Saturday, December 17, 2011

मांजर: एक दीर्घांक


मांजर असते एक आयुष्य, भले माणसाचे नसले तरी 
तेही चालते पायांवर, तेही आवाज काढते तोंडातून, 
तेही खाते आणि उत्सर्जन करते 
तेही देते प्रतिसाद त्याच्या भवतालाला
आणि एक दिवस तेही जाते होऊन भाग 
निश्चेष्ट अनाकलनीय अंधाराचा

मांजर असू शकते काहीही एखाद्या माणसासाठी 
अनोळखी आसपास वावरणा-या व्यक्तीसारखे 
किंवा मध्येच एकदा रस्त्यात भेटून हसणा-या ओळखीएवढे
किंवा ते असू शकते जगण्याची सवय 
एकटेपणाचा तात्कालिक तोडगा 
किंवा एकपात्री संवादांचे एकमात्र गिऱ्हाईक 

मांजर खाऊ शकते काहीही 
ते लपालपा दूध पिऊ शकते 
ते खाऊ शकते भात, चपाती, फरसाण, वेफर्स आणि असे तत्सम चकणे
ते खाऊ शकते उंदीर, मासे, कबूतर, सरडे 
किंवा ते नुसतेच घुटमळू शकते पायाशी 
भाव खात

मांजर वावरू शकते त्याच्या वयानिशी त्याच्यावर लादले जाणारे सारे अर्थ घेत 
ते मऊसर निरागस होऊन झोपू शकते तुमच्या कुशीत 
ते होऊ शकते बिलंदर आणि येऊ शकते तुमच्या घरात कामापुरते 
ते होऊ शकते गोल गरगरीत मठ्ठ बोका आणि बोचकारू 
शकते तुमच्या वर्षानुवर्षे असलेल्या पालकत्वाला
आणि त्याही पलीकडे जाऊन ते होऊ शकते एक इवले छोटे आयुष्य 
आणि तुमच्या घराच्या खोबणीत खुशाल बसू शकते पिल्लांना चाटत

मांजर हळूहळू होत जाते जिवंत अर्थांचे अबोल पात्र
त्याच्या     म्यांव म्यांव ना येऊ शकतात कुठलेही आकार 
त्याच्या हालचालींना येतात सवयींचे संदर्भ 
ते बनत जाते असण्याचा धडधडता हिस्सा 
त्याच्या सा-या ब-या- वाईट सवयींसह

तरीही आपण आखून असतो एक रेष, आपल्या आयुष्यातील 
मांजर आणि माणसांमध्ये 
आपण आपल्या सुख आणि दुखांच्या तीव्रता करून ठेवतो खुज्या 
आणि  मांजराला होऊ देत नाही मांजरापेक्षा अजून काही 
मांजराचे सुख, मांजराचे दुख 
आपण वेगळे काढतो माणसांच्या सुख-दुखापेक्षा 
मांजरांच्या स्पर्शाचे निराकार मऊसूत सुख तेवढे शोधता येत नाही कुठे 
माणसांच्या स्पर्शांना लगडून आलेले असतात अपार अर्थ 
मांजर तेवढे बिलगून जाते अबोल मागणीचे दावेदार होत 

मांजर असत असत जाते आठवणीचे थर देत 
आणि एक दिवस मांजर घेते उडी असण्याच्या सलग रेषेतून 
नसण्याच्या दिक्काल खोलीत 
आणि तिथे जाणवत रहाते 
मांजर नुसते मांजर नव्हते 
त्याच्यापाशी जडलेले कोवळे, बरे, नुसतेच आठवणींचे व्रण 
लसलसतात चार दिवस 
आपले माणूस तुटावे तश्या सवय तुटण्याचा साऱ्या जळण्याचे 
चटके देते मांजराचे मरणेही
आपण घेतो शहाणपणाचा डोस आणि मांजरच तर होते 
म्हणून सोडून देतो 

बुद्धाला जाणवला होता जगाच्या चित्राचा फसवेपणा 
एका वृध्द आयुष्याच्या अंताने 
मांजराच्या मरणाने जगाच्या नश्वरतेला छेडणारा 
महात्मा आपल्याला ठाऊक नाही 
मांजर घेत असावे सात किंवा नऊ जन्म 
म्हणूनच ते असावे इतके कोडगे 
कि एका जन्मात मरूनही
ते येत असावे परत पायाशी घुटमळत 
आणि त्याच्या निष्पाप भासणा-या आपलेपणाला
कवेत घेण्यापलीकडे रहात नसावे फारसे पर्याय 

मांजराच्या   निमित्ताने इतका झाला नसता उहापोह 
जर ते निपचित पडले असते ९-१० वर्षांच्या 
चक्रनेमिक्रमीय आयुष्यानंतर  
ते झाले असते मंद, थकाऊ आणि बसले असते जाऊन एका कोप-यात 
आणि दिसले असते केव्हातरी मान टाकून निघून गेलेले 
तर औषधे खात जगणारी तद्दन म्हातारी मेल्यावर होते 
तसे तुटले असते काही आणि सावरले असते सारे 
असे व्हायचेच अशा सोयीस्कर आशावादात

जेव्हा मांजर मारते त्याचा विलोभी निरागसपणा 
कुठलाही आकार घेण्याआधी 
तेव्हा ते सोडून जाते चरचरता दाह 
ते घालून जाते निरगाठ 
बोबड्या बालिश बालपणाशी 
जेव्हा पोक्त होण्याच्या मुत्सद्दी दिवसांत 
आपले-परके सारेच तोलले जातात
हिशोबी  निब्बर बरे-वाईटपणात
तेव्हा अजून असे काहीच न झालेले मांजर 
तेवढे शिल्लक खूण असते 
जगाच्या संकेतांचे बेरकी आकार न आलेल्या 
केवळ असण्याची 
जे आपले काही शोधत रहाते 
ते कुशीत शिरते भय-भीतीचे पुंजके डावलून 
ते हिंडते-फिरते त्याच्या शरीरात निसर्गाने आखलेला कित्ता गिरवत 
आणि एक दिवस ते सहज पार करून जाते 
मरणाची क्रूर रेषा 
त्याच्या जगण्याच्या शेवटच्या क्षणात 
त्याच्या डोळ्यांसमोर येणारी भेसूर खाई
ते लोटून देते  तुमच्या कुशीत
आणि एका क्षणी होऊन जाते एक फक्त हाडा-मासाचा गोळा

मांजर होऊन जाते आठवणीचा विरघळता ठिपका 
त्याच्या मातीआड लोटलेल्या देहाबरोबर 
ते होत जाते अस्पष्ट निशाणी 
आणि आपण परत जगू लागतो 
देत पांगळे स्पष्टीकरण 
मांजराच तर होते, एवढे काय...

मांजर काय ,माणसे काय 
आपले आपल्याला फसवणे तेवढे शाश्वत आहे 
जेवढे    शाश्वत आहे मांजराने म्यांव करणे...

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...