Skip to main content

Posts

Showing posts from February, 2011

प्रश्नप्राक्तन

मागचे किती दिवस तो सारा मुलुख भटकला होता. आधी बिनधास्तपणे कोणाशीही बोलत, गप्पा मारत आणि त्यानंतर चेहरा लपवत... एखाद्या घुबडासारखा तो दिवसभर एखाद्या सावलीशी पडून रहायचा. मग प्रकाशाचे दुवे निसटून गेले आणि ओळखीची शक्यता धूसर झाली कि तो परत रस्ता धरायचा. कुठे जाणार रस्ता हे त्याला ठाऊक नव्हता, पण तो आपलं वेगळेपण दर्शवू शकत नव्हता. आणि म्हणून तो लपत होता, पण चालत होता. कालची रात्र त्याने शहराच्या सीमेवर शेकोटी पेटवून काढली होती. मध्ये तहान लागली म्हणून तो उठला. समोर नदीच्या आरस्पानी पाण्यावर चांदणं तरंगत होतं. चंदेरी प्रकाशाचा एक वर्ख सार्या अस्तिवावर होता. काही क्षण त्याच्या मनात मुग्ध कविता पालवून आल्या. त्या कवितांच्या ओळी त्वचेच्या थरांशी येतायेत, मोकळ्या होण्यासाठी, उमटण्यासाठी सरसरतायेत अशा उत्फुल्ल जाणीवेच्या स्फोटात पाण्यावर तरंगणाऱ्या अभासाला स्पर्श करावा म्हणून तो वाकला आणि आपल्या प्रतिबिंबाला पाहताना त्याचा सारा आनंद विस्कटून गेला. कासवाने आपले हात-पाय आत ओढल्यावर एक निर्जीव दगडी कवच उरावं तशी ती दगडी कठोर जाणीव परत त्याला शरीरभर जाणवू लागली. मागचे रिकामे दिवस आणि त्याचा असंबद्ध…

जागरण

टक्क उघड्या डोळ्यात
साचलेला त्रासिक कंटाळा
आढ्याकडे बघून शिणलेल्या पापण्या
त्याहीपलीकडे येणाऱ्या दिवसाच्या
ओझ्याने झुकलेला जीव....

ही रात्र आणि दिवस वेगळी करणारी रेष असते कुठे
एकदा त्या रेषेवरच पोचायचं आहे
आणि आज आणि उद्या मधल्या
निराकार पोकळीत जीव रमवायचा आहे

डोळ्याखाली साचली आहेत जन्मतः मरण
पावलेली काही स्वप्ने
अस्तित्वाचे ठिसूळ अर्थ करपून जमा
झाले आहेत चेहऱ्याच्या राठ रेषांत
कवितांची थोटके पडली आहेत इतस्ततः
गाण्यांचे शिळे सूर खिडकीच्या जाळीत
थबकले आहेत

आकाश बदलतंय रंग
समोरची बिल्डींग आळोखे-पिळोखे देतीये
कंठ फुटतोय आसमंताला
उत्साहाच्या रतीबाला आधण आलंय

डाचतोय हलकासा आवाज
खुपतोय इवलासा प्रकाश
मी गच्च गुंडाळून घेतलंय पांघरूण
आणि केलंय माझ्याभोवती बीळ  
मी  वाट पाहतोय अंधाराची
काही न बोलता कुशीत सामावून घेणाऱ्या