Wednesday, July 20, 2011

झोळी घेतलेला आणि खोल डोळ्यांचा माणूस


 समोरचे लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. एक डोळ्यात खोल गेलेली वेडाची झाक असणारा माणूस त्यांना काहीतरी सांगत होता. समोरची माणसे जणू त्याच्या शब्दांच्या दोऱ्या  वापरून कुठल्यातरी दूरच्या गावात पोचली होती. त्यांचे कान त्या माणसाचे शब्द टिपत होते आणि त्या शब्दांमधून व्यक्त होणारे अस्पष्ट, अधिरे स्वप्न त्यांच्या डोळ्यात उमटत जात होते. प्रत्येकाला ऐकू जाणारे शब्द जरी सारखे असले तरी अर्थाच्या अनिर्बंध कुंचल्यानी प्रत्येकाच्या डोळ्यासमोर नाचणाऱ्या चित्राचे रंग मात्र वेगवेगळे होते. आणि हे चित्र बाकीच्या चित्रांसारखे खुणावणारे, बोलावणारे आणि नंतर परके करून सोडणारे नव्हते. त्यात प्रत्येकाची हक्काची, ओळखीची जागा होती. 
   आपल्याला एका सुंदर जगात जगायचे आहे. आपण श्रीमंत असू का गरीब ह्यापेक्षा आपण जिथे राहणार असू तिथे काही एक रचना, काही एक विचार आणि सुंदरतेची अनुभूती आहे का हे महत्वाचे आहे. अशा रचनेत केलेल्या परीश्रमाना अर्थ आहे. आज आपण उन्दरांसारखे पळतो, गलेलठ्ठ होतो, आपापली बिळे सजवतो आणि त्या नादात सारे पोखरत जातो. एक ना एक दिवस हा पोकळ डोलारा कोसळणार आहे. आणि आपण सारे सुस्त, गुबगुबीत उंदीर त्या पडझडीत मरणार आहोत. पण आपण हे बदलू शकू. आणि ते बदलायचे म्हणजे काही पहाड उचलायचे काम नाही. आपल्या प्रत्येकाने आपल्या जगण्याचा  कोन थोडा थोडा बदलला तरी आपल्या सगळ्यांच्या मिळून असण्याचा कोन आमूलाग्र बदलेल. मी तुमच्याकडे तो तेवढा बदल मागतो आहे. तो तेवढा द्या. मग पहा, ही आजची चिरडाचीरडीची पायवाट आपल्या प्रयत्नाने बहरलेल्या फुलांनी घमघमून जाईल.  
    त्याच्या या शब्दानंतर समोरच्या समूहात मान्यतेची, समर्पणाची शांतता होती. गर्दीच्या रानटी नियमांनी बांधलेल्या, पण तरीही संस्कृती नावाची भरजरी वस्त्रे पांघरुन आलेल्या त्या समूहाच्या मनात ठासून भरलेल्या अपराधी भावनाचे काटे त्यांना आता टोचत नव्हते. आपले अस्तित्व एकमेकांना चिरडणारे आहे ह्या अविभाज्य जाणीवेपासून ते काहीवेळ दूर गेले होते. त्यांच्या आधीच्या, त्यांच्याही आधीच्या अशा कित्येक पिढ्यांना भुलवत आलेले अविनाशी, संपन्न आणि तरीही समाधानी  सहअस्तित्वाचे स्वप्न आता जणू त्यांच्यापासून काही अंतरावर होते. आणि त्या डोळ्यात वेडाची झाक असलेल्या, नात्याच्या, मैत्रीच्या काटेरी पाशापासून मोकळ्या माणसाला त्या स्वप्नसृष्टीचा रस्ता ठाऊक आहे हे त्या सगळ्यांना पटले होते. त्यांचे कंठ होकाराच्या हुंकारांनी भरून येत होते. डोळे त्या माणसाच्या अस्तिवात अमानवी असे काही पहात होते. 
   पण त्या समूहाच्या मागे एक माणूस शांतपणे हे सारे न्याहाळत उभा होता. त्याचे डोळे कुठल्याच रंगांच्या उधळणीने रंगले  नव्हते. ना त्याच्या गात्रात नुकत्याच ऐकलेल्या शब्दांनी सळसळ पेरली होती. त्या समूहाच्या अनावर होत चाललेल्या उर्जेचा लोट तो त्याच्या खोल अस्तित्वात सहज सामावून घेत होता. 
    तर मित्रानो, आपल्याला त्या वाटेवर चालायची सुरुवात करायची आहे. आणि या वाटेला तुमच्या अस्तित्वाचे इंधन नको आहे. तुम्ही जे करत आहात त्यातही, त्यानेच तुम्ही या नव्या जगाचे दूत होणार आहात. त्याला फक्त तुमच्या सहभागाचा स्पंद हवा आहे. या, या, या आजवरच्या मानवी कृत्यांचे काळे व्रण पुसून टाकणाऱ्या चिरस्थायी बदलाचे अग्रदूत होऊया...
  एवढे बोलून त्याने आपली झोळी उघडली आणि ती काहीकाळ त्या समोरच्या मंत्रित माणसांसमोर उघडून धरली. थोड्यावेळाने त्याने त्या झोळीची गाठ मारली. तशी पहिली तर रिकामी वाटणारी झोळी त्याने एखाद्या ओझ्यासारखी उचलली. मग दोन्ही हात जोडून त्याने मिटल्या डोळ्यांनी साऱ्यांना नमस्कार केला. हळूहळू समोरचे लोक पांगले आणि तिथे ती झोळी घेतलेला आणि त्या साऱ्या प्रसंगाच्या परिणामापासून अस्पर्श राहिलेला अशी दोन माणसेच उरली. 
    तो खोल डोळ्यांचा माणूस त्या झोळीवाल्या माणसाजवळ गेला. 
   अभिनंदन! खरोखर तू त्या साऱ्यांना त्या अस्तित्वात नसलेल्या किनाऱ्याशी नेवून सोडलस. आता त्याच्या भोवती ते दंभाचा कोश विणतील आणि ते त्यालाच नव्या जगाच्या जन्माची पूर्वतयारी समजतील. त्यांना 'चांगले', 'सत्य' असे शब्द जिकडे तिकडे दिसू लागतील. ते वर्तमानाची लक्तरे भूतकाळाचे हवे तसे लावलेले संदर्भ किंवा भविष्याची उबदार घोंगडी यात लपवतिल. आणि त्यांच्या सृजनवृक्ष म्हणून लावलेल्या झाडांतूनच विनाशाची बीजे पसरवतील. 
    त्या खोल डोळ्याच्या माणसाच्या या तडे पडणाऱ्या शब्दांनी तो झोळी घेतलेला माणूस थबकला. त्याने झोळी खाली ठेवली आणि तो त्या खोल डोळ्याच्या माणसाजवळ आला. 
  बरोबर आहे. तू म्हणतोस ते खरं आहे. पण ते तर माणसाच्या पायांची चिन्हे काही काळ पाहिलेला कुठलाही माणूस सांगेल. अर्थात अशी आपल्या पुढची किंवा मागची पावले नीट पाहणारे किती असतात? बहुतेकांना ती पावले एका आश्वस्त, शांत गावाकडे जात आहेत या एवढ्या आशेवर समाधान असते. पण हळूहळू पावले वाढत जातात, त्या पावलांना खुणावणारा परीघ वाढत जातो आणि मग ती पावले ज्या जमिनीवर ते उभी आहेत ती जमीन, इतरांची पावले असे सारे विध्वंसत निघतात. मी त्यांना स्वप्नांची भूल घालून काही पावले तरी वाचवतो आहे. 
  खोल डोळ्यांच्या माणसाने हे शब्द ऐकून घेतले आणि तो एक जखमी हास्य चेहऱ्यावर  घेऊन म्हणाला, आणि मग तू वाचवलेली ही पावलेच नव्या झुन्डीचे, त्या झुंडीच्या गोंधळावर पुष्ट होणारे ताबेदार बनणार.... मला तुझ्या ह्या स्वप्नांशी, त्या माणसांच्या मनात एव्हाना आकार घेऊ लागलेल्या गगनचुंबी पण जमिपासून वर तरंगणाऱ्या मिनारांशी काही घेणे-देणे नाही.  मला राहून राहून आश्चर्य एवढ्याचे वाटते कि तू त्यांना ही स्वप्ने विकतो आहेस ही केवळ तुझ्या अस्तित्वात राहण्याची अपरिहार्यता आहे हे त्यांना कधीही लक्षात कसे येत नाही. आणि त्यांची स्वप्ने या रिकाम्या दिसणाऱ्या  झोळीत गोळा करून तू ती पेरतोस आणि मग त्यांना तुझ्या रखरख आयुष्यात उडणारी फुलपाखरे करतोस हे ते कधीही पहात कसे नाहीत. जगणे आंधळे करून बेभान नाचवणाऱ्या स्वप्नाचा एकच उतारा असतो असण्याच्या असह्य हलकेपणावर .... आणि तुझ्याकडे ते स्वप्नही नाही. म्हणून तू त्यांची स्वप्ने बांधून घेतो आहेस... आणि त्यासाठी तू त्यांना नादावतो आहेस...खुळावतो आहेस...आणि सौंदर्याचे स्वप्न घेऊन विनाशाच्या धुळीत मिटणा-या  मानवी प्रयत्नाच्या जीवाश्मांसाठी तू अजून एक खूण बनवतो आहेस....
      झोळी घेतलेला माणूस सहज हसत त्याला म्हणाला,' तुझ्या आयुष्याला असे स्वप्न कधीच डसले नाही ना ? .. मग तू  त्या  रिक्ततेचा वचपा म्हणून आपल्या पावलांपुरते जगणाऱ्या, त्यात जन्म घेणाऱ्या स्वप्नांना आधीच का उखडतो आहेस? विरोधाभास हाच तेवढा ह्या जगाचा समतोल आहे. पण ही जाणीव अशी सगळ्यांना पेलत नाही...मग तू त्याचे ओझे त्यांच्या खांद्यावर का देतो आहेस....जसा मी त्यांच्या स्वप्नांच्या मुग्ध हुंकारांवर माझी दुनिया भरतो तसा तूही तुझ्या स्वप्नहीन जगण्याचे पोकळपण विरोधाभासाचे पुरावे गोळा करून भरतो आहेस.... तू काय आणि मी काय....    .           एवढे बोलून त्याने झोळी उघडली. त्यातून उडालेल्या फुलपाखरांच्या रंगानी त्याच्या चेहेर्यावर एक तृप्त हास्य आले. आणि अमर्याद आकाशाच्या पोकळीत विरत जाणाऱ्या त्या क्षणभंगुर पण नितांत सुंदर रंगबिलोरी क्षणाकडे तो खोल डोळ्याचा माणूस स्तब्धपणे पहात राहीला..... 

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...