Wednesday, June 19, 2013

तीन विश्वनाथ


यांतला पहिला तर तुम्हाला माहितीच आहे. मी त्याच्याबद्दल आधी लिहिलंय पण. तो आहे ‘रारंग ढांग’ मधला विश्वनाथ मेहेंदळे. दुसरा आहे मिलिंद बोकिलांच्या ‘अधिष्ठान’ कथे मधला विश्वनाथ. तिसरा आहे पानवलकरांच्या ‘परदुख शीतल’ कथेतला विश्वनाथ.
      तिघेही थोडे जगावेगळे आहेत. मी या तिघांच्या गोष्टी वाचल्या त्या वेळा वेगवेगळया आहेत. ‘रारंग ढांग’ च्या विश्वनाथबद्दल फार लिहायला नको. ती कादंबरी, त्यातला मूल्यांचा झगडा, माणसांचे स्वभाव, निसर्ग हे सगळं तसं लोकप्रिय आहे.
      दुसरा विश्वनाथ आहे तो बोकिलांच्या ‘झेन गार्डन’ कथासंग्रहातल्या ‘अधिष्ठान’ कथेत. मी जेव्हा ती गोष्ट वाचली, त्या वेळच्या माझ्या मनस्थिती आणि परिस्थितीमुळे म्हणा मला ती गोष्ट आवडली. पहिल्या विश्वनाथसारखा हा दुसराही तेज आहे. फरक एवढाच की मेहेंदळे सारा रोमान्स पत्रांतून करायचे. ह्या दुसऱ्या विश्वनाथचं लग्न झालंय, आणि त्यानंतर बायकोला सोडून तो पुढच्या शिक्षणाला अमेरिकेत का परदेशात गेलाय.
      तिसरा विश्वनाथ आहे तो नैतिकतेच्या बाबतीत पहिल्या दोघांच्याही खाली आहे. त्याचं लग्न झालंय, त्याचे अजून एका स्त्रीशी सबंध आहेत, आणि त्याची नोकरीही जायच्या अवस्थेत आहे. त्याची बायको सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून आहे.
      मला या तीन विश्वनाथांच्या गोष्टी संक्षिप्त रुपाने सांगायच्या नाहीत. त्या तर आधीच लिहिलेल्या आहेत. मला हे लिहावसं वाटलं ते तेंडुलकरांच्या ‘हे सर्व कोठून येते’ मधला ‘औदुंबर’ हा लेख वाचून. श्री. दा. पानवलकर यांच्या आठवणींचा हा लेख आहे. मराठी लेखकांची आयुष्ये जशी असतात त्यापेक्षा खूपच वेगळं असं आयुष्य पानवलकर जगले. ते इंग्रजीचे प्राध्यापक नव्हते, ते कुठल्या चळवळी लढ्यांशी संबंधित नव्हते. ते कुठल्या निम-शहरी खेड्यात जगत नव्हते. ते कस्टम मध्ये नोकरीला होते, ते एकटे होते, ते, तेंडुलकरांच्या लिखाणात जे सापडतं त्यानुसार दारूचे व्यसनी होते. आणि शेवटी त्या व्यसनाने, आजारपणाने ते गेले. ‘अर्धसत्य’ चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही एक त्यांची प्रसिद्धीशी भेटगाठ. त्यांच्या लिखाणात वेगळेपणा आहे. आणि मला तो वेगळेपणा त्यांची ‘परदुःख शीतल’ ही कथा पेंढारकरांच्या ‘रारंग ढांग’ आणि बोकिलांच्या ‘प्रतिष्ठान’ बरोबर कॉंट्रास्ट करून पाहायचा आहे. मला ही तीन विश्वनाथांची चित्रे एकमेकांच्या बाजूला मांडून गम्मतीखातर काय दिसतंय ते बघायचंय.
      ह्या तीनही विश्वनाथांमध्ये काही सारखं आहे तर ती त्यांची घुसमट. पहिला विश्वनाथ मेहेंदळे, तो शहरातल्या नोकरीला कंटाळला आहे, तिथल्या स्वतःचे साधण्याच्या स्पर्धेला कंटाळला आहे आणि त्यावर सोलेस म्हणून तो हिमालयात रस्ते बांधण्याची नोकरी पत्करतो. ‘अधिष्ठान’ कथेतला विश्वनाथ हा लवकर लग्न झाल्याने येणारी जबाबदारी, वागायच्या अपेक्षा आणि त्याला शिकण्याकरता हवी असलेली पण न मिळणारी स्पेस ह्यांत अडकला आहे. मग तो परदेशात असलेली एक शिष्यवृत्ती मिळवतो आणि लग्न, बायको ह्यातून सुटतो. पानवलकरांच्या विश्वनाथला कायद्याचा कचाटा आहे. त्याचं एका बाईशी, जी वेश्या असावी असा संशय ‘परदुःख शीतल’ कथा निर्माण करते, काही एक प्रकरण (लफडे, अफेअर) आहे. ह्या बाईचे एका फौजादाराशीही अफेअर आहे. आणि विश्वनाथाच्या मते, फौजदाराने चिडून, का ती बाई गर्भार राहिली म्हणून पहिले विश्वनाथला मारायला पाहिलं. विश्वनाथ त्यातून वाचला तर त्याला एका खटल्यात गोवण्यात आलं. विश्वनाथ त्यातून निभावला तर आता तो ज्या सरकारी कार्यालयात नोकरीला आहे तिथे त्याला बदफैली वर्तनासाठी मेमो दिला गेला आहे आणि तो सस्पेंड व्हायच्या मार्गावर आहे. घरात फाके पडू लागले आहेत, बायको नेटाने घर चालवते आहे आणि विश्वनाथ त्याच्या एका मित्राचे लग्न पळून लावून द्यायच्या भानगडीत गुंतला आहे.
      घुसमट असली तरी तिघांच्या तीन तऱ्हा आहेत. पेंढारकरांच्या विश्वनाथची घुसमट ही अस्सल मराठी (का बाXX) घुसमट आहे. ‘रारंग ढांग’ ही काही नव्वदीमधली वगैरे कथा नाही. ती ७०-८० च्या सुमारासची गोष्ट असणार. म्हणजे असा माझा कयास आहे. अर्थात नैतिक घुसमटीचा पेच हा कालनिरपेक्ष आहे. स्वार्थ का स्वार्थाच्या पुढचे काहीतरी, की खुपच पुढचे ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ असे असा नैतिक पेच. विश्वनाथ मेहेंदळेचा नैतिक पेच हा इतका जबरी नाही. रारंग ढांग चा जो, लघु कादंबरी किंवा दीर्घ कथा असा जीव आहे त्याला तो मानवणारा नाही. त्याचा पेच हा अनुभवी वरिष्ठांचा निर्णय आणि त्याच्या कुशाग्र, गोल्ड मेडलिस्ट बुद्धीला दिसणार संभाव्य धोका आणि त्यासाठी वरिष्ठांच्या निर्णयाला, नकाराला न जुमानता करावा लागणारा उपाय हा आहे. म्हणजे इथे मुळात हिरो आणि अदर्स अशी विभागणी आहेच. फक्त हे अदर्स हे दाट काळ्या किंवा काळ्या रंगात नाहीत. हिरो फेंट ग्रे आहे आणि अदर्स थोड्या डार्क ग्रे शेडमध्ये आहेत. विश्वनाथला मोरल सपोर्ट द्यायला त्याचे स्वातंत्र्य सैनिक बाबा आहेत. मध्ये रोमान्स भरायला चित्रकर्ती उमा आहे. त्याच्या वागण्याचे अव्यक्त, आणि प्रसंगी व्यक्त समर्थन करणारा मिनू खंबाटा आहे. सरतेशेवटी अगेन्स्ट ऑल ऑडस्, त्याच्या बुद्धीला पटणारा आणि त्याच्या करीअरची होळी करू शकणारा निर्णय विश्वनाथ मेहेंदळे घेतो. त्याचे वरिष्ठ त्याच्यावर चिडतात. कोर्ट मार्शल, कोर्ट मार्शलच्या दोन्ही बाजू बघू शकणारा न्यायाधीश आणि सरतेशेवटी विश्वनाथ, त्याच्या बुद्धीचे कौतुक करून घेत, पण त्याचवेळी त्याला दिली जात असलेली मुभा सगळ्यांनाच का देता येऊ शकत नाही ही अपरिहार्यता दाखवत, बाइज्जत सस्पेंड किंवा कर्तव्यमुक्त! मला कुठेही पेंढारकरांचा संघर्ष डीमीन करायचा नाही. कित्येक वर्षे आणि कदाचित अजूनही ‘रारंग ढांग’ माझ्यासाठी खास गोष्ट आहे. पण तो प्लॉट, त्या व्यक्ती, आणि निर्णयाची इतकी टोकदार दुहेरी बाजू हे सगळं प्रचंड दुर्घट आहे. अर्थात म्हणूनच रारंग ढांग खास आहे. पण म्हणूनच तिचा नायक एक काल्पनिक आदर्श ठरतो. मला काहीवेळा पेंढारकरांच्या लिखाणाचं अप्रूप वाटतं की ‘अरे संसार संसार’ मध्ये त्यांचा नायक हा किती मध्यमवर्गीय प्रश्नांशी झुंजतो, अडकतो आणि फसतो. अर्थात असा नायक उभा करतानाही असं वाटत राहतंच की हा नायक विश्वनाथ मेहेंदळे बरोबर एका शाळेत होता, मेहेंदळे गोल्ड मेडलिस्ट इंजिनीअर झाले तर हा कारकून. पण त्यांच्यावर खास मराठी आदर्शपणा एकत्रच शिंपडला गेला होता. मेहेंदळ्याना हिमालयात जाऊन बाकी दुनियेविषयी आणि ‘अरे संसार संसार’ च्या नायकाला मुंबई चौपाटीवर बसून जे वाटतं ते कुंभ के मेले मे बिछडे हुये जुडवा भाई! प्रश्नांची डायमेन्शन काही असो, दोघेही पठडी बाहेर जाणारी सोल्यूशन्स काढू पाहतात. मेहेंदळे हिरो बनत उमेच्या संभाव्यातेकडे परत येतात. ‘अरे संसार संसार’ मधल्या नायकाची पत्नी मरते. ‘अरे संसार संसार’ मला अनेकदा मास्टरपीस बनता बनता राहिलेली कृती वाटते. कारण त्यातला नायक थोडा मिसफिट आहे. मेहेंदळे आणि तो एका शाळेत नसते तर बरं झालं असतं. कदाचित ट्रॅजेडी असल्याने ‘अरे संसार संसार’ गाजली नसावी. (इतिहास नाही, प्रेरणा नाही, सामाजिक चिंतन नाही, हे काय लिखाण झालं, च् च्!) कदाचित लेखकही प्लॉटच्या संभाव्य डेप्थने किंवा प्रॅक्टिकल चिंतांनी गांजला असावा आणि त्याने ‘अरे संसार संसार’ होईल तशी पूर्ण केली असावी. असो. तात्पर्य असं की पेंढारकरांच्या नायकाचा नैतिक साचा एक आहे. आणि तो खास थोडा भावूक, थोडा आदर्श असा मराठी वाचकांच्या पसंतीचा.
      बोकीलांचा ‘अधिष्ठान’ मधला विश्वनाथ हा बोकिलांच्या बाकी नायकांपेक्षा, म्हणजे ग्रामीण एन.जी.ओ. वाले किंवा डावखुऱ्या चळवळींशी सबंधित पण आता स्थिर-स्थावर यापेक्षा वेगळा आहे. तो मुळात कोणत्या विषयांत काय करतो हे सांगणं कठीण आहे, पण तो मानववंशशास्त्रात (म्हणजे अँन्थ्रोपॉलॉजी हो) शिकणारा असावा असं वाटतंय. त्याची बायको आहे गायत्री. जी झुऑलॉजी शिकली आहे. गायत्रीही विश्वनाथ वर निस्सीम, निरतिशय, खरे, साहित्यिक, आणि कालनिरपेक्ष प्रेम करणारी आहे. पण त्याचवेळी, बोकिलांच्या कथातल्या बायका जसे करतात तसे थोडे फिजिकल डायव्हर्शन करून आली आहे. आणि मग ते तसे ‘प्रांजळ’ पणे विश्वनाथला सांगते. म्हणजे नैतिकतेच्या चिरेबंद चढणीवर बोकील पेंढारकरांच्या खाली. पण बोकील आधुनिक लेखक आहेत. बोकिलांची ही गायत्री तिच्या संबंधांमधल्या शारीरिक आणि मानसिक बाजू वेगळया करू शकते. शारीरिक अनुभवातही जे घडलंय ते तिच्या एकटेपणाची, त्या वेळी तिला लाभलेल्या सोबतीची सहज स्वाभाविक परिणीती आहे. पण तिच्या मनाने ती होती तिथेच आहे, विश्वनाथ सोबत. (म्हणजे सगळ्या उदारमतवादी, स्त्रीवादी वाचक वर्गाला केल्या थोड्या गुदगुल्या असंही कोणी खवचट म्हणू शकतात). तिचे शारीरिक अनुभव हे तिच्या लालसेने किंवा वासनेने आलेले नाहीत. ते ‘सहज, स्वाभाविक’ आहेत. आणि हळूहळू ती त्यांच्यातून बाहेर पडून परत विश्वनाथच्या स्थिरबिंदूवर आहे. एक फरक असा आहे, की बोकिलांची कथा ही मुळात विश्वनाथ आणि गायत्री ह्या दोघांची आहे. पेंढारकर आणि पानवलकर ह्यांच्या कथांचे निर्विवाद केंद्रबिंदू विश्वनाथ आहेत. आता हा बोकिलांच्या विश्वनाथचा स्थिर बिंदू काय करतो? गायत्री आणि विश्वनाथ, असा गेस मारू की पदवीचे शिक्षण पूर्ण करताना किंवा ‘पुणे युनिव्हर्सिटीत’ (इशारा: मूळ कथेत पुण्याचा संदर्भ नाही. चालू असलेला खोडसाळपणा सर्वस्वी ब्लॉगरचा आहे.) पदव्युत्तर (खरंतर पुणे म्हणजे पदवीच्या उत्तर काय पूर्व, पश्चिम, दक्षिण, नैऋत्य सगळंच असणार!) शिक्षण पूर्ण करताना प्रेमात पडलेले, आणि मग गायत्रीच्या आग्रहाने लग्न केलेले आहेत. ते उपजीविका काय करतात असा प्रश्न ह्या कथेत नाही. (पुणे तेथे उपजिविकेस काय उणे!) त्यांनी एक नवे घरही घेतले आहे, तेव्हाच्या पुण्याच्या आउटस्कर्ट्स वर कदाचित. पण पुण्याच्या तमाम तेजस्वी, विचारवंत जनतेप्रमाणे विश्वनाथ संत्रस्त आहे तो जीविकेच्या प्रश्नाने. आणि ह्या भव्य प्रश्नाचा पाठलाग करताना लग्न, होऊ घातलेले मूल ह्या सगळ्याने तो गांजला असावा. तो असे काही बोलत नाही. कदाचित तो युनिव्हर्सिटीत पी.एच.डी साठी एन्रोलाही असावा. (म्हणजे सगळीकडून गंजला आणि गांजला). आणि त्यात त्याला एकदम एक परदेशी शिष्यवृत्ती मिळते. आणि तो शिकायला जातो, का संशोधन करायला जातो. म्हणजे बायकोचा नीट निरोप वगैरे घेऊन जातो, पत्र वगैरे लिहून खुशाली वगैरे कळवतो आणि मग हळूहळू तुटत जातो. पत्र नाही. खात्यात पैसे येत राहतात, आणि एक दिवस डिव्होर्स पेपर येतात. वर वर्णलेली गायत्री अर्थातच त्यांच्यावर सही करत नाही. मग एक दिवस विश्वनाथ परत येतो. तो आता लेखक आहे, त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे. गायत्रीला हे ठाऊक आहे. त्याच्या फोनची वाट पाहते आहे कदाचित. तो फोन येतो आणि त्यांची भेट ठरते. ‘अधिष्ठान’ ही त्या भेटीची कथा आहे. सगळं त्याच्यात फ्लॅशबॅक म्हणून येतं. ‘प्रतिष्ठान’ नाव का हे मला कळलेलं नाही, मी असा कधी फार विचारही केलेला नाही.
      विश्वनाथची घुसमट तीव्रपणे येत नाही. मुळातच ह्या भेटीत तो गायत्रीला ऐकतोय. विश्वनाथने परदेशी जाऊन एका जिप्सी गटावर संशोधन केलं आहे. संशोधनाचा सारा मासला आर्टिस्टिकली मांडला आहे. म्हणजे त्यांच्यासोबत नुसतं फिरत जाणं, किंवा त्यांच्याकडूनच खूप शिकलो असं सद्गदित होणं वगैरे. (यशस्वी संशोधक कायम त्यांचा रिसर्च असा का मांडतात काय माहित! किंवा हे केवळ रोमँटीक रि-कन्स्ट्रक्‍शन असावं!!) आणि आता त्याचं एक पुस्तक प्रकाशित झालं आहे. प्रकाशन, किंवा भारतीय आवृत्तीचे प्रकाशन गायत्री जिथे राहते त्या शहरात, म्हणजे कदाचित पुण्यात, आहे. अमेरिकेत त्याची मनोवृत्ती, त्याचं आधी तुटत जाणं आणि मग आता एकदम हळवं होत परत भेटू पाहणं हे फार काही स्पष्ट होत नाही. खरा फोकस जातो तो गायत्री, तिचं एकटं आयुष्य, तिच्या आयुष्यात आलेले एक पुरुष, तिचं सेक्सुअल डायव्हर्शन आणि तरीही मानसिक पातळीवर तिचं तसंच होमोजीनियस असणं. पण आता गायत्री मोडलेली, भेलकांडलेली नाही. तिला तिचं स्वत्व मिळालं आहे. तिची प्रेरणा कोणी एक रिसर्चर आहेत आणि आता तीही, थोडे मेटा फिजिकल रोमँटीक रिसर्च क्वेश्चन घेऊन तिच्या त्या सापडलेल्या स्वत्वाकडे केंद्रित आहे.
      मग मनोमीलन होणारा सुखांत, बाहो के दरमियां. मला ही कथा का आवडली ह्याचं कारण माझे वैयक्तिक प्रश्न आणि त्यावेळची मानसिक अवस्था असावी. मला बायकोला टाकून जाणारा विश्वनाथ भावला. आणि मग बोकिलांच्या कथेत असतं तसं स्वतःचं स्वतःला सापडणं. मग स्थिरचित्त होत बायकोकडे परत. असं काही सापडेल का आणि बायको एवढ्या वेळ थांबेल का आणि मला तिचे, जर असेल तर, जे काही भले-बुरे अनुभव असे स्वीकारता येतील का असे प्रश्न नाहीच. मुळात कथेत विश्वनाथचं द्वंद्व किंवा घुसमट फार मांडली नाहीच आहे. गायत्रीच्या कथनातच ती जाणवते. मुळात बोकिलांच्या ज्या स्त्री-पुरुष संबंधांच्या कथा आहेत त्यातली टिपिकल नायिका गायत्री आहे आणि स्वाभाविक तिच्या अनुषंगाने विश्वनाथ उभा आहे. विवाहबाह्य स्त्री-पुरुष नाती बोकिलांच्या बऱ्याच कथेत येतात. आणि बऱ्याचदा त्याची पात्रे ह्या नात्यांची भावनिक उलाढाल खूप आदर्शपणाने घेतात, अपवाद एका कथेचा (नाव आठवत नाही, पण ती ‘उदकाची आर्ती’ मधली एका विदेशस्थ भारतीय जोडप्याची कथा आहे). विश्वनाथ मुळात इतका अपराधी भाव घेऊन आला आहे की तो गायत्रीच्या ह्या अनुभवावरून तिला काहीच म्हणत नाही. कदाचित त्यानेही असं काही तो होता तिकडे करून पाहिलं असावं आणि मग एकमेकांच्या चुकांची आपोआप फिटंफाट झाली असावी. किंवा मुळात विश्वनाथ, आता तो उन्नत अवस्थेत असल्याने, नात्याच्या भावनिक डायमेन्शन्स बाकी पैलूंपासून वेगळया करून पाहू शकत असावा.
      अशा शक्यतांमुळे बोकीलांचा नायक खोटा वाटतो, जरी तो हवाहवासा प्रकारचा असला. ८-१० वर्षांचा आपल्या भावनिक, शारीरिक आयुष्यावर किती परिणाम होईल? प्रेम, नाती ह्या गोष्टी इतक्या वर्षांच्या संवादहिनतेला तोंड देऊन कशी टिकतील, किंवा काय होतील? गायत्रीचं मेटाफिजिकल प्रेम ह्या सगळ्या गोष्टी दुर्घट नाही तर एकदम काल्पनिक, थोड्या बेगडीच वाटतात. म्हणजे एकतर लेखकाची स्वतःची अशी एक नैतिक चौकट आहे किंवा तो मराठीचा चेतन भगत बनू पाहतोय. दुसरी शक्यता आपण बाजूला ठेवू, किंबहुना प्रचंड खवचट झाल्याशिवाय काय बोलणार त्याबाबत.
      बोकिलांची ही नैतिक चौकट, म्हणजे ही ब्लॉगर चीच मांडणी आहे बरं, ही पेंढारकरांच्या चौकटीच्या पुढची आहे. ती सेक्स जरा अजून मोकळेपणाने स्वीकारते, पण त्याचवेळी मानसिक स्तरावर तशीच एकसंध, ठाशीव आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर मार्खेजच्या लिखाणात जसं कधीही नष्ट न होणारं पण पार्टनर बदलत जाऊ शकणारं प्रेम असतं त्याच्या जवळ जाणारी ही चौकट. त्यात बोल्डनेस आणि पारंपरिकता ह्यांचं खुबीदार मिश्रण आहे. शारीरिक एकनिष्ठतेपासून भरकटणारी बाई, मग तिचं तिने मनोमन वरलेल्या जोडीदारासमोर सत्य मांडणं आणि मॅच्युअर जोडीदार हा बोल्ड पार्ट. पण ह्या बोल्ड पार्ट नंतर ही चौकट नांदा सौख्यभरे असा सुखांत किंवा ‘कर्तव्याच्या पुण्यपथावर..’ प्रकारचा दुखी शेवट अशीच जाते. हे बोकिलांच्या स्त्री-पुरुष संबंध दर्शवणाऱ्या बहुतेक किंवा सर्वच कथांत घडतं. आणि त्यातली पात्रे ही मानसिक स्थिरतेने, किंवा अपरिहार्यतेने हे स्वीकारतात ती मांडणी मला अनेकदा दिखाऊ वाटते, किंवा आदर्शवादी. म्हणजे हे असं काहीतरी व्हायला हवं प्रकारची. ज्यात थोडी चुका करायची स्पेस आहे, पण सरतेशेवटी सगळं सापडतं, उलगडतं, थोडी पोएटिक हुरहूर उरते एवढंच. पण तरीही ह्या सगळ्याची वाचनीयता उरते ती त्यातल्या संदर्भांच्या घनतेने.
      पानवलकर असं काहीच मांडत नाहीत. त्यांच्या कथांना असा नैतिक सूर जवळपास नाहीच. त्यांच्या कथांना एकटेपणाचा, नोस्टाल्जियाचा, नाजूक पण तितक्याच पेचदार नात्यांचा चेहरा आहे. कदाचित त्यांच्या आयुष्याचा हा परिणाम असावा. त्यांची लिखाणाची भाषाही अशीच आहे, तिला लय आहे, वेग आहे, तिला अडखळणं मंजूर नाही. ती वर्णनाच्या तपशीलात अडकण्यापेक्षा टोकदार    कंगो-यांचे वळसे घेणं पसंत करते. आणि तिच्या शेवटाला अनेकदा एक उदासीन हताशपणा, रिकामेपणा किंवा एकट्या माणसाचे, खास त्याचेच असे एकटेपण आहे. माणसाच्या आयुष्याचा हा एकटा कोपरा कुठल्याच नैतिक कचाट्यात सापडत नाही. ‘परदुःख शीतल’ चा विश्वनाथही त्याला अपवाद नाही. त्याचे बायकोवर प्रेम आहे, पण त्याचवेळी तूच आलीस माझ्याकडे, मी काही तुझ्या मागेमागे फिरत नव्हतो असे सांगून तिला गप्प करायला तो मागेपुढे बघत नाही. बायकोने तुम्ही अजून एका बाईशी संबंध ठेवून का आहात असे विचारल्यावर ‘तेवढाच रुचीपालट’ असं उत्तर देतो. आणि तरीही, परंपरागत भारतीय पुरुषाप्रमाणे, मानसिक हेलकाव्याच्या क्षणी बायकोच्या कुशीला जवळ करतो. त्याची स्वतःची नोकरी संकटात आहे, पण तो एका मित्राला पळून जाऊन लग्न करायला मदत करतोय. आणि ही मदत करत असताना कसलाही सात्विक भाव त्याच्या मनात नाही. करडे, रोखठोक हिशोब केल्यासारखे तो वागत जातो. मित्र रडत घरात बसला असतानाही त्याला बायकोला अंगाखाली घ्यावीशी वाटते, तिचे शारीर अस्तित्व आजूबाजूला हवेहवेसे वाटते. पण तिची भीती, तिच्या भावना त्याच्या वाटेत फारश्या येत नाहीत. ही त्याची मस्तीही नाही. कदाचित त्याला कळून चुकलंय की त्याच्या घाबरण्याने काही बदलणार नाही, आणि त्यातून तो कोरडा, मुर्दाड होत जातोय आणि एकटाही.
      हा एकटेपणा, बरेच काही करूनही पुरेशे श्रेय न मिळाल्याने आलेली तुटक पण कर्तव्यतत्पर वृत्ती पानवलकरांच्या लिखाणात खूप येते. त्यांची पुरुष पात्रे भावनाविवश किंवा विचारविवश नाहीत. करत सुटण्याचा धबडगा त्यांच्या पाठी लागला आहे. पण त्या धबडग्यात कुठेतरी त्यांचे एकटे, हळवे कोपरे दिसतात. तेवढेच. बाकी परत पानवलकरांच्या लयदार भाषेत वेगाने सारं पुढे सरकतं आहे.
      आधी म्हटलं तसं हे तीन विश्वनाथ कुठलीही सुसंगती किंवा क्रम दाखवत नाहीत. ह्या तिन्ही पात्रांचे निर्मिती काळही मी ज्या क्रमाने त्यांच्याबद्दल लिहिलं आहे तसे नाहीत. मी ज्या क्रमाने त्यांना वाचलं तो क्रम मी लिहिण्यासाठी निवडला आहे. लेखकांच्या बाबतीत म्हणाल तर पानवलकरांची ओळख सगळ्यात आधी, दहावीच्या पुस्तकात त्यांचा ‘सुंदर’ हा धडा होता. दहावीतल्या मुलांना माणसांचा नाही तरी हत्तींच्या रोमान्सचा तरी धडा होता. तेव्हा लिखाणाला कसं पहावं हे कळत नसलं तरी तो धडा आवडला होता. मग १९-२० वर्षाचा असताना ‘रारंग ढांग’ आणि त्या टोकदार निर्णयांचं, परिणामाला न घाबरता स्वतःला पटले म्हणून करून जाण्याचं (आणि अर्थात ते न चुकता बरोबर असण्याचं) गारूड झालं. मग पुढे केव्हातरी आपली स्वतःची नैय्या सगळ्याच किनाऱ्यांवर गोते खाण्याच्या दिवसांत बोकील. आणि मग आता आपण कुठेच न जाता इथेच बसून केवळ गंमत पहावी अशा स्तब्ध दिवसांत पानवलकर परत, आणि मग त्यांच्या आयुष्याबद्दल. मला वाटतं की ह्या तीन विश्वनाथांची जास्त सुसंगती माझ्या वैयक्तिक पडझडीशी जास्त आहे. मी वयाने वाढत जाताना, आणि आकलनाने किंवा आकलन होतंय अशा भासाने फोफावताना माणसाने कसं असावं ह्याबद्दल माझाही दृष्टीकोन बदलत गेला. खरंतर माणसाने कसं असावं ह्यापेक्षा माणूस कसा आहे हाच प्रश्न मला जास्त उलगडावासा वाटू लागला. कदाचित प्रामाणिक लेखकही ह्याच प्रश्नांचा अटळ अयशस्वी पाठलाग करतात. हे तीन विश्वनाथ मला हे तीन प्रयत्न वाटतात. एक खूप आदर्श आणि काल्पनिक, एक पोएटिक, हिंदी प्रायोगिक सिनेमांसारखा पण बराचसा बेगडी, तुमच्या माझ्यात तो असण्याची शक्यता खूप कमी असलेला आणि एक अगदी दुखऱ्या कोप-यासारखा ..      


      

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...