Thursday, December 1, 2011

पांडुरंग सांगवीकर यांस,

पांडुरंग सांगवीकर यांस,

     अर्धवट पडलेले कॉलेजचे वर्ष सोडून तुम्ही गावातच आहात का अजून? कुठेही असं, पण अशी माझ्या मानगुटीला बसण्याची काही गरज नाही. आपलं झालं थोडं आणि त्यात तुमच्या 'stream of consciousness' चं घोडं असला प्रकार होतोय...आणि तरीही जगण्याच्या सगळ्या टवक्यांकडे टक्क उघड्या डोळ्यांनी बघत त्यातली निरर्थ झिंग घ्यायची खाज जात नाही...आणि म्हणून सांगवीकर मी माझ्या होस्टेलच्या एकांड्या खोलीत परत परत तुम्हाला भेटत रहातो...
    आपल्याला लहानपणी मेलेली बहिण नाही, बाप व्यवहारी, कपटी, कुटील, कसबी असा कोणीही नाही.. फक्त जाणिवांचे संवेदनशील तंतू घेऊन जगत राहण्याच्या अफाट लाटेवर तरंगणारा मी आहे... आपल्याला गाव नाही, भाषेच्या २-४ वाटा-वळणांचे ज्ञान नाही... पूर्ण रिकामा रिकामपणा आणि अगदी मध्याशी पोकळ असणारा रिकामपणा असे दोन भाग केले तर आपण पहिल्या भागात आणि तुम्ही दुस-या... 
पण एक बिलकूल खरं आहे कि काही करून मैदान मारण्याची इच्छा नसली कि उरणारे बघेपण तेवढे तुमच्या भागातही आहे आणि माझ्याही...  
    तुमची गोष्ट वाचून संपली...संपली किंवा पुढे पाने नव्हती वाचायला...ती तुमची गोष्ट आहे का नाही हाही वादाचा मुद्दा आहे. पण तरंगत राहायच्या अवस्थेत तुमचे सांगणे वाचत जाण्याच्या काडीने मी झक्क तरंगतो आहे. माझ्या आजूबाजूला फार हुशार माणसे आहेत. त्यांनी 'प्रवाह'नावाची काही तरी गोष्ट बनवली आहे. मग त्यातले आम्ही प्रवाहात पुढे आहोत असे म्हणत झपाझप पोहत आहेत आणि काहीजण आम्ही थोडेच प्रवाहाच्या विरुद्ध असे म्हणून पोहत आहेत. मी असाच आजूबाजूला तरंगतो आहे. आता तरंगताना मी कधी प्रवाहात असतो तर कधी विरुद्ध... आपल्याला काय आहे... बालपणाची सुखरूप होडी या हिशेबी जगाच्या लाटांनी तुटली कि आपण सगळे एकच अथांगात फेकले जातो, आणि कितीही हात-पाय मारले तरी तसेच शेवटी नाका-तोंडात पाणी जावून मारतो...जे लागतात किना-याला ते दिसत तर कधी नाहीत...मग आहोत तिथे बुडलो काय आणि काही फर्लांग दूर जाऊन बुडलो काय... शेवटी आपल्या यश-अपयशाच्या निकषांचा प्रकाशही पोचणार नाही अशा एकाच अंधारात आपण पोचणार आहोत... कदाचित तुम्ही तिथे आधीच पोचला असाल... 
    छे... ही खंत-बिंत बिलकूल नाही माझी... इथली गम्मत बघणे आणि मग हळूहळू त्या गमतीपासूनही मोकळे होत जाणे ह्याचीच मला गम्मत वाटते आहे. हं..अध्ये-मध्ये जाऊन चार पत्ते टाकून आपणही दोन डाव मारून यावेत अशी खुमखुमी येते... पण असा हवं तेव्हा निघा आणि हवं तेव्हा घुसा करण्याचा निब्बरपणा अजून जमलेला नाही. पापणी न मिचकवता हे करडे-कोरडे जग बघत राहण्याची सवय लागण्याच्या आधी माझ्या आई-बापानी, मास्तर-मास्तरणीनी, पुस्तक-कथा-कविता-गोष्टी-पोवाडे यांनी जे हळवे, कोवळे जग माझ्या बुबुळात पेरले होते त्याचे आंधळेपण अजून पुरते फिटले नाही. तुमच्या भेटींनी त्याला टरटरीत तडा जातो आहे एवढे पक्के.. पण काहीवेळा तो तडा परत बुजून येतो आणि पुढे येणा-या दिवसांच्या एकसलग माळेत ह्या करड्या-कोरड्या प्रकाराला छेडून जाणारे काही आहे असे उगाच वाटू लागते...आणि मग दिवस सरकत जातात, थोडे भराभर.. आणि मग असे काहीच नाही, हे आहे असे आहे, ही माणसे आहेत, ही गर्दी आहे, हे वारंवार बुडू पाहणारे आणि तरीही वाचणारे जग आहे, ही प्रवाहात आणि विरुद्ध पोहणारी माणसे आहेत, हे आपले कल्पनांचे इमले आहेत आणि त्याच्या काल्पनिक मजल्यांवर हाशहूश करत पळणे आहे, हे पाहणे आहे, ह्या पाहण्याचा शून्य सारांश आहे...आणि परत एकदा तुमची भेट आहे...
   आपल्या पोटात खानेसुमारीची ओळ तर येणार नव्हती...आपण आलो नसतो तरी ओळीला फारसा फरक नसता... आपले दुखही साले येडझवे आहे...ते आपल्याच अंगाभोवती गुंडाळून त्याच्या उबेत झोपावे तर ते फारच मोठे आहे आणि त्यात जीव उबून जातो... आणि ते पसरवून पार क्षितिजापर्यंत त्याचाच मऊ-मायाळू अंधार करावा तर ते तोकडे आहे... नेमके दुख असणे हे नेमके सुखही आहे... सांगवीकर, इथे तुम्ही-आम्ही एकाच वाटेवर पुढे-मागे आहोत... 
    तरी तुम्ही सगळ्याचे पुस्तक लिहिलेत हे बरे केलेत...म्हणजे जसे शिलालेखामुळे मागे जे राजे होते ते कसे होते याचे अदमास अनेक थोर माणसे काढतात तसे अगदी नाही झाले तरी कंटाळ्याची रेषा ही सातत्याने वाहते आहे आणि त्या रेषेवरून दिसणारे जग तेव्हाही तसेच दिसत होते, आत्ताही तसेच आहे...एवढा अदमास तर नक्कीच घेता येतो... 
   आता बेडकासारखे पार जमिनीखाली जाऊन घुसणार आहे. सांगवीकर तुमच्या वेळेत माहितीचा स्फोट झाला नव्हता. इथे मागच्या काही वर्षात, का दशकांत जिथून तिथून माहिती बनते आहे. ती इथे-तिथे आवाज, चित्र, अक्षर असे काहीही बनून दे दणाणा जमते आहे. तिच्या ढिगाखाली मी आता जाऊन बसणार आहे. वर वर सगळे जमत राहील. आणि इतक्या गोष्टींच्या अस्तित्वाचे ओझे घेत घेत मी असण्याचे निव्वळ जीवाश्म  होईन... काहीही नसलेले आणि तरीही दगडावर आपला ठसा सोडलेले... 
     किंवा एकदा या निरर्थाच्या निमुळत्या कड्यावर छाती काढून उभा राहीन..मला आठवतील ती गाणी-कविता पार घसा बसे-पुसे पर्यंत म्हणेन आणि मग जी छलांग मारेन समोरच्या काळोख्या दरीत, सांगवीकर, कि ....
       
('कोसला'च्या 'न' व्या भेटीनंतर....)             

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...