Thursday, May 23, 2013

च्युXX कथा-२ : विक्रम वेताळ -१


             इशारा: प्रस्तुत ब्लॉगपोस्ट ही ब्लॉग लिहिणाऱ्याच्या मनोरंजासाठी आहे. त्यात अन्य कोणाच्या मनोरंजनाचाही हेतू खरंतर नाही. तसे झाल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसेच सामाजिक संदेश, सामाजिक विधायक बदल, राष्ट्रनिर्मिती, संस्कार असा कुठलाही साईड इफेक्ट साधण्याचाही ह्या लिखाणाचा हेतू नाही. ब्लॉगरच्या क्षुद्र अस्तित्वापलीकडे हे सर्व आहे.

         तर महिना अखेरच्या शुक्रवारच्या रात्री, एका आय.ची. कंपनीत काम करणारा विक्रम सिग्नेचरचे २.५ पेग टाकून त्याच्या झुणे शहरातील प्राचीन घराकडे जाऊ लागला होता. खरेतर पिवळ्या प्रकाशाने लगडलेला रस्ता सोडून तो ह्या आड रस्त्याला आला कशाला?  आणि तेही केवळ आजच्या या शुक्रवारी नाही. मागचे सहा महिने, दर मंथएंडला येणाऱ्या विकेंडला विक्रम या आड रस्त्याला येतो. त्याला  त्याचे प्रोजेक्ट आठवत नाही, त्याला त्याच्या बाबांची औषधे आणि अपॉइंटमेंट आठवत नाही. कंपनीतून बाहेर पडला की तो थेट  एक निप, शेंगदाणे आणि त्या नंतर एक रँडमली सिलेक्टेड सब्जी आणि दोन रोटी अशा नेमस्तपणे पितो. किंबहुना ही त्याची त्याच्या ऐतिहासिक, सामाजिक, वैयक्तिक अशा साऱ्या च्युत्याप्यापासूनची एक्झिट असल्यागत तो ह्या कृती करताना हरवत हरवत जातो. मग तो ग्लोव्हज घालतो, हेल्मेट घालतो, एक आडबाजूच्या बंद दुकानाच्या मागच्या दारातून एक देशी दारूची बाटली आणि चणे घेतो, आणि त्याची युनिकॉर्न घेऊन निघतो. कुठे? कशाला? शिक्षण, शिक्षणाच्या प्रवासात वाटेत नोकरीचं अॅडव्हान्स बुकिंग, नोकरीच्या प्रवासात लग्नाचे अॅडव्हान्स बुकिंग, लग्नाच्या प्रवासात संततीचे आणि म्हातारपणाचे अॅडव्हान्स बुकिंग आणि त्याच्या अध्ये-मध्ये ट्रेक्स, सिनेमे, पुस्तके, परदेश प्रवास, फोटोग्राफी, स्टेटस अपडेट आणि लाईक्स अशा मार्गावर जाणारा हा मुलगा असा भरकटला कसा? ते आपण जाणून घेऊया.
(तुम्ही आता पार्श्वसंगीत इमॅजिन करू शकता, मालिकेचे नावही इमॅजिन करू शकता, जसे खाली पडला झोका...)
         विक्रमचे झुणे शहरातील घर हा खरेतर इसवी सनाच्या वजा चौथाव्या शतकातील विक्रमादित्य राजाचा महाल असे. नंतर जसे जुन्या वस्तू ह्या आपोआप ऐतिहासिक होत जातात असा तो अशाच महत्वपूर्ण ऐतिहासिक घडामोडींचे केंद्र होत असे. सध्या तिथे इतके वेगवेगळे अवशेष होते की ते प्राचीन घर हे परसाकडे जाणाऱ्या माणसाचे चित्र असलेली आदिमानवाची गुहा किंवा महाराष्ट्रातील एक आणि एकाच थोर माणसाच्या बालपणी त्यांचा जिवलग सवंगडी जिथे पहिल्यांदा त्याच्या बायकोच्या भावाला पिठलं-भाकरी खाण्यास घेऊन आला ती जागा किंवा क्रांतिकारी विचारांचे झुणेरी तरुण, कालनिरपेक्षपणे आपल्या क्रांतिकारक निर्मिती केल्यावर मिसळ आणि ताक घेण्यास थांबत ती झुणे-५७ नावाची जागा आहे असे काहीही सिद्ध करता येऊ शकत होते. पण खरेतर विक्रमाचे अत्यंत खट असे चुलत-मावस काका अडून बसल्यामुळे अजून रीडेव्हेलप व्हायचे राहिलेले ते एक जुने घर होते. खरेतर विक्रमला पूर्वी त्या घराबाबत किळस, शरम, घृणा किंवा असे काहीही वाटत असे. त्याच्या आय.ची. कंपनीतील मित्रांना ह्या घरी आल्यावर इतिहासात आल्यासारखे वाटे, पण त्याच्या मैत्रिणी काही फार येत नसत. त्यामुळे बाकीच्यांनी कितीही 'वाव सो कूल' म्हटले तरी विक्रमाला काही मुलभूत मुद्द्यांमध्ये नको तेवढा थंडावा येत होता. अश् त्याची सॉफ्टवेअर मधली हार्ड जिंदगी चालू असताना एका विकेंडला कुठे ट्रेक नसल्याने, कोणाची पार्टी नसल्याने, कुठले भाषण, नाटक किंवा परिसंवाद किंवा संमेलन नसल्याने विकुल एकाकी असा विक्रम ओल्ड मॉंक मारून घराकडे परतत होता. त्याच्या घराच्या रस्त्यावर, म्हणजे आयफेल टॉवर हापशीच्या पुढे एक पिंपळाचे झाड होते. सकाळी त्यावरून बेसुमार पक्षी शीटत. त्यामुळे विक्रम दुसऱ्याच एका रस्त्याने आपली घोडी (वाचा युनिकॉर्न) घेऊन जाई. पण त्या रात्री, जसा की दैवयोगच, की विक्रम त्या पिंपळाच्या झाडाखालून जाऊ लागला. आणि एकूणच सरबरीत असा विक्रम त्या खडबडीत रस्त्यावरून जात असताना त्याच्या खांद्यावर धाडकन काही पडले. त्याने त्याच्या एकूण वंशाचा, इतिहासाचा आब ठेवत बाईक पडू दिली नाही. स्वतःला सावरले. त्याला त्याक्षणी एकदम 'बचेंगे ती और भी लढेंगे'  असे सारे काही आठवतही होते. आणि त्याचक्षणी मल्टी-टास्किंग करत तो कोण शिटले असेल एवढे धबडकन हेही शोधत होता. एवढे ताकदवान हागू शकणारा पक्षी इथे असेल तर त्याला कॅमेरात कॅप्चर कसे करावे, कोणता अँगल लावावा, आणि मग फेसबुकावर त्या पिकला काय नाव द्यावे असा विचार तो करत असताना त्याला कण्हण्याचा आवाज ऐकू येवू लागला.
'विक्रमा, विक्रमा...' असे तो आवाज अस्पष्टपणे म्हणत होता. हे आपले चुलतमावस काका तर पडले नाही ना पिंपळावरून म्हणून विक्रम सुखावला. आणि तो परत बटन स्टार्ट करून जायला निघणार तोच तो आवाज म्हणाला, '
'अरे, एवढे एपिसोड केलेस तू माझ्याबरोबर. आणि आज तुला माझी आठवणही येत नाही.'
आता विक्रमाला वाटले की त्याने त्याच्या एकटेपणाच्या कैफात २ खंबे मारले असावेत त्यानेच त्याचे कान आपोआप वाजू लागले आहेत.
'नाही, नाही, विक्रमा. हा आवाज तुझ्या मानगुटीवरून आहे. आणि तो तू कित्येक अमावास्यांच्या रात्री ऐकला आहेस. पण मागची ही काही वर्षे तुझ्या माझ्यात दुरावा आला. '
मानगुटी, अमावस्येची रात्र हे ऐकून विक्रम चक्रावला. पण मग त्याला लाभलेल्या आणि त्याने संपूर्ण शैक्षणिक कारकीर्दीत जोपासलेल्या स्मरणशक्तीच्या देणगीने त्याला चांदोबा मासिक आणि त्यात वाचलेल्या विक्रम-वेताळाच्या गोष्टी आठवू लागल्या. पण आपण तो विक्रम आणि हा आवाज म्हणजे तो मानगुटीवर बसणारा वेताळ, तो कूट नैतिक प्रश्न टाकणारा वेताळ म्हणजे हा असला कुपोषित आवाज! साला हा चायना वेताळ की काय, की साला कोणी 'मायग्रंट' ह्या झाडावर आलेला आणि संत्रा मारून पडलेला!!
'विक्रमा, प्रश्न मी विचारणार आणि तू उत्तरे देणार हा रिवाज. आणि आज तुलाच एवढे प्रश्न कसे विक्रमा? पण साहजिक आहे. कुठे ते अक्राळ-विक्राळ वेताळ, त्याची भयावह पिशाच्च अवस्था आणि कुठे माझे हे बापुडवाणे स्वगत. पण आज विक्रमा, मला तुझ्याशी असे बायोग्राफिकच बोलायचे आहे. आणि माझी तुला कळकळीची विनंती आहे की तू ते ऐकून घ्यावेस.'
वेताळाचे असे भावूक पैशाच्ची बोलणे ऐकून विक्रम भारावून गेला आणि आपसूकच त्याने मानगुटीवरच्या आवाजाला मनातच बोल असे म्हटले.
'विक्रमा, असे पिंपळाखाली नको. चल, तिकडे थोड्या दूरवर चायनीजवाल्याने आजची हाडे टाकली आहेत. मला कित्येक दिवसांत असे मनाजोगते अन्नही मिळालेले नाही. चल. '
(स्मशानातून जंगलात चालत जाणारा विक्रम, आणि जुन्या वाड्याच्या पिंपळाखालून चायनीजच्या गाडीवरून फेकलेल्या अवशेषांकडे जाणारा विक्रम. हे असे दिवस, ह्या अशा रात्री. माणसे काय, पिशाच्चेही बदलली असा उसासा सोडण्यास आता हरकत नाही.)
            त्या झाडझडो-यात एक रिकामा कोपरा धरून विक्रमने आपली बाईक लावली. आणि वेताळाला त्याने त्याची जी काय हाडे घ्यायची ती घेऊन मागच्या सीटवर बसायला सांगितले. त्या निऑन अंधारात जेव्हा विक्रमाने निरखून बघितले तेव्हा त्याला वेताळ थोडाफार दिसू लागला. त्या चांदोबाच्या मासिकातले कथेप्रमाणे खूप वेळा वापरून धुवून दिसलेल्या पांढऱ्या कपड्याप्रमाणे हा वेताळ होता. पण आता तो कपडा जिकडे तिकडे विरलाही होता.
'कुपोषण, विक्रमा, कुपोषण. अरे, पूर्वी, जंगले असत. भोळी-भाबडी माणसे असत. कुठेतरी एखादे देऊळ असे. वेशी-वेशीला माझे दगड असत. कोणाला झपाटणे इतके सोपे होते. आणि आता लटकायला झाडे उरली नाहीत. झाडे आहेत तिथे जावे तर जिकडे तिकडे मंदिरे, मंदिरे नसतील तर देव-देवतांच्या कॉलर ट्युन्स, स्टीकर्स, अरे आणि बाबा-भगत, जो पूर्वी १० गावांत एक सापडायचा तो तर मी ऐकलंय एका शहरात लोकल का काय असते तिच्या प्रत्येक डब्यात सापडून राहिलाय. अरे, जेवढे समंध, पिशाच्चे, भूते उरली नाहीत त्याहून अधिक तर हे तांत्रिक झाले. आणि त्यांच्या मोर पिसा-यांचा मार खाऊन खाऊन माझे सारे एजंट गेले रे. आता ते सारे आपली दाद मागायला दिल्लीत गेले आहेत. आणि त्यांना साऱ्याच प्रांतांचे साथीदार मिळाल्याने त्यांनी आपली गाऱ्हाणी जोरदार मांडायला सुरुवात केलीये विक्रमा. शेवटी, भारत माझा देश आहे विक्रमा.'
असे म्हणून वेताळाने खिशात हात घातल्यासारखी हालचाल करून एक बाटलीसारखी दिसणारी वस्तू काढली. आणि तिचा एक जोरदार घोट मारला.
'विक्रमा, अरे काही वर्षामागे मी गौड-बंग प्रांतातल्या भ्रांतीनिकेतन मधल्या आवारात एका शेकडो वर्ष जुन्या झाडावर होतो. मग तिथे एका तरुणाच्या मानगुटीवर मी बसलो. आणि तो मला जाम सोडेना. तो जंगलात काय गेला, त्याने तीर-कमान काय चालवली, त्याने तांबडे झेंडे काय लावले, आणि सारा वेळ त्याने त्याच्या झोळीशी माझे पाय जाम बांधून ठेवले. मग एक दिवस खाकी वेशातले आणि पांढऱ्या वेशातले लोक आले. त्यांनी लोकांच्या बोटांवर ५ वर्षांनी एकदा ठिपके देऊन सारी बाधा घालवली. तोवर हा तरुण चाळीशीला गेला होता. आणि मी त्याच्या झोळीत निपचित. एक दिवस तो रस्त्येच्या कडेला मेला. तेव्हा मी त्याच्या फाटक्या झोळीतून कसा-बसा  निसटलो. तेव्हा त्याच्या हातात हा मोहाच्या दारूचा बुधला होता. बघ, बघ, हा बघ.'
विक्रमाने त्या बुधल्याजवळ नाक नेले आणि त्या भयंकर उग्र भपका-याने त्याला जाम गरगरू लागले. आणि त्याचवेळी वेताळाने त्याच्या मानगुटीवर पकड कसली आणि त्याला आपल्या खास पैशाच्ची आवाजात फर्मावले,' कसा च्युत्या बनवला विक्रमा तुला? अरे, हॉरर शो तर आता तुम्ही पैसे देऊन देऊन बघता. इमोशनल स्टोरी आली, देशभक्ती आली, समाज आला, नॉस्टाल्जिया आला की मात्र साले तुमची सारी अक्कल जाते xxx. मी अजून थोडावेळ बोललो असतो तर तू तर मेणबत्ती घेऊन गेलाच असता इंडिया गेटला. चल, चल, आता चुपचाप स्टेशनाकडे चालू लाग.'
वेताळाच्या तावडीत चांगलाच सापडलेला विक्रम स्टेशनाकडे जाऊ लागला. स्मशान सोडून हा वेताळ स्टेशनाकडे कुठे घेऊन चालला असा प्रश्न विक्रमाला पडू लागला तेव्हा वेताळ परत खदाखदा हसून म्हणाला, 'विक्रमा, अरे त्या विद्युत दाहिनीच्या स्मशानात काय xx उपटणार मी? आत्ता खरे भयावह असतात ते दिवसा सर्वात गजबजलेले भागच. आणि तुला ही फुकाची चिंता हवी कशाला? तुला एकतर आता मौन ठेवायचे आहे आणि त्याचवेळी माझ्या प्रश्नांचे उत्तरही द्यायचे आहे. वाचला आहेस ना चांदोबा आणि आता तर सिरीयलपण आहे युट्यूब वर सगळी. मार निवांत डाऊनलोड. हा हा हा हा'
विक्रम चुपचाप स्टेशनाकडे चालू लागला. आणि त्या झपाटल्या मंथएंडच्या विकेंडपासून विक्रम दर मंथएन्डच्या विकेंडला त्या रस्त्याकडे जातो आहे. कंपनीतून बाहेर पडला की तो थेट  एक निप, शेंगदाणे आणि त्या नंतर एक रँडमली सिलेक्टेड सब्जी आणि दोन रोटी अशा नेमस्तपणे पितो. किंबहुना ही त्याची त्याच्या ऐतिहासिक, सामाजिक, वैयक्तिक अशा साऱ्या च्युत्याप्यापासूनची एक्झिट असल्यागत तो ह्या कृती करताना हरवत हरवत जातो. मग तो ग्लोव्हज घालतो, हेल्मेट घालतो, एक आडबाजूच्या बंद दुकानाच्या मागच्या दारातून एक देशी दारूची बाटली आणि चणे घेतो, आणि त्याची युनिकॉर्न घेऊन निघतो. त्याचवेळी धुवट विरल्या देहाच्या वेताळालाही जाग येते.        
इशारा: प्रस्तुत ब्लॉगपोस्ट ही ब्लॉग लिहिणाऱ्याच्या मनोरंजासाठी आहे. त्यात अन्य कोणाच्या मनोरंजनाचाही हेतू खरंतर नाही. तसे झाल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसेच सामाजिक संदेश, सामाजिक विधायक बदल, राष्ट्रनिर्मिती, संस्कार असा कुठलाही साईड इफेक्ट साधण्याचाही ह्या लिखाणाचा हेतू नाही. ब्लॉगरच्या क्षुद्र अस्तित्वापलीकडे हे सर्व आहे.

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...