Saturday, April 2, 2011

ओळ्ख, आवेग आणि अजून काही....

'असं खरं होत नाही कधी' त्याच्या मनात विचार आला. तिचा आवाज फोनवर इतका तुटलेला, इतका निर्विकार कधीच ऐकलेला नाही. आणि तोही एकदा नव्हे, मागच्या आठवड्यात तीन्हीवेळा जे काही बोलणं झालं फोनवर ते असंच होतं. आठवड्याभरापूर्वी त्याने असंच तिला फोन लावला. खरंतर फोन बिझी येईल अशीच त्याची अपेक्षा होती. पण तिने फोन उचलला. ती जेवढ्यास तेवढं बोलली आणि बोलणं संपलं. मग परत दोन दिवसाने मंगेशाला अमेरिकेत जायला मिळतंय हे सांगायला त्याने फोन केलेला तेव्हाही ती जेवढ्यास तेवढं बोलली.  मग आज...आज खरतर एकदम असं काहीसं वाटलं कि काहीतरी ठीक नाहीये तिच्यासोबत...म्हणून त्याने फोन लावला. आणि ती बहुतेक करून फोन कट करेल, मीटिंग आहे असा मेसेज पाठवेल असं त्याला वाटलेलं...तसं झालं असतं म्हणजे ती तिचं नॉर्मल आयुष्य जगते आहे हे त्याला कळलं असतं. पण तिने फोन उचलला. त्याने दोन-तीनदा खोदून विचारलं तेव्हा भेटूया आज असं म्हणून तिने फोन ठेवला. खरंतर कुठे, कसं भेटायचं हे तिने ठरवायचं आणि ह्याने पाळायचं हा नियम. पण आज सगळं त्यालाच ठरवायचं होतं. 'ठीके. दिवसभरात ठरवू आणि दुपारी सांगू तिला.' असं ठरवून त्याने आपलं डोकं समोरच्या मेलमध्ये घातलं.
     त्याचा काम चालू राहिलं यांत्रिक गतीने. लंच ब्रेकच्या वेळेला त्याने एका सहकार्याला विचारून बांद्रातल्या २-३ चांगल्या जेवायला जायच्या जागांची माहिती काढून घेतली.
     ५ च्या सुमारास त्याने परत तिला फोन लावला. २-३ रिंग नंतर तिने फोन उचलला. खूप थकलेला, झोपाळू आवाज... 'बरं नाहीये का? ' त्याने विचारलं. 'नाही. ठिके. बोल' 'फाईन डाइन ला जाऊया?' 'नको.' तिचं ताबडतोब उत्तर. त्याने त्याच्या यादीतली उरलेली नावेही विचारली आणि तिने तितकीच लगेच ती खोडलीही. शेवटी त्याने विचारलं, 'मग शिशाला जाऊया? ' 'एक दोन क्षणात तिचं उत्तर आलं, 'ठीके'. 'क्या बात है. आज जाम के साथ साकी भी है' त्याने उगाच तिला छेडून पाहिलं. 'हा हा ..खूप प्रयासाने तिने हसल्यासारखं केलं. 'भेटूया ८ वाजता. मी तुला ऑफिसपाशी पिक करतो' तिचं खोटं हसणं ऐकून त्याने पटकन फोन ठेवू पहिला. 'मी घरी आहे. मी पोचते शिशाला.' त्याने काही विचारायच्या आत तिने कट केला फोन. थोडावेळ तो फोन तसाच कानाला ठेवून बसला. आणि मग परत त्याने समोरच्या स्क्रीनमध्ये लक्ष घातलं.
    *********
  ८ वाजता तो शिशात पोचला. आता त्याला दरवान, वेटर चांगले ओळखत होते. दरवानाने हसत त्याचं स्वागत केलं. तो आत शिरला आणि नेहेमीसारखा आपल्या टेबलापाशी बसणार तेवढ्यात त्याला ती दिसली. ती पोचली पण होती आणि तिने ऑर्डरपण दिली होती. 'ती वेळेवर आली आहे. आणि वाईन, ब्रीझर असं काही न पिता बहुतेक व्हिस्कीचे घोट घेत बसली आहे, म्हणजे खरंच काहीतरी गडबड आहे' असा विचार करत तो तिच्या समोर जाऊन बसला.
' हाय. ' तिचे डोळे खूपच हरवले होते, चेहेरा बिना मेकपचा आणि जवळपास रडवेला, एखाद्या हरवून गेलेल्या लहान मुलीसारखा....
 'हाय. लवकर पोचलीस. ' त्याने ती प्रचंड ताणलेली शांतता तोडू पहिली.
  तिने नुसतीच मान हलवली आणि एक मोठा घोट घेतला.
   त्याने वेटरला नेहेमीची ऑर्डर सांगितली.  'काय घेणार सोबत. कबाब का क्रिस्पी का अजून काही...सांग.'
  'काहीही सांग. एनी थिंग विल बी फाईन' ती म्हणली.
   'ओके. एक हरा भरा कबाब आणि रोस्टेड पापड. ' त्याने वेटरला सांगितलं.
  वेटर पेग बनवेपर्यंत ती शांतपणे इकडे तिकडे बघत होती... मध्येच एखादा मोठा घोट घेत होती...
  'चिअर्स....' तो ग्लास उंचावून म्हणाला. 'या. चिअर्स...चिअर्स टू धिस ब्लडी फकिंग लाइफ....' असं म्हणत तिने ग्लास उंचावला आणि एक दमात रिकामा केला.
   'काय झालंय? एवढी कशावर डिस्टर्ब आहेस? 'त्याचे प्रश्न पुरे होण्याआधी तिने आपलं डोकं हातात धरून टेबलावर टेकलं होतं. आणि आता तिला तिच्या रडण्याचा हलकासा आवाज ऐकू येऊ लागला होता.
'काय झालंय?' त्याने परत शांतपणे विचारलं.
'नेहेमीचं यार. तीच स्टोरी....'
'हं. सगळं संपलं का अजून काही बाकी आहे? ' त्याने उगाच थोडं तिरकसपणे विचारलं. मागचे दोन-तीन वेळेला तो हेच ऐकत होता.
'काय माहिती. but i see this pattern.... I keep doing this same mistake. I am damn expert at it' ती डोकं वर उचलत म्हणाली... तिचे डोळे पाण्याने टच्च भरले होते. तिने बाजूचा टिश्यू उचलून डोळे पुसले.
वेटरने कबाब आणून ठेवले. त्याने कबाब उचलत तिला म्हटलं, ' ठीके. आज घरीच होतीस? '
'३ दिवस झाले सुट्टीच घेतलीये. I might leave the job'
'come on. एवढं काय झालंय? तुझ्या व्हिसाचं काय झालं? आणि विशालचाही व्हिसा मिळणार होता ना?
'त्याला मिळाला. मला समजेल पुढच्या आठवड्यात. '
'मग विशाल कधी जाणारे? '
 'या शुक्रवारी...'
 'ठीके. तोपर्यंत जाऊ नकोस. घरी थांब. Why you have to leave the job? का दुसरा काही मिळालाय?
'Will you stop asking this questions? मला काही करायचं नाहीये, काही नाही यार.... ' तिने परत टेबलावर डोकं टेकलं.
वेटरने त्याच्याकडे पहिला. त्याने ठीके अशी खूण केली. त्याने स्वतःच एक पेग बनवला आणि आता ती परत बोलायला लागायची तो वाट पाहू लागला. ती तिला हवं तेव्हा सांगणार हे त्याला पक्कं माहित होतं अन त्यामुळे उगाच तिला विचारत बसण्यापेक्षा त्याने एक एक घोट घ्यायला सुरवात केली. आजूबाजूला जाझचे हलके स्वर होते....खिडकीतून इमारतींचे दिवे लकाकताना दिसत होते.... हळूहळू तो त्यांच्या ओळखीच्या सुरुवातीच्या दिवसात, त्यांच्या नात्याच्या एवढ्या दिवसांच्या आठवणीत जाऊ लागला.
   तसं आपण तिला मागच्या ८ वर्षापासून ओळखतो. ओळखतो, नक्की? आपण पहिल्यांदा भेटलो तो दिवस... ती स्टेशनवर लोकलची वाट बघत उभी होती, हरवल्यासारखी.  आपण तिला क्लास मध्ये कित्येकदा पाहिलं होतं. ती पहिल्या बेंचवर बसायची, काहीही विचारलं कि सांगायला तिचा हात तत्परतेने वर असायचा. आणि तिच्या हुशारी इतकंच तिचा मुलांशी मोकळा-ढाकला वागणंही.... क्लास संपला कि स्टेशनपर्यंत ती कधी मैत्रिणींबरोबर दिसलीच नाही....बहुतेकदा तिचा कोणी मित्रच असायचा सोबत....पण त्या दिवशी ती एकटी उभी होती. कदाचित त्यांच्यात काही झालं असावं किंवा काय....आणि मग आपण सहज तिच्या बाजूला जाऊन उभे राहिलो. तिला माहित होतं कि मी कल्याणहून दादरला येतो.... आपण बदलापूर गाडीत चढलो....ती लेडीज मध्ये न चढता आपल्याबरोबर जनरलमध्ये चढली. बसायलाही जागा नव्हती, आपण असेच एका हाताने बार पकडून उभे राहिलेलो, आणि ती समोर. आपण उगाच काही ना  काही विचारत राहिलो तिला, तिचा तो हरवलेला चेहेरा बघवत नसल्यासारखे. ती जुजबी उत्तरे देत राहिली, मग एकदम एका क्षणी दोघे गप्प झालो, थोडा वेळ तसाच गेला आणि मग एकदम तिने डोकं टेकलं खांद्यावरती. त्या गर्दीत सारे तिच्याकडे बघत होते, आणि मग आपल्याकडे....आणि आपण कुठेच न बघता शांतपणे तिच्या डोक्यावर थोपटत होतो. मग पुढे कुठेतरी बसायला मिळालं, ती तशीच खांद्यावर डोकं ठेवून..झोपलेली किंवा काही न बोलता नुसतीच. कल्याण गेलं, आणि तरीही तिने खांद्यावरून डोकं काढलंच नव्हतं. मग तिचं स्टेशन आलं तशी ती म्हणाली उतरूया. मग स्टेशनवर बसून ती सांगत राहिली काय झालं ते...आणि मग घरापर्यंत चल सोबत म्हणाली. ती घरी गेल्यानंतर आपण तिने डोकं खांद्यावर ठेवल्याचे क्षण आठवत घरी आलेलो....
    त्यांनतर हक्काने रडायची, काहीही सांगायची तिची जागा बनलो आपण...तीच बडबडत, बोलत बसायची...कधी कधी नुसतीच बसून रहायची....पण तिने बोलावलं कि आपण जायचो आणि ती कधीही बोलावू शकायची....
   एकदा तिच्या मित्राबरोबर ती रात्री रेल्वेने कुठेतरी दूर, कदाचित चेन्नईला जाणार होती, अर्थात घरी न सांगता. दहाच्या सुमारास तिने फोन करून स्टेशनवर बोलावून घेतलं. मग आईस्क्रीम खात, स्टेशनाच्या बाकावर डास मारत तिच्या मित्राची वाट पहात बसून राहिलो.... जेव्हा गाडी आली, तेव्हा त्या मित्राला, किंवा तिच्या त्यावेळच्या बॉय फ्रेंडला वाईट वाटेल म्हणून आपल्याला तिथेच सोडून ती गेली.
   आणि मग तिचं इंजीनीरींग होईपर्यंत असं ३-४दा घडलं. दरवेळी कोणीतरी तिला सोडून गेलेलं असायचं किंवा तिला कोणीतरी आवडू लागलेलं असायचं. आणि तिला जे सांगायचं असायचं तेवढ्यासाठी आपण...नुसते ऐकून घेणारे.....
  पण तिच्या एवढ्या प्रेमात- आणि ब्रेक ऑफ मध्ये तिचं अम्बीशियस असणं थांबलं नाही. इंजीनीरींगच्या फायनल इअरमध्ये तर ती खूप सिरीयस होती राहुलबाबत...पण त्याने घरी सांगितलं तेव्हा त्याच्या आई-वडिलांनी तमाशा केला.... त्यानंतर हे सगळा सांगताना, रडतानाही ती तिच्या प्लेसमेंटची तयारी विसरली नव्हती.... प्लेसमेंट झाल्यावर ती भेटली तेव्हा ती सगळा विसरून फक्त आनंदी होती. आपण तेव्हा तिला म्हणालोही कि तुला बॉय फ्रेंड फक्त मध्ये मध्ये टाइमपासला लागतात, बाकी तर तू तुला जे करायचं आहे ते करतेच आहेस.....आणि ती म्हणालेली कि सोड, तुला कळणार नाही ते....
   आपल्याला कळलं नाही का कळण्यासारखा काही नव्हतंच....आपल्या दृष्टीने तिचा सरळ सोपा साधा हिशोब आहे, तिला सगळ्यात महत्वाचं आहे तिचं करिअर, आणि मध्ये मध्ये ती कोणा कोणात गुंतत जाते. आणि मग कंटाळा आला , तिला किंवा त्याला कि बाहेर पडते, आणि आपण फक्त ती ट्रान्झिशन सोपी करणारे असतो...आपण ऐकून घेतो, तिला चूक -बरोबर काही म्हणत नाही...आणि मग ती मोकळी होते.....
  मग आज ती अशी शांत का आहे, काहीच न बोलता, सगळी वाफ नुसतीच अडवून ठेवून....
  आणि आपण असे का बसलो आहोत.....आपण एवढे दिवस का ऐकून घेत आहोत तिला....
  तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तिच्या हुशारी एवढंच, तिच्या सतत पुढे असण्या एवढंच जाणवलेला तिचं राहणं, तिचं मोकळं, कदाचित जास्त सलगीचा वागणं, आणि त्या दिवशी स्टेशनवर ती एकटी आहे तेव्हा आपल्याला हेच वाटलेलं, कदाचित हाच आपला चान्स आहे....थोडे दिवस बोलू, मग कदाचित एक दिवस....
    एवढे दिवस बोलत, हं, ऐकत राहिलो....आणि तिने एकदा काय खांद्यावर डोकं ठेवलं तेव्हा तिला थोपटण्यापलीकडे  कुठेही गेलेलो नाही...का? आपण इतके काही नवखे नाही, कदाचित ती जोखत असावी फक्त आपल्याला, आणि आपण दरवेळी तिने काही करावं अशी वाट पहात राहिलो का?
   नाही....कदाचित असं काही उमटलच नाहीये कधी...आपण एकमेकांचे कोण आहोत असा प्रश्न येण्याइतकं काही घडलंच नाहीये आपल्यात...ती बोलते आणि आपण ऐकतो....एवढंच....
  
त्याने समोर तिच्याकडे पाहिलं....निळ्या रंगाचा स्लीवलेस आणि जीन्स, खोल गळा, जीन्सच्या थोडी वर दिसणारी गोरी त्वचा,,, गुळगुळीत हात, निमुळती बोटे आणि भुरभुरणारे केस... तिचा चेहेरा दिसत नाहीये आत्ता... पण आठवतोय......
   त्याची नजर जाणवल्यासारखी ती एकदम उठली.
   'काय? I am fine. It will pass.' ती धुंदावल्यासारखी बोलली आणि तिने वेटरला बोलावून एक पेग भरायला सांगितला...
   'खूप झालं. You are already drunk.'
  'I know what I am doing. आणि तूच सोडणार आहेस घरी..' असं म्हणून ती एकदम हसली.
 'ओके.' असं म्हणून त्यानेही आपला ग्लास रिकामा केला... एकदम ती बोलायला लागली.
   'त्याला खात्री नाहीये कि त्याला माझ्याबाबत वाटतंय ते नेमकं काय आहे. आणि त्याला उगाच स्वतःला कमीटमेंट कडे रेटायचा नाहीये. आणि मला पण नकोय त्याने असं बळजबरी काही केलेलं. पण या वेळी मी सिरिअस होते. मी त्याला सांगून टाकलं... आणि त्यावर तो एखाद्या लहान मुलासारखा रडायला लागला. मग मीच उगाच त्याला समजावत राहिले. '
   'कधी झालं हे सगळ?'
   'दोन दिवस झाले. पण मग त्यानंतर मला कुठेच जावसं वाटत नाहीये. सगळीकडे आम्ही दोघांनी घालवलेले क्षण अंगावर येतायेत. म्हणूनच तू म्हणालास तिथे कुठेही जायला नको म्हणाले मी. '
  'हं. आणि सुट्टी का घेतलीयेस? '
  'तो अमेरिकेला जाईपर्यंत मला जायचंच नाहीये ऑफिसात. तिथे कळलंय हे सगळ्यांना आणि कोणी नुसतं काही बोललं ना तरी मी एकदम रडायला लागेन किंवा ओरडेन वगैरे वेड्यासारखी. आणि मला असला तमाशा नकोय. हे काही पहिल्यांदा नाहीये. I will move on, I know that. '
   मग ते दोघे नुसतेच न बोलता तिथे काही वेळ बसले, जाझ, टिंब टिंब दिव्याचं शहर आणि व्हिस्कीचे सावकाश घोट.....
  दोघांचेही पेग संपल्यावर तो म्हणाला....'चलूया? '
  'काय करणारेस आता? '
 'असा काही प्लान नाही. तू सांग.'
  'समुद्रावर जाऊया? '
  'जाऊ. पण अकरा वाजलेत.'
  'मग? उद्या ऑफिस आहे?'
  'नाही. माझी यु.एस. ची प्रोसेस आहे, दुपारी गेलं तरी चालेल. चल'
  त्याने वेटरला बिल आणायला सांगितलं. बिल आल्यावर तिने कार्ड ठेवलं स्वतःचं आणि वर शंभराची नोटही टीप म्हणून. वेटरने कार्ड परत आणून दिल्यावर ती झटकन खुर्ची सरकवून उठली आणि एकदम तिचा तोल गेला. त्याने झटकन तिला कम्बरेपाशी पकडलं.
'सांभाळ. You are drunk.'
हं. तू आहेस ना....'
   त्याची बोटं थोडावेळ तिच्या कम्बरेपाशी रेंगाळली. ती दरवाज्यातून बाहेर गेली आणि झटकन तिच्यापुढे एक taxi  थांबली. ती दरवाजा उघडून आत बसली. तो पाठोपाठ आत आला. दरवाजा लावत त्याने ड्रायवरला कुठे गाडी घ्यायची ते सांगितलं.
           *******************
    इथे किती वेळा आलोय आपण..एकटे...आणि कोणासोबतही....सगळ्यात आधी आलो तेव्हा वाचत बसलेलो आणि एकदम एक लाट पुस्तक भिजवून गेली...सगळ्यात पहिल्यांदा शरीराची धग अनुभवली तीही इथेच....आजूबाजूच्या गर्दीची पर्वा न करता.... आणि आता ही अशी रात्र... त्याने सहज खिडकीतून बाहेर नजर टाकली....फारसा कोणी बसलेलं नव्हतं.....समुद्राची गाज हलकीच जाणवत होती....शहराचा प्रकाश लाटांवर तरंगत होता....त्याने तिच्याकडे पाहिलं.....तिचे डोळे परत भरून आलेले....त्याला वाटलं त्या ओलसर कडांना स्पर्श करावा....तिला मिठी मारावी गच्च...बाकी काही न जाणवू देणारी....
     
'भैय्या, वापस चलो, चार बंगला अंधेरी ले जाना....' ती एकदम ड्रायवरला म्हणाली.
     'काय झालं? '
     'नको इथेही. इथेही परत तेच सगळं आठवणार आहे. मग परत तेच रडणं, तेच नुसतं आपल्याच आपल्यात घुसमटत राहणं....' तो बोलून नुसतीच बघत राहिली समोर कुठेतरी....
   ड्रायवरने गाडी वळवली आणि आता समुद्र मागे पडत होता... ती खिडकीला चेहेरा टेकवून बसलेली....आणि तिच्या गालांवर तिच्या डोळ्यातलं पाणी....खिडकीतून येणारा पिवळसर प्रकाश तिच्या चेहेर्यावर पडत होता....गालावरच्या थेंबात किंचित अडकत होता.... तो नुसताच तिच्याकडे बघत बसून राहीला....
   चार बंगलापाशी आल्यावर तिने ड्रायवरला घराचा पत्ता सांगितलं. तिच्या अपार्टमेंटच्या गल्लीत शिरले तेव्हा तो म्हणाला,' चलो. भेटू वीकेंडला जमलं तर....'
   तिने एकदम वळून त्याच्याकडे पहिला. ' चल ना घरी. मला एकटीला रूममध्ये नाही बसायचय....'
   'हं'
   दार उघडून ते घरात आले. तिच्या मैत्रिणीच्या खोलीत दिवा चालू होता. तो एकदम अवघडून दरवाज्यातच थांबला.
  'अरे ये. विशाल पण यायचा आणि तिचा बॉय फ्रेंडही  येतो.....'
  तो तिच्यापाठोपाठ तिच्या खोलीत शिरला... अस्त्याव्यस्त बेड, फोटो, पुस्तकं, क्रीम्स, कागद यांनी भरलेलं टेबल....कपड्यांनी गच्च भरलेलं कपात...खुर्चीवर पडलेला laptop ... तिने आधी केव्हातरी घातलेले कपडेही बेडवर पसरलेले... तिने बेड जरासा आवरला आणि एकदम ती बेडवर पडली.....तोही बेडच्या कोपर्यात बसला....
    थोडावेळ ते फक्त तसेच बसले होते...ती एकटक सिलिंगकडे पहात होती..तिचे डोळे ओलसर होत होते आणि मधूनच ती जोरात श्वास घेऊन रडणं आवरून धरत होती....
  त्याने खिशातून सिगरेटचा पाकीट काढलं....एक सिगरेट तिला देऊ केली...तिने सिगरेट ओठापाशी ठेवली...त्याने दुसरी सिगरेट ओठात पकडली.... बाजूला वळत हाताच्या आडोश्याने त्याने एक काडी पेटवली....तिच्या ओठांपाशी नेत तिची सिगरेट पेटवली आणि आपलीही. समोरच्या टेबलावरचा एक रिकामा खोका त्याने राख  झटकायला म्हणून बाजूला घेतला.....
   सिगरेटचे झुरके घेत ती मागे रेलली, तिच्या चेहेर्यावर, डोळ्यात, मानेच्या कोनात हरवलेपण होतं. यांत्रिकपणे ती झुरका घेत होती, एखाद सेकंदाने धूर बाहेर सोडत होती. काही वेळाने त्याने तो खोका तिच्यापाशी नेला.
 'ओह,...' असं म्हणत तिने राख झटकली.
 'You have to move ahead, means I know you know that.....'
' नाही. मला आता कशातून बाहेर पडायचा नाहीये, आणि कशात गुंतायचही नाहीये. खूप थकलीये रे मी..आणि मी कोणाला हक्काने थांबही म्हणू शकणार नाही. कारण असं मला जेव्हा कोणी म्हणालं तेव्हा मला तो दुबळेपणा वाटला. पण आता मागचे दोन दिवस नुसती या खोलीत पडून आहे, भीती वाटते, स्वतःला संपवून  टाकावसं वाटतं आणि शेवटी तोल जात जात कुठेतरी खोल पडल्यासारखा.'
  तिने सिगरेट खोक्यात दाबून विझवली. मग ती बेडवर झोपली, एका हाताचा तळवा पालथा कपाळावर  आणि दुसरा सरळ पोटावर, एक पाय मुडपलेला...
  तो बघत होता शांतपणे तिच्याकडे. तिचा चेहेरा, छाती, सपाट पोट, पायाची नखं, लालसर तळवे...
  एकदा तिच्या ग्रुपसोबत आपण धबधब्यात गेलो होतो. तिच्याशिवाय आपल्या ओळखीचं कोणी नव्हतं. ती घरी न सांगता आलेली आणि  तिला परत घरी सोडायला म्हणून आपण, बाईक घेऊन गेलेलो. धबधब्यापाशी आपण तिला पहात उभे होतो, ती मनसोक्त खेळत होती, बाकीच्यांना भिजवत होती...एकदम तिचं लक्ष आपल्याकडे गेलं,. ती ओढून घेऊन गेली धबधब्यात, आणि मग एकदम ढकलून दिलं तिने पाण्याखाली. आपण वर आलो तेव्हा ती बाजूलाच होती. एकदम आपल्या हाताचा स्पर्श.... आणि तिला जसा काही कळलंच नाही
   ती इतकी मोकळी आहे, कित्येकदा रात्री उशिरा आपल्या रूमवर येऊन थांबली आहे. आणि कदाचित तिलाही माहितीये आपण तिला न्ह्याहाळतो असे, कदाचित तिला सवय असेल अशा नजरांची. का तिचा विश्वास असेल ...
  
त्याने एकदम नजर दुसरीकडे वळवली.
   आता ती रडत होती, तिचे गाल, मान, उशीचा काही भाग त्यावर काळसर ओलसर रेघा होत्या...
एकदम ती उठली, एखाद्या झटक्याने उठावी तशी... आणि टेबलापाशी पोचून टेबलावरच्या वस्तू फेकू लागली, टेडी, पेन, फ्रेम्स, मग्स...तिने मग फेकल्यावर त्याचे तुकडे इकडे तिकडे उडाले.
तो उठला नि त्याने जाऊन तिला पकडलं, 'इट्स ओके. शांत हो, शांत हो' 
 ती धुमसत होती, त्याला ढकलू पहात होती पण हळूहळू तिचा जोर कमी होत होता... त्याला जाणवलं खोलीच्या दरवाज्यातून तिची रूममेट पहाते आहे काय आवाज आहे ते... त्याने तिला परत बेडपाशी नेलं, बसवलं आणि तो तिच्या जवळ बसला. ती आता हळूहळू मुसमुसत होती, डोळ्यांच्या कडा लालसर झालेल्या, केस विस्कटलेले.' नकोय कोणी, कोणाच्या आठवणी, It will pass पण मला नकोय आता परत काही...' ती परत धुमसायला लागली, उठून टेबलाकडे जायला लागली.. त्याने तिचं मनगट घट्ट पकडलं आणि तिला मागे खेचलं. ती तिचा हात सोडवू पहात होती..तिच्या हालचालींचा वेग वाढला होता. शेवटी त्याने तिच्या खांद्याला पकडून तिला बेडवर ढकललं. ती तरीही उठू पहात होती, हातानी त्याच्या छातीवर मारून त्याला मागे ढकलू पहात होती. त्याने तिचे हात पकडले, घामेजलेले , गरम तळहात... त्याची बोटं तिच्या बोटात गुंफून त्याने हातांची हालचाल थांबवली..ती एकदम बेडवरून वर उठली..'सोड, जाऊ दे..' 'नाही' तिचा चेहेरा त्याच्या अगदी  जवळ...तिचे ओठ, लालसर गाल, सुटलेले केस आणि धपापता उर...सोड असं म्हणून तिने एक निकराचा प्रयत्न केला..हात पकडलेले असल्याने तिला थांबवायला तो पुढे रेलला...आता तिचा श्वास त्याला त्याच्या चेहेर्यावर जाणवत होता..त्याने चेहेरा अजून पुढे नेला..आता त्यांच्या ओठात एक पुसट रेषेचं अंतर होतं..आपसूक त्यांचे ओठ एकमेकांत मिसळले. त्याने तिच्रे हात सोडले, पण तिचे हात काही हालचाल करण्याएवजी त्याच्या पाठीवर स्थिरावले. त्याची बोटे तिच्या चेहेर्याच्या रेषा चाचपत मानेवरून खांद्यावर, खांद्यांवरून खाली सरकली. त्याने तिला बेडवर झुकवलं आणि तो तिच्यावर अजून रेलला...ती त्याच्या ओठांना दातांनी हलकेच चावत होती..त्याच्या शरीरात एक उष्ण लाट उसळून आली..तिच्या शर्टाच्या मागच्या बाजूने त्याचे हात आता गेले आणि तिच्या छातीपाशी....तिचे हात त्याच्या पाठीवर फिरू लागले, त्याचा शर्ट वर ओढू लागले...'क्लोस द डोर...' ती एकदम त्याच्या कानात कुजबुजली...तो एकदम मागे सरकला, उठला आणि त्याने दरवाजा लावला....
  बेडकडे यायला तो मागे वळला....
  कधीतरी, म्हणजे पावसाच्या दिवसात....लख्ख उन्ह पडलेलं असतं. आपण पाउस येणार नाही असं पकडून चालत असतो...आणि मग एकदम पाउस येतो...एकदम जोरात, त्वचेवर जाणवणारे त्याचे सुयांसारखे स्पर्श, आपण त्या अस्पष्ट स्पर्शाचा सुख जाणवत एकदम आडोश्याला जातो,जायचं नसता पण जाण भाग असतं असं काही.. रस्त्याकडे पाठ, आपण थोडं पाणी झटकतो, रुमालाने चेहेरा, केस पुसतो अन आता पाउस कधी थांबेल अशी वाट पाहायला मागे वळतो....तोवर परत उन्ह आलेलं असतं, रस्त्यावर जमलेलं पाणी कडांनी एकदम सुकायलाही लागलेलं असतं....हळूहळू पावसाच्या सगळ्या खुणा संपतात, अगदी आपला शर्ट, केसांची टोकही झटकन वाळतात आणि त्वचेच्या रंध्रांवर जाणवलेला ते अनामी सुखही एखाद्या भासाचा भाग बनतं.... आपण गेलो नसतो बाजूला तर कदाचित ...
  
ती बेडवर पडलेली...कसलीच हालचाल नाही...अगदी मंद श्वास...तिचा मगासचा विखार कुठेच नव्हता...त्याला एकदम चोरी करताना पकडल्यासारखं वाटलं.... तो बेडपाशी गेला, सिगारेटच पाकीट त्याने उचललं आणि तो जायला वळला...ती काहीच बोलली नाही.. त्याला एकदम थकल्यासारखं वाटलं, डोकं जड झालेलं आणि त्याहीपेक्षा आता जे घडलं किंवा घडता घडता थांबलं त्याचा अन्वयार्थ लागत नव्हता...त्याला इतके दिवस जपलेलं काहीतरी एकदम चुरगाळून गेल्यासारखं वाटलं..
तो बेडपाशी खाली जमिनीवर बसला...पायापाशी पडलेले मागचे फुटके तुकडे त्याने बाजूला ढकलले आणि तो पाय पसरून बसला. त्याने पाकिटातून एक सिगरेट काढली आणि पेटवली. त्याने पायानेच कपचा मगाशी सरकवलेला तुकडा जवळ ओढला आणि गुडघ्यापाशी ठेवला. मग त्याने एक लांब कश मारला आणि संथ लयीने त्याने धूर अपोआप  बाहेर येऊ दिला. त्याचं डोकं हळूहळू हलकं होत होतं, पण तरीही तिला मागे वळून काही बोलावं असं त्याला वाटत नव्हतं...चूक-बरोबर पेक्षाही आपण एका आवेगी क्षणात वाहत जाणार होतो... आणि मग का गेलो नाही, तीसुद्धा प्रतिसाद देतच होती ना.. कुठे जाणार होतो..त्यानंतर भेटलो असतो तेव्हा ह्या क्षणांचं ओझं घेऊन...मग एकमेकांचे आडाखे घेत चुचकारत एकमेकांना अपराधीपणातून मोकळं केलं असतं किंवा काही दिवस एकमेकांचे होण्याचा खेळ खेळलो असतो....त्या अस्वस्थ, अधुर्या क्षणाशी थांबलो एवढंच... कदाचित तेच बरोबर...
 
त्याने राख झटकली त्या तुकड्यावर...आणि दरवाज्याकडे बघत सिगरेट संपवली..त्याने सिगरेट विझवली आणि उरलेला तुकडा फेकण्यासाठी तो खोका घ्यायला तो वाळला...
     ती त्याच्या बाजूला येऊन बसली होती....तिचे डोळे आता कोरे होते.. नाही...पण तीच्या डोळ्यात आठवणी नव्हत्या, किंवा कुठले प्रश्नही...तिला मागच्या कुठल्या क्षणाची खंतही जाणवत नव्हती...तिची नजर त्याला बोचत नव्हती, पण इतक्या स्वच्छ नजरेला तो फार काळ पाहूही शकला नाही.
  'आपण धावतो ना रे एवढे, त्या सगळ्याचा काय होता रे....या वेळी मला माझ्यासाठी त्याच्यात नव्हतं गुंतायचं. मला फक्त कोणासोबत तरी चालायचं होतं...असं एकट्याने पळण्याचा, मग अडखळले कि कोणाला तरी शोधण्याचा कंटाळा आला रे. पण म्हणून कोणावर काही लादताही  येत नाही. आणि कदाचित काही दिवसांनी परत पळू लागावं वाटलं तर? काही वेळा वाटतं ना कि माझ्या आत एक पोकळी आहे फक्त...रिकामी आहे मी...आणि त्या पोकळीला घाबरते ना म्हणून मग तिला विसरायला इतकं काही करत रहाते...पण मध्ये कुठेतरी सगळा मागे फिरतच...त्या पोकळीपाशी... मग परत दूर रेटा...करिअर, बॉयफ्रेंड...मग परत मागे....
बस.... कंटाळा आला याचा...'
   तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं, तो सेकंदभर शांत होता आणि मग जुन्या ओळखीने त्याचे हात तिला डोक्यामागे थोपटू लागले... 

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...