Tuesday, April 26, 2011

विसरले जाणारे एक साधे आयुष्य

सदू, चार भावांतला तो तिसरा आणि तिन्ही भावांपेक्षा वेगळा. सदू चार वर्षाचा असताना त्याची आई गेली. त्यांनतर वडिलांनी एका हळव्या जागेसारखा सदूला जपला. सदूचे वडील एका वाड्याचे, त्याच्यापुढच्या निवांत पसरलेल्या अंगणाचे, मागच्या निगा राखलेल्या बागेचे एकुलते एक मालक. खरंतर त्यांच्या चारही मुलांना बायका-पोरांसह पुरून उरेल एवढी जागा वाड्यात. पण सदूचा सगळ्यात मोठा भाऊ अकाली गेला, दुसर्याने कुठल्या एका झटक्यात भ्रमंती आणि ब्रह्मचर्य पत्करले, तिसरा सदू....त्यामुळे चौथ्या भावाच्या बायकोकडे वाड्याची सूत्रे गेली. अर्थात सदूच्या गोष्टीतला हा नगण्य भाग.
  तर सदू चौथीपर्यंत शाळेत गेला. किंवा मास्तर ओळखीचे म्हणून चौथीपर्यंत पुढे ढकलला गेला. वडिलांची आशा होती कि एक दिवस नशिबाचा फासा पालटेल. सदू चार-चौघांइतका, किमान ढोबळ आकार असलेला माणूस होईल. एक दिवस सदू शाळेतून घरी आला नाही. वाटेत कुठेतरी त्याचे दप्तर सापडले. त्याच्याबरोबर वर्गात असलेल्या मुलांना विचारले तर त्यांनी सदूला शाळेतून बाहेर पडताना पाहिल्याचे सांगितले. उरलेला आख्खा दिवस वडील आणि दोन भाऊ त्याला शोधत राहिले. रात्रभर सगळे जागे होते. दुसर्या दिवशी पोलिसात तक्रार झाली. दुपारपर्यंत हा लोकांना चर्चेचा विषय झालेला. शाळा सुटल्याची वेळ झाली आणि सदू घरी आला. चेहरा, कपडे मळलेले...पण कुठे ओरखडा नाही. चेहेर्यावर मधला एक दिवस दिवसांच्या माळेतून सुटल्याचा मागमूसही नाही. सगळ्यांनी त्याला खोदून खोदून विचारून पाहीले. पण ते सगळे प्रश्न निरर्थक असल्यासारखं सदू त्याच्या कोर्या, किंचित हसर्या डोळ्यांनी सगळ्यांकडे बघत राहीला. शेवटी भाऊ त्याच्या या गप्प बसण्यावर चिडून त्याला मारायला धावला तेव्हा सदू घरातून बाहेर पळत आला. घराबाहेर असलेल्या आणि त्या दुपारी निवांत पहुडलेल्या अंगणात आपल्या फांद्यांचा कुटुंब-कबिला सांभाळत वयाने म्हातारे असे एक झाड होते. सदू त्या झाडाला पाठ टेकवून बसला. भाऊ तिथे पोचायच्या अगोदर वडिलांनी भावाला समजावले. मग त्यांनी शेजार-पाजारच्याना पांगवले. ते झोपाळ्यावर येऊन बसले. सदू झाडाला टेकून बसला होता. अपराधीपणाची झाक नाही, ना आल्यावर बापाला बिलगला नाही. ओलसर डोळ्यांनी वडील सदूला त्याच्या आईच्या आठवणी सांगू लागले. झोपाळा हलकेच हलत होता. समोरच्या झाडाच्या सावलीत  सदू बसला होता, कोरे, किंचित हसरे डोळे घेऊन.
   सदू त्यानंतर शाळेत गेला नाही. वडिलांनी त्याला बागेत काम करायला शिकवले. सदूच्या हातात फार कसब होते असे नाही, पण सदूला बागेची सवय झाली. अर्धी विजार आणि वर पांढरा सुती शर्ट हा त्याचा नेहमीचा वेश बनला. एकट्याने वडिलांनाही बाग पाहणे अपुरे व्हायचे. सदूबरोबर तेही बागेत रमायचे. दिवसभरात केव्हातरी झाडाखाली बसलेला सदू आणि समोर झोपाळ्यावर हलकेच झोके घेत बसलेले वडील दिसायचे. कधी वडील बोलत असायचे, कधी झोपाळा नुसताच झुलत असायचा. आणि समजणं- न समजणं ह्याच्या पलीकडे असलेलं एक हसणं घेऊन सदू तिथे बसलेला असायचा.
    सगळ्यात धाकट्या मुलाचं लग्न झाला आणि वडिलांच्या म्हातारपणाला उतरती कळा आली. घरात वहिनी आल्यावर सदू रात्रीचा घरात झोपायचा बंद झाला. रात्री दहाच्या सुमारास सदू वळकटी आणून अंगणात टाकायचा आणि झोपून जायचा. कधीतरी भटक्या भाऊ घरी असेल तर तोही सदूशेजारी झोपायचा. सकाळी वडिलांची हाक ऐकली कि सदूचा दिवस सुरु व्हायचा. सदूच्या सोबतची माणसे कुठेतरी पुढेमागे सरकत होती. पण एखाद्या जुन्या घडाळ्याने ठरल्यासारखे ठण-ठण टोले न चुकता द्यावेत तसे सदूचे दिवस होते.
    पण त्याचे दिवस एकसारखे एक असले तरी सगळ्यांचे नसतात. सदूच्या वडिलांचे नव्हते, वाड्यासमोरच्या अंगणाचे नव्हते. आणि सदूशी सावलीचे नाते जोडून असलेल्या झाडाचेही नव्हते. वाढत जाणार्या शहरात वाड्याचा विस्तार मावणार नव्हता. शहरातल्या वाढू पाहणाऱ्या रस्त्यांच्या जाळ्याला अंगणातल्या फांद्यांच्या जाळ्याची अडचण होती. एक दिवस सरकारी हात वाड्यासमोरचे अंगण, झाडे साफ करू लागले. त्यात सदू ज्या झाडाखाली बसून कोर्या, किंचित हसर्या डोळ्यांनी वडिलांकडे पहात रहायचा ते झाडही होते. ते झाड तोडायला सुरुवात झाली आणि सदू ओरडत झाडाजवळ गेला. त्याचा कोरा चेहेरा कुठल्यातरी हरवण्याच्या जाणीवेने धुमसत होता. आधी तो झाडाखाली बसून राहीला, आणि जसे त्याचे भाऊ त्याला खेचू लागले तशी त्याने भावांना हिसडा देऊन झाडाला गच्च मिठी मारली. त्याच्या रागाचे, किंवा उद्रेकाचे आवर्त ओसरले कि मिठी सैल व्हायची आणि तो नुसता बिलगून असायचा. पण कोणी झाडाकडे जाऊ लागला कि तो परत खवळायचा  . शेवटी वडिलांनी सरकारी लोकांना तात्पुरते अंगणातून बाहेर जायला सांगितले. भावांना त्यांनी अंगणाबाहेर तयार रहायला सांगितले. मग ते झोपाळ्यावर बसले. थोड्या वेळाने सदू झाड सोडन झाडाखाली सावलीत बसला. वडील सदूला काही सांगू लागले. सदूचा चेहेरा परत कोरा, किंचित हसरा होत गेला. नंतर एकदम काही उमजल्यासारखा सदू उठला आणि वडिलांच्या जवळ उभा राहीला. त्याला घेऊन, झाडाकडे वळून बघत बघत वडील अंगणाबाहेर गेले. मग सदूचा एक भाऊ, वडील आणि सदू रिक्षातून दूर कुठेतरी गेले. सरकारी माणसे कामाला लागली. त्यानंतर झोपाळा हलत राहीला, पण सावली मात्र संपली होती.
        पुढे सरकत गेलेल्या दिवसात सदूच्या आयुष्याचे कोपरे तसेच राहिले. वडील थकले आणि त्यांचा वावर कमी झाला. सदू एकटाच बाग बघायचा. कधीतरी वडील सदूचा आधार घेत संध्याकाळचे झोपाळ्यावर बसायचे, सदू झोपाळ्याजवळ बसायचा. वडील फार काही बोलायचे नाहीत. संध्याकाळचा उदास प्रकाश निवत गेला कि ते उठून सदूचा आधार घेत घरात जायचे. एक दिवस असेच संध्याकाळचे घरात गेल्यानंतरच्या रात्री झोपेतच वडील गेले. सकाळी भावाने हाक मारून सदूला उठवले. त्यावेळी भटक्या भाऊ घरात होता. तो सदूला घेऊन बसून राहीला. सदू कोर्या चेहेर्याने, किंचित हसत वडिलांचे प्रेत तिरडीवर बांधण्यापासून ते त्यांना उचलेपर्यंत सारे काही बघत होता. नंतर भटक्या भावासोबत तो अंत्ययात्रेतही चालत गेला. त्याने त्याच कोर्या, किंचित हसर्या चेहेर्याने वडिलांना शेवटचा नमस्कार केला. सगळे लोक कोरड्या शोकाचे उमाळे आणत सदूकडे पहात होते. तो केव्हातरी त्याच्या अजाण शांततेतून बाहेर पडेल असे सर्वाना वाटत होते. पण सदू कुठे ओरडला नाही, रडला नाही. चितेने पेट घेतल्यावर भटक्या भावाबरोबर लांब उभा राहून तो चितेकडे पहात होता. त्याच्या दुनियेला दुखाचा, हे काय चाल्लय ह्या कुतूहलाचा तडा गेला नव्हता. कदाचित नात्यांच्या रेषा त्याच्या मनात उमटल्याच नव्हत्या किंवा मुळात स्वतःच्या असण्यापलीकडे दुसर्या कोणाचे असणे नसणे जाणवावे असे काही सदूला नव्हतेच. पण अंगणातल्या तुटणाऱ्या झाडाशी सदूचे काय जुळले होते? का सदूचे वेगळेपण हेच कि सावली देणारे झाड का बाप हे त्याला ओळखताच येत नव्हते. सदूच्या कोर्या, किंचित हसर्या चेहेर्याला ह्या त्रयस्थ प्रश्नाचे काही नाही.
    वडील गेल्यावर काही दिवस सदूच्या वाहिनीचे सदूच्या नावाने ओरडणे ऐकू आले. पण हळूहळू आता वाडा वडिलांचा नाही, तर वहिनीचा आहे हे सदूच्या चक्रात आले. वडिलांची पारख आणि पखर तो बागेला देऊ शकला नाही तरी त्याने बागेतल्या झाडांना पोरके सोडले नाही. घरातली थोडीफार कामे आणि बाग ह्यात त्याचा दिवस बांधलेला होता. दुपारी तो बागेपासच्या ओट्यापाशी जेवायचा. भावांना तो असं गड्यासारखा जेवतो हे कधी-मधी बोचायचे. पण वहिनीच्या जवळ एका अंतरापलीकडे जायचे नाही असा सदूचा काही नियम होता. सदूच्या एकावर एक जमत जाणार्या दिवसात अजून एक बदल झाला. पूर्वी वडील सदूला घेऊन न्हाव्याकडे जायचे. त्यानंतर भावाने जेव्हा त्याला न्हाव्याकडे सोबत न्यायचा प्रयत्न केला तेव्हा सदूच्या साच्यात न बसणारा माणूस सदूने स्वीकारलाच नाही. तो अडून बसला. आरडा-ओरडा नाही पण आलाच नाही. मग भावाने समोर बसून त्याची दाढी करू पहिली. आधी सदू घाबरला पण मग तो अगदी आरामशीर बसून दाढी करून घेऊ लागला. भावाने दाढीसोबत  केसांचा गोटाही केला. त्यानंतर  सदूच्या हातात ब्लेड द्यायची भीती वाटल्याने हाच शिरस्ता बनला. कधी-कधी सदूच्या डोक्यावर कापल्याच्या खुणा आणि वर लावलेली हळद दिसायची.
    सदूच्या धाकट्या भावाची मुलेही सदूला 'सदूच' म्हणायची. अर्थात ह्यावर सदू काहीच म्हणायचा नाही. तो तसंच कोरं, किंचित हसत विहिरीचे पाणी झाडांना द्यायचा. जमेल तशी ताण-उसकटे काढायचा. पेरू, कैर्या, नारळ पडले असतील तर आणून ओट्यावर ठेवायचा. मध्येच हुक्की आल्यासारखे खत द्यायचा, फांद्या कापायचा. त्याचा दिवस ह्या एक संथ पण शाश्वत गतीत फिरून रात्री दहाला उरल्या-सुरल्या अंगणाच्या तुकड्यातल्या त्याच्या वळकटीपाशी थांबायचा. अध्ये-मध्ये एखाद्या संध्याकाळी तो झोपाळ्यापाशी बसून झोपाळा हलकेच झुलवत रहायचा.
     जातात तशी महिने, वर्षे गेली. भावाची मुले मोठी झाली. बागेतली झाडे पडली, किडली, वठली, नवीन कोणी रुजली नाहीत. विहिरीला पंप आला. सदूही पिकत गेला. पण त्याच्या रापलेल्या, सुरुकुतू लागलेल्या चेहेर्यावरच्या अबोध कोर्या जाणीवेला वयाने गाठलेच नव्हते.
    मोठ्या झालेल्या भावांच्या मुलांना हवे ते वाडा देत नव्हतं. वाडा पडून तिथे इमारत बांधून कोट्याधीश व्हायचे ठरले. मग बाग गेली, वाड्याचे धूड कोसळायला काही दिवस लागले, झोपाळाही गेला. भाऊ, वाहिनी वाडा पडताना निखळल्यासारखे रडले. कामाला लावलेली माणसे झोपाळा उचलून नेत असताना सदू कशातही जीव न लावण्याचा धडा गिरवल्यासारखे सारे पहात होता. पहिले झाड, मग वडील आणि आता झोपाळा....पण संपत जाण्याच्या या साखळीचे बंध सदूला बोचत नव्हते. हरवण्यासारखे काही व्हायला मिळण्यासारखे काही त्याच्यापर्यंत पोचलेच नव्हते. किंवा एकूणच सदूच्या दुनियेचे कोरे, किंचित अर्थ वेगळे होते.
      सदू अजून आहे, साठी ओलांडलेला. तो भावाच्या घरात राहतो. नव्या इमारतीत भावाला, भावाच्या दोन्ही मुलांना ऐसपैस जागा मिळाली आहे. रस्ता दिसू शकेल अशी बाल्कनी भावाच्या घराला आहे. बाल्कनीला शेड लावून घेतली आहे. सदू आता बाल्कनीत झोपतो. त्या बाल्कानिखाली असणाऱ्या अंगणाच्या, झोपाळ्याच्या आठवणींचा स्पर्श त्याला होतो का हे कळायला वाव नाही. तो अजूनही तसेच कपडे घालतो, दाढीचा नियम तोच आहे. सदूच्या भावाची नातवंडेही त्याला सदू म्हणतात. बाहेरच्यांना तो आता फारसा दिसत नाही. पण कधी दिसला तर वयाच्या हिशोबाचे ओझे आणि चल-बिचल त्याला नाही एवढे दिसते. कधी एखाद्या संध्याकाळी रस्ता चौखूर उधळलेल्या वाहनांनी गुदमरत असताना, बाल्कनीच्या कडेशी सदू खुर्चीवर बसलेला असतो. बाल्कनीच्या भिंतीवर कोपर आणि हाताचा तळवा हनुवटीशी  टेकवून. आठवणींच्या झोपाळ्याला तो मंद झोके देत असेल? त्याचे दिवस एकमेकांपासून वेगळे काढता येत नसले तरी त्यांच्यावर उमटून गेलेली वडिलांची माया, बागेची सोबत ह्यांचे कातर संदर्भ त्याला कधीच सापडत नसतील? सगळ्यांना घाबरवणारी शेवटची सावली सदूला जाणवतही नसेल का? का सोडावेसे काही सदूने धरलेच नाही त्यामुळे सदू ह्यातून मोकळा आहे? दूर कुठेतरी बघणारा त्याचा अजूनही कोरा, किंचित हसरा चेहेरा या कशाचीच उत्तरे देत नाही. 

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...