्रोटक अनुभव मला आहे त्यात हे स्पष्ट समजतं की वाचकांचे दोन गट आहेत. आणि त्यात फार काही सामाईक नाही. म्हणजे त्यांना काय वाचावसं वाटतं, ते काय विकत घेतात आणि ते कशाला चांगलं वाईट म्हणतात यांत फारसं काही सामाईक नाही. एक गट असा म्हणता येईल जो रंजकता, रिकाम्या वेळेत मन रमवायला वाचतो. आणि दुसरा गट जो कमी जास्त प्रमाणत व्यसनी गट. तो वाचतो तो व्यसनी म्हणून, आणि त्याला त्या व्यसनातून, कदाचित स्वतःला थोडासा त्रासही देणारी एक किक घ्यायला आवडतं. वाचकांचं अशा दोन गटांत वर्गीकरण केलं तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. रंजकता गटात येणाऱ्या माणसांना ते वाचतात त्याच्यातून त्यांचा वेळ मजेत जावा, नॉस्टाल्जिया, अभिमान, भावनिक, लैंगिक आकर्षण अशा सुख देणाऱ्या संवेदनांच्या तारा थोडा वेळ छेडल्या जाव्यात यापलीकडे जेन्युअनली काही नको असतं. कदाचित त्यांच्यातल्या काहीजणांना इतिहासाचे, परंपरांचे सोयीस्कर मर्यादित अर्थ काढायचे असतात. पुस्तक चांगलं का वाईट हा प्रश्न फार तिथे नसतोच. आपल्याला जी वाचणारी माणसे माहित आहेत त्यांच्या रेफरन्सने पुस्तक वाचायचं, काही घंटे मजेत गेले, काम खतम, थोडी उभारी वगैरे आली, रक्त उकळलं थोडा वेळ तर और थोडा मजा.
असा गट मोठा आहे फार. संख्येने, क्रयशक्तीने, आणि आपल्या बाळबोध भाबड्या आदर्शवादी वातावरणानेही. म्हणून मराठी हिट पुस्तके म्हणजे महाभारत, शिवाजी महाराज, पेशवे, पानिपत, स्वातंत्र्यलढा आणि मग असंच ह्यांच्या ग्रँडस्केलशी जुळेल असं, किंवा मग एकदम पु.ल., व.पु. आणि.., जुन्या आर्थिक आणि वैचारिक मध्यम वर्गाला कुरवाळणारी, हवे किंवा नको तिथे सुखद चिमटे घेणारी आणि शेवटी आपलं (भारतीय म्हणा, मराठी म्हणा, काही न जमल्याने आलेले स्युडोवैराग्य म्हणा) ते लाल हो असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष झेंडा उंचावणारी.
व्यसनी वर्गातली पुस्तकं अगदीच आपल्याला माहित नाहीत असं नाही. कोसलाबद्दल ऐकलेलं तरी असतं, काही पानं वाचून काय रे हे बाबा असं म्हणून बाजूला ठेवलेलं. अजून फार पुढे खोदायलाच नको.  
चाळेगत रंजकतेच्या वर्गात नाही. पण त्यात थेट किक आहे असंही नाही. कारण ते त्याच्या फॉर्मशी सुरुवातीलाच फार प्रयोग करतं. आणि त्याने कदाचित त्याच्या मुळाशी, त्याचं असं ओरिजिनल असं जे आहे ते मिळायला वेळ लागतो. मला आवडलेल्या पुस्तकांच्या बाबतीत माझं एक ढोबळ निरीक्षण आहे. तुम्हाला डोक्यात भिनत जाणारा आनंद देणारं पुस्तक सुरुवातीला, सुरुवातीच्या काही पानांत तुम्हाला दूर लोटू पाहतं. ते जसं काही तुमच्या दमाला, संयमाला जोखत असतं. तुम्हाला खरंच वाचायचं आहे का नुसतंच वेळ घालवायचा आहे असा प्रश्न विचारतं. ती सुरुवातीची पानं ओलांडून तुम्ही टीकलात की मग मजा यायला लागते. ‘चाळेगत’ ह्याला अपवाद नाही. पण एवढंच त्याचं वेगळेपण नाही.
कोसला, चांगदेव चतुष्टय (किंवा असंच काही ते) ह्या लिखाणात जो सांगणारा आहे तो वेगळा आहे, पण त्याच्यावर यकीन ठेवता येतो, तो कोण आहे ह्याचा धक्का बसत नाही. तिथे फॉर्म, सांगण्याची धाटणी वेगळी असली तरी काहीतरी आहे, स्थिर आहे. कथा नसली किंवा जे काही आहे ते तिच्या लयीत घडत राहतं. श्याम मनोहरांचं ‘कळ’, मकरंद साठे यांचं ‘अच्युत आठवले आणि आठवण’, काही प्रमणात कमल देसाई हे फॉर्मलाही अस्तित्ववादी प्रश्न विचारतात. मला स्वतःला ‘कळ’ झ्याट झेपलेलं नाही. ‘अच्युत आठवले आणि आठवण’, ‘रंग-२’ मी वाचू शकलोय, थोडीफार त्यांच्यात काय होतंय हे कळतंय असं वाटलं. पण ते आधीच्या नेमाडीय साहित्याहून वेगळे आहेत, आणि त्यांची किक सुद्धावेगळी आहे. म्हणजे त्याच्या नशेची जातकुळी वेगळी आहे. मला स्वतःला ‘अच्युत आठवले आणि आठवण’ वाचून झाल्यावर तसं फारसं काही वाटलं नाही, अगदी हताश, रिकामा, खिन्न करणारी भरीव जाणीवही नाही. झालं वाचून, इट वॉज डीफ्रंट असं, कदाचित एवढंच. त्यातला सटल उपरोध, त्यातला मध्येच आत-बाहेर होणारा निवेदक, संगणक, नॉर्वे, स्वीडन, अमेरिका हे शैलीचे प्रयोग लक्षात घेऊनही. ‘चाळेगत’ पहिल्यांदा वाचलं तेव्हा एका संवेदनशील माणसांच्या हरवणाऱ्या भोवतालची, त्याच्या आकुंचित, बेगडी होत जाणाऱ्या परिघाची जळती मोहोर सोडण्याइतकं ते ताकदवान वाटलं. मग आत्ता ते परत वाचताना ते वेगळे वाटायला लागलंय. कदाचित मी निब्बर झालोय, पुस्तक तेच आहे.
ठीके. एका लेखकाची कथा, त्याच्या लिखाणाची कथा, एक सामाजिक, राजकीय, वैयक्तिक अशा एकांत एक गुंतलेल्या, म्हणाल तर अधुऱ्या, अपुऱ्या वास्तवाची काल्पानिक गोष्ट. आणि ही कथा सरळसोट येत नाही. तिच्यात सामाजिक चळवळींचे, विचारांचे, वादांचे खुंटे ठोकलेले आहेत. ते जाचतील काही जणांना. मराठी हिट साहित्यांत, पुस्तकांत, पिक्चरांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जी एक स्टिरिओटाइप मांडणी आहे त्याला चाळेगत सहज वाकवतं, ते थोडं त्रासदायकही होतं.
‘चाळेगत’ सारख्या पुस्तकावर, आणि त्याच्याच अनुषंगाने म्हणाल तर ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ अशा नाटकांवर फार धुळवड झाली नाही. तसं त्यात वापरलेल्या व्यक्तिरेखा ह्या जरी फिक्शनलाइज केल्या असल्या तरी त्यातले नामसाधर्म्य लपणारे नाही. आणि असं असूनही महाराष्ट्रातले स्वयंप्रेरित सेन्सॉर जागले नाहीत ह्याला काय म्हणावं? म्हणजे आपण कलेच्या स्वातंत्र्याचा, त्यात लेखक वापरू शकतो अशा उपरोधाचा आदर करायला शिकलोय का अशा कलाकारांच्या निर्मितीने मतांच्या, सत्तेच्या गणिताला झ्याट फरक पाडत नाही असा विश्वास स्वयंप्रेरित सेन्सॉरना आला आहे? मला स्वतःला तरी काहीच धुळवड न झाल्याचं वाईट वाटतं. किमान ह्या निर्मितीच्या पाठी जी आयडियालॉजी आहे, आणि ह्या निर्मिती ज्या कथित-तथाकथित आयडियालॉजींचा उपरोध, विरोध करतात त्यांच्या समर्थनाचे, किंवा टीकांचे आवाज येत नाहीत हा मला चांगला सिग्नल वाटत नाही. अशा शांततेने काही तोटेच होतात. जसे ह्या पुस्तकांची, नाटकांची फुकट प्रसिद्धी होत नाही. चौकटीला हादरे देणारं आणि चौकट एक्सपांड करणारं काही कोणाला कळतंच नाही. म्हणा अशा कळण्या- न कळण्यानेही काय होतं? पण नुसत्याच मचूळ संथ शांतातेला हादरे आले तर वाईच मजा.
चाळेगत हे जसं मला एक वाचलं जावसं पण फार कोणाला न कळलेलं पुस्तक वाटतं तसं अजूनही काही पुस्तकांबद्दल वाटतं. त्यात आधी प्रभाकर पेंढारकर यांचं ‘अरे संसार संसार’ होतं, मग त्यात श्री.दा. पानवलकर आले. पण आत्ता ‘चाळेगत’ बाबत एवढंच.                                                           

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...