Skip to main content

शोकाचे प्रहर उमलता

चारी बाजूनी अंगावर येत घुसमटवून टाकणा-या शांततेच्या भिंती आणि इतका श्वास कोन्डूनही कोणाला सांगायची सोय नाही... किंवा कोणाला सांगून काही फायदा नाही असा पार खोल साक्षात्कार. आपण कोणाला सांगतो आणि मग दुसरा संकटमोचन असल्याच्या नादात सहानुभूती, सल्ले, आपले साधर्म्य असलेले अनुभव असे काही ना काही आपल्या दिशेने टाकू लागतो. ऐक ना बाबा, ऐक, फक्त ऐक. जसे हे वाचतोयेस तसे नुसते एक. तुला मी सांगतोय ते सांगितल्याने तू काही उतारा सुचावशील आणि हे सलत जाणारे दुख आणि गुदमरवणारी शांतता जाऊन खेळत्या हवेचा विलक्षण आल्हाद येईल म्हणून नाही. उलटी केली कि कसं बरं वाटतं तसं जे सांगायचं ते बाहेर पडलं कि वाटतं म्हणून सागतोय...कारण नुसते माझ्याच माझ्यात हे शब्द घुमून, माझ्या शरीराच्या, धमन्यांच्या भिंतीवर निनादून माझ्या आत त्यांच्या प्रतीध्वनिन्च्या लाटा येऊन मी पार बुडून बुडून... ऐक , नुसतं ऐक, नाहीतर तुला सांगताना मी माझ्यात गुरफटून माझ्यातल्या पोकळीशी माझ्या बुबुळातला प्रकाश गिरवत बोलू लागलो कि चुपचाप निघून जा... पण जाताना काही म्हणजे काही सांगू नकोस... 
      काल असं झालं कि मी रात्री एकदम उठलो. माझ्या घरात किंवा मी ज्यांच्या घरात राहतो ते बाकीचे सगळे झोपले होते. मला एकदम वाटलं कि असेच एक दिवस सगळ्यांचे मृतदेह ठेवलेले असतील, दगडी स्थिर. कोणी रडत असतील, कुणी मुके उमाळे स्फुंदत असतील आणि काहीवेळा त्या प्रेताच्या थंड शरीर होऊन जाण्यात तुटून गेलेले आठवणींचे तुकडे कधीतरी एकदम ओलसर हळवे होऊन येतील. भर रस्त्यावर मध्ये चालत असताना तुम्हाला गेलेले माणूस आठवेल, त्याच्याशी मारलेल्या गप्पा आठवतील, त्याचे हावभाव, त्याच्या शरीराच्या हालचालींची लकब, त्याचे राग, लोभ, सवयी, तिरस्कार, माया सारे एकदम गळ्याशी दाटून येईल, अगदी गर्दीच्या मध्ये डोळे भरून येतील, धाय मोकलून रडावेसे वाटेल, जे चालले आहे ते सारे आता केवळ जिवंत असण्याच्या स्वाभाविक गृहितकाने ढकलले जाते आहे, पण जे होऊ शकत होते ते सारेच त्या माणसाच्या जाण्याने मिटून संपून पार पुसून नुसते कल्पनेच्या नाजूक दुनियेचे होऊन बसले आहे...
   पण हेही फसवे आहे. असे एकमेकांचे मृतदेह बघूनही, एकमेकांना जाळून, पुरून, राख करूनही माणसे परत हसताना दिसतात. परत त्यांना हवेहवेसे, नकोनकोसे वाटण्याएवढे आयुष्याचे आकर्षण रहाते. त्यांच्या शरीरात अपोआप असावे तसे ते दुखाला निष्ठुर दाबत जातात. त्यांच्या शरीरात अपोआप असावे तसे परत ते निवांत शांत झोपू लागतात, चवीने खाऊ पिऊ लागतात, देवभक्ती वगैरे करून, इतरांच्यात जीव वगैरे लावून परत नव्याने दुखाचा डंख घ्यायला ताजेतवाने होतात. 
   इतके वर-खाली झुलत राहूनही आपण उत्साहात, उमंगीत जगू पाहतो...ही सारी केव्हातरी जगणे खाऊन जातील इतके भव्य वाटलेल्या दुखाची थट्टा आणि ही निगरगट्ट असोशी हाच तेवढा जगायचा एकमेव तोडगा... आपण जसे असे आहोत तोच आपला खरा उपहास आहे आणि तेच आपले खरे असणे आहे... 
    आणि आता हे इतके सारे स्पष्ट दिसूनही तू माझ्याकडे पुढच्या दिवसांच्या सावलीची, रात्रीच्या चादण्यांची अनुमाने मागतेस..तूही एकदा अशी पडणारच थंडगार, दगडी, निर्जीव लाश होऊन...किंवा केव्हातरी तुझ्या जगण्याची अपरिहार्यता तुला माझा अटळ श्रोता होऊ देणार नाही आणि मग माझा तुला गृहीत मानून आपल्याच सावलीत आपल्या असण्याचे गूढ उकल्यणाचा धंदा बंद पडेल. मग हे असेच सैरभैर दिवस, ह्या अशाच पुढच्या दिवसाची हूल आणि भय देत सरकन संपून जाणा-या रात्री. हे असेच सगळे शब्द, शब्द, शब्द, श्वासात, हालचालीत, बंद-खुल्या डोळ्यांत, अंघोळ करताना , कमोडवर, रस्त्यात, अंथरुणात, आपल्याच असण्याचे आपल्यालाच नकोसे ओझे वाहताना ते आपल्याला हवेहवेसे वाटत रहाण्याचा भयानक खेळ आणि आपण एकच वेळी त्यात खेळत खेळत हारत जाणारे, आपणच तो खेळ बघत टाळ्या वाजवणारे आणि आपणच त्या खेळाचे धावते समालोचन करणारे.     
शोकाचे प्रहर उमलता 
दुखाचा शिशिर बहरतो 
संदिग्ध होऊनी दृष्टी 
अंधार मंद पसरतो 

माझ्या ओळी आणि त्याच्या आत परक्या कवीचे, परक्या लेखकाचे अस्तित्व...साले जन्मापासून आपण असेच ह्याचे त्याचे शब्द वाचत ऐकत पहात मोठे होणार, आणि मग आपल्यात ओरिजिनल काय. नुसती मुळाक्षरे शिकवून, ऐकवून सोडून दिले तर आपण काय सांगू बोलू तेच खरे, पण आता हे असे एवढ्या वर्षांचे कम-अस्सल सारे साठून बसले आहे. आपण काहीही म्हटले तरी इसवी सनाच्या आगे-मागे किंवा समुद्राच्या ऐल-पैल पसरलेल्या देशांमध्ये कोणी ना कोणी तसे काही म्हटलेलेच असते. म्हणजे आपल्या जगण्याचे प्रतिबिंब पण आपल्या खाजगी मालकीचे नाही. ते साले आधी कोणी तरी चितारलेले. हे साले शब्दांचे असे फुटके नशीब. चित्र, गाणे, नाच, शिल्प अशा बाकी चौसष्ट वगैरे कलांत असे फार होत नसावे. ज्याच्या रेषा त्याच्या रेषा, ज्याची पावले त्याची पावले, ज्याची तान त्याची तान... पण लिहिणारा असं दस्तुरखुद्द स्वतः नाहीच. तो असाच ह्याच्या त्याच्या गडद-फिकेपणाचे नाजायज पोर. आणि तरीही तो तेच शब्दांचे शस्त्र, शब्दांच्या कुबड्या, शब्दांचा एनिमा, शब्दांचा वेन्तिलेतर लावून आपल्या जगण्याची थडथडती नस पकडू पहाणारा. 
  हे वर्षानुवर्षांच्या शब्दांचे पर्वत ओलांडून गेलं पाहिजे. त्याच्या पलीकडचे ध्वनींचे, हालचालींचे, सूचक संकेतांचे बर्फाळ निद्रिस्त अरण्य ओलांडून आपले असणे आपल्याला जाणवण्याच्या निखळ किना-याशी पोचले पाहिजे. अर्थांची सारी पुटे खरवडून जे आहे ते तसे बघायचा झरोका मोकळा केला पाहिजे. टक्क उघड्या डोळ्यांनी पार भिडून पाहीले पाहिजे जगणे भय-भीतीचे आदिम कुंपण तोडून. चव, नाद, स्पर्श, अर्थ असे साऱ्यातून येणारे सुखाचे फसवे हुंकार पचवत पाहिलं पाहिजे कि आपल्या आत खरंच तो आपला आवाज वगैरे आहे का का सारेच एका रिकाम्या पोकळीवर उभारेलेले वेष्टन आहे. आणि ह्या अंतिम प्रश्नाची शहानिशा करण्यासाठी केलेल्या सगळ्या येडझव्या पायपिटीची, त्यातल्या एकारलेल्या भयाण पल्ल्यांची कहाणी मध्ये मध्ये ओरडत राहिली पाहिजे. आठवणीचे शेवाळे साचले कि जगणे कुठेच वाहत नाही. असे शेवाळे न जमू देता, स्वप्नाच्या उंच कड्यावरून कोसळून आपले दिवस आधीच्या दिवसांच्या गाळाने संपृक्त करत जाण्याचे नदीपण येईपर्यंत मागे मागे गेले पाहिजे. जगणे पुढे जाते असं सार्वत्रिक समाज असला तरी शहाणी माणसे मागे बघतात तेव्हाच शहाणी असतात, पुढे बघून ते मागच्या रेषेला स्वप्नील समाधानी दुनियेचे काल्पनिक टोक लावू पाहतात आणि मग त्याचे सारे शहाणपण विसरले जाऊन त्यांना येणारे दिवस कसे गेलेल्या दिवसांसारखेच आहेत हे समजले नाही ही ठसठशीत चूक तेवढी त्यांची खूण बनून रहाते. आपल्याला मागे नको- पुढे नको, आपल्याला तात्विक अवगुंठना नको, आपल्याला आपले अस्सल शब्द हवे. आपली पैज अमृताशी नको, आपली ओल्ड मोन्कशी पैज बरी. पण आपले शब्द नशा होवो, आपले शब्द शेकोटीचा जाळ होवो, आपल्या शब्दांत जिवंत होवो जगण्याची विलक्षण विजिगीषा आणि तिच्याखाली खोल खोल पुरले जाणारे विरोधाभास., आपले शब्द कल्लोळ होवोत, उग्र भडक वाद्यांचा आणि ते वाचणा-याला अस्वस्थ करून सोडोत, आपले पसायदान नाही, आपले अभंग नाहीत, आपले शब्द बुडून वर ना तरंगोत, आपले शब्द वाचणा-याच्या काळजाशी पोचोत, त्याच्या वेदनेच्या कुळाला स्पर्श करणारे निरागस अल्लड कण बनोत, आपले शब्द धूळ  धूळ बनून वा-यावर विरत जावोत, आपले शब्द आपले थडगे बनून न राहोत, आपले शब्द आपल्यापाठोपाठ मार्गस्थ होवोत, आपले शब्द आणि आपण कोणीच सोडून जावू नये एकमेकांना ... आपण होऊन जावे अस्तंगत संध्याकाळच्या क्षणिक अशब्दी रंगझळाळासारखे जे दिसतात पण नावाच्या यादीत अडकत नाहीत...
   हे असे प्रार्थनांचे उद्घोष, जगणे म्हणजे आहे पेक्षा व्हावे असे कोते पिकलेपण.. आणि मग कुठेतरी आजूबाजूला रटरटणा-या जगाच्या भट्टीचा चटका, कुठेतरी तो क्षण जिथे जाणवणारी हवे आणि आहे यांच्यातली जीवघेणी पोकळी, कुठेतरी ही हवे हवे चे मंत्र जपत सारे चेचत जाणारी एककलमी गर्दी, हे एकमेकांना बिलगणा-या पंडितांचे संकटकालीन अलार्म, हे पदोपदी मांडून ठेवलेले माहितीचे पुंज आणि मग हे असेच परत आपल्या आतल्या एकाट शांततेच्या निर्वातात सावकाश बेहोष होत जाणे.  
देहावर चढते भूल 
देहाला येते फूल 
देहाच्या खडकावरती 
माझीच जमते धूळ 
हे असे काही कामाचे नाही. असे मध्ये मध्ये अर्धे-मुर्धे खुळावत जाणे, अध्ये-मध्ये असे लिहिण्याचे तात्कालिक मोड फुटणे, अध्ये-मध्ये जीवितार्थाची उभारी येवून आपले बंदे नाणे खण खण वाजवायची मर्दुमकी वाटणे, असे अध्ये-मध्ये माणसे जमवून काही एक खेळ थाटून बघणे...एक काही तो प्रकार नेटाने केला पाहिजे. हेच तर सारे अशिक्षित, अर्ध, उच्च, अतिउच्च शिक्षित माणसांच्या आपले झेंडे रोवून आपल्या पुढच्या २-३ पिढ्या समृद्ध करून जाण्याचे गमक आहे. हेच तर एक खुले सत्य आहे, जिकडे तिकडे प्रकाशून असलेले. एकच एक काही केले पाहिजे, ते करत करत गेले पाहिजे... परिपूर्ण वगैरे होत गेले पाहिजे. 
ऐक भाऊ एक मार्ग भला 
इकडे-तिकडे हुंगशी
तू वेडा का खुळा
सन-थोर चालले 
रस्ता धरूनी नेटाने 
तुही पकड ऐक दिशा 
चाल कडेकडेने 
अशा तर अशा पण कविता येतच राहिल्या हव्यात, जगावर प्रकाशझोत मारून नवे नवे काही बाहेर आलेच पाहिजे, जरी माणसे आदिम काळापासून तशीच आहेत असे वाटले तरी तसे न म्हणता आधी खोटेच काही म्हणून मग जड जड शब्दांनी ते हळूच चुकले असे म्हटले पाहिजे. होतेच तर आहे असे, त्या दूर पश्चिमेच्या देशात युनीवरसीट्या मध्ये नवे नवे हररोज येते आहे, सूट-बूट टाय लावून माणसे तेजाळ होत देशचे देश इकडे तिकडे नेत आहेत, इतिहास नव्याने कळतो आहे, भूगोल नव्याने बदलतो आहे, इकडे तिकडे पृथ्वीसारखा ग्रह मिळतो आहे, नव्या कादंबऱ्या, नवे टीकाकार, नवे कवी, नवे संदिग्ध साहित्यिक, नवे, नवे असे क्षणाक्षणाला बनून अवघ्या मानवजातीवर कोसळते आहे. असे सतत सतत नवे मिळत राहणे हेच तर खरे, हेच सत्य, हेच ते जे आपण पिढ्या-पिढ्या चिरंतन शोधत आलो, ते हेच कि जे शोधतो ते नवे नवे बनून आले पाहिजे..
जिकडे तिकडे ह्या सत्याचा परीसस्पर्श मिळत आहे. इंटरनेट, टीव्ही, नाके जिकडे तिकडे नव्या नव्या प्रगतीचे मंत्र ऐकवणारे महंत आहेत. आणि ते इतके हवेतच. फार थोड्यांनी खरे काय ते सांगितले कि त्याला भलतीच किंमत येऊन ते एकदाच मुरवून परत परत वापरले जाईल. पण फार माणसे उच्च रवाने सांगू लागल्याने ते खरे आहेच असे वाटणेही बंद होते आणि मग ते परत परत शोधायला अर्थ राहतो. ते शोधणा-याचे जीवन सार्थकी वगैरे कुठेतरी लागून जाते... असे व्हायलाच हवे. दशावतार, व्यास, बुद्ध, शंकराचार्य, सोक्रेटीस, अरीस्टोटल, प्लेटो,  सोफेक्लीस, शेक्सपीअर, थोरो, थिरूवल्लूर, नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर, पॉपर, केन्स आणि अजून असे मृत, हयात, ज्ञात-अज्ञात, त्याचे शिष्य, अभ्यासक, वाचक, प्रकाशक, चिंतक असे सगळेच होऊनही नवे नवे सारे काही सापडतेच आहे...सापडो सापडो
मी तर चाललो आहे, मला तो धुक्याच्या दाटीआडचा आश्वस्त आवाज ऐकू येतो आहे, मला आता कोणी नको आहे माझे काही ऐकायला, मला काही विचारायला, मला दारू, गांजा, सिगरेट, बिडी, बाई, आई, मांजर, कुत्रा, मित्र, माणसे कोणी नकोत. 
मी हे हिवाळ्याच्या रात्रीचे निशब्द चांदणे आपल्या त्वचेत पेरून घेतो आहे, मी हे शहर मागे पडताना गाढ होत जाणारी शान्तता भरून कानाची रंध्रे बुजवतो आहे, तुझी शरीराच्या तृप्तीने क्लांत छबीची वितळती मोहर लावून मी डोळे मिटले आहेत, स्मरणाच्या सुया माझ्या रक्ताचा थेंब थेंब टचटचणा-या अबोध दुखांच्या नावे झेलून घेतायेत,  मी घेतो आहे आटोकाट हवा काठोकाठ  फुफ्फुसात भरून आणि मग ह्या हिरव्या-निळ्या अफाट जळात सूर मारतोय, शब्द, नाद, स्पर्श,दृश्य, संवेदना 
सा-याच्या पलीकडचे असणे झाकोळून जाणारी जाणीव मला कवेत घेताना..                               .              

Popular posts from this blog

???

देशासाठी, समाजासाठी काहीतरी करावं असे समज असण्याचे दिवस होते, आपल्या भोवतालच्या लोकांच्या जगण्याचा स्तर जो आहे तो का आहे वगैरे प्रश्न पडू लागले तेव्हापासून ‘जात’ ही संपूर्णपणे चुकीची गोष्ट आहे हे मानत आलो आहे. आधी फारसा अभ्यास नसताना केवळ आदर्श समज म्हणून आणि आत्ता माझ्या आजूबाजूच्या लोकांना कसलेही कार्यकारणभावाचे पाठबळ नसलेल्या ‘जात’ नावाच्या दोऱ्यावर अभिमानाचे, द्वेषाचे, सोबतच्या माणसांना जातीच्या कप्प्यांत वाटण्याचे उद्योग करताना बघतो तेव्हा माझं मत दृढ होत जातं.        माझ्या इमारतीच्या आजूबाजूला, चौकांत, बाईक्सवर, फोर व्हीलरवर उद्या होणाऱ्या मोर्च्याची चर्चा आहे. फेसबुकवर तर मता-मतांचा कल्लोळ आहे. मोर्चा कसा केवळ जातीय नाही, त्यात स्त्रियांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत असं एकानं म्हटलंय. बरं, फेसबुकवर जे विचारसरणी निहाय अड्डे आहेत त्यात लिबरल, सुजाण अशा  अड्ड्यावर नेहमी असणारा माणूस. लिखाणावरून जर लिहिणाऱ्याच्या भूमिकेची परीक्षा होत असेल तर ह्या माणसाची भूमिका बाकीच्यांनी जात मानू नये, पण माझ्या जात वाल्यांनी मानली तर वाईट म्हणू नये अशी पकडायला लागेल. त्यावर कमेंट करणारा एकजण म्हणत…

हंडाभर चांदण्या

मागच्या वर्षी कधी वर्तमानपत्रात, कधी फेसबुकवर मी ‘हंडाभर चांदण्या’ बद्दल वाचलं होतं. मग केवळ १०० रुपये तिकिटात आपल्या शहरातील नाट्यगृहात ‘हंडाभर चांदण्या’ बघितलं. टँकरची वाट बघणाऱ्या एका गावातल्या एका दिवसाची गोष्ट असं अत्यंत तोकडं वर्णन ह्या नाटकाचं करता येईल. बघायला सुरुवात करताना माझ्याकडे तेवढाच दुवा होता. नाटक गावाच्या वेशीत घुसतं तिथपासून मला ‘वेटिंग फॉर गोदो’ आठवत होतं. ‘हंडाभर चांदण्या’ वर गोदोचा प्रभाव आहे असं मला अजिबात वाटत नाही. गोदो ज्या पोस्ट-मॉडर्न म्हटल्या जाणाऱ्या अॅबसर्ड असण्यासाठी प्रसिद्ध आहे तशीच अॅबसर्डिटी ‘हंडाभर चांदण्या’ मध्येही आहे. पण ‘हंडाभर चांदण्या’ आणि गोदो ह्यांच्या अॅबसर्डिटीमध्ये एक महत्वाचा फरक आहे: गोदो हा सगळं आटपून, पोटभर हादडून केलेल्या सूक्ष्मतर निरीक्षणाचा, बौद्धिक आनंदाचा परिपाक असेल तर ‘हंडाभर चांदण्या’ ही मेलोड्रामा व्हायच्या शक्यतेत जाऊ शकणारा आक्रोश व्यक्त करणारी कृती आहे. अनेकांच्या जगण्याला ग्रासणारा, जगण्याच्या किमान पातळीचा प्रश्न कथेच्या केंद्रबिंदूला असताना त्याला तात्विक, भावनाविवश करण्याचा मोहमयी रस्ता टाळून अॅबसर्डिटी आणि …

एका मेटाफिजिकल कारस्थानाची दास्तान – १

एकदा एक नवा नवा कवी आपल्या बॅचमेटच्या गाडीतून बॅचमेटच्या इगतपुरीच्या फार्महाउसला चाललेला असतो. नवा नवा कवी आणि गाडीचा मालक हे एका प्रथितयश कॉलेजात एकत्र असतात. पुढे तिथून त्यांना नोकऱ्या लागतात. पुढे तिथून ते परदेशात जातात. पुढे तिथून ते अशा मोडला येतात जिकडे त्यांच्याकडे मुबलक पैसा जमून गेलेला असतो, त्यांचं लग्न झालेलं नसतं आणि त्यांचे आई-वडील त्यांच्याशी विकली फोनवर आणि क्वार्टरली किंवा बाय-अॅन्युअली समोरासमोर फॅमिली हॉलिडेजना भेटत असतात. मग ह्या प्रदीर्घ का-या पण मुमुक्षू अवस्थेत त्यांना त्यांचा एक सुपर सिनियर भेटतो, जो मॅरेथॉन रनर असतो आणि व्हेन्चर कॅपिटलिस्ट. त्याला भेटल्यावर गाडीवाला मित्र एथनिक ठेपले आणि आचार विकण्याचा स्टार्ट-अप काढतो आणि उरलेला मित्र, ज्याला आपण नवा नवा कवी म्हणत आहोत, तो म्हणतो, आय विल आल्सो फॉलो माय कॉलिंग, मग तो कवी बनतो.        म्हणजे तो एका कॉलेजात व्हिजीटींग शिकवायला लागतो. बाकीच्या वेळात तो कविता करू लागतो, वाचू लागतो, फिरू लागतो. मग फेसबुक अनहर्ड व्होईसेस नावाच्या पेजला तो फॉलो करतो. मग ते सगळे पेजचे लोक महिन्यातून एकदा एकेका नामचीन ठिकाणी भेटून एकमेक…