Skip to main content

बघ्या, दाभोलकर आणि मंगळागौर

बघ्या सकाळी मित्रासोबत चहा पीत असताना त्याला दाभोलकरांची गोळ्या घालून हत्या केली असं कळलं. त्याला धक्का बसला. का?
  १. तो केव्हातरी दाभोलकरांच्या नात्यातल्या जवळच्या कोणालातरी भेटला होता.
  २.  त्याहून महत्वाचं म्हणजे त्याच्या अशा छोट्या-मोठया ओळखीत खून झालेलं त्याने पहिल्यांदा ऐकलंय.
  ३.  त्याला हेही एकदम जाणवलं की महाराष्ट्राच्या, किंवा भारताच्या सामाजिक, राजकीय घडामोडींत असे खून क्वचित होतात. अपवाद/उदाहरणार्थ: बिल्डर्स, नगरसेवक आणि शहरपातळीवरचे राजकारणी, गँगस्टर्स, एक पत्रकार सुमारे दीड एक वर्षांमागे. कदाचित हे त्याला माहित असलेले, आठवत असलेले.
मग बघ्या दिवसभर ह्याच घटनेवर तरंगत राहिला. फेसबुकवर शोकाचे, श्रद्धांजलीचे, महाराष्ट्रातील, देशातील लोकशाहीच्या अधःपतनाचे, स्वातंत्र्यावर घाला येण्याचे स्टेटस अपडेट वाचत राहिला. होईल तसा आपलेही पसा-दोन पसा योगदान देत राहिला. त्याला ठाऊक होतं की त्याचं बरचसं वाईट वाटणं बेगडी आहे, दिखाऊ, सवयीचा भाग आहे. तो त्याचं म्हणून एक जे व्यक्तिमत्व जोपासू पाहतो आहे त्यात अशी हळहळ हा एक पैलू आहे.
पण त्याला एक प्रश्न पडत राहिला, तो म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यांचा. बघ्या आधी जाम श्रद्धाळू होता. म्हणजे इयत्ता तिसरीत त्याचा आठवा क्रमांक हुकला याचं कारण होराभूषण शास्त्री यांच्या दर रविवारी छापून येणाऱ्या भविष्यानुसार त्याला असलेली साडेसाती हे होतं. मग तो त्यासाठी शनिस्तोत्र वाचू लागला. मग तो परीक्षेच्या अगोदर हातावर दही घेऊन बाहेर पडू लागला. पण ही काही श्रद्धा नव्हती हे आज बघ्या सांगू शकतो. ही असली तर भीती होती, किंवा खंडणी.
मग बघ्या हळूहळू अश्रद्ध बनत गेला. म्हणजे तो उघड नास्तिक झाला नाही. पण त्याने अस्तिक असण्याचे जे आचार-विचार बाळगावेत ते सोडले, ते केले नाहीत तर काय ह्याची भीती सोडली. पण बघ्या निर्भय झाला नाही. बघ्याची गांड फाटायची. पण तो कोणाला न दाखवता एकटा मनात टाके घालायचा. पण काही-कधी काही जाम झेपायचं नाही. मग बघ्या भगवद्गीता वाचायचा, किंवा मनाचे श्लोक म्हणायचा. म्हणजे तो थेट देवाला वेठीस धरायचा नाही, पण त्याच्या जाणीवेबाहेरचा, आकलनापलीकडचा एक बिंदू आधाराला धरून तो हलके हलके स्थिर व्हायचा. मग गांड फाटायची थांबली की परत तो अधांतरीचा बिंदू सोडून आपल्या नेहमीच्या धंद्यांना लागायचा.
किंवा कधी-कधी बघ्याला स्वतःचा तिटकारा यायचा. म्हणजे आपण वासना, आळस, इर्षा, मांद्य ह्यांनी बनलेला मांसल लिबलिबित गोळा आहोत असा. आणि त्याला कळायचं नाही कि स्वतःची त्वचा तरातरा ओढून मोकळं व्हायची जी तहान लागते, जी वेडीपिशी तगमग होते तिचं काय करायचं? मागे फिरायचे रस्ते बंद, आणि पुढे असली येडझवी अवस्था, त्याच्या मध्ये बघ्या परत स्वतःला शांत करायचे आध्यात्मिक उपाय करायचा. मग बघ्या शांत व्हायचाही. पण बघ्याला ही स्वतःच्या स्केप्टिकल, रॅशनल होऊ पहाण्याशी केलेली प्रतारणा वाटायची.
   आता बघ्या मुर्दाड आहे. तो स्वतः स्वतःची अवहेलना करत नाही की पाठ थोपटत नाही. तो सामाजिक जबाबदारीने पोक घेत नाही की उच्छृंखल मुक्तपणाने उनाडूनही जात नाही. तो फक्त बघतो, जसं आज त्याने दाभोलकरांचं मरणं बघितलंय.
--
   बघ्या विचार करू पाहतो की का झाली असावी ही हत्या, का वध, का खून? बघ्या शब्दच्छल सोडतो आणि फोकस्ड होतो. पण बघ्या पोलिटिकल अॅनालिस्ट नाही, बघ्या विकेंड पुरवणीत सिरीयस दिसणारे, सामाजिक, राष्ट्रीय धोक्याचा भोंगा वगैरे देणारे लेख लिहीत नाही. बघ्याला उत्सुकता आहे एवढंच.
१.       त्यांनीच मारलं. तेच जे त्यांच्या विरोधी होते. संपवला त्यांनी. खत्तम. वध आहे हा त्यांच्या दृष्टीने, जसा कृष्णाने जरासंधाचा, अर्जुनाने कर्णाचा, शिवाजी शहाजी भोसल्यांनी अफजलखानाचा, आणि __श्यांनी ... . तसा वध आहे हो. हा निद्रिस्त समाज/धर्म जागा झाला की की तो असे बळी गिळतोच असं म्हणतील ते. त्या वधकर्त्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष समर्थन देतील, मदत देतील. आणि ज्यांनी ही सुपारी दिली ते सावकाश त्यांच्या साथीदारांसमोर हे आम्ही केलं ह्याचं क्रेडीट घेतील. गर्जना करतील, शंखनाद करतील. पण वरकरणी ते हळहळतील. अगदी अश्रूही ढाळतील.
२.       पण त्यांना मारून काय झालं? मारणारा हुतात्मा होईल का, का रोल मॉडेल? अगदी त्यांच्या कट्टर अनुयायात? म्हणजे मोहम्मद अट्टा, किंवा लादेन जसा काहींच्या लेखी असेल तसा तो होईल का? का मारणाऱ्याला धर्म पालनाचं समाधान मिळेल, सगळ्या भौतिक समाधानाच्या पलीकडचे समाधान, सूडाचे, क्रूर कर्तव्यपूर्तीचे समाधान? पण त्याचं हे समाधान बाकीच्यांना कसं समजेल? आणि समजलं तरी स्वीकारलं जाईल?
३.       दाभोलकरांच्या आणि त्यांच्या विरोधाच्या चळवळीचे काय फायदे तोटे? एक बडा मोहरा मारल्याने ती बाजू नामशेष होईल का उफाळेल? विरोधाची चळवळ सरकारी परिप्रेक्ष्यात येईल आणि कमकुवत होईल? का विरोधी चळवळीला वाढता जनाधार मिळेल? आणि ज्यासाठी होत आहे अट्टाहास, त्या जादूटोणा विरोधी बिलाचं, बाबा-फकीर-दुवावाल्यांचं काय होईल?
४.       का त्यांना येऊ घातलेल्या निवडणुकीच्या गणितातला एक मोहरा म्हणून मारला? म्हणजे मग एका बाजूला xxध, xxध असं म्हणता येईल. आणि मग विकासाचे नारे का सेक्युलर सरकार हे जुनेच कोडे घालून गंडवता येईल? आणि दुसऱ्या बाजूला पण इनडिरेक्ट कळतंच आहे की हे विकास, गव्हर्नन्स वगैरे नारे फार अल्ट्रा-मॉडर्न झाले. शेवटी परत धर्म, संस्कृती, इतिहास, प्रथा, परंपरा आणि ग्लोरीयस पुनर्निर्माण हवंच. एवढी कडक अफू तर कुठेच नाही, आणि चिलीम पेटवायला थोडे निखारे तर हवेच. मग जसा इथे हा मोहरा, आपसूक. बाकी यात्रा, मंदिर, दंगे आणि पोग्राम तर चालूच आहे वर्षानुवर्षे?
५.       एकूणच कुठल्याही राजकीय, सामाजिक हत्येचा उद्देश काय असतो? दहशत, विरोधाची बाजू चिरडणं? मग तो इथे साध्य होतोय? का असं थंड डोक्याचं गणित नाहीच आहे मागे? आहे ती भावनांची उकळ आणि लख्ख मानसिक क्लॅरिटी, की ह्याला मारायलाच हवा? दाभोलकरांच्या किंवा ते ज्या बाजूने होते त्या बाजूत इतकी प्रसिध्द, इतकी प्रभावशाली रिप्लेसमेंट आहे? का आता दुय्यम निर्नायकी? तसं असेल तर हा वर्मी घाव म्हणायचा. पक्का हिशोब.
बघ्या रिसर्चर नाही, बघ्याकडे कुठली फेलोशिप नाही, बघ्याकडे आतल्या गोटातले परिचय नाहीत. बघ्या एवढेच तार्किक तारे तोडू शकतो आणि मग सट्टा लावल्यागत कुठला लागतो ह्यातला म्हणून उत्सुक राहू शकतो.
--
बघ्या त्याच्या आईला सांगतो की दाभोलकरांना गोळी घातली. आई म्हणते कशाचे डॉक्टर होते ते? बघ्या शांतपणे पोळी खातो, भाजी खातो, हात धुतो आणि चलतो, काय हवंय का घरात विचारतो. आई म्हणते, बस प्रसाद खा. मग तो दारात उभा राहतो, उजव्या हातात प्रसाद घेतो तेव्हा आई म्हणतो अजून कोणीतरी गेले ना, तर तो म्हणतो ते कालनिर्णयवाले. आई म्हणते पण कोणीतरी भास्कर होते ना गेले ते. तो निघतो.
       आई उपवास करते बघ्या नीट लाईनीत यावा म्हणून. त्याने आजूबाजूच्या शे-सव्वाशे पोरांसारखी इस्त्रीची शर्ट-पँट घालावी, बूट घालावे, नियमाने दाढी करावी, लोकल पकडावी, महिन्याला ३०-४०-५०-६०-७० हजार पगार आणावा, आपल्या जातीत बायको करावी, बायकोने सारे सणवार करावे, बघ्याची सिगारेट सुटावी, बघ्या सुखी रहावा आणि बाकी जनरल...
       आई विद्युतपुरवठा खंडीत झाला की स्वामींना साकडं घालते, बाबांना यायला उशीर झाला की व्यंकटेश स्तोत्र म्हणते, आणि बाबांना कधी ऑर्डर्स नाही मिळाल्या मनासारख्या की महाराजांची पोथी वाचते. पण ती काम करायची थांबवत नाही. आणि होईल तेव्हा बाबांना, बघ्याला त्यांच्या क्रमशः अश्रद्ध किंवा आळशी कामचलाऊ श्रद्धेबाबत टोमणे मारणंही. ती वर्षातून एकदा सत्यनारायण करते. तिने बघ्यासाठी, तिच्या काहीही फुफाटा न करता अग्नी दिलेल्या सासूसाठी नारायण नागबळीही केलाय.
       बघ्या आईला आधी समजावू पहायचा, मग त्याला कळलं की आई ऐकतच नाहीये. ती फक्त बघ्याला बोलू देतीये. तिच्या भोवती तिच्या काल्पनिक कठीण परिस्थितीचे, तिला न मिळणाऱ्या भौतिक सुखांचे, तिच्या परिश्रमपूर्वक जगण्याचे, तिच्या स्वामी, बाबा आणि देवांचे जे कवच आहे त्यात प्रश्न घुसूच शकत नाही आणि त्या कवचात आई सुखरूप आहे.
       आता बघ्या आईला जे ती वांछील ते करू देतो, जोवर ते त्याच्या आड फारसे येत नाही. फार कधी प्रसंग आलाच तर मांडवली केल्यासारखा तो मिनिमम काही करतो आणि मोकळा होतो. जसे, एकदा बाबा गावी गेले आणि आईला जमणार नाही म्हणून तो शंकराला बेल वाहून आला. पण त्याने तिथे बसून बोर्डावर लिहिलेले स्तोत्र काही वाचले नाही.
       पण त्यावेळीही बघ्या एका सूक्ष्म नैतिक द्वंद्वात सापडलाच. १२-१२.३० च्या त्या दुपारी देऊळ निवांत होते. त्याच्या पाठी एक जुनाट तळे होते जे पाहून बघ्या थोडा काव्यमय हळवा झाला आणि देवळाच्या खिडकीपाशी उभे राहून त्या जीर्ण, मरू घातलेल्या तळ्याकडे पाहतानाही त्याला शांत, हलके वाटले. हे काय? म्हणजे आपल्या आत खोल असली प्रतिकहीन आस्तिकता असतेच का? का सगळे त्या कोण एका/एकीवर सोडून मुक्तपणे कृतीला न्याय द्यायची ट्रिक भावते आपल्याला? मग बघ्या बाहेर आला, त्याला आधी काही तरुणी आणि मग एक व्हील चेअर वरचे आजोबा दिसले तेव्हा आधीचे द्वंद्व जाऊन अधिक शारीर द्वंद्वात बघ्या सापडला. असो!
       पण बघ्याला सकाळचा प्रश्न, श्रद्धेचा, आठवलाच परत. आणि त्याला एक कोरोलरीही. की भले आपण आपल्यापुरता निवडा केला ह्या श्रद्धेचा, त्याचा प्रचार-प्रसार का करावा? बघ्याला जाणवलं की हा प्रश्न इतका क्षुल्लक नाही. तो मुळात एका अवाढव्य प्रश्नाचा भाग आहे. तो प्रश्न म्हणजे-
       माणसाने कसं जगावं, का जगावं ह्याची काही अंतिम उत्तरं आहेत का आपल्याकडे? आणि ही अंतिम उत्तरं, त्यांच्या वाटा ह्या वैयक्तिक आहेत का सामूहिक?
       बघ्याला वाटतं की त्याला मंदिरात जे शांत वाटलं, त्याला अधांतरीच्या बिंदूचं जे आकर्षण वाटतं, त्याला अद्वेष्ट सर्वभूताना म्हणताना जे वाटतं, त्याला निर्वाणषटक ऐकावसं वाटतं, त्याला काही दिवस सगळ्यांशी सगळं बोलणं सोडून आपल्यात गुंतावासा वाटतं ते ह्याच प्रश्नाशी जोडलेला आहे. पण ही खरी जाणीव का निष्क्रियतेची गुंगी हे बघ्या जाणत नाही. बघ्या तिथे हताश आहे.
       पण म्हणजे आपण किती विचार करून आपल्या कृती ठरवणार? आणि त्यात किती जणांना किती दुखवायचं? आणि असं करून जे काही हाती लागेल ते फक्त आपलं आपल्याशी राहणार असेल, त्याला सर्वांना पटणारा अर्थ नसेलच, तर मग एकूणातच हे उद्योग, हे प्रश्न का? आपण कोण कोणाचे नेमके कोण लागतो? आणि त्यांच्या श्रद्धा डोळस का आंधळ्या हे ठरवायला जाणं हे कितपत बरोबर?  
       म्हणून बघ्याने हत्येचा निषेध केलेला नाही. त्याला हिंसेचे कुतूहल आहे, कदाचित आजवर तो अशा कशात सापडला नाही म्हणून. पण त्याने अशी हत्या, आजवर तो जसा जगला तेवढ्याने तरी केली नसती असं तो सांगू शकतो. बघ्याला दाभोलकरांच्या समाजाच्या बैलाला चुचकारून अंगावर घ्यायच्या धाडसाचं कौतुक वाटतं, हेवा, इर्षाही. पण त्याचवेळी कायदा बनवायला जाणं हा त्याला स्वतःच्या किंवा दुसऱ्यांच्या लेखी जो चुत्याप आहे तो करायच्या बेसिक फ्रीडमवर आघात वाटतो, जसं थेटरात येणारी धूम्रपान विरोधी फुफ्फुसात एवढा टार सांगणारी जाहिरात.
--
       बघ्या दिवसभर एवढा सगळं बौद्धिक तलम गांजा मारून रात्री एका नव-विवाहित मित्राकडे होऊ घातलेल्या मंगळागौरीस जातो. तिथे तो जेवतो. मग तो खेळ बघू लागतो. त्याचा दोस्त बॅटमॅनने करावी तशी एक फुगडीही घालतो. बघ्या तिथे जमलेल्या नव, जून आणि पोक्त विवाहीतांचे खेळ बघू लागतो. त्यातल्या गाण्यांचे बोल ऐकू लागतो. मोड्युलर किचन मध्ये जगणाऱ्या, लोकल ट्रेनने जाणाऱ्या, मराठी सिरियल्स पाहणाऱ्या संसारिक सुखी स्थूल स्त्रियांचे खेळ. मग भरल्या पोटी ढेकर द्यावे तसे प्रश्न: ही श्रद्धा का अंधश्रद्धा? का पूर्वी हा खेळ म्हणजे संसाराचे कष्टाळू गाडे ओढणाऱ्या बायकांची स्पेस होती? म्हणजे युटिलिटी? आपला धर्म, किंवा प्रथा-परंपरा म्हणजे निव्वळ सामूहिक स्तराच्या गंमतीचा संरक्षित पाशवी आनंद का माणसांना एकत्र जमून पेन्ट अप करण्याची सोय? आपल्या ह्या रुढी-परंपरा किती खोल घुसल्या आहेत, काळात आणि स्थळातही? आणि ह्यातल्या किती बायकांना ठाऊक आहे दाभोलकर गेले? कितींना त्या माहितीने बरं-वाईट असं वाटलंय? का ह्या भव्य,भयानक रगाड्यात अशी एक हत्या काही नाही. १२५ करोड माणसांना, किंवा १२ करोड माणसांना, किंवा ५ करोड शहरी महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसांना किती सोयर-सुतक असतं असल्या सार्वजनिक परिघात घडलेल्या गोष्टींचं? मला किती आहे? खरंच किती आहे?
       बघ्याला समोरचे खेळ तद्दन खोटे वाटू लागतात. ह्या बायका उद्या कशा कण्हत असतील, सांधे दुखत असतील असं त्याला वाटतं. त्या बायकांचे मोबाईलवर शूट करत असलेले नवरे त्याला मजेशीर वाटतात. त्याला कळप म्हणून जगण्याचे सुख दिसते. आणि मग त्याला मनापासून वाईट वाटतं की दाभोलकरांना गोळी घातली गेली. त्याला मनापासून स्वतःचा गांडूपणा जाणवतो. त्याला त्याची दाभोलकरांचे वाक्य कोट केलेली स्टेटस अपडेट आठवते, पण नेमकी अपडेट आठवत नाही.
       बघ्या मंगळागौरीतून निघतो. बघ्या रस्त्यावर येतो आणि फुफ्फुसांत टार भरू लागतो. तेव्हा बघ्याला वाटतं की या आजूबाजूच्या सगळ्याला फाट्यावर मारूनही त्याबद्दल झिडकारा, घृणा न ठेवणं ही केवढी मोठी गोष्ट आहे, मग तुम्ही कशासाठीही फाट्यावर मारलेलं असू दे आणि शेवटी तुम्हाला गोळी लागलेली असू दे.                  

      

Popular posts from this blog

???

देशासाठी, समाजासाठी काहीतरी करावं असे समज असण्याचे दिवस होते, आपल्या भोवतालच्या लोकांच्या जगण्याचा स्तर जो आहे तो का आहे वगैरे प्रश्न पडू लागले तेव्हापासून ‘जात’ ही संपूर्णपणे चुकीची गोष्ट आहे हे मानत आलो आहे. आधी फारसा अभ्यास नसताना केवळ आदर्श समज म्हणून आणि आत्ता माझ्या आजूबाजूच्या लोकांना कसलेही कार्यकारणभावाचे पाठबळ नसलेल्या ‘जात’ नावाच्या दोऱ्यावर अभिमानाचे, द्वेषाचे, सोबतच्या माणसांना जातीच्या कप्प्यांत वाटण्याचे उद्योग करताना बघतो तेव्हा माझं मत दृढ होत जातं.        माझ्या इमारतीच्या आजूबाजूला, चौकांत, बाईक्सवर, फोर व्हीलरवर उद्या होणाऱ्या मोर्च्याची चर्चा आहे. फेसबुकवर तर मता-मतांचा कल्लोळ आहे. मोर्चा कसा केवळ जातीय नाही, त्यात स्त्रियांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत असं एकानं म्हटलंय. बरं, फेसबुकवर जे विचारसरणी निहाय अड्डे आहेत त्यात लिबरल, सुजाण अशा  अड्ड्यावर नेहमी असणारा माणूस. लिखाणावरून जर लिहिणाऱ्याच्या भूमिकेची परीक्षा होत असेल तर ह्या माणसाची भूमिका बाकीच्यांनी जात मानू नये, पण माझ्या जात वाल्यांनी मानली तर वाईट म्हणू नये अशी पकडायला लागेल. त्यावर कमेंट करणारा एकजण म्हणत…

हंडाभर चांदण्या

मागच्या वर्षी कधी वर्तमानपत्रात, कधी फेसबुकवर मी ‘हंडाभर चांदण्या’ बद्दल वाचलं होतं. मग केवळ १०० रुपये तिकिटात आपल्या शहरातील नाट्यगृहात ‘हंडाभर चांदण्या’ बघितलं. टँकरची वाट बघणाऱ्या एका गावातल्या एका दिवसाची गोष्ट असं अत्यंत तोकडं वर्णन ह्या नाटकाचं करता येईल. बघायला सुरुवात करताना माझ्याकडे तेवढाच दुवा होता. नाटक गावाच्या वेशीत घुसतं तिथपासून मला ‘वेटिंग फॉर गोदो’ आठवत होतं. ‘हंडाभर चांदण्या’ वर गोदोचा प्रभाव आहे असं मला अजिबात वाटत नाही. गोदो ज्या पोस्ट-मॉडर्न म्हटल्या जाणाऱ्या अॅबसर्ड असण्यासाठी प्रसिद्ध आहे तशीच अॅबसर्डिटी ‘हंडाभर चांदण्या’ मध्येही आहे. पण ‘हंडाभर चांदण्या’ आणि गोदो ह्यांच्या अॅबसर्डिटीमध्ये एक महत्वाचा फरक आहे: गोदो हा सगळं आटपून, पोटभर हादडून केलेल्या सूक्ष्मतर निरीक्षणाचा, बौद्धिक आनंदाचा परिपाक असेल तर ‘हंडाभर चांदण्या’ ही मेलोड्रामा व्हायच्या शक्यतेत जाऊ शकणारा आक्रोश व्यक्त करणारी कृती आहे. अनेकांच्या जगण्याला ग्रासणारा, जगण्याच्या किमान पातळीचा प्रश्न कथेच्या केंद्रबिंदूला असताना त्याला तात्विक, भावनाविवश करण्याचा मोहमयी रस्ता टाळून अॅबसर्डिटी आणि …

एका मेटाफिजिकल कारस्थानाची दास्तान – १

एकदा एक नवा नवा कवी आपल्या बॅचमेटच्या गाडीतून बॅचमेटच्या इगतपुरीच्या फार्महाउसला चाललेला असतो. नवा नवा कवी आणि गाडीचा मालक हे एका प्रथितयश कॉलेजात एकत्र असतात. पुढे तिथून त्यांना नोकऱ्या लागतात. पुढे तिथून ते परदेशात जातात. पुढे तिथून ते अशा मोडला येतात जिकडे त्यांच्याकडे मुबलक पैसा जमून गेलेला असतो, त्यांचं लग्न झालेलं नसतं आणि त्यांचे आई-वडील त्यांच्याशी विकली फोनवर आणि क्वार्टरली किंवा बाय-अॅन्युअली समोरासमोर फॅमिली हॉलिडेजना भेटत असतात. मग ह्या प्रदीर्घ का-या पण मुमुक्षू अवस्थेत त्यांना त्यांचा एक सुपर सिनियर भेटतो, जो मॅरेथॉन रनर असतो आणि व्हेन्चर कॅपिटलिस्ट. त्याला भेटल्यावर गाडीवाला मित्र एथनिक ठेपले आणि आचार विकण्याचा स्टार्ट-अप काढतो आणि उरलेला मित्र, ज्याला आपण नवा नवा कवी म्हणत आहोत, तो म्हणतो, आय विल आल्सो फॉलो माय कॉलिंग, मग तो कवी बनतो.        म्हणजे तो एका कॉलेजात व्हिजीटींग शिकवायला लागतो. बाकीच्या वेळात तो कविता करू लागतो, वाचू लागतो, फिरू लागतो. मग फेसबुक अनहर्ड व्होईसेस नावाच्या पेजला तो फॉलो करतो. मग ते सगळे पेजचे लोक महिन्यातून एकदा एकेका नामचीन ठिकाणी भेटून एकमेक…