Thursday, February 3, 2011

जागरण

टक्क उघड्या डोळ्यात
साचलेला त्रासिक कंटाळा
आढ्याकडे बघून शिणलेल्या पापण्या
त्याहीपलीकडे येणाऱ्या दिवसाच्या
ओझ्याने झुकलेला जीव....

ही रात्र आणि दिवस वेगळी करणारी रेष असते कुठे
एकदा त्या रेषेवरच पोचायचं आहे
आणि आज आणि उद्या मधल्या
निराकार पोकळीत जीव रमवायचा आहे

डोळ्याखाली साचली आहेत जन्मतः मरण
पावलेली काही स्वप्ने
अस्तित्वाचे ठिसूळ अर्थ करपून जमा
झाले आहेत चेहऱ्याच्या राठ रेषांत
कवितांची थोटके पडली आहेत इतस्ततः
गाण्यांचे शिळे सूर खिडकीच्या जाळीत
थबकले आहेत

आकाश बदलतंय रंग
समोरची बिल्डींग आळोखे-पिळोखे देतीये
कंठ फुटतोय आसमंताला
उत्साहाच्या रतीबाला आधण आलंय

डाचतोय हलकासा आवाज
खुपतोय इवलासा प्रकाश
मी गच्च गुंडाळून घेतलंय पांघरूण
आणि केलंय माझ्याभोवती बीळ  
मी  वाट पाहतोय अंधाराची
काही न बोलता कुशीत सामावून घेणाऱ्या

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...