Thursday, March 3, 2011

घड्याळ आणि स्वप्ने

तो कंटाळला होता. त्याच्या कथा, कविता आणि अगदी कोणाला लिहिलेला साधासा मजकूरही एका चौकटीत फिरतोय हे त्याला जाणवत होतं. आणि त्या चौकटीचे सारे काने-कोपरे धुंडाळले तरी त्या लिहिण्यात कुठली धग, आरपार पोचणारा दंश किंवा अगदी क्षणभर तरी स्तिमित करणारी अनाकलनियता येईल असं त्याला वाटत नव्हतं. ही कसली चौकट आहे? किंवा एक बंदिस्त नियम, ज्यात कितीही बंड केलं तरी एखाद्या गुलामासारखा आपलं लिहिणं घुमतं आहे? आपल्या आतल्या डोहात, त्याच्या तरल पृष्ठभागावर, गडद-सावळ्या अंतरंगात सापडणारी चित्रे, त्या डोहाच्या तळाच्या अंधाराचा शोध लावताना येणारी हतबलता किंवा जीवघेणी कोसळती जाणीव हेच तर लिहितोय आपण.... आपल्या जगण्याचे झरे त्या डोहाला जाऊन मिळतायेत, वाटेत त्यांच्यात काय काय मुरतंय आणि डोहाच्या पाण्याला त्याची चव येतीये, त्याच रंग येतोय....आणि म्हणून आपल्या जगण्याशी तो डोह जोडलेलाय, आणि त्याची खोली माझ्या स्वतःला मी किती कळतोय ह्याच्याशी.... मी जिथे टाळतोय स्वतःला तिथे अंधार आहे, आणि माझ्या असण्याचा कवडसा मी जसा फेकतो तश्या दिसतात मला माझ्या आठवणी... आणि माझ्या स्वप्नांचे अंकुरही ह्याच डोहाच्या पाण्यावर पोसलेले.... म्हणजे मी काय होतो आणि मी काय होईन ह्यांनी बांधलेल्या असण्यात तेवढं माझं लिहिणं आहे.... आणि अगदी तो मी खोडून काढत दुसर्या कोणालाही उभा केला ह्या डोहाचा मालक म्हणून तरी ह्या भिंती तशाच आहेत. म्हणजे सार्या गोष्टी शेवटी भूतकाळाचा काढू पाहिलेला अर्थ आणि त्या अर्थाच्या कुशीत शोधू पाहिलेली भविष्याची वाट अशाच...  ह्या पलीकडे काय येणार ह्या गोष्टींमध्ये.... आणि हे टाळून अगदी जे उमटतंय त्वचेवर त्याचा प्रतिबिंबच ठेवू शब्दात असा म्हटलं तरी केव्हा ना केव्हा हा अर्थाचा किंवा वाटेचा प्रश्न येणारच.... मग का लिहायचं?
    ह्याच्या पलीकडेही गोष्टी असतील. कदाचित आपण एका जागी बांधले गेलोय म्हणून आपल्या गोष्टीही एकाच एक गाभ्याशी जोडल्यासारख्या झाल्या आहेत. इथून बाहेर पडायला हवं, ह्या अपूर्ण जगापलिकडे पूर्ण काही असेल जिथे भूतकाळ आणि भविष्य यांच्या अक्षांश-रेखांशात जगणाऱ्या माणसांच्या पलीकडे काही असेल....  बस, आता इथून निघायला हवं, तरच ती नवी गोष्ट सापडेल... त्याने सामान बांधलं आणि तो चालू लागला....
      पण नवी गोष्ट इतकी सहज मिळत नव्हती. तो जिथे मुक्काम करायचा तिथली माणसे पाहायचा आणि त्याला जाणवायचं हे सारेही त्याच नकाशा-बरहुकूम आहेत. त्यांच्या गात्रात त्यांचे अनुभव साठले आहेत, त्या अनुभवांचा उसना-तोकडा अर्थ त्यांनी लावलं आहे, आणि त्या गात्रातून त्यांच्या इच्छांचे, स्वप्नांचे झंकार येतायेत....त्यांच्या त्वचेचे, ते राहतात त्या शहराच्या मातीचे, झाडांचे रंग, प्रकार बदलतायेत, पण गोष्ट तीच आहेत, त्याच आवर्तात फिरणारी, आणि थकून उणी-पुरी समजणारी....
    तो चालत होता. निराशेचे मूळ छाटत होता. त्याने इतके दिवस पाहीले होते कि सापडण्याच्या बेभान आनंदाचा क्षण हरवून जाण्याच्या टोकानंतरच येतो हे त्याला ठाऊक होतं. आणि एक एक शहर ओलांडताना तो ह्या हरवून जाण्याच्या टोकाकडे पोचतोय हे त्याला जाणवत होता.
     कुठेतरी अशी माणसे आणि म्हणून त्यांच्या गोष्टी असतील कि त्यांना मागचा दिवस संपूर्ण आकळला असेल आणि येणारा दिवस त्यांच्या स्पंदानाना थिरकवत नसेल... अर्थाची अपूर्णता आणि पर्यायाने येणारी कृतीच्या परीघाची संभाव्यता ह्या अटळ नियमापेक्षा ते वेगळे असतील...
   का ही आपलीच आशा आहे, आपलं स्वतःला फसवणं... आहे का कोणी असं.....
   त्याने ठरवलं कि उद्या ज्या गावात पोचू तिथेही नवी गोष्ट मिळाली नाही तर मागे फिरायचं, सारे शब्द टाकून द्यायचे आणि.... ह्या विचारानेही तो घाबरला. आता ह्या दिवसाला तरी तो सापडण्याचा क्षण असला पाहिजे...
     संध्याकाळ पर्यंत तो नुसताच रस्ता तुडवत होता. दिवस आणि त्याची आशा दोन्ही मावळण्याच्या टोकाला असताना तो एका कमानीपाशी पोचला. कमानीतून एक रस्ता, अगदी सरळ, समोर जात होता. त्या रस्त्यावर कोणीच नव्हते...रस्त्याच्या दोन्ही बाजूला वस्ती असावी असं वाटत होतं, पण संध्याकाळच्या प्रकाशात वास्तव आणि भास वेगळे काढता येत नव्हते. तो कमानीतून आत गेला. डाव्या हाताला एक एक मजली घर होतं. तो घरापाशी गेला. तिथे 'प्रवाश्यांसाठी थांबण्याची सोय' अशी पाटी होती. दरवाजा उघडा होता. त्याने काही वेळ कोणी आहे का हे पाहिलं, आवाज दिला... कोणीच नाही हे पाहता तो आत गेला. जागा साफ होती, जरी वावराची खूण नसली तरी ओसाडही नव्हती. तो घराचे निरीक्षण करू लागला. उजवीकडे एक टेबल होते. त्यावर प्रवाशांसाठी सूचनेचा कागद होता. थांबायची जागा डावीकडच्या जिन्याने वर गेल्यावर होती. पाणी, अंघोळ, खाणे सार्याची सोय वर केलेली होती. कागदावर कोणाचेच नाव नव्हते.
   तो जिन्याने वर गेला. वर एक खोली, एक स्वैपाकघर, एक अंघोळीची जागा होती. स्वैपाकघरात खाण्याचे पदार्थ ठेवलेले होते, एका माणसापुरते. तो खोलीत गेला. खोली नीट आवरलेली होती. खोलीला खिडकी नव्हती, पण छपरापाशी असणाऱ्या काही झरोक्यातून येणाऱ्या हवेने खोली हवेशीर होती. त्याने सामान पलांगापाशी ठेवले. खोलीच्या उरलेल्या भागात एक टेबल होते आणि एक खुर्ची. तो टेबलापाशी गेला. टेबलावर कोरे कागद रचून ठेवले होते आणि बाजूला एक पेन.
   त्याने थोडसं खाऊन घेतलं. तो परत खोलीत आला. दमलेल्या अंगाने तो अंथरुणावर पडला तेव्हा त्याला फिकट काहीसं वाटलं कि त्याला ही नेमकी एकच खोली कशी, इथे कोणीच का नाही, असे कागद का रचून ठेवलेत, ह्या गावात कोण रहाता ह्याचा आश्चर्य, भीती किंवा उत्कंठा कशी काय वाटत नाहीये. पण ती फिकट जाणीव हळूहळू विरली आणि त्याच्या थकव्याने तो झोपून गेला.
              सकाळी तो उठला. त्याला थकवा जाणवत नव्हता. पण नव्या दिवसाची नवी आणि हळूहळू विरत जाणारी कोवळी जाणीव कुठेच नव्हती. एका सलग नाटकातला एक प्रवेश संपून दुसरा यावा तसं काहीसं... त्याने परत थोडसं खाल्लं, आवरलं आणि  तो खोलीत आला. बाहेर दिवस हळूहळू गती पकडत होता. तो टेबलापाशी बसला. त्याने कागद जवळ ओढले. पेन काढून लिहायला तयार झाला. पण पेनाचे टोक कागदाला स्पर्श करताक्षणी त्याला जाणवले कि तो काहीच लिहू शकत नाहीये. त्याने तो इथे कसा पोचला, आणि आता तो काय शोधणार आहे हे लिहायचा प्रयत्न केला. पण त्याच्या सार्या शब्दांची जुळवाजुळव त्या कोर्या पानावर एक अक्षर उमटवू शकत नव्हती. जणू त्याची जाणीव आणि त्याची कृती याच्यामधला एखादा महत्वाचा दुवा निखळला होता. पण त्याचे शब्द मूक होण्याचही त्याला काही फारसं वाटलं नाही. आपलं आयुष्य कोरून ठेवावं किंवा आपल्या अनुभवांच्या गाठोड्यानाच  निर्मिती म्हणून मानावे असे समझोते त्याने केव्हाच सोडून दिले होते. त्याने पेन आणि कागद जसे होते तसे ठेवून दिले आणि खोलीतून बाहेर पडत, जिना उतरून दरवाज्याने तो रस्त्यावर आला.
        तोच सरळ समोर जाणारा रस्ता...त्याचा दुसरा टोक दिसतही नव्हतं. आणि त्या रस्त्यावर कोणीच चालत नव्हतं. तो थोडं पुढे चालत गेला. काल त्याला जो भास जाणवला होता तशी घरे खरोखर तिथे होती. त्याने डाव्या हाताला पाहिलं. काही पडकी, काही चांगल्या अवस्थेतली तर काही अगदी नवी घरे एका सरळ रेषेत तिथे होती. जणूकाही कोणी एका क्रमाने ती घरे बांधत गेला होता. त्याने उजवीकडे पाहिलं. डाव्या बाजूचं प्रतिबिंब असल्यासारखी ती उजवी बाजू होती. तशीच घरे, नवी, जुनी... तोच क्रम, तीच बांधणी.... त्याच्या मनात परत एक फिकट विचार आला, कि हे कुठलं गाव, अशी तंतोतंत जुळणाऱ्या बाजू असलेला हा कुठला रस्ता, आणि इथे राहत तरी कोण,,,आणि ह्या सगळ्याच्या भीतीचा एकही चरा कसा नाही उमटला आपल्यावर... पण आदल्या रात्रीसारखा तो विचार अपोआप संपला आणि एका कोर्या मनाने तो डाव्या बाजूची घरे शोधू लागला.
       फार पडक्या घरात कोणी रहात नसेल असं वाटून तो जरा एका बर्यापैकी दिसणाऱ्या घरात शिरला. तो काल थांबलं तशाच बांधणीचं हे घर होतं. सराईतपणे तो जिन्याने वर गेला. वरच्या खोलीत एक १२-१३ वर्षाचा मुलगा होता. त्याने मुलाकडे पाहिलं. पण एकाद्या चित्राच्या नजरेला नजर भिडावी तसे त्याच्या डोळ्यांनी त्या मुलाच्या डोळ्यांना पाहिलं. त्या नजरेत एक टक्क कोरेपणा होतं. भीती, कुतूहल, बोलायची उत्कंठा अशी कुठलीही भावना नसलेला कोरेपणा... जसं काही त्या दोघांच्यामध्ये एक काचेचं तावदान होतं. तो त्या मुलाकडे बघत राहिलं. तो मुलगा त्या खोलीच्या भिंतीवर असलेल्या घड्याळाकडे गेला. त्याने ते घड्याळ हातात घेतला. घड्याळावरची काच काढून तो मुलगा घड्याळाचे काटे मागे फिरवू लागला. काही वेळाने ते काटे स्थिर करून त्याने ते घड्याळ भिंतीवर परत लावले आणि तो मुलगा एकटक त्या घड्याळाकडे पहात बसला.
      तो घरातून बाहेर आला. काही घरे सोडून तो पुढच्या घरात शिरला. त्याच क्रमाने जिन्याने वरती गेला. ह्या खोलीत एक २०-२१ वर्षाचा माणूस होता. ह्या माणसाचा चेहेरा त्याने आधी पाहिलेल्या मुलाशी जुळत होता, जसं काही त्याचा मोठा भाऊ किवा त्याच मुलाचा काही वर्षांनी दिसणारा चेहेरा. पण इथेही तोच कोरेपणा आणि तेच तावदान.... आणि हा माणूसही घड्याळाचे काटे मागे फिरवून घड्याळाकडे पहात बसलेला.
    तो आता क्रमाने एक एक घर बघत गेला. सगळीकडे तोच माणूस होता. पण त्याचं वय पुढच्या पुढच्या घरात वाढत जात होतं. आणि कुठेही त्याची दखलही नव्हती. तेच घड्याळ, तेच मागे फिरणारे काटे, आणि मग तीच घड्याळाशी भिडलेली नजर.....
    तो रस्त्यावर आलं. मधल्या कुठल्याही घरात न जाता तो अगदी टोकाच्या घरात गेला. अगदी काही क्षणांपूर्वी उघडलेला आहे अश्या दरवाज्यातून तो आत गेला. तो वरच्या खोलीत पोचला तेव्हा बाकी सारे तपशील तेच होते, पण वार्धक्याच्या टोकाला स्पर्श करणारा तो माणूस, ज्याची पोरसवदा, तरुण, पोक्त अशी सारी रूपे तो मागच्या घरांतून पहात आला होतं, तो माणूस इथे आधीपासूनच घड्याळाकडे बघत उभा होता. आणि ह्यावेळी जरी नजरेला नजर भिडली नसली तरी त्या समोरच्या माणसाच्या आणि ह्याच्या अस्तिवात कुठलाही थर नव्हता. पण त्याने काही बोलण्याआधी, त्याचे सारे प्रश्न आणि पूर्वायुष्य शोषून थेट अंतिम उत्तराने हाक द्यावी तसा त्या माणसाचा आवाज त्याच्या पर्यंत येऊ लागला.
      'तू आला आहेस ती जागा काळाच्या पकडीतून मुक्त आहे. इथे प्रत्येक जण त्याच्या त्याच्या मितीत जगतो आहे आणि तो काळामध्ये पुढे-मागे कसाही चालू शकतो. हा सरळ रस्ता वर्तमान अस्तिवाचा टोकदार क्षण आहे. ह्या क्षणाची जाणीव नाही म्हणून ह्या रस्त्यावर तुला कोणी दिसत नाही. पण डावीकडे भूतकाळ आणि उजवीकडे भविष्य आहे. रस्त्याच्या बाजू एकमेकांचे प्रतिबिंब असल्यासारख्या आहेत कारण भविष्याच्या क्षणाची चित्रे ही न उलगडलेल्या अबोध आठवणी किंवा जाणीवा ह्यातूनच येतात. म्हणून उजवीकडचे घर, जो मी पुढे जगणार असा एक क्षण आहे तो मागच्या क्षणाशी चपखल जोडलेला आहे. पण इथे जगणं आणि जगण्याची जाणीव एकरूप आहेत. आधी इंद्रियांनी जगणं, मग मनाने त्या अनुभवांचे थर चाचापणा आणि मग कुठेतरी थेंबभर काही सापडणं ह्या तुझ्या मर्यादा इथे नाहीत. इथे सगळ्या अनुभवांचे अर्थ पूर्णपणे अविष्करीत आहेत आणि म्हणून कुठल्याही स्वप्नांना किंवा मीच केलेल्या माझ्या जगण्याच्या विस्तराला अपूर्णता नाही. पण माझ्या जगण्याची कुठलीही अनुभूती मी कोणालाही देऊ शकणार नाही. कारण इथे 'मी' एवढा परिपूर्ण आहे कि अजून कोणाच्यात डोकावून काही शोधावं असा प्रश्नच नाही आणि दुसर्या कोणालाही कुठलीच वेदना नसल्याने अशा सह वेदनांचे तुला नैसर्गिक वाटणारे बंधही मला नाहीत. '
           आता आवाज थांबला. आणि तो माणूस चालू लागला. तोही त्या मानसापाठोपाठ सहज चालू लागला. रस्ता ओलांडून ते त्या घराच्या प्रतीबिम्बात पोचले. पण कडा आणि कडा एकमेकांशी जुळणाऱ्या त्या घरांमध्ये एकच फरक होता. उजवीकडच्या ह्या घरात घड्याळ नव्हते. त्या जागी फक्त एक पोकळी होती. तो माणूस त्या पोकळीशी डोळे भिडवून उभा राहीला आणि परत तोच आवाज त्याच्याशी बोलू लागला.
   'ह्या पोकळीत मी माझे पुढचे क्षण पाहतो. आणि मला हेही कळतं कि त्यांचे तपशील माझ्या स्वप्नांशी कुठे जुळतायेत आणि कुठे ते अपुरे आहेत. ते अपुरेपण जाणवलं कि मग मी शोधतो कि 'हवं आणि आहे' ह्यांच्या मधले हे अन्तर कुठून आले आहे. मग मी परत भविष्याच्या ह्या क्षणाशी जोडलेल्या माझ्या मागच्या जाणीवेत जातो. तिथे तुला जे घड्याळाचे काटे फिरवणं वाटलं ते माझं माझ्या आयुष्याच्या आधीच्या संदर्भांना परत जगणं होतं. आणि जगत जाताना 'हवं आणि आहे' ह्यांच्यातला अंतर जन्माला घालणारे जे संदर्भ आहेत ते मी बदलतो आणि अन्तर शून्य करतो. मग मी पुढे सरकतो आणि नवे घर बांधतो. '
     तो माणूस त्या पोकळीत बघत राहीला. आणि आता परत एकदा मध्ये एक पारदर्शक पडदा आला होतं, त्या दोघांच्या अस्तित्वाना छेदत विलग करणारा.  
      तो बाहेर पडला. त्या रस्त्याने मागे चालत चालत रात्री तो जिथे थांबलेला त्या खोलीत परत आला. हीच तर ती नवी गोष्ट होती. आणि आता त्याला ती लिहायची होती. पण तरीही ह्या उर्मीने कुठलीच लाट त्याच्या मनात उसळत नव्हती. शांतपणे तो टेबलाशी बसला आणि त्याने कागद ओढले, पेन हातात धरलं.
   ....आणि तरीही तो काही लिहू शकलं नाही. आणि आता त्याला जाणवत होतं कि आयुष्याच्या अर्थाची अपूर्णता, माणसांची स्वप्ने आणि प्रत्यक्ष जगणं ह्यांच्यात येणारं अटळ अन्तर, आणि तरीही ह्या मर्यादा ओलांडायचा, अर्थाच्या गाभ्याला स्पर्शायचा सोस माणसाच्या काळजात, विचारात जिवंत आहे. जगून झालेल्या क्षणाचे, दिवसांचे रंग असण्याशी बेमालूम विरघळले आहेत आणि त्याच्याच छटा येणारे दिवस घेऊन येणारेत. पण हा नियम जितका खरं आहे तितकीच ह्याच्या पार जाऊन एखाद्या निखळ, निरव जागेपाशी पोचायची ओढही. ती जागा जी खेद, तृष्णा, विरत जाणारे सुख किंवा इंद्रियांचा झळाळता पण क्षणभंगुर आनंद  ह्या सगळ्याच्या खूप पुढे आहे. आणि ती सांगता येत नाही म्हणून ती सांगता यावी यासाठी गोष्ट, एक किंवा अनेक जन्माला येणार आहेत.
   आणि ह्या रस्त्यांवर, ह्या खोलीत आलेला, जाणिवेशी समरस माणूस पाहिलेला तो एकटाच नाही. आधीही कोणी इथे आले असणार, त्यानाही परिपूर्ण आयुष्याचा तोच अंतिम आवाज ऐकू आला असणार, आणि जेव्हा ते ही नवी गोष्ट लिहायला इथे असेच बसले असणार तेव्हा त्यांनीही हे कागद असेच कोरे ठेवले असणार....
   तो घराच्या बाहेर आला. संध्याकाळ झाली होती. तो कमानीतून चालत काल तो जिथे होता तिथे आला. त्याने मागे वळून पाहिलं. तो तसाच सरळ न संपणारा रस्ता, आणि तीच संदिग्ध घरांची ओळ....  त्याला तो आज जगला तो दिवसही आता एक तरल भास वाटत होता... आणि ती चमकती पारदर्शक जाणीव संपण्याआधी ही गोष्ट सांगावी अशी अस्थिर तहानही त्याला जाणवू लागली. तो मागे वाळला आणि झपाट्याने त्या कमानीपासून. काळाच्या पकडीतून मुक्त जागेपासून, परिपूर्ण जाणीवेच्या माणसांपासून दूर जाऊ लागला.

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...