Monday, September 26, 2011

त्याच्या बिन अर्थाच्या, निष्पाप निरागस आठवणी


 बाई सावकाश चालत त्यांच्या बिल्डींगपाशी पोचल्या. त्यांचे घर तळ-मजल्यावरच होते. समोर ४ पायर्या आणि त्या चढून डावीकडे गेलं कि त्यांचं घर. त्या पायर्या चढण्या अगोदर बाई थांबल्या. त्यांनी एकदा बिल्डींगकडे बघितलं. 'आनंदी' आणि खाली १९७८. ३ मजल्यांची इमारत. आणि इमारतीच्या चारी बाजूला मोकळी जागा. मग त्यांनी एकदम त्या आजूबाजूच्या जागेकडे पाहिलं. थोडं पुढे विटा मांडून मुलं क्रिकेट खेळत होती. आणि बाकी मिळेल तिथे चारचाकी-दुचाकी गाड्या उभ्या होत्या. कोणती गाडी कोणाची हेही त्यांना लक्षात येत नव्हतं. आधी सामंतांची पांढरी गाडी, अम्बसीडर का पद्मिनी अशी काही तरी असायची. आणि तीही ते अनेकदा धक्के मारून चालू करायचे. आणि २-३ जणाच्या बजाज स्कूटर. आता कदाचित प्रत्येक घरटी एक तरी चारचाकी किंवा दुचाकी आहेच. 
  तेवढ्यात वरच्या मजल्यावरून एक मुलगा, २८-३० चा तरुण हातात किल्ली फिरवत उतरत आला. हा इथे राहतो का कोणाकडे आलाय.... बाईना सहज पार करून तो आपल्या दुचाकीशी गेला. मग त्याने ती नीट वळवून घेतली. मग एका झटक्यात पायाने किक मारून गाडी चालू करून तो निघून गेला. 
   बाईनी, अगदी अपोआप, मनात मोजले, सुहास असता तर आज किती वर्षाचा असता. ३५, पटकन आलेलं उत्तर. म्हणजे या आत्ता गेलेल्यापेक्षा मोठा. मग एकदम त्यांनी मनात त्या आत्ता दिसलेल्याचा चेहेरा ३५ व्या वर्षी कसा दिसेल असा काहीतरी तर्क करून पाहिलं. सुहास २८-३० व्या वर्षी कसा दिसला असता? मग एकदम पाटी ओलं फडकं फिरवून कोरी करावी तसं त्यांनी ते सगळं बाजूला ढकललं आणि त्या पुढे गेल्या. पायर्या चढण्याधी डावीकडे बिल्डींग मधल्या नावांचा बोर्ड. काही नावांवर नवे कागद चिकटलेले. काही नावे नुसतीच नावे म्हणून असलेली, प्रत्यक्षात तिथे वेगळेच भाडेकरू राहातायेत. एक वेळ सगळी सोळाच्या सोळा बिऱ्हाडे एकमेकांना ओळखायची. आता त्यातले ३ बाकी, बाकी सगळे नवे. अगदी नव्यांना तर आपण ओळखत पण नाही. आपण, शेजारचे वामनराव आणि दुसर्या मजल्यावरचे सावंत. बाकी गेले नव्या घरांत..दूर...
  बाई पायर्या चढून दारापाशी गेल्या. हातातली पिशवी त्यांनी दाराला टेकवून खाली ठेवली. मग पर्समधून चावी काढत त्यांनी दार उघडले. मग वाकून, वाकताना डाव्या हाताचा तळवा डाव्या गुढघ्यावर दाबून त्यांनी पिशवी उचलली. मग दरवाजा ढकलत त्या आत गेल्या. 
   त्या आत गेल्या गेल्या. एक छोटे मांजराचे पिल्लू त्यांच्या साडीच्या निर्यात, पायांत हलकेच म्यांव म्यांव करत घुटमळू लागले. त्यांनी एका हाताने दरवाजा मागे ढकलत बंद केला. चपला काढल्या आणि त्या किचनकडे गेल्या. ते पिल्लूही तसेच तुडतुडत त्यांच्या पाठी आले. 
   मग त्यांनी पिशवी टेबलावर ठेवली. मग जवळच्या स्विचबोर्डवरचे बटन दाबत पंखा सुरु केला. त्यांना त्यांच्या पोटाशी एकदम कहीतरी खेच जाणवली. ते मांजराचे पिल्लू खुर्चीवर चढले होते. मागचे दोन पाय खुर्चीवर आणि पुढचे बाईंच्या पोटाशी ठेवून ते टकमक बाईंकडे बघत होते. त्याच्या पुढच्या पायांची नखे साडीत अडकली होती. बाईंनी त्या पिल्लाला उचलून कुशीत घेतले. पुढचे दोन पाय मनगटावर आणि मागचे त्यांच्या तळहातावर टेकवून ते पिल्लू त्यांच्या छातीला कपाळ घासू लागले. बाईंनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्या पिल्लाच्या पांढर्या केसांच्या आड त्याची गुलाबी गुलाबी त्वचा दिसत होती. त्याच्या मऊ तळव्याचा स्पर्श त्यांच्या तळहाताला होत होता. 
'अरे शोनू माझी, आता टेबलावर चढायला लागली' बाई किंचित बालिश बोबड्या आवाजात त्या पिल्लाला म्हणाल्या. 'भूक लागली? दूध हवं?' मग बाईंनी पिल्लाला टेबलावर ठवले. फ्रीजमधून दुधाचे भांडे काढून एका बशीत दूध घेतले. ती बशी टेबलावर ठेवेपर्यंत पिल्लू बशीशी पोचलेही होते. त्याने लपालपा दूध प्यायला सुरुवात केली.
********** 
    दोन-अडीच महिन्यांआधी एका काळ्या-पांढर्या ठिपक्यांच्या मांजराने त्यांच्या एका रिकाम्या कुंडीत २ पिल्लांना जन्म दिला. त्या कुंडीत काहीतरी लावायचे होते पण काही झाले नाही. मग एक दिवस सकाळी उठून त्या बाकीच्या झाडांना पाणी घालायला गेल्या तेव्हा त्यांना ती ठीपकेवाली मांजर आणि ती दोन नुकतीच जन्मलेली पिल्ले दिसली. ती मांजरी जशी एकदम आशेने त्यांच्याकडे बघत होती. जसं काही मला अजून कुठे जागा नाही आहे ह्यांना ठेवायला..इथे राहू दे... मग बाईंनी एकदम हाक मारली, 'अहो हे बघा इथे काय आहे' बाईंचा  नवरा मागेच कोचावर पेपर वाचत बसला होता. सावकाश पेपर घडी करून ठेवत तो कुंडीपाशी आला. मग त्याने चष्मा आणि भिवयी यांच्या मधल्या मोकळ्या जागेतून त्या मांजराकडे पाहीले. मग परत पेपर वाचायला जात तो म्हणाला 'आत्ता वेळीच ही कुंडी बाहेर ठेवून ये. एकदा सवय पडली कि मग होणार नाही'.
 'अशी कशी बाहेर ठेवू. नुसते गोळे तर आहेत ते मासाचे. किती जगणार बाहेर ठेवले तर. जरा मोठे झाले कि देऊ सोडून. '
 'अगं ती मांजरच खाईल पिल्लांना, एवढा विचार करू नकोस. जे जगायचे ते अपोआप जगतात. ' 
'हो. झाला असलं काही बोललं कि. आई आहे ती. जगणार नाही याची खात्री झाली कीच ती खाईल. बघा कशी बघतीये आशेने. '
'बर. मग ते घरभर मस्ती करायला लागले कि मला नको सांगूस.'
नवर्याच्या वाक्याने त्यांना एकदम घरात खेळणारे सुहास आणि सुधीर आठवले. तुडतुडणारे, लोभस हसणारे. रांगत, चालत घरातला प्रत्येक कोपरा धुंडाळणारे.... आणि त्यांच्या मागे मागे फिरणारे आपण..आणि सुट्टीच्या दिवशी हे... कपाटात त्यांचे फोटो आहेत...आणि तो जुना कॅमेराही.. 
फक्त आत्ता ती लहान मुले नाहीत...आणि सुहास तर नाहीच...सुधीर पुण्याला आहे. तो आता बाप बनेल. आणि आपण इथे आहोत, हेही, आणि आता ही मांजर, तिची दोन पिल्लं आणि तिची विनंती कि इथे राहूद्या....
त्यांना वाटले कि ती मांजरी त्यांच्या जुन्या ओळखीची आहे. आणि ती तिच्या स्तनाला लुचणारी बंद डोळ्यांची दोन पिल्लेही... 
झाडांना पाणी घालून त्यांनी परत त्या कुंडीत पाहीले. ती मांजर तशीच लुकलुकत्या डोळ्यांनी बघत होती. 
'रहा बाई. पण घरभर दंगा नको करूस.' 
मांजरीने समजल्यासारखी मान खाली घेतली आणि मग डोळे मिटून ती झोपून गेली. का बाईना असे वाटले....
********
 लपालपा दूध पिणाऱ्या त्या मांजराकडे बाईंनी थोडावेळ पाहिलं. त्यांनी झाडं लावलीयेत तिथल्या ग्रीलमधून हे पिल्लू आत-बाहेर करतं. म्हणजे कधीतरी उगाच बाहेर जातं. नाहीतर खरं घरातच त्याचं त्याचं खेळत असतं. आधी त्याच्यासोबत ते दुसरं पिल्लूपण होतं. पंधरा दिवसांमागे ते गेलं. ते कुंडीतून बाहेर यायला बघत होतं आणि खाली पडलं असावं. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू  आला आणि आपण धावत गेलो कुंडी पाशी. 
   दोन्ही पिल्लं ओरडत होती. एक खाली पडलेल्याच, दीर्घ आणि आर्त...आणि एक कुंडीतूनच,,, केवळ त्या दुसर्या एकू येणाऱ्या आवाजाला आपला आवाज देत...त्यांची आई कुठेतरी गेली होती. तशी ती आता सगळा वेळ ह्यांना दूध द्यायची नाही. दिवसातून कधीतरी यायची, पडून रहायची कुंडीत, मग हे दोघं तिच्या अंगावर खेळायचे. दूध प्यायचे. ती त्यांना चाटून पुसून साफ करायची. मग ती दोन्ही पिल्लं झोपली कि ठिपकेवाली मांजर परत कुठेतरी निघून जायची. मग ती पिल्लं उठली कि एकमेकांशी खेळायची. त्या तेवढ्याश्या कुंडीत आता ती रहायची नाहीत. बर्याचदा ती कुंडीच्या काठाला आपल्या पायांनी  आणि तोंडानी धरून त्या इवल्या डोळ्यांनी घराकडे टुकूटुकू पहात बसायची. मग कधीतरी अगदी काठावर येऊन ओणवायची  पण त्यांची तिथून उडी मारायची हिम्मत नाही व्हायची. कधीतरी बाई त्यांना उचलून घरात ठेवायच्या. तिथे ती कावरी-बावरी होऊन एका कोपर्यात रहायची. खरंतर ह्यांना आवडेल का नाही हे माहित नसल्याने त्यांना सगळा वेळ घरात ठेवायच्या नाहीत. थोडावेळ झाला कि त्या कोपर्यात परत त्यांचे खेळ सुरु व्हायचे. एकमेकांना पकड, नखं न लावता पंजे मार, शेपूट ओढ... मग परत ते एकमेकांच्या कुशीत दमून झोपून जायचे. मग बाई त्यांना कुंडीत ठेवायच्या. त्यांनी कुंडीपाशी ग्रीलवर एक पुठ्ठा पण ठेवलेला, पिल्लं आलीच कुंडीतून बाहेर तर पडू नयेत म्हणून.... 
  आणि तरी ते पिलू पडलंच... अंग मातकट झालेलं, आणि तोंडाने म्यांव म्यांव.... त्यांनी पटकन जाऊन बाहेरून त्या पिल्लाला उचललं. टचकन त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या लहान जीवाला पडून लागलेला मार सहन होत नव्हता. ते फक्त ओरडत होतं. बाईंनी त्याला एकदम उराशी कवटाळले. त्याचा आवाज थोडावेळ त्यांच्या कुशीत लपला  आणि मग परत सुरु झाला. बाई त्याला तसंच पकडून घरात घेऊन आल्या. एका फडक्यावर त्या पिल्लाला झोपवून ठेवलं. पण फडक्यावर ठेवताच ते पिल्लू एकदम मलूल झालं. त्याच्या चकाकते डोळे विझत चाललेले...ते मध्येच पाय हलवायचं..जसं काही त्या हालचालींनी ते सगळ्या वेदना दूर झुगारु पाहतंय... मग नुसतंच पडून रहायचं...त्याच्या हलत्या पोटाने फक्त समजायचं कि जीव आहे अजून. 
  थोड्या वेळाने ठीपकेवाली मांजर आली. बाईना वाटलं कि हिला काहीतरी ठाऊक असेल ह्या दुखण्यातला. मांजरीने आधी कुंडीतल्या पिल्लाला दूध दिलं. तिची चाहूल लागल्याने दुसरं पडलेलं पिल्लू परत तसंच लांब, आर्त ओरडू लागलं. त्याच्या आवाजाने ती मांजर त्याचापाशी आली. तिने त्याला सगळीकडून हुंगला. थोडावेळ त्याच्या कपाळाला, मळकट पायांना चाटले. त्या वेळात ते पिल्लू तिचं दूध प्यायची खूप तडफड करत होतं. बाईना वाटलं आता मांजर त्याच्या शेजारी झोपेल, त्याला सोबत करेल... पण मांजरीने असं काहीच केलं नाही. ती थोडावेळ तिथे उभी राहिली, परत एकदा पिल्लाला हुंगून मागे वळली. तिने एकदा बाईंकडे पाहिलं. आणि मग झटकन खिडकीतून उडी मारून निघून गेली. ते पिल्लू उठायचं, आईमागे जायचा प्रयत्न करत होता,पण तिथल्या तिथेच.... बाईंनी एकदा खिडकीपाशी जाऊन पाहिलं..मांजर कुठेच नव्हती. कुंडीतला पिल्लू भित्र्या डोळ्यांनी कुंडीतून दिसणारं आकाश, बाकी झाडांची पाने आणि डोळ्यात पाणी आलेल्या बाई पहात होतं. 
   त्या पिल्लाचं काय होणार हे स्पष्ट दिसत होतं. बाईना एकदम गुदमरून गेल्यासारखं झालं. त्या पिल्लाजवळ जाऊन बसल्या. आता त्याचा आवाज कण्हत असल्यासारखा होता. बाई त्याच्या अंगावरून हलके बोटं फिरवू लागल्या. मध्येच त्या उठल्या. एका ताटलीत दूध घेऊन त्या पिल्लापाशी आल्या. त्याच्या अगदी तोंडाशी ताटली ठेवली. पण पिल्लाने काहीच हालचाल केली नाही. ते फक्त संथ दुखर्या आवाजात म्यांव म्यांव करत होतं. बाईना एकदम रडायला आला. त्यांच्या डोळ्यातलं पाणी गालांवर, हनुवटीवरून खाली फडक्यावर.... 
  आपल्याला ह्या पिल्लाची भाषा येत नाही. पण त्याच्या वेदनेची भाषा आपल्याला ठाऊक आहे. सुहास गेला तेव्हा आणि त्या नंतरच्या सावरत बांधलेल्या दिवसात आपण शिकलोय ती. तो गेला कुठे हे ठाऊक नाही, तो कसा आहे आत्ता, आहे का नाही हे ठाऊक नाही. पण तो आता येणार नाही हे येणारा प्रत्येक दिवस ठळक गिरवून जातो आहे... पण त्याच्या आयुष्याने कुठलाही आकार घेण्याआधीच तो गेला. तसंच हे पिल्लू जाणार... त्याच्या ह्या इवल्याश्या, गोंडस आकाराला पुढे कुठलीही दिशा नाही. त्याच्या आईने हेच हुंगला  आणि ती आपल्यावर हे सोडून निघून गेली. तिला जसं माहितीये कि ह्या बाईना ठाऊक आहे ह्या पिल्लाचं काय करायचं... 
   अगदी सावकाश ते पिल्लू म्यांव म्यांव करत होतं. पण त्या बारीक आवाजातही आईला बोलावणं होतं. ये आई, आई, मला लागलंय इकडे... खूप दुखतंय ग आई....म्यांव..म्यांव  
    सुहास निघून गेला तेव्हा खूपदा रात्री स्वप्नात यायचा...आणि बोलवत असायचा...कधी एखाद्या अपघातात त्याला लागलेलं असायचं...कधी कुठेतरी त्याला ताप आलेला असायचा... मग त्या उठायच्या...रडायच्या...हे आणि सुधीर त्यांना समजावत रहायचे. मग त्या त्या स्वप्नांचे अर्थ लावू पहायच्या. दुसर्या दिवशी पोलिसांना फोन करून काही तपास लागला का ते पाहायचा. ज्योतिष्यांना विचारायच्या... अगदी काही महिन्यांपूर्वीही आलेला तो स्वप्नात...पण तो इथेच घरात.... पोळी-भाजी खाताना... 
    त्यांना समजेना काय करावं ह्या पिल्लाचं... पिल्लूही ग्लानी आल्यासारखं पडून होतं. मध्येच तेच म्यांव म्यांव....
    ह्याला लांब सोडून यावं कुठेतरी...का? कारण आपण त्याला असं थेंब थेंब मरत जाताना पाहू शकणार नाही. बाहेर त्याला कदाचित कावळे-घारी खातील...त्याचे लुसलुशीत शरीर एका घासाचे... पण कदाचित ते जगेलही... त्याच्या देहात जगण्याची मुळे एकदम तरारतील..नाहीच. तसे असते तर मांजरीला कळले असते. ती आई आहे. 
   आईला कळतेच असे कुठे आहे. सुहास असा घर सोडून जाईल याचा किंचितही अंदाज नव्हता. त्याने काही चुकीचे केले असले तरी त्याच्या आत असा काही सल आहे हे एकदा तरी कुठे वाटलेले?. इतका जवळ होता, पण कसलाच अंदाज नाही. ह्या मांजरीचा अंदाजही चुकीचा असेल. 
   हे सगळे आपण उगाच म्हणतो आहोत. पिल्लाचे काय होणार हे दिसते आहे...त्याच्या कोवळ्या जीवाला होणारा त्रास झेपत नाहीये... आणि ते स्वतःला सांभाळेल इतके मोठेही नाही. पण ते डोळ्यासमोर मेलेले पहावणार नाही. त्याला बाहेर सोडले कि जर-तर च्या तंतूवर पिल्लू मेले हे स्वीकारणे सोपे आहे. जसे कुठेतरी असेल सुहास, कधीतरी त्याला आईची आठवण येईल या आशेवर आपण तो गेला, आता तो परत भेटणार नाही हे पुढे पुढे ढकलतोय.... 
         त्या दरवाजा उघडून बाहेर गेल्या. तिथे बिल्डींगचा कचरेवाला झाडत होता. त्यांनी कचरेवाल्याला विचारले कि तो ह्या पिल्लाला तो राहतो तिथे, त्यांच्या मागे जी झाडी वगैरे आहे तिथे नेऊन सोडेल का. कचरेवाला हो म्हटला. तो दहा मिनिटाने घेऊन जातो म्हणाला.   
   बाई आत गेल्या. त्यांनी परत एकदा त्या पिल्लावरून हात फिरवला. ते दूध पिते आहे का ते पाहीले. पिल्लाने पडल्या-पडल्याच त्यांच्याकडे पाहीले... त्याचे छोटे डोळे... त्यात वेदना होती, आईला हाक होती आणि त्याच्या निरागस असण्यावर झाकोळत जाणारी एक थंड दगडी सावली... मग परत ते डोळे मिटून हलके म्यांव म्यांव करू लागले. 
  बाईंनी बाथरूमच्या वरून बूट ठेवलेला एक खोका काढला. त्याच्या झाकणाला सुरीने २-३ भोके पडली. खोक्यात फडक्यासह ते पिल्लू ठेवले. त्यांना वरून झाकण लाववेना. त्यांनी तसेच खोके आणि ते झाकण दाराच्या बाजूला ठेवले. आणि त्या वाकून त्या पिल्लाला पाहू लागल्या. 
  हे म्हणाले तेव्हाच मांजरीला हुसकावून लावायला हवे होते. आता उगाच हे पिल्लू दुखरा व्रण सोडणार आहे. आणि ते जगले असते तरच्या तंतूंचे जाळे. आधीच आपण सुहास गेल्याने हळव्या झालो आहोत, त्यात आता शाळेतून रिटायर झाल्यावर घरातच असतो. आपण नवीन कुठले नाते आपल्याशी उगवणार नाही हे पाहीले पाहिजे. आपण कसा किती त्रास करून घेणार..    
   तेवढात दाराची बेल वाजली. त्यांनी उठून दार उघडले. पिल्लाकडे न पाहता त्यांनी कचरेवाल्याला तो खोका घेऊन जायला सांगितले. तो झाकण लावून खोका घेत असताना त्यांनी आत जाऊन वीस रुपये आणले आणि कचरेवाल्याला दिले. कचरेवाल्याने ते खिशात टाकले आणि तो दार ढकलून खोका घेऊन निघून गेला. 
   बाईना एकाचवेळी उदास पण हलकेही वाटले. त्या किचनमध्ये गेल्या आणि ग्लासभर पाणी घेऊन त्या टेबलापाशी खुर्चीवर बसल्या. 
**********
  कचरेवाल्याला पिल्लू दिले त्याच संध्याकाळी बाई नेहेमीसारख्या ५-५.३० बाहेर पडल्या. बिल्डींग मधून बाहेर पडून थोडाश्या पुढे गेल्या तेव्हा त्यांना तिथल्या कचराकुंडीपाशी तो बुटांचा खोका, ते फडके आणि त्याच्याच बाजूला पडलेले ते पिल्लू दिसले. त्याच्या अंगावर टोक मारल्याच्या खुणा होत्या, त्यातले रक्त त्याच्या मळक्या पांढर्या अंगावर साकळले होते. त्याचे पाय वेडेवाकडे पसरले होते. बाईना वाटले कि अजूनही त्याचा श्वास चालू आहे, सावकाश, आणि म्यांव म्यांव...अजून ते बोलावते आहे...आई, आई, ये, एकदा...जाण्याआधी एकदा.... 
  बाईना एकदम घाम आला. त्यांना रडायला येईल, आपण रस्त्यातच हंबरडा फोडू असे वाटले. जाऊन त्या कचरेवाल्याला तासडावे.. 
  बाई तशाच मागे वळल्या. होईल तितक्या झरझर चालत घराकडे येऊ लागल्या. पण तो आवाज अजून येतच होता...म्यांव म्यांव...आई आई... त्या तळहाताएवढ्या जीवात एवढा आवाज कुठून? आणि तसं असेल तर आपण त्याला घरात ठेवायला हवं होता. आपणच त्याला उकिरड्यावर फेकून मारलं. घरात मेलं असतं तर आपण पुरलं असतं कुठेतरी. आपण त्याला जगवायचा प्रयत्नही केला नाही, बस एकदा ताटलीभर दूध दिले. त्याचे रक्ताळलेले शरीर आणि तरीही त्यातले आर्जव.... आई आई मला असे बेवारस मरायचे नाही आई.... मला तुझ्या कुशीत यायचं आई....
  दार उघडून बाई घरात आल्या. दार बंद करून त्या दिवाणखान्यातल्या शोकेसपाशी येऊन त्यातला सुहासचा फोटो पाहू लागल्या.  मग त्यांनी एकदम कुंडीत जाऊन दुसरे पिल्लू पाहीले. ते शांत झोपले होते. त्यांना एकदम ते पाय वेडेवाकडे पसरून पडलेले ते दुसरे पिल्लू आठवले. आणि तो आवाज... पण आता तो आवाज कोणाला बोलावत नव्हता....तो त्या थंड दगडी सावलीत हळूहळू निवत चालला होता. बाईना वाटले कि त्या आवाजासोबत आपणही त्या काही न दिसणाऱ्या दरीत निघून जावे. तिथेच सुहास आहे...हे पिल्लू त्यानेच आपल्याला बोलवायला पाठवले होते. म्हणूनच ते त्याच्यासारखे गेले... त्याच्या बिन अर्थाच्या, निष्पाप निरागस आठवणी मागे सोडून.... 
     बरे झाले सुहासचे काय झाले ते कळले नाही. आपल्याला त्याचे प्रेत असे पाहता आले असते का? आपण तिथेच चुरगळून गेलो असतो... तो परत आला नाही त्यामुळे एक जळमटी कोपरा आपण मनात राखून ठेवला आहे. पण आता तिथले काहीच दिसत नाही. सुहास घर सोडून गेल्यानंतरच्या १६ वर्षाच्या जगण्याच्या सवयीने आपण आपल्याला एक एक दिवस ढकलायला शिकवले आहे. आपण घेरा घालणाऱ्या त्या आठवणी, शक्यता ह्याचे भेसूर चेहेरे ओळखू लागलो आहोत. आणि त्यांना शिताफीने चुकवायलाही शिकलो आहोत.  
   पण आज ते सारे त्या पिल्लाचे कोवळे शरीर होऊन आले...आपण आपणहून त्या सार्याला जवळ घेतले. 
   बाईना एकदम हुंदका फुटला. आणि मग ते सारे विचार, तर्क, प्रतिमा संपून एक टोचते आणि तरीही खूप जवळचे दुख तेवढे त्यांना जाणवत राहिले.  

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...