Friday, April 8, 2011

साकी आणि हाडांचे गाठोडे

त्याने पाठीवरचं गाठोडं अगदी पायाजवळ ठेवलं, जसा काही कोणी ते चोरून नेणार आहे. मग त्याने रस्त्याच्या आजूबाजूला नजर टाकली. 'इथपर्यंत यायचं हे तर कळलं होतं. आता पुढे? ' खरंतर तो थकला होता. तसा त्याने प्रवास काही चालत वगैरे केला नव्हता, किंवा त्याच्या कपड्यांवर प्रवासाच्या धुळकट रेषा वगैरेही नव्हत्या. पण तो दमला होता. कोणी पहात नाही असं पहात, गाठोडं खांद्याशी पकडत तो रस्त्याच्या कडेला गेला. त्याने गाठोडं हलवलं आणि कान जवळ नेऊन तो त्यातून येणारा आवाज ऐकू लागला. उगाच काहीतरी खळखळ असा आवाज आला...त्याने दोन-तीनदा हलवून, ऐकून पाहिलं. पण येणाऱ्या आवाजाने त्याला काही कळलं नाही. शेवटी त्याने गाठोडं खाली पायाशी ठेवलं आणि एक सुस्कारा सोडत तो आता रात्रीसाठी थांबायची जागा शोधू लागला. तो आत्ता चालत होता त्या रस्त्याला गजबज होती, रस्त्याच्या शेवटी उजळलेली घरे होती, माणसे घाई-गर्दीत चालत होती. त्याला एकदा वाटलं त्या उजळलेल्या घरांमध्येच कदाचित जायचं असेल, आत्ताच जाऊन पाहूया का? पण तेवढ्यात शंका, भीती आणि अशाच अनाम सावल्यांनी त्याची इच्छा झाकोळून गेली. त्याने पायाशी ठेवलेल्या गाठोद्याकडे पाहिलं. तो दररोज गाठोड्याचे  कापड साफ करायचा. गाठोडं हिंदकळूही नये म्हणून जपायचा. 'ठीक आहे, उद्या तर उद्या. इथपर्यंत आलो आहोत, पुढेही पोचू' असा विचार करत त्याने परत रात्रीसाठी जागा शोधायला सुरुवात केली.
   मुख्य रस्त्याला डावीकडे एक फाटा फुटत होता. काही अंतरावर तो फाटा अंधारात दिसेनासा झाला होता. त्याने त्या अंधारात लपलेल्या जागेकडे जायला सुरुवात केली. पण त्याचे पाय गती हरवल्यासारखे सावकाश हलत होते आणि त्याच वेळी कोणाला गाठोडं दिसू नये म्हणून तो ते लपवायचा प्रयत्न करत होता. त्या अंधाराच्या तुकड्याकडे पोचेपर्यंत त्याच्यातला उरला-सुराला दम संपला होता. आकाशाच्या पोकळीत घुमटासारख्या पसरलेल्या एक झाडाच्या खाली तो पोचला. त्या झाडाच्या तळाशी, जिथे त्या झाडाची आणि जवळपासच्या झाडांची मुळे एकमेकांत मिसळून एक दाटी तयार झाली होती, त्यात त्याने गाठोडं लपवलं आणि त्या गाठोड्याला स्पर्श होईल असं पहात त्याने जवळपास अंग जमिनीवर फेकून दिले.
    मध्येच केव्हातरी तो जागा झाला. पण त्याच्या मागे ते झाड, तो पोटाशी घेणारा अंधार हे काहीच नव्हतं. तो एका जिन्याजवळ उभा होता. त्याच्या खांद्यावर गाठोडं होतं. त्याच्या जवळ असणाऱ्या जिन्याच्या पायर्यांखेरीज जाण्याची दुसरी कुठली दिशा त्याला समजत नव्हती आणि उभं राहून स्वतःची स्वतः वाट शोधावी एवढा  धीर त्याच्यात उरला नव्हता. तो सावकाश, त्याच गती हरवलेल्या पावलांनी जिना चढून वर गेला.
      वर बरीच माणसे होती, पण कोणी त्याच्या येण्याची दाखल घेतली असे त्याला जाणवले नाही. त्याला एकदम कोणालातरी हलवून पाहावेसे वाटले, पण लगेच त्याच्या हातांची पकड गाठोड्यावर पक्की झाली आणि कोणी पहात नाही हेच बरं असं त्याला वाटलं. गाठोडं स्वतःच्या चालीत लपवत लपवत तो त्या जागेत शिल्लक असलेल्या कोपर्याकडे गेला. त्याने गाठोडं कोपर्यात ठेवले आणि गाठोड्याला अगदी चिकटून भिंतीला पाठ टेकवून तो बसला.
      गाठोडं खांद्यावरून उतरल्यावर त्याला जरा वेगळं, हलकं वाटलं. जाऊन त्या बाजूला बसलेल्या लोकांत मिसळावं असं एक चुकार क्षणी त्याला वाटलं. पण लगेच बाजूच्या गाठोड्याचा स्पर्श त्याच्या हाताला झाला आणि त्याने स्वतःभोवती विणलेला कोश त्याने अजून घट्ट केला. सावध नजरेने तो आता तिथे बसलेली माणसे निरखू लागला.
     त्याल आता एवढावेळ जाणवणारी कुजबुज नीट ऐकू येऊ लागली. ती माणसे, अगदी एकटी बसलेली माणसेही बोलत होती. तो बारकाईने त्यांच्याकडे पाहू लागला, त्यांचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्यापासून काही अंतरावर चार माणसे बसली होती. ती दूर कुठेतरी लढाई करत असणाऱ्या लोकांबद्दल बोलत होती. एक जण सांगत होता कि ही लढाई कशी वेगळी आहे, ह्यात कोण कोणाविरुद्ध लढतो हे कोणालाच ठाऊक नाही, पण जो तो हातात येईल ते चालवतो आहे, शत्रूला गारद करू पाहतो आहे. बाकीचे कधी त्याला कुतूहलाने ऐकत होते, कधी त्याच्या म्हणण्याला काही जोडत होते, तर कधी त्याच्या विरुद्ध जात होते.
   त्या चौकडीजवळ जवळ एक देखणासा  माणूस एकटाच बसला होता. त्याच्या समोर सापशिडीसारखा एक खेळ होता. तो त्त्यावर फासे फेकायचा, आलेलं दान नीट बघायचा आणि मग खांदे उडवून परत खेळायचा. त्याला जशी काही ह्या नव्या माणसाची नजर खांद्यावर जाणवली. फासे एक हातात खुळखुळवत  त्याने कोपर्यात नजर टाकली. त्याचा हात गाठोड्या कडे सरकला आणि डोळे एकदम दुसरीकडे वळले. पण डोळ्याच्या कडेला तो त्या फासेवाल्याला पहात होता. फासेवाल्याने खांदे उडवले आणि परत फासे फेकले.
    त्याच्या अगदी विरुद्ध कोपर्यात बरीच माणसे एकत्र बसली होती. त्याचे चेहेरे दुखी होते, पण त्याचवेळी त्यांच्या शरीरांच्या रेषा कुठलाश्या सुखाने सुस्त होत्या. त्या घोळक्याच्या मध्ये बसलेला माणूस मंद आवाजात बोलत होता. त्याने हा मंद धुनेचा आवाज आधी ऐकला होता. बदल, समाज, भविष्य असे काही शब्द त्या धुनेतून ऐकू येत होते. आणि मध्येच केव्हातरी त्या दुखी चेहेरे आणि सुस्त सुखी शरीराच्या माणसातून हुंकार उठत होते.
   तो त्या सगळ्या माणसांकडे बघून तिरकस हसला. तो आजवर आपला रस्ता सोडून काही चालला नव्हता, त्याला कुठले देश माहित नव्हते, त्याने कधीही प्रश्नांच्या मोहोळात रात्र अडकू दिली नव्हती. त्याने गाठोडे आणि त्याची वाट एवढ्याशीच इमान राखले होते. हं, तो काही एकटा नव्हता, पण वाट चालताना सोबतीची सवय त्याने ठरवून मोडली होती. आणि आता इथे ह्या माणसांचे आवाज, हालचाली पाहून त्याला आपल्या आयुष्याबद्दल एक मऊ जाणीव झाली.
   'असं! म्हणजे तू सांगाड्यांचा ओझं घेऊन चालतो आहेस, आणि त्या सांगाड्याच्या खडखडीला  तू आवाज समजत आलास हा तुझा शहाणपणा तर!! ' त्याने चमकून बाजूला पाहिलं. आणि एकदम त्याला स्वतःच्या बेफिकीर रहाण्याचा राग आला. ती त्याच्या बाजूला येऊन बसली होती, अलगद आणि जसं काही त्याला नुसतं पाहून तिने त्याच्या आजवरच्या चालण्याची शहानिशा करून टाकली होती.
   तो थोडासा दूर सरकला, आणि त्याच्या तोंडात काही शब्द फिरत राहिले.
   'मला कसं समजलं? इथे नेहेमी येतात तुझ्यासारखे. इथे याच कोपर्यात बसतात, ह्या बाकीच्या लोकांना पाहून स्वतःच्या वाटेवर खुश होतात. आणि इथे बसलेले बाकी सगळेही हेच करतायेत. ते तुझ्याकडे बघून त्यांचे त्यांचे अर्थ काढत आहेत. त्यांनीही त्यांची गाठोडी लपवली आहेत. पण शेवटी प्रत्येक जण हाडांचे आवाज, फाश्यांचे आकडे, दूर देशीच्या गोष्टी ह्यातूनच रस्ता आजमावतो आहे. '
   'आणि तू कोण आहेस? हे सगळं माहित असलेली? '
  'मी? मी जगणं आहे असं समज. बघ, मला हात लावून.' ती पुढे सरकली. एखाद्या तजेलेदार धुतल्या पानासारखी तिची कांती तकतकत होती, तिच्या डोळ्यात स्पर्शाचं उत्त्फुल आव्हान होता, आणि तिचे ओठ काही न सांगताही त्याच्या सार्या संवेदनांना जाग आणत होते. त्याने गाठोडं पकडलं आणि ते हलवून पाहिलं.
  'हा, हा. तुला स्वतःला जाणवत नाही काही? त्या गाठोड्यात काहीच नाहीये. तू नुसतंच ते घेऊन फिरतोयेस ते...वेडा .' तिने त्याच्या समोर, पण जवळपास शून्य क्षणांत ते गाठोडं उचललं. तिने त्याची गाठ सोडवली आणि ते उलटं केलं. तो चालत आलेल्या त्या रस्त्याची धूळ तेवढी त्यातून पडली.
   तो धडपडला. त्याने ते गाठोडं हातात घेण्याचा प्रयत्न केलं.
   'हा.हा. का? गाठोडं नाही तर तू आजवर जे केलंस ते काहीच खरं नाही का? आणि अगदी गाठोड्यात काही आहे असं मानलं तरी गाठोडं तुला काहीच सांगत नाही. '
   'फसवतीयेस तू मला.' तो तिच्या हातातून गाठोडं हिसकावत म्हणाला. त्याने गाठोडं चाचपून पाहिलं. गाठोडं वजनदार लागत होतं. त्याला धीर आला. 'मी खूप ऐकलंय तू सांगतीयेस ते. पण तूही शेवटी अशीच एका गाठोड्यात जाणार. शेवटी माणसाची त्वचा, त्याचे शब्द, त्याची स्वप्ने हे सगळंच तुझ्या इथे असण्यासारखं आहे, विरून, झडून जाणारं...शेवटी हाडांच्या गाठोड्यात जाणारं..' तो ठामपणे म्हणाला.
  'हा.हा.' ती परत हसली, त्याच्या शब्दांची तटबंदी तोडून जात.
  'मला शरीर नाहीच मुळी माझी हाडं उरायला. मी अशीच आहे, मागचे कितीही दिवस, येणारे कितीही दिवस. '
  त्याच हसण्याच्या लयीत तिने स्वतःभोवती गिरकी घेतली, तिच्या शरीराने अशक्य वळणे घेतली आणि एकदम एक चमचमता तरंग होत तो दिसेनाशी झाली.
   'पाहिलंस!' त्याच्या दुसर्या बाजूने आवाज आला. तीच. ' तू लपतो आहेस त्या हाडांच्या गाठोड्यामागे . तुला भीती आहे कि आयुष्याचे साजरे क्षण टिकणार नाहीत. म्हणून रुक्ष तत्वज्ञानाची कफनी घातली आहेस तू. पण टिकण्याची भीती आली कि सांगाडाही येतो.  आणि अशी कितीही हाडे गोळा केलीस, त्यांना कितीही खुळखुळावलेस  तरीही त्यांच्या आवाजाला अर्थाची कुठलीच लय नसणार. तूच त्या आवाजाला दिशा समजतोस. पण एकदा का तो आवाज तुला सांगतो असं तू स्वीकारलस कि मग तुला फसण्याची, हरलो वाटण्याची भीती वाटत नाही. त्या हाडांत काही ना काही शहाणपण असेल असा विश्वास ठेवला आहेस तू. आणि तू ह्या लोकांवर हसतोस. ती हाडे, खरंतर मातीच नुसती. '
  'असेल. पण मग आपला म्हणून तरी रस्ता आहे कुठे. त्या हाडांना त्वचेची जिवंत पालवी नसेल, पण त्यात जगण्याची लालसा आहे. मी जेव्हा जेव्हा हे गाठोडे हलवतो तेव्हा त्यांच्यातली शिल्लक जगण्याची असोशी मला रस्ता दाखवते. मला ठाऊक नाही कि ते शहाणपण आहे का नाही. पण दररोज स्वतःच्या रस्त्याचा जमाखर्च मांडायची तोशीस मला नाही. '
   'आणि ही तोशीस नको म्हणून तू स्वतःच्या जगण्याच्या तहानेला ह्या हाडांच्या आवाजात बदललस. आणि त्या गाठोड्याच्या आवाजात खरंतर तूच तुझ्या इच्छांचे झंकार ऐकतोस, फक्त नाकारत राहतोस.  तू  काही पहिला  नाहीस असा. तू तरी तुझ्या आयुष्यातला माणसांची हाडे जमवूनच चालला आहेस. पण इथेतर हजारो वर्षांची जीवाश्मे उकरून त्यांच्या अवशेषांचीही ओझी घेऊन जाणारे आहेत. आणि त्या ओझ्यात पिचत जाण्यालाच, त्या धुळीच्या लोटांत आपल्याच पायात घुटमळण्यालाच  ते प्रवास म्हणतात. '
   'मग काय करू? असा एक एक दिवस उधळत जाऊ? '
   'मला काय ठाऊक? पण गाठोड्याचा कंगाल खजिना जीवापाड जपण्यापेक्षा स्वतःच्या संवेदनांवर जुगार खेळणं का पत्करू नये..' असं म्हणत, स्वतःशीच एक धून गुणगुणत ती त्याच्या भोवती फिरू लागली. हळूहळू तिच्या गिरक्यांची गती वाढली आणि एका क्षणी ती मिसळून गेली, किंवा तो, त्याच्या भोवतीचे लोक, सारंच तिच्या गिरक्यांमध्ये मिसळून गेलं.
   
तो घाबराघुबरा होऊन उठला. वरच्या काळोखाच्या पोकळीला लालसर प्रकाशाचे झरोके फुटत होते. झाडाच्या घुमाटातून नव्या शांततेचे निरव आवाज उमटत होते.
   त्याने गाठोडं हातात घेतलं. हलवून पाहिलं. कसलाही अर्थ नसलेला एक आवाज आला. त्याने परत एकदा तेच करून पाहिलं, तरीही अर्थाची कुठलीही निशाणी त्या आवाजाला नव्हती. त्याने आजूबाजूला पाहिलं. झाड स्तब्ध उभा होतं, काळोख पुसट होत होता... त्याने गाठोड्याची गाठ सोडली आणि गाठोडं झाडाच्या मुळाशी रिकामं करायला सुरुवात केली. बराच वेळ झाला तरी गाठोडं रिकामं होईना...शेवटी त्याने गाठोडं फेकून दिलं. झाडाकडे पाठ फिरवून आता तो समोरच्या आकाशाच्या खुल्या पटाकडे पाहू लागला...

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...