Friday, May 27, 2011

पलीकडले जग

तो एका गजबजलेल्या चौकात उभा होता. एखाद्या वाद्याने चढती लय पकडत राहावी तशी माणसांच्या एकमेकांत गुंतलेल्या आयुष्याची त्या चौकातली लगबग वाढत जात होती. हवा उबदार होती आणि सकाळचा ताजेपणा अजून काही ठिकाणी आळशीपणे रेंगाळत होता. असाच एक आळशी कोपरा त्याला एका हॉटेलमध्ये दिसला. तिथल्या टेबलाच्या पायाशी दरवाजाच्या रंगीत काचेतून रंगून येणारा एक कवडसा थरथरत होता. आणि खुर्ची तटस्थ स्थिरतेने टेबलाची सोबत करत होती. तो त्या टेबलापाशी येऊन बसला. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एकमेव माणसाने त्याच्या समोर न विचारता चहा आणि बन-मस्का आणून ठेवला. चहाची वाफ त्याच्या चेहेर्याला सुखावून गेली. त्याने डोळे मिटले आणि पापण्यांच्या टोकाशी हुळहुळणारे वाफेचे अल्लड स्पर्श तो काही वेळ अनुभवत राहीला. पण जून होत चाललेल्या दिवसाबरोबर ती वाफही संपली. कोमट चहाचे घोट आणि मध्ये मध्ये बन मस्का खात तो काल रात्रीची स्वप्ने आठवत राहीला. तो रस्त्याकडे पाठ करून बसला असला तरी माणसांच्या हालचालींची गुणगुण त्याला आता जाणवू लागली होती. चहाचे काही घोट शिल्लक होते...तो काल रात्रीचे शेवटचे स्वप्न आठवत होता, ज्याचा स्मरणावर उमटलेला व्रण सर्वाधिक ताजा होता. पण जसा जसा तो आठवत गेला तसा तसा तो व्रण पुसट होत गेला. शेवटी त्या चित्रांची अगदी अस्पष्ट रेष उरली आणि त्याने चहाचा शेवटचा घोट घेतला.
    त्याने दोन्ही हातांचे तळवे टेबलावर ठेवले आणि एक लांब श्वास घेऊन तो त्या टेबलाचा स्पर्श हाताच्या त्वचेवर साठवत राहीला. मग कुठेतरी एक जुनी आठवण जागी झाली, आणि त्या नंतर एकाला एक लागून तो अशा आठवणींचे झोके घेत राहीला. थोड्या वेळाने त्या आठवणी कल्पना बनू लागल्या. त्याने डोळे उघडले आणि कशाने त्याचे हे झोके सुरु झाले होते ते आठवायचा तो प्रयत्न करू लागला.
   त्या हॉटेलात काम करणारा एकमेव माणूस त्याच्या समोर येऊन बसला.
   ' दरोज रात्री झोपताना उद्याचा दिवस आला नाही तर बरं होईल असं वाटतं का हो तुम्हाला?' त्या एकमेव माणसाने त्याला प्रश्न विचारला.
   त्याने त्या माणसाकडे नीट निरखून पाहिलं. प्रश्न आणि प्रश्नापाठचा चेहेरा यांचा काही जवळचा संबंध नव्हता.
   एकमेव माणूस शांतपणे हसला. 'हॉटेलच्या मागे माझं घर आहे. तिथे माझा भाऊ राहतो. तुम्हाला वेळ असेल तर त्याला भेटा.'
    'मला काही काम वगैरे नकोय. आणि कुठला सल्लाही.'
    'तो या चौकातला माणूस नाही. ' एकमेव माणूस त्याच निर्लेप पण ओळखीच्या आवाजात म्हणाला.
    तो उठला आणि एकमेव माणसापाठोपाठ हॉटेलच्या मागच्या दाराने गेला.
    मागे एक बर्याच वर्षांच्या अस्तित्वाने समजूतदार झालेलं लहानसं घर होतं. एकमेव माणसाने त्याला दरवाज्यापर्यंत सोडले आणि मग तो हॉटेलमध्ये जाण्यासाठी परत वळला.
   तो दरवाज्यातून आत गेला.

     आतली खोली पुस्तकांनी भरली होती. भिंतींच्या कडांना लागून असणारी पुस्तके, जमिनीवर पडलेली पुस्तके, खुर्चीवर स्थिरावलेली पुस्तके, कपाटात भरून ठेवलेली पुस्तके.... आणि खोलीच्या मध्याशी ढिगाने रचलेली पुस्तके....
    त्या ढिगाच्या अध्ये-मध्ये एक खूप म्हातारा माणूस बसला होता. त्याने दरवाज्याच्या दिशेने नजर फिरवली होती, पण त्याच्या डोळ्यात कोण आले आहे याचे प्रतिबिंब नव्हते. त्याचे हात-पायांवर गोंदणे, खुणा, सुरकुत्या होत्या... त्याच्या हातांची बोटे पुस्तकाच्या पानावर फिरत होती... आणि त्याच्या चेहेर्यावर बर्याच दिवसाच्या जगण्याने यावे तसे भरलेपण आणि त्याच वेळी कसलाश्या वेदनेची झाकही होती...आणि त्याचा चेहेरा तरुण होता पण त्याचे शरीर एखाद्या म्हातार्या माणसासारखे होते. पण जशी त्या खोलीत जुनी, नवी, विरत-झीरत निघालेली आणि नवेपणाचा वासही न ओसरलेली पुस्तके एकात एक मिसळून गेली होती, तसा काळाच्या सरळ हिशोबात न बसणारा तो माणूसही त्यात मिसळून गेला होता.
      'साहजिक आहे तुला आता माझ्याबद्दल प्रश्न पडले असतील.' तो माणूस एका सरळ एकटाकी आवाजात बोलू लागला.
      'तुला जसा आहे तसा मलाही या इथल्या अमर्याद अर्थहिनतेचा कंटाळा आला आहे, किंवा आला होता म्हण. मला दिसेनासं झाल्यापासून काळ माझ्यासाठी गोठल्यासारखा आहे. मी लहानपणापासून पुस्तके वाचायचो. एक दिवस पुस्तकाच्या पानांत हिंदकळणारे, खुणावणारे रेशमी झगझगीत जग आणि माझ्या आजूबाजूला पसरलेले एखाद्या सुस्त अजगरासारखे सारे काही पचवून पडलेले जग यांच्यातले अन्तर मला बोचू लागले. आणि मला जाणवले कि हा सल टोचून विसरल्या जाणार्या बाकीच्या दुखांसारखा नाही. आपण सगळे एका जाळ्यात अडकलेले आहोत. पण जेव्हा जाळ्याचा एकच तंतू हाताशी लागतो तेव्हा आपल्याला ती पुढे जाण्याची आपल्यासाठी आखलेली रेष वाटते, पण जेव्हा आपण त्या जाळ्याकडे पूर्णपणे पाहतो तेव्हा आपण कुठे जात नसून एका जाळ्यात फसलो आहोत ही रखरखीत करडी जाणीव आपला ताबा घेते. मलाही ह्याच करड्या जाणीवेच्या सलाने पछाडले होते. मला पुस्तकाच्या पानांत सुरु होणारे आणि एका पानाशी संपणारे मर्यादित आणि म्हणून रंगांच्या उधळणीला काही एक अर्थ असणारे जग खुणावू लागले. मला त्यातच रहायचे होते. त्यातल्या शक्यतांच्या खेळात उतरायचे होते. कोसळायचे होते, फुलून यायचे होते. पण मी जेव्हा जेव्हा पुस्तके वाचायचो तेव्हा त्या पलीकडच्या जगाचा स्पर्श मला माझ्या ओठांशी, त्वचेशी जाणवायचा...पण त्याल स्पर्शू पाहीले, जगू पाहीले तर सभोवतालच्या सुस्त, राखाडी जगाची धूळ तेवढी उडायची.
      एक दिवस असाच त्या ओलांडता न येणाऱ्या अंतराच्या तहानेत, मी एका रात्री पुस्तक वाचत पडलो होतो. माझ्या गात्रांना ते रुणझुनणारे नाद ऐकू येऊ लागले होते. आणि त्या कम्पनातच असणे विरून जावे, उद्याच्या जगण्याचे ओझे अंगावर येऊ नये असे वाटत असतानाच माझा डोळा लागला. पुस्तक बरोबर माझ्या छातीवर पडले आणि माझे हात पुस्तकाच्या ओळींना स्पर्शत राहिले.
   काही वेळाने मला जाग आली तेव्हा मी त्या पुस्तकाच्या मर्यादीत जगात शिरलो होतो. झोपायच्या आधी मी ज्याच्या नजरेतून ती गोष्ट ऐकत होतो त्या माणसाचे आयुष्य आता मी जगत होतो. माझ्या नकळत मी ते अंतर ओलांडले होते. आता माझ्या असण्याला माझ्या परिघात तरी का होईना एक अर्थ होता. पुढच्या पानांत उमटणारे माझे असणे माझ्या भूतकाळाच्या खुणांमध्ये सापडणारे नव्हते. जीवाला थरथरवणाऱ्या अनाकलनीयतेची मिती मी जगत होतो.
       पण अप्र्याप्याला मिळवल्याचा तो आनंद फार टिकला नाही. जशी त्या पुस्तकाची गोष्ट संपली तसा मी परत त्याच थंड, अजगरी जगात फेकला गेलो. आणि धुंदावणाऱ्या क्षणांची चव चाखल्यावर त्या कृत्रिम रंगांच्या अमर्याद अर्थहिनतेत जगणे मला कठीण होत गेले. दर रात्री मी पलीकडच्या जगात जायचो, माझे असणे कल्पनांच्या, शक्यतांच्या, वासनांच्या क्षितिजाला स्पर्शून जायचे. आणि मग केव्हातरी प्रत्येक गोष्ट तिच्या अटळ शेवटाला पोचली कि मी निर्दयीपणे परत त्या कोडग्या यांत्रिक जगात फेकला जायचो.
     माझ्या तीव्र तहानेने मी पलीकडच्या जगात जे काही जगलो ते माझ्या त्वचेवर उमटत गेले, पण त्याचवेळी विरोधाभासाच्या अपरिहार्य जाणीवेचा खिळा मारून ठेवावा तसा माझा चेहेरा माझे नेहेमीचे आयुष्य जगत राहीला. त्या पलीकडच्या जगत मी एक उपरा चेहेरा होतो. आणि हा उपरेपणा माझी सोबत करत राहीला. माझी प्रत्येक रात्र शक्यतांची अस्पर्श धागे विणत राहिली आणि त्याच वेळी प्रत्येक नवा दिवस निरार्थ निर्वात पोकळीत साठत गेला.
    असाच एक दिवशी जेव्हा मी एका संवेदनांना वेडाचे घुंगरू लावणाऱ्या गोष्टीतून बाहेर फेकला गेलो, तेव्हा रागाने मी माझे डोळे जाळून घेतले. मला माझ्या भोवतालचे मख्ख जग बघायचे नव्हते. त्यात उमटणारे उथळ तरंग मला पहायचेही नव्हते. असण्याच्या तीराला उन्मळून टाकणाऱ्या लाटांवर मला रहायचे होते. पण जसे मी माझे डोळे जाळले तसा माझा पलीकडच्या जगात जायचा रस्ता बंद झाला. आणि मग प्रत्येक रात्र माझ्या आंधळ्या तहानेला खदखदून हसू लागली. माझ्या बोटानी मी पुस्तकांच्या मध्ये दडलेल्या पलीकडल्या जगाचे किनारे चाचपत राहतो. पण अक्षरांची प्रतिबिंबे माझ्या डोळ्यात उमटत नसल्याने मी तिथे कधीच जाऊ शकत नाही. '
   त्या माणसाने एवढे बोलून एक खोल उच्छ्वास सोडला. काही वेळ ते दोघेही तसेच उभे होते.
   'हे घे'. तो माणूस जखमी स्वरात म्हणाला. त्याच्या दोन्ही हातात काही पुस्तके होती. ' तुलाही ते आपल्याला वेढून उरणारे जाळे दिसले आहे. त्यातून बाहेर पडणे म्हणजे स्वतःला भूल घालून जाळ्याच्या अस्तित्वाची जाणीव होऊच न देणे. पण एकदा ते जाळे दिसले कि अशी भूल घालता येत नाही. घातलेली प्रत्येक भूल ओसरणार आणि मग खडबडीत प्रवासाची जाणीव अजून बोचत जाणार. पण तरीही बेहोशीचे क्षण तुला हवेच आहेत. हे घे. जागे असण्याच्या कोरड्या, कोडग्या जाणीवेला काही वेळ तरी फसवणारे, एकामागोमाग येणाऱ्या दिवस-रात्रींच्या असीम वाळवंटात तरलेले हे काही हिरवे धुमारे.....'
    त्याने ती पुस्तके घेतली आणि त्या माणसाकडे न बघता तो चालू लागला. चालत चालत तो त्याच्या रहायच्या जागेशी पोचला. त्याने पुस्तके बाजूला ठेवली. त्यातले एक पुस्तक वाचायला घेऊन तो पलंगावर पडला. 
     एका दूर देशातली ती गोष्ट होती. पायाने अधू असलेलं एक मुलगा, त्याचे एकारलेले पोरके बालपण आणि त्यानंतर तो नेमकं कोण ह्याच्या शोधातला त्याचा लंगडा प्रवास... वाचता वाचता त्याचे डोळे मिटू लागले, पुस्तक नि मिटता त्याच्या छातीवर पडले आणि त्याची बोटे पुस्तकाच्या पानांना स्पर्शत....
        त्याला जाग आली तेव्हा तो थंडीने गारठत होता...खिडकीबाहेर झोपलेले शहर दिसत होते... तो खिडकी बंद करायला हुकला तेव्हा त्याला जाणवले कि तो लंगडतो आहे... खिडकीतून येणाऱ्या थंड वार्याची झुळूक त्याच्या अधू पायाच्या पार हाडांपर्यंत पोचली... कशी-बशी खिडकी बंद करून तो परत येऊन झोपला. पण आता कसलीशी काळजी त्याला घेरू लागली. त्याचे पैसे संपत आलेले, आणि ती, मिल्ड्रेड तिला काहीच समाजात नव्हतं. तो कशाचाही विचार न करता तिच्या आयुष्याला पांघरूण घालू बघत होता, आणि त्याचे पैसे संपत चालले होते.
    उद्या कॉलेजमध्ये फी भरावीच लागणार आहे, घरचे भाडे द्यायचे आहे आणि मिल्ड्रेड.... तिच्यासाठी आपण काय काय सोडणार आहोत....
     मग तो कॉलेजला गेलाच नाही, एका छोट्या खोलीत राहायला लागला....
   मग मिल्ड्रेड गेली, एका छोट्या बाळाला घेऊन आली, परत गेली, आली, आणि एक दिवस गेलीच....
    त्याचे लंगडे आयुष्य पुढे जात राहिले, आणि निर्णयाच्या प्रत्येक क्षणी तो भाम्बावत राहीला, हेच का ते जे शोधत आहोत, का अजून पुढे....
   मग रस्त्यात ओळ्ख झालेल्या मित्राचे घर, त्याची तरुण मुलगी, त्याच्या शेतात कामाला जाणे आणि एक दिवस....

        .... त्याला जाग आली. त्याचा पाय अजून दुखत होता. रात्री त्याने सुरु केलेले पुस्तक मिटून बाजूला पडले होते.  तो उठला आणि त्याने खूप प्रयासाने तो दिवस अंगावर घेतला.
   रात्री त्याने त्या माणसाने दिलेल्या गठ्ठ्यातले दुसरे एक पुस्तक वाचायला घेतले. त्या सुंदर शहरात दोन माणसे फिरत एकमेकांशी बोलत होती, नव्हे, एक बोलत होता आणि दुसरा ऐकत होता...ते भेटायचे, तो बोलायचा, दुसरा ऐकायचा आणि मग ते त्या दिवसापुरते थांबायचे... वाचता वाचता त्याचा डोळा लागला आणि आजही तो त्या...
      त्याला समोरच्या ऐकणार्या माणसाचा चेहेरा दिसतही नव्हता. पण तो बोलत होता. आणि तो जे बोलत होता ते त्याच्या भूतकाळाचे, त्याच्या विसंगत, स्वार्थी वागण्याचे स्पष्टीकरण होते. तो तो जे वागला त्याची अपरिहार्यता दाखवत होता आणि त्याचवेळी त्याचं माणूस म्हणून कोसळत जाण दाखवत होता. पण त्या स्वार्थी, स्व-केंद्रित वागण्यातही कुठेतरी लख्ख दिसणारे आयुष्याचे कवडसे होते.
   एका नदीपाशी ते आले. तिथे अजून त्या किंकाळ्या स्पष्ट ऐकू येतायेत. इथेच ती उडी घेणार होती नदीत, आणि मी फक्त बघत राहिलो होतो. आणि मी फक्त बघूच शकत होतो ना...पण मग त्या किंकाळ्या, ते हसणं माझा पाठलाग का करतय?....
   ऐकणारा दुसरा कोणी होता कि नाही कोणास ठाऊक...पण स्वतःला सावरताना मी कोसळत जातोय....

        .....तो जागा झाला तेव्हा तो घामाघूम झाला होता. तो वरकरणी होता तसाच होता, पण त्याच्या आतले साठलेले संस्कारांचे, आठवणींचे आता जळून कोळसे झाले आहेत आणि आपण आतून अगदी पोकळ होत आहोत असे त्याला जाणवत होते....
      त्या माणसाने ही पुस्तके देऊन त्याचा शाप आपल्यालाही जोडला कि काय? पण फरफटत जाणार्या हररोज दिवसांपेक्षा हे दिवस बरे आहेत... मितींच्या पलीकडे आपण रात्रभरासाठी का होईना पोचतो आहोत... 
   आता तो प्रत्येक रात्रीची वाट पाहू लागला... तो कधी समुद्राच्या रौद्र लाटांत भिजत होता, निसर्गाच्या वादळ रेषांत जगणे फुलवू पाहणाऱ्या माणसांमधला एक होत होता आणि मग एका महाकाय लाटेने उलथे-पालथे होणारे एक आयुष्य बनत होता. कधी तो मैलोन-मैल प्रवास करणारा एक शेत-मजूर होत होता. जवळपास फुकटात राबत होता. आणि मग उद्वेगाच्या एक क्षणी दैन्याच्या अवदसेत जगणाऱ्या आयुष्यांची एकजूट करावी असे स्वप्न पहात होता. त्यासाठी आपली माणसे सोडून भटकत होता आणि शेवटी माणसांच्या स्वार्थी, पिचल्या जगण्यातून एकजुटीच्या स्वप्नांना पडणारी भेग पहात होता....
    पण जश्या-जश्या या रात्री वाढू लागला तसे दिवस अधिक असह्य होऊ लागले. प्रत्येक गोष्ट कुठेतरी संपत, थांबत होती...आणि मग तो परत होता त्याच ठिकाणी परत येत होता...आणि प्रत्येक दिवशी ते परत येणे अजून अजून जाळत जाणारे होत होते..  गोष्टींमध्ये असणारी लय, तिच्यातल्या माणसाना जोडणारी, फेकणारी आणि परत सांधणारी एक अदृश्य दोरी, त्यातल्या काळाचा मंद, संथ किंवा वेगवान होत एका किनार्याकडे प्रवाहित असणं आणि जे सांगायचंय ते झाल्यानंतर उरलेल्या न सांगितलेल्या असंख्य शक्यतांच्या जगात गोष्टीचं मिटून जाणे .... त्याला त्या शक्यतांच्या मध्ये एक बनून रहायचं होतं...त्याला ह्या निब्बर कातडीच्या गतानुगतिक जगात परतायचं नव्हतं....
       त्या रात्री तो उरलेलं एक पुस्तक वाचू लागला....
     ते एक गाव होतं...तसं म्हटलं तर त्याला एक पत्ता होता. तो त्याच्या घरात एका खोलीत लहान कोरीव सोनेरी मासे बनवत होता. आणि २५ मासे बनले कि तो परत सारे मासे वितळवायचा आणि नव्याने कोरायला चालू करायचा. रिबेकाला जाऊन किती दिवस झाले ठाऊक नाही, पण ती गेली आणि आणि या खोलीबाहेरचे जग आणि मी यांच्यात एक पारदर्शक काच बनली आहे. मी या बाजूला आणि बाकी सारे तिकडे....
     बाबा इथेच दिवसरात्र काम करायचे. त्या जीप्सीने त्यांना सोनं बनवायची युक्ती शिकवली आणि मग घरातली सारी भांडी त्यांनी इथेच वितळवली . आता स्वतःला इथे दिवसरात्र कोंडून घेताना बाबांच्या वेडेपणाचा अर्थ लागतो. या गावात येऊन वसल्यापासून त्यांना त्यांच्या एकटेपणाने वेढून टाकलं. बाबांना गाव नाहीच, सतत खुणावणारे पारचे देश आणि ते शोधत रहायचा धुंदला प्रवास... त्यांना गाव सोडता येईना म्हणून देश-देश भटकणाऱ्या जीप्सिशी त्यांची मैत्री... पण तो कधी यायचा कधी नाही...मग बाबांनी त्यांच्या उरलेल्या एकटेपणाला प्रयोगशाळेच्या वेडाचे सोंग पांघरले. आता ते अंगणातल्या झाडाला बांधलेले आहेत आणि त्यांच्या डोळ्यात काय आहे कोण जाणे....पण त्यांच्या एकटेपणाचा वारसा या खोलीतून तेवढा आला आहे. आणि रिकाम्या एकटेपणापेक्षा कशालातरी बांधून घेतलेला एकटेपणा जास्त सुसह्य असतो.
   नाही, नाही, बाबा गेले त्याला बरीच वर्ष झाली. पण आई म्हणते तसं त्यांचं भूत अजूनही त्या ठरलेल्या जागी आहे. बाबांना जाता आलं नाही, आणि आता भूतही त्या सवयीचं गुलाम होऊन बसलंय.
    आठवणी एका सरळ रेषेत साठवल्या नाही कि हे असं होतं. अर्थात त्या तशा साठवू नयेतच. आठवणींची सावळी रेषा जितकी गडद तितकी एकटेपणाशी मैत्री होणं कठीण.
     आपल्याला एक दिशाहीन आंधळा राग आहे या जगावर. देवाला पूजणाऱ्या, रडणाऱ्या, मरायला घाबरणार्या... आणि त्या आंधळ्या रागाखातर आपण लढत राहिलो. आपण हरलो याचं कारण जिंकलो असतो तर लढण्याचा कारण संपलं असतं...आणि म्हणून शेवटी हाताशी आलेला विजय सोडून तह केला आपण....  पण तो राग आता उरला नाहीये. ह्या बंद खोलीत एकटेपणाने आपल्याला घासत, कोरत शहाणं करत आणलंय...
   हा आवाज कसलाय.. अरे, सर्कस आलीये का गावात? एकदा बाबा मला आणि जोसेला घेऊन गेलेले सर्कशीत... असाच विदूषक, अस्वल, नाचणाऱ्या बिलोरी मुली...
     वेळ चुकली कामाची ह्या आठवणींच्या कढात .... का वेळ झालीये आता आपली... झाली असेल तर इथे नको.... अंगणातल्या झाडापाशी....
   
तो उठला. समोर नव्या दिवसाचा प्रकाश हल्के तरंगत होता. पुस्तक संपलं नव्हतं, पण तो ज्याच्या आयुष्यात शब्द बनून शिरलेला तो संपला होता. पण त्या गावाच्या, त्या भल्या-थोरल्या घराच्या, त्या आपल्या भोवती आपल्या तर्हेवाईकपणाची वर्तुळे घेऊन फिरणाऱ्या माणसांची सोबत त्याला हवी होती. त्याला शरीरांचा उत्त्फुल उत्सव जगायचा होता, प्रथा-रुढींचे पीळ आणि त्यांच्यात अलगद शिरणारे नवे वारे स्पर्शायचे होते. आणि त्याला त्याच्या भोवती कुठले वर्तुळ उमटते ते पहायचे होते..बंद खोलीत मासे कोरणारे, अंगणातल्या झाडाशी भूत बनून राहणारे, बहिणीचा द्वेष करत एकटे आयुष्य जगत विणकाम करत जगणारे का चार पिढ्यांच्या वेडसरपणाचा सांभाळ करताना अंधाराच्या सावल्या स्वतःभोवती वेढून घेणारे. आणि इथे आपली माणसे मेलेली, पुरलेली आहेत, म्हणजे तर पक्के हेच आपले गाव.... हेच तर गाव आपलं...ह्या उनाड, प्रश्नांनी पोखरलेल्या आणि अंध दिशांच्या जगात आपण फक्त वाट बघत थांबलेलो तो दरवाजा उघडण्याची.... ही माणसे स्वतःच्या विश्वासाची पट्टी बांधून आहेत डोळ्यांवर, ती या गर्दीत एकमेकांना धडकतात आणि त्यालाच सापडणे म्हणून एकमेकांचे हात धरून लोंबकळत राहतात. त्या गावात सताड उघड्या डोळ्यांचा, सारी दिशाभूल पाखडून असण्याचे गणित सोडवणारा एकटेपणा तर आहे....तिथेच.....
        त्याने एक धारदार सुरी आणली. तो पलंगावर पडला. त्याने सुरीच्या पात्यावरून एकदा बोट फिरवले आणि मग सफाईने ती सुरी मनगटावर चालवली. वेदनेची एक लाट, बांध फुटल्यासारखी एक जाणीव...
   दुसर्या हातात त्याने पुस्तक घेतले आणि तो ते वाचू लागला. हळूहळू त्याची शुद्ध हरपू लागली आणि त्या पलीकडल्या जगाचा दरवाजा किलकिला होऊ लागला. ते गाव, ते भले-थोरले घर, ती सर्कशीची मिरवणूक....
  तो त्या गावात पोचला आणि पलीकडच्या जगाचा उघडलेला दरवाजा अल्लद बंद झाला...आता तो इथून मागे कुठेच जाणार नव्हता....      

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...