Wednesday, December 29, 2010

संमेलन लक्षण समास

  इये मराठीचिये नागरी
  साहित्य असे नानापरी
  परी चर्चा घरोघरी
   असे संमेलनाची

   विचारती सामान्य जन
  काय प्रकार संमेलन
   काय त्याचे प्रयोजन
  सारेच दिग्मूढ

    चालीला हा मेळा  दरसाल
   आधी निवडणूक इरसाल
  मग अवतरे सोहळा विशाल
   अखिल भारतीय

 आधी ग्रंथदिंडी सोहळा
  गत अध्यक्षांचा आवळा
  नव-अध्यक्षांचा कोहळा
  अवघे दाटले कौतुक

  चिंतनाचा पडे सडा
  विचार लोळती गडबडा
 भाषेचा विराट गाडा
  करे आवाज जागेवरी

   जाणती मार्केट डिमांड
   प्रकाशन घोड्यावरी मांड
 शब्दांवर कुशल कमांड
  असे साहित्यपुंगव

   करती चर्चा घनघोर
   सर्व जीवांस लागला घोर
  भाषेचे वैभव थोर
  पण भविष्य काळवंडले

   कशी टिकवावी भाषा
  कशी वाढवावी भाषा
  संमेलनाचा अनुदानित तमाशा
  कसा पुढे चालणार   
  
  भेटती समदुखी मित्र
   चालती अनेक सत्र
  पावले वळती इतरत्र
  हेच संमेलन जीवांचे

   करती भेदक गर्जना
   गगनभेदी घोषणा
   भाषेच्या शील रक्षणा
   धावती कागदी सिंह

    ऐशी अगाध असे लीला
   खेळ संमेलन चांगला
   भाषेचा जीव खंगला
   घेई उभारी नवी

     साहित्यिक प्राणी आगळा
    पुस्तकी घेई नाना कळा
    नेत्यांचा लागला लळा
    लागली वर्णी उपर

    साहित्य जीवनाचे प्रतिबिंब
    राजकारण जीवनाचे अंग
    लाभला थोडा सत्ता संग 
   काय बिघडले एवढे
 
   असती काही बाणेदार
    साहित्याचे स्वतंत्र सुभेदार
   घालिती स्वयंस्फूर्त बहिष्कार
   आणि मार टीकांचा

   संमेलन असे ऐरावत
   वाटे निष्ठावंता खिरापत
   विरोधकांची नसे मुर्वत
   चाले प्रवास वर्षानुवर्ष

  संमेलन बहुप्रसवा नारी
  होती संमेलने राज्यभरी
  पण सर्वांहुनी भारी
   हेच खरे अखिल भारतीय

  विदेशी पोचली उडी
  ओळखली एन.आर.आय. नाडी
  संस्कृतीची शानदार गुढी
  उभारली सातासमुद्रापार

   लाभती भक्कम प्रायोजक
   आणि कल्पक संयोजक
  चालती कल्पना रोचक
  पत्रकार नोंदीती सहर्ष

   संमेलन महिमा अपार
   फुक्या झाला पार गार
   एवढा सोहळा रुबाबदार
   डोळा न पाहिला

   मराठीचे गाऊ शौर्य गान
  आले शब्दांत त्राण
   हातात घेतली वहाण
  फोडू मुस्काट अन्य भाषांचे

   करू अनुवाद, लिहू फिक्शन
   सीमा भागात घेऊ एक्शन
   जीवनाचे सर्वांग भक्षण
   आणि निर्मुया कविता

  हेच संमेलनाचे सार
   लोपला भाषीय अंधार
   साहित्यिकांनी दिला आधार 
  वेलू गेला वर भलताच 
  

वेगवेगळी दुःखे आणि पावसाळा

Tolstoy चं एक वाक्य आहे, ' Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way'. माझी आवडती कोट आहे.  ह्य...