Saturday, February 5, 2011

प्रश्नप्राक्तन

मागचे किती दिवस तो सारा मुलुख भटकला होता. आधी बिनधास्तपणे कोणाशीही बोलत, गप्पा मारत आणि त्यानंतर चेहरा लपवत... एखाद्या घुबडासारखा तो दिवसभर एखाद्या सावलीशी पडून रहायचा. मग प्रकाशाचे दुवे निसटून गेले आणि ओळखीची शक्यता धूसर झाली कि तो परत रस्ता धरायचा. कुठे जाणार रस्ता हे त्याला ठाऊक नव्हता, पण तो आपलं वेगळेपण दर्शवू शकत नव्हता. आणि म्हणून तो लपत होता, पण चालत होता. कालची रात्र त्याने शहराच्या सीमेवर शेकोटी पेटवून काढली होती. मध्ये तहान लागली म्हणून तो उठला. समोर नदीच्या आरस्पानी पाण्यावर चांदणं तरंगत होतं. चंदेरी प्रकाशाचा एक वर्ख सार्या अस्तिवावर होता. काही क्षण त्याच्या मनात मुग्ध कविता पालवून आल्या. त्या कवितांच्या ओळी त्वचेच्या थरांशी येतायेत, मोकळ्या होण्यासाठी, उमटण्यासाठी सरसरतायेत अशा उत्फुल्ल जाणीवेच्या स्फोटात पाण्यावर तरंगणाऱ्या अभासाला स्पर्श करावा म्हणून तो वाकला आणि आपल्या प्रतिबिंबाला पाहताना त्याचा सारा आनंद विस्कटून गेला. कासवाने आपले हात-पाय आत ओढल्यावर एक निर्जीव दगडी कवच उरावं तशी ती दगडी कठोर जाणीव परत त्याला शरीरभर जाणवू लागली. मागचे रिकामे दिवस आणि त्याचा असंबद्ध अन्वय त्याला परत भंडावूलागला.
      मित्रांबरोबर दिवस घालवणे हा एकमात्र उद्योग तो करत होता. तो काय, त्याच्या वयाचे सगळेच ते करत होते. पण काही दिवसांनी एक बदल घडू लागला. त्याच्या एका मित्राचे वडील गेले. आणि दुसर्या दिवशी त्या मित्राच्या कपाळावर एक ठसठशीत प्रश्नचिन्ह उमटलं. असं प्रश्नचिन्ह मुलुखातल्या सार्या वयस्क स्त्री-पुरुषांच्या कपाळावर होता. आणि वय वाढतं तसं ते अपोआप उमटतं असं सगळे म्हणायचे. पण त्याला कधी आपल्या कपाळावर असं प्रश्नचिन्ह यावं असं वाटलंच नव्हतं. त्याने पाहिलेलं कि अशी प्रश्नचिन्ह असलेली माणसे फार बोलत नाहीत. त्यांच्या कपाळावरच चिन्ह सतत त्यांच्याकडे काही मागत असतं. आणि एक दिवस त्या प्रश्न्चीन्हाखालाचा बिंदू ठळक, धगधगता होतो आणि त्या माणसाचे निष्प्राण कलेवर तेवढे उरते. त्याच्या आजूबाजूच्या, अगदी जख्ख म्हातार्या माणसांच्या कपाळावरही असं प्रश्नचिन्ह होतं आणि कायम ते प्रश्नचिन्ह त्यांना सतावत असे. त्याने एकदा बाबाला, जेव्हा तो उन्हातून येऊन गार वार्याच्या झुळूकेला बसला होता, तेव्हा ह्या प्रश्नप्राक्तनाबद्दल विचारलं होता. बाबा म्हणालेला कि बहुतेकांच्या माथ्यावर असलेलं प्रश्नचिन्ह कायम जळजळत राहता. पण प्रश्नचिन्ह असूनही शांत असलेले काहीजण दूर समुद्रापाशी राहतात. तिथे कसं जायचं हे तो विचारणार तेवढ्यात बाबाचं प्रश्नचिन्ह परत ठसकू लागलं आणि तो विषय तिथेचराहीला.
     त्या एका मित्रानंतर बरेच दिवस पूर्वीसारखेच होते. पण नंतर त्याचा एक मित्र त्याच्या दूरच्या नातेवाइकाकडे जाऊन आला. तो आला तेव्हा त्याच्या कपाळावर एक अरुंद आणि उभे चिन्ह होते. त्याच्या खालचे टिंब पार त्याच्या नाकाच्या टोकावर आले होते आणि त्यामुळे त्याचे नाक उगाच वर आल्यासारखे झाले होते. आल्यावर तो मित्रांशी बोलेनासा झाला. सगळी मोठी माणसे, अगदी म्हातारेही त्याच्याभोवती कोंडाळे घालून बसत आणि त्याच्या प्रश्नचीन्हाबाबत चर्चा करत. तेव्हा एकदा त्याने सांगितले कि तो जिकडे गेला होता तिथे सार्यांच्या चेहऱ्यावर असेच किंवा याहून देखणे प्रश्नचिन्ह आहे. आणि जेमतेम मिसरूड फुटायच्या वयात जर असे चिन्ह उमटले नाही तर अशा पोरांना ते त्यांच्या गावातून घालवून देतात. मी तिथे पोचलो तेव्हा ते मला गावात येउच देत नव्हते. पण माझ्या नातेवाईकाने मध्यस्थी केली. त्यांनतर मला त्यांनी त्यांच्या गावातल्या मिसरूड फुटणार्या पोरांबरोबर दूर दिसणाऱ्या एका डोंगरापर्यंत शर्यत लावायला सांगितले. त्या डोंगराला स्पर्श करणाऱ्या पहिल्या एकतीस जणांनाच चिन्ह प्राप्त होईल असे भविष्य संपूर्ण शरीराचेच प्रश्नचिन्ह असणाऱ्या आणि चिन्हाच्या धगीत त्वचा सतत पोळल्याने लालबुंद दिसणाऱ्या एका भाविष्यवेत्याने सांगितले. आम्ही एकूण सत्तावन मुले पळू लागलो. गाव दूर पडल्यावर ढकलाढकली सुरु झाली. आधी मी त्यात भाग घेतला नाही. पण नंतर जेव्हा माझ्यापुढे पळणारी एकतीस मुले मला दिसू लागली, तेव्हा मी एकातीसाव्याचा खांदा खेचून त्याला बाजूला ढकलले. तिसावा आश्चर्याने माझ्याकडे पहात असताना मी त्याला ओलांडले. आणि मग मध्ये येणाऱ्या कोणाचीही पर्वा न करता मी धावलो. मी जेव्हापासून त्या डोंगराला स्पर्श केला तेव्हापासून हे चिन्ह मला मिळाले. त्याच्या ह्या गोष्टीवर सार्यांनी जल्लोष केला आणि असे देखणे चिन्ह आपल्या मुलांना कसे मिळेल असे लोकांनी त्याला विचारले. त्याने सांगितले कि आपल्याकडे डोंगर नाही. पण नदीकीनार्याची वाळू उपसून जो आठ गोणी वाळू घराच्या बांधला आणेल त्याला असे चिन्ह मिळेल.
   तेव्हापासून एक एक करून त्याचे मित्र वाळू उपसायला जाऊ लागले. नदीच्या काठाला एक शांत तुकडा उरला नाही. अगदी दहा-अकरा वर्षाची पोरेही धामधुमीने वाळू उपसु लागली. लवकरच लांबुडक्या चिन्हांचा कळप तयार झाला. सगळ्यात पहीले चिन्ह मिळालेल्या मित्राचे चिन्ह अजून लांब होऊन पार त्याच्या गळ्याशी टेकले होते. तो प्रत्येक गल्ली-गल्लीत जाऊन लोकांना कामाला लावत होता.
    सुरुवातीला त्याला ह्या सगळ्याची गम्मत वाटली. पण त्याला कधी अशी वाळू उपसून घराच्या बांधला घालावी असे वाटले नाही. त्याच्या आई-बापानेही त्याला आग्रह केला नाही. पण हळूहळू सगळ्यांची घरे वाळूच्या बांधाने रुंदावली. ती वाळू इकडे-तिकडे उडून धुरळा होऊ लागला. ताबडतोब लांबुडक्या प्रश्नचीन्हाने आणि त्याच्या साथीदारांनी झाडांच्या फांद्या खिडक्यांना लावण्याचा उपाय शोधला. त्याने लोकांच्या घरात वाळू जाणे थांबले. पण त्याच्या घराला ना वाळूचा बांध होता आणि खिडक्यांना झाडाच्या फांद्या. त्यांचे घर वाळूने भरून जाऊ लागले, नदीचे पाणी किनारा न उरल्याने घराकडे सरकू लागले. घराला बांध असलेले लोक त्याच्याकडे बघून थांबेनासे झाले. एक दिवस त्याचे आई-बाप धुळीच्या वादळात गेले. त्याचेच नाही, तर वाळू न उपसू शकलेल्या आणि झाडाच्या फांद्या न मिळवू शकलेल्या अनेक घरांची वाताहत झाली. आता गावात सारेच प्रश्नचीन्हाकिंत लोक उरले. तो आणि त्याचे काही मित्र, जे नदीचा किनारा आणि झाडाच्या फांद्या ह्या नदी आणि झाड ह्यांच्यासाठी असतात असे मानत ते उरले. पण त्याला कुठे खेळता येईना, बसता  येईना, जिथे-तिथे देखण्या प्रश्नचिन्हांचे लोक येत आणि त्यांच्या चिन्हांची जळजळ थांबवायला ते काही ना काही करू लागत. त्याच्या मित्रांच्या आई-बापानी त्या मित्रांना डोंगराच्या गावात पाठवून दिले.
   तिकडे जाणार्या शेवटच्या मित्राला निरोप देतान मित्राने विचारले कि आता तू काय करणार. त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हते. त्याच्या मित्राने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारले, तुमचे दूर कोणी नातेवाईक नाहीत. त्याला एकदम बाबाने सांगितलेली समुद्राजवळ राहणाऱ्या माणसांची गोष्ट आठवली. मित्राची निघून जाणारी आकृती लांबवर पोचल्यावर त्याने मोजक्या सामानाची गाठोळी घेतली आणि तो समुद्र शोधत निघाला.
   वाटेतल्या सगळ्या गावात देखण्या प्रश्नचिन्हाचा फैलाव झाला होता. सारे रस्ते वाळू उपसणाऱ्या, फांद्या तोडणार्या, खड्डे खणायला जाणार्या, प्राणी कोंडायला निघालेल्या लोकांनी भरले होते. ज्याला त्याला प्रश्नचिन्ह मिळावयाचे होते. तो गर्दीत येत नाही असे पाहून मग कोणी त्याच्याशी बोलत नव्हते. कोणी बोलले तरी एकटक त्याच्या कपाळाकडे पहात राहायचे आणि हळहळत त्यांच्या कामाला निघून जायचे.
अशी कित्येक गावे मागे टाकत, माणसे टाळत तो ह्या मोठ्या शहराच्याही पलीकडे आला होता.
   पण आता त्याचा ह्या प्रवासावर विश्वास राहीला नव्हता. त्याला वाटू लागलं होतं कि बाबाने आपल्यालाही वाळू उपसायला, फांद्या तोडायला पाठवायला हवं होता. किमान आपण स्वतःहून जायला हवं होता. ह्या दिवाभीत प्रवासाने काय मिळणार आहे. आपणही घराभोवती बांध घातला असता, हिरवीगार पाने असलेल्या फांद्या खिडक्यांना लावल्या असत्या. आपले देखणे प्रश्नचिन्ह बघायला, आपल्या शर्यतीची कहाणी ऐकायला लोक जमले असते. त्यांच्या उत्सुक डोळ्यात आपण इर्षेची ठिणगी टाकली असती आणि आपले चिन्ह अजून तेजस्वी होत गेले असते. तो समुद्र आणि ती न जाळणारी चिन्हे असलेली माणसे फक्त एक गोष्ट आहे. ती अस्तित्वातच नाहीत. अस्तित्व आहे ते फक्त प्रश्नचीन्हाला. त्याच्या जळत जळत स्वतःला संपवत जाण्याला. आपल्या माथ्यावर हे गोंदण का नाही, आपण असे कुरूप नशिबाचे का, असे रिकामे, बिन अर्थाचे....  एक दिशाहीन वावटळ त्याच्या मनात घोंघावू लागली आणि तो सैरावैरा धावत सुटला.
   त्याला धाप लागली आणि वावटळ थोडी शमली तेव्हा त्याला नाकपुडीत जाणारा समुद्राचा वास जाणवला. उरला-सुरला दम एकवटून तो त्या वासाच्या दिशेने चालू लागला.  हळूहळू त्याच्या कानात गाज घुमू लागली. त्याच्या पावलांचा वेग वाढला. आता त्याच्या डोळ्यासमोर त्याला बोलावणाऱ्या हजारो फेसाळ शुभ्र लाटा होत्या. त्या हिरवट-निळसर पाण्यात एक खुलं निमंत्रण होतं आणि एक संवाद. त्याला सैरभैर करणारी वावटळ शमली होती आणि तिथे एक निवांत झुळूक जाणवत होती. तो चालतराहीला . हळूहळू त्या लाटा त्याच्या पावलाला स्पर्शू लागल्या. त्याने डोळे मिटले आणि तो ते सुख निशब्द अनुभवू लागला. पण काहीवेळाने त्या जाणिवेची तल्खली ओसरली. आपण समुद्रापाशी आहोत, म्हणजे समुद्र ही काही गोष्ट नाही. म्हणजे....  म्हणजे.... तो इकडे तिकडे शोधू लागला.
    दूर एकीकडे त्याला हालचाल दिसली. तो धावत धावत तिथे पोचला.
    पार पिकल्या शरीराचा एक माणूस एक एक शिंपला वेचत होता. मुठभर शिंपले झाले कि तो मागे जायचा आणि एका रचनेत शिंपले मांडायचा. ती रचना काय होती कळत नव्हती, त्यात एक प्रचंड विस्ताराचे भव्य झाड होते, एक अपार वेगाचा धबधबा होता, एक तळ न दिसणारी दरी होती, फुले होती, आणि प्रत्येक मुठभर शिम्प्ल्यांबरोबर त्या रचनेत एकनवा अर्थ जन्म घेत होता.
   'हे काय आहे?' त्याने प्रश्न विचारला. काही उत्तर आलं नाही. 'तुम्ही इथे कसे आलात? ' काहीच उत्तर नाही. त्याने जवळ जाऊन, जोराने हेच प्रश्न विचारले. तो पार पिकल्या शरीराचा माणूस काहीच बोलला नाही. शेवटी तो त्या माणसाच्या वाटेत जाऊन उभा राहिला. आणि त्याच्या चेहेर्याकडे एक टक पहात राहिला. त्या पिकल्या माणसाच्या कपाळावरही प्रश्नचिन्ह होतं. पण ते धगधगत नव्हतं. त्या पिकल्या माणसाच्या हालचालीत कुठली घाई नव्हती आणि सुस्तीही. पिकल्या माणसाने त्याचे हात हातात घेतले आणि दोन टोकदार शिंपले त्याच्या हातात ठेवले. मग तो पिकला माणूस अगदी पक्का, खोल हसला, आश्वस्त करणारं आणि त्याने समुद्राच्या एका टोकाकडे बोट दाखवलं. समुद्राचा अंतहीन विस्तार तिथे जरा स्थिरावला होता आणि नीटपाहिलं तर धडकून फुटणार्या लाटा समजून येत होत्या.
   ते दोन शिंपले मुठीत घट्ट बांधून तो पावले टाकू लागला. पावलांनी जमिनीचा तळ सोडला तसं तो पोहू लागला आणि त्या समुद्रात एक टिंब असल्यासारखे असणाऱ्या बेटावर पोचला. त्याच्या समोर खडकांची तटबंदी होती, एकात एक मिसळत जाऊन आपोआप बनलेली. तो त्या खडकांपर्यंत पोचला . त्याने बोटांनी खडकाचा राकट, खंबीर स्पर्श चाचपला. मुठीतल्या दोनपैकी एक शिंपला घेऊन त्याने सावकाश त्या खडकावर तो चालत आला ती गोष्ट कोरायला सुरुवात केली, पुढचे कित्येक दिवस.....
   .............. एक उदिग्न चेहेर्याचा तरुणाने त्याच्या हाताला धरून त्याला वळवले होते. त्या तरुणाचे डोळे त्याच्या कपाळाकडे पहात होते आणि त्या तरुण, अधीर डोळ्यात त्याला त्याचे पिकले प्रतिबिंब दिसत होते आणि तो ज्याच्याबद्दल विसरूनही गेला होता, ते त्याच्या कपाळवर जन्मलेले प्रश्नचिन्हही....

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...