Skip to main content

दम मारो दम.....

संध्याकाळ होत येते... दिवसभर घातलेला शहाणपणाचा अंगरखा डाचायला लागतो... जगात दोन नाही तीन प्रकारची माणसे असतात....एक आहोत तिथेच बघणारी..एक आहोत त्याच्या थोडं पुढे बघून कुठे पाऊल टाकायचं ते ठरवणारी....आणि तिसरी म्हणजे या पहिल्या दोघांकडे आणि खूप दूर बघणारी आणि कदाचित कुठेच न जाणारी....खूप दूर पाहिलं कि सगळी पावलं सारखीच भरकटलेली वाटतात. थोड्या अंतरात अर्थाची सुसंगती असते. पण अशी अंतरं जोडून एक लांब पल्ल्याची शहानिशा करू पाहिलं कि एकमेकांत गुंतलेल्या अटळ विरोधाभासांची भोवळ तेवढी येते.
    जाणीव, आपण काय करतोय असा प्रश्न हा शाप असतो. कारण त्याला उत्तर नसतं. त्याला फक्त उत्तर म्हणून उभे केलेले तात्पुरते बचाव असतात. प्रश्नाचा जोर वाढला कि ढासळणारे, बदलणारे आणि प्रश्नांचा अजून खोल रुतत जाणारा बाण.... लहानपणापासून प्रश्नाला उत्तर असतं अशी एक अंधश्रद्धा बिंबवली जाते मनावर. मोठं झाल्यावर बहुतेकजण हे पाखंड चालू ठेवतात. पण प्रश्नांना, मित्रानो , तोडगे असतात, तडजोडी असतात किंवा प्रश्न नाहीसे करावे लागतात. पण प्रश्नाचे समाधान करणारे उत्तर असा प्रकार फक्त भारताची राजधानी कुठली अशा प्रश्नांनाच असतो. माणसाच्या कृतीच्या अगम्य मुळात एकदा का प्रश्न घुसले कि प्रश्नाला उत्तर नसतं,,,अनेकदा प्रश्नही एखाद्या धूसर अंधार्या वाटेत जाणवणाऱ्या अनाम भयासारखा असतो. 
   खोल जात चाललेली संध्याकाळ....आणि या इमारतींच्या जाळ्यात बचावलेला हलका वारा.... शहाण्या माणसाचा मळलेला अंगरखा....
   ही आता magic  पोएट्री ची वेळ.... म्हणजे संदिग्धतेची भुरभूर वाळू आणि अशब्द संवेदनांची झुळूक यांत दिसणारं ते दूर  क्षितीज....एका क्षणाचा उत्त्फुल आनंद आणि त्यानंतर अव्याहत कोसळत जाणे....आनंदाची जाणीव ही माणसाच्या एकटेपणाची मुलभूत जाणीव....ती कशातच येत नाही.....ती देताही येत नाही आणि घेताही येत नाही ....शब्दांचा सारा  पसारा ह्या जाणीवेच्या परीघापाशी येऊन थांबतो...पुढे आपण एकटच जायचं, एकटच भोगायचं...आणि एकटच रितं होऊन यायचं किंवा यायचच नाही.... 
    magic पोएट्री ची पहिली ओळ....मी आता रस्त्यावर दिसणाऱ्या कुठल्याही माणसाकडे बघून मस्त हसणारे....
    magic पोएट्री ची दुसरी ओळ....मी शहाणपणाचा मळका अंगरखा काढून माझ्या असण्याच्या सुरंगी जाणीवेत फिरणारे.....
    संध्याकाळ आता पार खोल अंधाराच्या पोटात गुडूप.... माणसांच्या गरजा, वासना, इच्छा, उत्कंठा, पिपासा, तृषा अशा असंख्य जाणिवांच्या interconnected समुद्रात बेटासारखं उगवलेलं शहर.....
  आणि चारी बाजूला या बेटाला तरंगवणारा आणि त्याच वेळी पोटात ओढू पहाणारा तोच interconnected समुद्र. निर्मितीच्या हातात अल्लड खेळणारा विनाश.... 
    हा हा....ही बोलण्याची तहान आहे ती या समुद्रात कुठेही भागणार नाही.... ही तहान नाही...ही नशा आहे.... बोलत राहणं, सांगत राहणं, ऐकत राहणं.... कोण कोणाला आवाज देणार मी.... 
    magic पोएट्री...इथे मीच माझ्याशी गप्पा मारतोय.... मी काळाच्या अनंत किनार्यावर उमटलेली माझी पाऊले पाहतोय....मी प्रत्येक पावलाशी कवितेची श्रद्धांजली देत चाललोय.....
   उद्या, परवा, काल , आधीची हजारो वर्षे, येणारी कोण जाणे किती....माझ्या खांद्यावर मला एकही क्षण नकोय..... मी format मारतोय हार्ड डिस्क.... आता फक्त magic पोएट्री चे जीवाश्म इथे उमटनारेत....शहाणपणाचा व्हायरस त्यांना डीलीट करे पर्यंत....
    दम मारो दम....मिट जाये गम.... चुकलास मित्रा.....मिट जाये गम तर मग उरणार काय? 
    दुखाची कलाबूत आहे मित्रा, अगदी नाजूक पण पक्की.... हे सारे निर्मितीचे हुंकार, स्वर, व्रण त्या कोणालातरी चिरत गेलेल्या प्रश्नांच्या बाणाचे, सांगण्याच्या तहानेचे आहेत.... माणसाच्या एकटेपणाचे, त्याच्या भोवतीच्या अर्थहीन खेळाचे दुख जर मिटले तर?  
   ही माणसे लगबगीने पळतायेत, एकमेकांशी बोलतायेत, ह्या शहराच्या नाकपुड्यात ते त्यांच्या हालचालींचा ऑक्सिजन भरत चाललेत आणि शहर इकडे तिकडे फेकत चाल्लय माणसे एकेका उच्छ्वासासरशी.... मला कुठलाच अर्थ लागत नाहीये ह्या सगळ्या गोंधळाचा....उसन्या घेतलेल्या क्षणभंगुर स्वप्नांवर, नात्यांच्या एकमेकांना गुंतवत जाणार्या जाळ्यांवर पोसली जाणारी, अडकणारी आणि त्या अडकण्यालाच सापडणं म्हणत जल्लोष करणारी माणसे.... आणि मध्येच एकमेकांच्या असण्याची किंवा नसण्याची सवय मोडली कि अर्थहिनतेच्या निर्वात पोकळीत गुदमरणारी माणसे....आणि मग कुठल्याही गोष्टीचा आधार घेऊन त्या अर्थहिनतेच्या निर्वात पोकळीतून बाहेर पडायची धडपड,,,त्या धडपडीला अर्थपूर्णतेचे कपडे चढवायची धांदल....हा हा हा 
    सगळ्यात वाईट व्यसन म्हणजे जगण्याचं, त्या खालोखाल दुसर्या कोणाच्या असण्याचं...जाम सुटत नाहीत ह्या गोष्टी... 
   जरा कधी बाथरूम मधलं फिनेल पिऊन बघा...ती चव किंवा बेचव जशी घशातून खाली जाईल ना तसे फक्त आढ्याकडे बघत पडून राहा....मग मळमळ होईल, ओकारी येईल,,,,थोडं अजून प्या....मग बघा कोणालातरी हाक मारायची लाट उसळून येते अंगभर...पोटात गेलेलं, जगून झालेला किबा जगायचं राहिलेलं सगळं बाहेर पडू पाहता....हात-पाय आपोआप बचावाच्या हालचाली सुरु करतात....आणि आपण मरत नाही फिनेलने .....पण जगण्याचं व्यसन किती पक्कं ते कळेल....
    आणि दुसरं कोणी असण्याच्या व्यसनाबाबत तर काय बोला.....आपल्या असण्याची आपल्याला खात्री असते कारण दुसर्या कोणाचा संदर्भ आपण आपल्या असण्याला देऊ शकतो....तो संदर्भ सोडला तर आपली सारी गृहीतके कोसळतात.....
    आता गोड काळोख आहे सोबतीला....मी खिडकीच्या चौकटीतून दिसणारे आजूबाजूच्या अस्तित्वाचे आवाज ऐकतोय... 
     दम मारो दम....   मी आता एक गच्च कश मारतोय गांजाचा....आणि आता मला समोरच्या कोड्याचे अर्थ उकलू लागतील....
     हद हद जाये हर कोई...अनहद जाये ना कोई....
     हद अनहद के बीच मे रहा कबीरा सोये....
   माणसाळलेलं असण्याची हद्द ओलांडली जातीये....संस्कारांचे केविलवाणे आवाज धुंदीच्या बेलगाम हाकांना कुठे पुरे पडणारेत..... दुसरा कश.... आणि आता अनहद.....
   कबीरा....कुठे झोपलायेस बाबा....जरा मलाही पथारी पसरू दे......
   निवत चाललीये शहराची रटरटती  भट्टी....आणि ही उरलेली घोटभर शांतता....थांब जरासा वेळ तोवरी....
   आता कश मोजलेले नाहीत....आणि magic पोएट्रीच्या किती ओळी झंकारून गेल्यात.....
   शब्दांचे किनारे मागे पडतायेत....स्मरणाचे काटे कुठेही खुपत नाहीयेत..... बोलायच्या तहानेला कवितांचे झरे येऊन मिळतायेत आणि मीच मला सांगत चाललोय, पहात चाललोय उमलणार्या, आणि त्याच क्षणात मनात शोषल्या जाणार्या गाण्यांच्या ओळी.....
    निर्मम, निखळ एकटेपण....मायाळू, समंजस मौन.... स्वप्नांचे आवाज ऐकू न येणारी शांत झोप.....  
    आकाशाच्या निर्विकार कृष्णतेला नव्या दिवसाच्या प्रकाशाची धडक बसतीये....  आटत चाललीये त्वचेला स्पर्शणारी उब....माझे डोळे मिटत चाललेत.... शेवटचा कश.... जाणीव कोसळत चाललीये शांततेच्या खोल डोहात....कानाशी ऐकू येणारा हे एक शेवटचं गाणं...
     Have no fear for when I'm alone
I'll be better off than I was before

I've got this light
I'll be around to grow
Who I was before
I cannot recall

Long nights allow me to feel...
I'm falling...I am falling
The lights go out
Let me feel
I'm falling
I am falling safely to the ground
Ah...

I'll take this soul that's inside me now
Like a brand new friend
I'll forever know

I've got this light
And the will to show
I will always be better than before

Long nights allow me to feel...
I'm falling...I am falling
The lights go out
Let me feel
I'm falling
I am falling safely to the ground

Popular posts from this blog

???

देशासाठी, समाजासाठी काहीतरी करावं असे समज असण्याचे दिवस होते, आपल्या भोवतालच्या लोकांच्या जगण्याचा स्तर जो आहे तो का आहे वगैरे प्रश्न पडू लागले तेव्हापासून ‘जात’ ही संपूर्णपणे चुकीची गोष्ट आहे हे मानत आलो आहे. आधी फारसा अभ्यास नसताना केवळ आदर्श समज म्हणून आणि आत्ता माझ्या आजूबाजूच्या लोकांना कसलेही कार्यकारणभावाचे पाठबळ नसलेल्या ‘जात’ नावाच्या दोऱ्यावर अभिमानाचे, द्वेषाचे, सोबतच्या माणसांना जातीच्या कप्प्यांत वाटण्याचे उद्योग करताना बघतो तेव्हा माझं मत दृढ होत जातं.        माझ्या इमारतीच्या आजूबाजूला, चौकांत, बाईक्सवर, फोर व्हीलरवर उद्या होणाऱ्या मोर्च्याची चर्चा आहे. फेसबुकवर तर मता-मतांचा कल्लोळ आहे. मोर्चा कसा केवळ जातीय नाही, त्यात स्त्रियांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत असं एकानं म्हटलंय. बरं, फेसबुकवर जे विचारसरणी निहाय अड्डे आहेत त्यात लिबरल, सुजाण अशा  अड्ड्यावर नेहमी असणारा माणूस. लिखाणावरून जर लिहिणाऱ्याच्या भूमिकेची परीक्षा होत असेल तर ह्या माणसाची भूमिका बाकीच्यांनी जात मानू नये, पण माझ्या जात वाल्यांनी मानली तर वाईट म्हणू नये अशी पकडायला लागेल. त्यावर कमेंट करणारा एकजण म्हणत…

हंडाभर चांदण्या

मागच्या वर्षी कधी वर्तमानपत्रात, कधी फेसबुकवर मी ‘हंडाभर चांदण्या’ बद्दल वाचलं होतं. मग केवळ १०० रुपये तिकिटात आपल्या शहरातील नाट्यगृहात ‘हंडाभर चांदण्या’ बघितलं. टँकरची वाट बघणाऱ्या एका गावातल्या एका दिवसाची गोष्ट असं अत्यंत तोकडं वर्णन ह्या नाटकाचं करता येईल. बघायला सुरुवात करताना माझ्याकडे तेवढाच दुवा होता. नाटक गावाच्या वेशीत घुसतं तिथपासून मला ‘वेटिंग फॉर गोदो’ आठवत होतं. ‘हंडाभर चांदण्या’ वर गोदोचा प्रभाव आहे असं मला अजिबात वाटत नाही. गोदो ज्या पोस्ट-मॉडर्न म्हटल्या जाणाऱ्या अॅबसर्ड असण्यासाठी प्रसिद्ध आहे तशीच अॅबसर्डिटी ‘हंडाभर चांदण्या’ मध्येही आहे. पण ‘हंडाभर चांदण्या’ आणि गोदो ह्यांच्या अॅबसर्डिटीमध्ये एक महत्वाचा फरक आहे: गोदो हा सगळं आटपून, पोटभर हादडून केलेल्या सूक्ष्मतर निरीक्षणाचा, बौद्धिक आनंदाचा परिपाक असेल तर ‘हंडाभर चांदण्या’ ही मेलोड्रामा व्हायच्या शक्यतेत जाऊ शकणारा आक्रोश व्यक्त करणारी कृती आहे. अनेकांच्या जगण्याला ग्रासणारा, जगण्याच्या किमान पातळीचा प्रश्न कथेच्या केंद्रबिंदूला असताना त्याला तात्विक, भावनाविवश करण्याचा मोहमयी रस्ता टाळून अॅबसर्डिटी आणि …

एका मेटाफिजिकल कारस्थानाची दास्तान – १

एकदा एक नवा नवा कवी आपल्या बॅचमेटच्या गाडीतून बॅचमेटच्या इगतपुरीच्या फार्महाउसला चाललेला असतो. नवा नवा कवी आणि गाडीचा मालक हे एका प्रथितयश कॉलेजात एकत्र असतात. पुढे तिथून त्यांना नोकऱ्या लागतात. पुढे तिथून ते परदेशात जातात. पुढे तिथून ते अशा मोडला येतात जिकडे त्यांच्याकडे मुबलक पैसा जमून गेलेला असतो, त्यांचं लग्न झालेलं नसतं आणि त्यांचे आई-वडील त्यांच्याशी विकली फोनवर आणि क्वार्टरली किंवा बाय-अॅन्युअली समोरासमोर फॅमिली हॉलिडेजना भेटत असतात. मग ह्या प्रदीर्घ का-या पण मुमुक्षू अवस्थेत त्यांना त्यांचा एक सुपर सिनियर भेटतो, जो मॅरेथॉन रनर असतो आणि व्हेन्चर कॅपिटलिस्ट. त्याला भेटल्यावर गाडीवाला मित्र एथनिक ठेपले आणि आचार विकण्याचा स्टार्ट-अप काढतो आणि उरलेला मित्र, ज्याला आपण नवा नवा कवी म्हणत आहोत, तो म्हणतो, आय विल आल्सो फॉलो माय कॉलिंग, मग तो कवी बनतो.        म्हणजे तो एका कॉलेजात व्हिजीटींग शिकवायला लागतो. बाकीच्या वेळात तो कविता करू लागतो, वाचू लागतो, फिरू लागतो. मग फेसबुक अनहर्ड व्होईसेस नावाच्या पेजला तो फॉलो करतो. मग ते सगळे पेजचे लोक महिन्यातून एकदा एकेका नामचीन ठिकाणी भेटून एकमेक…