Friday, March 25, 2011

मोठी, मधली आणि धाकटी


मोठी पाय पसरून बसली होती. ९ वाजत आले होते. सकाळी ६ ला जाग आल्यानंतर दात घासून इथे येऊन बसायचं. म्हणजे खरं एका कोपर्यातच. गुडघे निकामी झाल्यापासून चालणं खूपच मंदावले होतं. अगदी ५-६ फूट चालत जायलाही ५ मिनिटं आणि छोटी छोटी ७-८ पावलं टाकायला लागायची. वळायचं  म्हणजे तर कशाचा तरी आधार घेऊन अगदी सावकाश वळायचं . अशा सगळ्या गतीने जर आपण सकाळी आवरत बसलो तर कोणालाच काही करता येणार नाही असा एकदा सुनेने जाहीर केलं आणि मग दुसर्या दिवसापासून मोठी, सून आवरून नोकरीला निघून जाईपर्यंत अशी एका कोपर्यात बसून असायची. मध्ये एकदा कपभर चहा सून आणून ठेवायची. मुलगा ८.३०च्या सुमारास पेपर आणून ठेवायचा. त्यागोदर ६ ते साडेआठ आपल्या पुरता आवाजात लावलेला रेडियो,  एक पुस्तक, मध्ये मध्ये गुडघ्यांचा मालिश यांत मोठी वेळ काढायची. रेडियोचे सेल संपलेले दोन दिवसांपूर्वी. आणि नातवाला तिने ते आणायला सांगितलेले. पण त्याला काही लक्षात रहात नव्हतं. एका बँकेत मनेजर असलेल्या मुलाला दोन सेल आणायला सांगावेत असं मोठीला वाटत नव्हतं. सुनेला काही सांगण्याचा प्रश्नच नव्हता. खरंतर अडीच तास असं बसवत नाही. गुडघे आखडून जातात. पहायला गेला तर डॉक्टर म्हणाले आहेत कि सकाळी उठल्यावर १५-२० मिनिटं चाललं पाहिजे. तरच गुडघे जास्त साथ देतील. पण सून, मुलगा आणि नातू यांची आवर-अवरीची गडबड सकाळी असते. आणि म्हणून आपण असं कोपर्यात बसून रहायचं. तसंही आपण वाळीत टाकले गेलो आहोतच. सुनेकडून, अगदी मुलाकढूनही ... तो आपली जबाबदारी झिडकारत नाही एवढंच ...
   खरंतर आपल्या घरात आपण एकटे राहायचो. आपापल्या परीने जीव रमवायचो. सकाळी उठून रेडियो लावला कि त्या आवाजाच्या गतीने हळूहळू कामं करत राहायचो. अगदी वाशिंग मशीनही वापरायला शिकलो. संध्याकाळी थोडसं बाहेर फिरून यायचो. त्यावेळी जे लागेल ते जवळचा  दुकानदार द्यायचा. कोणावर अवलंबून नव्हतो. पण मग एकदा घसरून पडायचा निमित्त झालं आणि मुलाने  आणि मुलीने मिळून ठरवलं कि आता मी असं एकटी राहू नये. त्याधी जेव्हा हिंडत फिरत होते तेव्हाही एकटी होतेच कि. पण आजारपणाची धावपळ नको म्हणून मी मुलाकडे रहावं. एका कोपर्यात बसून रहावं, सगळे निघून गेले घरातून कि घरात वेळ काढावा. कशाला हात लावू नये कारण मला नीट हाताळता येणार नाही, फोन करायचा नाही कारण मग मी तासन-तास बोलत बसते. टीव्हीवर मराठी चानेल बघणं एवढाच विरंगुळा. पण त्याचाही कंटाळा येणार. कंटाळा सगळ्याचाच येतो आहे, आणि आज तर सगळ्या आठवणींनी नको केलं आहे....
    आज धाकटी ७५ वर्षाची होईल. तिघा बहिणींमध्ये सगळ्यात लाडकी. मागच्या ५ वर्षात तिला भेटले पण नाही. ती मागची जवळपास १७ वर्ष अशी ना तशी आजारी आहे. म्हणून ती येऊ शकत नाही. आणि मी एकटीने काही तिला भेटायला जाऊ शकत नाही. मधली दोघींना भेटत रहायची, त्यामुळे काही कळत रहायचं. अगदी वर्षापूर्वी पर्यंत मधलीशी फोनवर बोलत होतो. पण मग एक दिवस मधली एकदम फोनवर एवढं काही बोलली आपल्याला, आणि तिथेच तिला धाप लागली. मग त्यानंतर मुलांचा एकमेकांशी बोलणं झालं आणि माझं मधलीला फोन करणं संपलं. धाकटीच्या घरच्यांशी आपलं कधीच पटलं नव्हतं. १० वर्षामागे जेव्हा ती जाते कि काय असं झालं होतं तेव्हाही तिच्या मुलाने आपल्याला तिला भेटू दिलं नव्हतं. का म्हणे, तर तुमच्या रडण्याने तिची तब्ब्येत अजून बिघडेल. 
    धाकटी अशीच आहे नाजूक..५ वर्षाची होती तेव्हा टायफोइड झाला होता. आई ३-४ महिन्यापूर्वीच गेलेली. आपण आणि मधली मिळून तिला साम्भालायचो. आपण नाही मधलीच....धाकटी तापाच्या ग्लानीत आपला हात पकडून म्हणायची, 'ताई, ताई.....मला भीती वाटते. मला पकडून ठेव ग. 'आणि तिच्या कपाळावर घड्या ठेवणं विसरून आपण रडत राहायचो. मधली तेव्हा १२  वर्षाची होती. पण स्वैंपाक करायची, औषधांचं पहायची. मग एकदा धाकटीचा ताप जास्त झाला, ती काही न बोलता फणफणलेल्या अंगाने नुसतीच पडून होती, बाबा पण घरात नव्हते तेव्हा मधलीनेच  शेजार्या-पाजार्यांना बोलावून तिला सरकारी हॉस्पिटलात नेलं. खरी धाकटी तेव्हाच जायची, पण वाचली आणि आपल्या तिघीत सगळ्यात चांगलं नशीब घेऊन....
     सरकारी नोकरी करणारा नवरा आणि मग इंजिनिअर झालेला मुलगा. आणि पहिल्यापासून आईभक्त. लग्नापूर्वी अमेरिकेत होता. पण नंतर आईबरोबर रहायचं म्हणून परत गेलाच नाही. सून पण समजूतदार आहे. सासूचं आजारपण, नवर्याचा तिरसटपणा यांत पण सगळ्यांशी सांभाळून आहे. २-३ महिन्यामागे नवर्याला न कळवता  केव्हातरी  दुपारची  फोन करते आणि धाकटीची खुशाली सांगते. 
     मधलीला तरी फोन करावा. तिला धाकटीला आवडणारं काहीतरी घेऊन जायला सांगावं, म्हणजे अर्धा डझन हातरूमाल, किंवा लिमलेटच्या गोळयांचा एक अख्खं पाकीट...पैसे मी पाठवते म्हणून. 
   एवढ्या इच्छेसारशी मोठीच्या त्या कोपर्यात अडकून पडलेल्या दिवसाला गती आली. सून गेली हे दिसताच ती सावकाश चालत नाश्ता करत बसलेल्या मुलाजवळ आली. आई बाथरूममध्ये जायचं सोडून इकडे का आली असा प्रश्न चेहेर्यावर घेऊन मुलाने विचारलं कि काय ग आई, ठीक आहेस ना. मोठी नेहेमीपेक्षा वेगाने चालली होती. थोडा दम खाऊन ती मुलाला म्हणाली, 'आज धाकट्या मावशीला ७५ पूर्ण होतील. मला मधल्या मावशीला फोन लावायचा आहे. ' 
 'आई, झालं तेवढं पुरे नाही झालं का? परत तुम्ही जुनं-पुराणा काही उगाळून गळे काढणार. आणि मग मधल्या मावशीच्या घरचे आम्हाला नावं ठेवणार. ' 
'अरे, हे काही नाही बोलणार बरं. फक्त जमलं तर धाकटीला घे काहीतरी एवढं सांगायचं आहे. ' मोठी लाचारीने, जवळपास रडवेल्या चेहेर्याने मुलाला म्हणाली. 
'आई, देतो फोन लावून. सकाळ सकाळी रडू नकोस. '
 मुलाने फोन लावून दिला. मधलीच्या सुनेने फोन उचलला. सुरुवातीला थोडसं बोलून मुलाने मोठीला फोन दिला. 'फार बोलू नकोस. मावशीला त्रास होतो' एवढं सांगून बूट घालत मुलगा निघून गेला. 
  'अगं आज धाकटीला ७५ पूर्ण होतील. '
  'ठाऊक आहे ताई. ' मधलीचा कोरडा आवाज 
  'तिला भेटशील केव्हातरी? तिला तिच्या आवडीचं घे काहीतरी. तिची तब्येत बरी आहे का ग आता? '
  'ताई, तुम्हा दोघींच्या घराशी आता काही संबंध नाही हे सांगितलय ना मी. ती मेली असा मला फोन आला कि मी तुला कळवेन. '
   'असं नको बोलूस ग. कसला एवढा राग धरून बसली आहेस. ' मोठीला रडायला यायला लागलं. 
   'ताई, रडायची काही गरज नाही. आज तुम्हा दोघींची पोरं एवढी करती-सवरती आहेत. पण त्यांच्या लहानपणी तुम्हा दोघींचे संसार ठिगळ लावून चालवायला लागले तेव्हा मावशी आली होती हे ते विसरले. जाऊ दे. मला काही उकरायचा
 नाही. फोन ठेव. ' मधलीने फोन ठेवून दिला. 
    मोठी फोन हातात ठेवून रडत बसली. रिकाम्या घरात तिचे हुंदके कोणी ऐकणार नव्हतं. मधली  वर्षापूर्वीपर्यंत हिंडती-फिरती होती. पण मग एकदा सकाळी छातीत दुखायला लागला. अन्जिओप्लास्टी करायला लागेल असं डॉक्टर म्हणले. मधलीच्या मुलाची तेवढी अवस्था नव्हती. मधलीने धाकटीला पैशासाठी विचारलं. धाकटीचा मुलगा नाही म्हणाला, पण त्याने इथे कळवलं. सुनेने साफ नाही म्हटलं आणि सांगितलं कि आपल्याला काही कळलंय हेच कळू देऊ नका. पण मधलीला जे कळायचं ते कळलच. पुढे २-३ महिन्यांनी तिने फोन केला आणि तिथेच तिला बोलता बोलता धाप लागली. परत दवाखान्यात न्यावं लागलं.  तिथून पुढे काही उरलंच नाही. 
    मधली खरी....शाळेत शिक्षिका झाली. पहाटे चारला उठून घरचं आवरून ३५ वर्ष सकाळच्या शाळेत गेली.  अगदी मुख्याधापिका म्हणून रिटायर झाली तरी ह्या क्रमात खंड नव्हता. पुढे घरी शिकवण्या घेतल्या. विणकामाचे क्लास चालवले. आजही तिच्या पेन्शनवर घर चालते आहे.  एक मुलगा झाल्यावर नवर्याला ऑपरेशन करून घ्यायला लावलं. आपलं, धाकटीच घर धड चालत नव्हतं तेव्हा लागेल तिथे जमेल तेवढे पैसे उचलून दिले. आपला मुलगा मैट्रिक झाला तेव्हा त्याला  घड्याळ घेऊन दिलं. 
  पण आपण तिला ऑपरेशनला लागणारे लाखभर रुपये कुठून देणार होतो? सगळे पैसे मुलाच्या हाती सोपवलेत. आणि आपण असे अवलंबून, कुठून माझ्या पैशातले पैसे दे मधलीला असं सांगणार.....
    सांगायला हवं होतं का? आपल्याला नेहेमीसारखी भीती वाटली का...का आपल्या मुलाची धन व्हावी म्हणून आपल्याला बहिणीच्या आयुष्याचीही फिकीर वाटली नाही. आपण कोणत्या नात्याला वर-खाली ठेवलं......
    फोन हातात धरून, समोरच्या भरल्या घराकडे पहात मोठी बसून राहिली. 
                         ************

मधलीने फोन ठेवला. दोन दिवसापासून तिलाही धाकटीला ७५ पुरी होणार हेच आठवत होतं. लिमलेटच्या गोळ्यांचा पाकीट कपाटात पडून होतं. आज तिचा फोन आला नसता तर कदाचित ती गेलीही असती धाकटीला भेटायला हॉस्पिटलमध्ये.....
    ३ दिवसांपूर्वी धाकटीला परत दवाखान्यात ठेवलंय....मागच्या २ वर्षात ८व्यांदा...
    आपण हेही तिला सांगितलं नाही......आणि आता आपण धाकटीला भेटायलाही जाणार नाही....
    समोरच्या नवर्याच्या भिंतीवर टांगलेल्या फोटोकडे बघत ती मागचे दिवस आठवू लागली, आपण कसं सासूचं, बहिणीचं करत राहिलो हे पुटपुटत राहिली. कामात असणाऱ्या सुनेने सासूकडे लक्षही दिलं नाही. 
    मधलीला वाटलं असंच निघावं, धाकटीला भेटावं. आता जा समाधानाने बाई असं सांगावं. 
    नाही. ही कृतघ्न माणसे आहेत.....
   एकमेकांना कापणार्या विचारांच्या द्वंद्वात मधलीच्या श्वासांची लय चुकली. तिला धाप लागली. घोंघावणारे विचार, धाप आणि तिच्याकडे न बघणारी सून ह्यात मधली जिथे बसलेली तिथेच कलंडली. 
                       *********************

   धाकटी हॉस्पिटलमध्ये पडून होती. तिचे डोळे अर्धवट उघडे होते. पलंगाच्या टोकाशी, तिच्या डोक्याच्या बाजूच्या टेबलावर तिच्या नातवाने तिच्या ७५ व्या वाढदिवसानिम्मित्त आणलेली फुलं होती. धाकटीला हे सगळं अर्धवट जाणवत होतं. 
  ती खिडकीतून बाहेर बघत होती. मळभ होतं, आणि रिकामं आकाश.....ढग, पक्षी काही नसलेलं..... 
   धाकटीचे डोळे मिटले....आता समोरची खिडकी ७० वर्ष मागच्या घराची खिडकी होती. तिचे केस विंचरत मोठी बसली होती. मधली बाजूला तांदूळ निवडत होती. तिन्ही बहिणींच्या गप्पा चालल्या होत्या. 
   'ताई...ताई....  धाकटीच्या तोंडातून अस्पष्ट आवाज निघाला.  
   

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...