Saturday, December 25, 2010

तमाच्या तळाशी दिवे लागलेले

 
सोकावलेल्या सुन्न दिव्यांच्या
क्षणात होती लखलख ज्योती
वार्यामधली अबलख गाणी
श्वासावरती निथळून जाती

दूर तमाच्या शहरामध्ये
प्रकाशटिंबे चमचमणारी
अंधाराचा खोल वारसा
पटलावरती उमटवणारी

धुंद जरासा मदिर गारवा
त्वचेस आले अस्थिर कंपन
गात्रांमध्ये सरकून जाई
कैक तृषांचे अपूर्ण मंथन

इथेच होता सापडलेला
नितळ स्पर्श अलवार मृण्मयी
इथेच संपून गेली होती
श्वासांमधली धून प्रत्ययी

स्मरणामध्ये उब नभाच्या
उन्ह कालचे मालवलेले
गारठलेली स्वप्ने निजली
तमाच्या तळाशी दिवे लागलेले

(प्रतिमा सौजन्य: http://www.sheltoweehikes.com/IMG_0776.jpg )

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...